22 November 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : कपबशा, प्लेट्स आणि ठेवणीतली अडगळ

घरोघरी या कटलरी आणि क्रॉकरीच्या बॉक्सेसचा साठाच माळ्यांवर, कपाटांमध्ये करून ठेवलेला असतो.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

आल्यागेल्याला लागतं म्हणून खूप जण आल्यागेल्याची कटलरी, क्रॉकरी वेगळीच ठेवतात. एका अर्थी ही चांगली गोष्ट आहे. आलेल्या व्यक्तीचा पाहुणचार करण्यासाठी घरातले सर्वोत्तम ते वापरणे. भारतात अनेक जणांची कथा ही कष्टातून वर आलेल्या, आर्थिक स्थर्य हळूहळू मिळवत जाणाऱ्या लोकांची कथा असते. त्यामुळे, आहे त्यात काही गोष्टी काटकसरीने बाजूला काढून आल्यागेल्याला चांगले ते देणे, ही एक छान सवय आहे. परंतु कधी कधी त्याचा अतिरेक होतो कळत नकळत. म्हणूनच आल्यागेलेल्यालाच केवळ चांगले ते काढून ठेवणे आणि एरवी मात्र फुटक्या-तुटक्या गोष्टींनी आपले दिवस व्यापून टाकणे, अशीही सवय लागते. आपण कायमच फुटक्या कपात चहा प्यायचा, फाटक्या चादरीवर झोपायचे आणि आल्यागेल्यासाठी मात्र दोन तास ते दोन दिवसांसाठी सगळं भारीतलं वापरायचं, यालाही तसा अर्थ नाही. आपण आपल्यासाठीच तर कष्ट करतो नं! मग जे आपण आल्यागेल्यासाठी राखून ठेवलेलं असतं, त्यातल्या दर्जाचा काही हिस्सा आपल्याही दिमतीला जरूरच ठेवावा. आपलं रोजचं जगणं सुंदर करायचा तो एक प्रयत्न असू शकतो. आपल्यालाही फ्रेश वाटू शकतं चांगल्या गोष्टी वापरून. आपली आवडीनिवडीची पत सुधारत आणि उंचावत जाऊ शकते. घरातून बाहेर जाताना आपण चांगले कपडे घालून जातो. म्हणून घरात मात्र कसेही फाटकेतुटके कपडे घालून बसायची गरज नसते. आपल्या संपूर्ण अस्तित्वातच चांगल्या वस्तूंचा सुयोग्य वापर आपण आणू शकतो की, तसंच हेही!

तर, घरोघरी या कटलरी आणि क्रॉकरीच्या बॉक्सेसचा साठाच माळ्यांवर, कपाटांमध्ये करून ठेवलेला असतो. काही जण तर शोकेसमध्येसुद्धा या वस्तू सजावट म्हणूनच ठेवून देतात. कोणी जगभरातल्या वेगवेगळ्या प्लेट्सचे आपापल्या भिंतीवर आकर्षक प्रदर्शनच मांडतात. ते असतात फक्त आल्यागेलेल्याला. पाहुणे येतात तेव्हाच या गोष्टी खाली येतात. वापरल्या जातात. पाहुणे जायचा अवकाश, की या गोष्टी परत बॉक्सेसमध्ये पॅक करून माळ्यावर, कपाटांत जाऊन बसतात. कालांतराने आल्यागेलेल्याला ते काढायचासुद्धा कंटाळा येत जातो. ठेवणीतल्या म्हणून ठेवलेल्या वस्तू तशाच पडून राहतात. अनेकदा पडून पडून खराब होतात. त्यांचे रंग उडतात. टवके पडतात. काही वस्तू कमकुवत प्लॅस्टिकचे असतील, तर ते तडकत जातात. तरीही ते आपले माळे व्यापून असतात. कधी अचानक स्वच्छता मोहीम काढली, तर त्या सामान हलवाहलवीत काही गोष्टी तुटून जातात. त्यांचा पार भुगा झाल्याशिवाय या गोष्टी लोक टाकत नाही. भेट म्हणून पासऑन करायच्या किंवा आवर्जून विकत घेऊन भेट द्यायच्या वस्तूंच्या यादीमध्ये अशाच डिनर सेट्सचा, कपबशा सेट्सचा, इतर कटलरी वस्तूंचा मोठा वाटा असतो.

टप्परवेअरचे चौकाचौकात स्टॉल लागलेले असतात. ते विकणारे लोक ऑफिसांमध्येही जात असतात. एकाने घेतलं काही की दुसऱ्यावर नाक मुरडत का होईना, त्यातल्या त्यात काहीतरी खरेदी करायचं प्रेशर येतं. त्यातूनसुद्धा असे टप्परवेअर, डबेडुबे विकत घेतले जातात. ते मुळातच गरज ठरवून घेतलेले नसल्याने आधीचे डबेडुबे हद्दपार होत नाहीत, तोवर यांना विशेष रोजगार मिळत नाही घरात. किंवा कधी यांच्यामुळे आधीच्या बऱ्या वस्तू बाजूला टाकून यांचा वापर सुरू होतो. म्हणजे दोन्हीकडून जास्तीच्या वस्तू साठत जातात, बाजूला पडतात आणि पडून राहतात. मायक्रोवेव्हला चालणारी भांडी म्हणून विविध मॉल्समध्ये वस्तूंचा ढीगच्या ढीग पडलेला असतो. तिथूनसुद्धा अनेक वस्तू वापरू वापरू करत आणून ठेवल्या जातात. मायक्रोवेव्हला चालणाऱ्या अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या असतात. त्या कालांतराने अतिशय खराब दिसू लागतात. त्यात भाजलेल्या, गरम केलेल्या गोष्टी जरा जळाल्या की त्यांचे डाग त्या वस्तूंवर पडतात. तरीही आपण त्या तशाच वापरत राहतो. मग टूम निघते मायक्रोवेव्हसाठी प्लॅस्टिकच्या वस्तू टाकून काचेच्या वस्तू घ्यायची. म्हणजे सामानच सामान पुन्हा साठत जाते. आपला वापर नेमका किती आहे आणि काय काय आपल्याला अगदीच गरजेचं आहे, त्यानुसार स्वयंपाकघरात वस्तू येत नाहीत. त्या येतच राहतात सतत. कधी गिफ्ट रूपात, कधी आपली हौस म्हणून. काचेची भांडी हाताळायला, धुवायला विशेष लक्ष द्यावे लागते. मग आपल्याला हे जास्तीचे काम वाटायला लागते. परत त्या वस्तू बाजूला पडतात.

जसं काचेच्या भांडय़ांचं होतं, तसंच एकेकदा लोक घरातली सर्व भांडी मातीची असावी, या मिशनवर काम करायला लागतात. हा सगळा व्याप सांभाळायला घरात कोणी हौशी असेल तर ठीकच असते. परंतु रोजच्या धबडग्यात, कामाच्या धावपळीत या वस्तू वापरायला तितका वेळ आपल्याला देता येतोच, असं नाही. मग अशी सर्व समृद्ध अडगळ आपल्या घरात साचत जाते. नव्याने काही टूम निघाली की त्याही सर्व वस्तू आपल्याकडे येऊन पडतात. आल्यागेलेल्याला लागेल म्हणून, ते नकोश्या गिफ्ट्स पासऑन करणे, ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वस्तू विकत घेत जाणे अशा अनेक प्रकारांतून आपण घराचे कप्पे कप्पे वस्तूच वस्तूंनी भरून ठेवतो. एकदा या सगळ्याची झाडाझडती घेऊनच टाकू!

prachi333@hotmail.com

First Published on June 15, 2019 2:03 am

Web Title: article on cups plates
Just Now!
X