डॉ. मनोज अणावकर

आपल्या घराचं नूतनीकरण करताना किंवा नवीन घर घेताना आपण ते घर अधिकाधिक सुंदर कसं दिसेल याविषयी बराच विचार करतो, पण ही सगळी केलेली सजावट आणि त्याचं सौंदर्य तोपर्यंतच टिकेल, जोपर्यंत घरात तडे, भेगा, पाण्याची गळती असे दोष नसतील. ‘आरोग्य असेल तर सौंदर्य टिकेल.’ हा नियम माणसाप्रमाणेच घरालाही लागू आहे. नवीन घर घेताना अथवा घराचं नूतनीकरण करताना सिरॅमिक टाइल्सचं फ्लोअरिंग, स्टेनलेस स्टीलची प्लम्बिंगची फिटिंग्ज, फॉल्स सीलिंग अशा बाह््य सौंदर्यावर आपण भर देतो, पण त्याचबरोबर इमारतीच्या किंवा घराच्या कामासाठी जे बांधकाम साहित्य वापरलं जातं, त्याचा दर्जा कसा पाहावा, याविषयी जर थोडी माहिती घेऊन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी केली, तर अनेक वर्षं टिकणारं घर मिळाल्यामुळे काही वर्षांमध्येच उद््भवणाऱ्या दुरुस्तीच्या खर्चात कपात झाल्यामुळे बचत होऊ शकते. त्यात सिमेंट, रेती आणि विटा यांचा समावेश असतो. घराचं नूतनीकरण करतानाही या वस्तूंची खरेदी जर आपण केली, तर बाजारात खरेदी करायला गेल्यावर दुकानदार देईल ते साहित्य घेऊन आपण बऱ्याच वेळा घरी येतो, पण ते साहित्य योग्य दर्जाचं आहे की नाही, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बांधकामाचा दर्जा ज्या गोष्टींवर अवलंबून असतो, त्यात बांधकाम साहित्याच्या दर्जाचाही प्रामुख्याने समावेश होत असतो. त्यामुळे या वस्तू विकत घेताना त्यांचा दर्जा कसा तपासून घ्यायचा, हे जाणून घेऊ या.

सध्याच्या युगात सिमेंट हा बांधकामातला एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक बनला आहे. बाजारात विविध प्रकारची सिमेंट्स असतात. यातला सर्वसाधारणपणे वापरला जाणारा प्रकार म्हणजे ‘ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट’ अर्थात ‘ओपीसी’. ‘कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ’ अर्थात दाब सहन करण्याच्या ताकदीनुसार या सिमेंटचे उपप्रकार आपण नेहमी ऐकतो, ते असे- ५३ ग्रेड, ४३ ग्रेड, वगैरे. यातलं ५३ ग्रेडचं सिमेंट सर्वसाधारणपणे वापरलं जातं. यातला ५३ हा आकडा, ते सिमेंट पाण्याबरोबर मिसळल्यानंतर २८ दिवसांनंतरची (ठ/े२) या एककातली त्या सिमेंटची ‘कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ’ दर्शवतो. ही झाली सिमेंटच्या ग्रेडविषयीची जुजबी माहिती, परंतु कसलीही तांत्रिक किंवा इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी नसलेला एक साधा ग्राहक म्हणून जेव्हा आपण सिमेंट विकत घ्यायला जातो, तेव्हा काय पाहावं, वापरण्याआधी त्याची साधी-सोपी परीक्षा कशी करावी, हे खाली दिलं आहे-

*   सिमेंटच्या बॅगवर छापलेली उत्पादनाची तारीख फार जुनी नसल्याची खात्री करून घ्यावी.

*   सिमेंटची बॅग उगडल्यानंतर त्यात सिमेंटच्या गुठळ्या दिसता कामा नयेत. तसंच त्याचा रंग हिरवट करडा असला पाहिजे.

*   आपला कोरडा हात सिमेंटच्या बॅगमध्ये घातल्यावर हाताला एक प्रकारचा गारवा किंवा थंडपणा जाणवला पाहिजे.

*   चिमूटभर सिमेंट बोटांमध्ये घेऊन घासलं असता ते मऊ लागलं पाहिजे. बोटांना खरखरीतपणा जाणवता कामा नये.

*   पाण्यानं भरलेल्या बादलीत मूठभर सिमेंट टाकलं असता, त्याचे कण पाण्यावर काही काळ तरंगले पाहिजेत.

बांधकामात नेहमी लागणारा दुसरा घटक म्हणजे रेती! या रेतीत बऱ्याचदा नैसर्गिकपणे चिकणमाती, बारीक गाळ किंवा धूळ मिसळलेली असते. असे पदार्थ जर अतिरिक्त प्रमाणात असतील, तर अशा रेतीपासून तयार होणारं प्लॅस्टर किंवा काँक्रीट मागाहून आकुंचन पावतं आणि मग तडे जाण्याची शक्यता असते किंवा त्याची सच्छिद्रता वाढू शकते. असं प्लॅस्टर लावलेल्या भिंतीवर जर टाइल्स बसवल्या, तर त्या निखळून पडायची शक्यता असते. तसंच ज्या भिंतीवर हे प्लॅस्टर लावलं आहे, त्याच्या मागच्या बाजूला अशा सच्छिद्र प्लॅस्टरमधून पाण्याची गळती अथवा पाझर होऊन मागच्या बाजूचा रंगाचे पापुद्रे सुटू शकतात. त्यामुळे चिकणमाती अथवा गाळ यांचं रेतीतलं प्रमाण हे २ ते ३ टक्क्यांपेक्षा अधिक असता नये. त्यासाठी नमुन्यादाखल थोडीशी रेती मोजपात्रात किंवा उभ्या काचेच्या ग्लासात घेऊन त्यात पाणी मिसळावं आणि त्याचं तोंड घट्ट बंद करून ते घुसळावं. मग त्याला धक्का न लावता ते काही काळ उभं करून ठेवावं. त्यात आधी रेती तळाला बसेल. मग त्यावर गाळ, धूळ इत्यादी बारीक पदार्थांचा थर जमा झालेला दिसेल. त्यावरून त्यांचं रेतीतलं प्रमाण कळू शकेल. (छायाचित्र १ पाहा)

घरात कुठलंही काम करून घेताना आपण टाइल्स, रंग किंवा इतर कलात्मक वस्तूंच्या खरेदीकडे विशेष लक्ष देतो, परंतु या वस्तूंच्या आतला जो गाभा, सिमेंट, रेती आणि विटांच्या साहाय्यानं तयार होत असतो, तो मुळात भक्कम असण्यासाठी, त्या वस्तूंच्या दर्जाकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बांधकामाचा दर्जा हा या गोष्टींच्या दर्जावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.

विटा विकत घेतानाही काही मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते असे-

०  विटा सर्व बाजूंनी नीट भाजलेल्या असाव्यात.

०  त्यांच्या कडा तुटलेल्या असता कामा नयेत.

०  विटांवर लहान-मोठे तडे असता नयेत.

०  एखादी वीट अर्धी तोडून तुटलेल्या बाजूनं बघितल्यावर तिची प्रत आणि पोत आतून एकसमान असले पाहिजेत.

०  विटेवर नखानं ओरखडा काढायचा प्रयत्न केला असता, ओरखडा उमटता कामा नये.

०  वीट २४ तास पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर तिच्या वजनाच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी तिनं शोषता कामा नये.

०  दोन विटा एकमेकींवर आपटल्या असता, खणखणीत आवाज यायला हवा.

०  साधारण एक मीटर उंचीवरून वीट खाली टाकली असता, तिचे तुकडे पडता कामा नयेत.

(सिव्हिल इंजिनीअर)

wanaokarm@yahoo.co.in