26 November 2020

News Flash

आली दिवाळी आली..

दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. बहुतेकांनी घराची साफसफाई सुरू केलीही असेल

(संग्रहित छायाचित्र)

ऋतुपर्ण मुजुमदार

rutuparna703@gmail.com

दिवाळी जवळ आली की कट्टर गृहिणी सावध होते. आले दिवस कामाचे, कंबर मोडण्याचे हीच भावना तिच्या मनात असते. पण त्याचवेळी ती कामाची रूपरेखा आखते प्लॅनिंग करते. आणि ऐन दिवाळीत घरावर सजावटीचा साज चढवते.

दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. बहुतेकांनी घराची साफसफाई सुरू केलीही असेल. दिवाळी आली की कलासक्त रसिक मन आनंदित होते. ते दिवे, रांगोळ्या, पणत्या हा सारा साज सजविण्यास सज्ज होते. पण कट्टर गृहिणी सावध होते. आले दिवस कामाचे, कंबर मोडण्याचे, पण त्याचवेळी ती कामाची रूपरेखा आखते प्लॅनिंग करते.

सगळ्यात आधी चार महत्त्वाचे नियम.

१- नको असलेलं घराबाहेर (declutter)

२- वस्तू दान करा (donate)

३- स्वच्छता (deep clean)

४- सजावट (decorate)

न लागणाऱ्या वस्तू, कपडे फेकणं सगळ्यात कठीण. या वेळेस काहीही घडू शकत. ‘माझी जिन्स तू का फेकली, आत्ताच्या आत्ता मला आणून दे.’ इथपासून ते ‘आमच्या वस्तू कशाला, आम्हाला पण फेका आता बाहेर..’ इथपर्यंत.. पण डगमगलं तर  संपलं. गेल्या काही महिन्यांत ज्या वस्तू वापरल्या नाहीत त्या यापुढेही वापरू अशी शक्यता नसतेच. त्यामुळे सगळ्यात आधी कपाटाचा आढावा घ्यावा. न लागणाऱ्या वस्तू एकीकडे कराव्यात. संपूर्ण कपाट रिकामे करून आवश्यक ते कपडे नीट  लावून घ्यावे. पुस्तक, चप्पल जोडेसुद्धा.. बिघडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू ई-वेस्टमध्ये टाकावे. अशा वस्तू अनेक संस्था घेतात.

घराची स्वच्छता करताना लक्षात ठेवा की क्रम नेहमीच वरपासून खालपर्यंत- म्हणजे आधी सीलिंग, मग पंखे, टय़ूब, खिडक्या असा असावा. सगळ्यात शेवटी फरशी.. खूप  चांगले क्लीनर  वापरावे.  म्हणजे मेहनत कमी लागते. सुरुवात नेहमीच बेडरूमपासून करावी. क्रम तोच.  सगळं स्वच्छ  झालं की थोडी सामानाची अदलाबदल करून बघावी. पडदे नेहमीच प्रेस करून लावावे. त्यानंतर बाथरूम, नळाच्या तोटय़ा, फरशीचे डाग व्हिनेगरने किंवा चांगल्या क्लीनरने काढावे.

हॉलमधल्या  सोफ्यावर खूप धूळ असते, वर्षांत एकदा तरी धुऊन घ्यावा. स्वयंपाकघरात असलेली सगळी कपाटं नीट पुसून नवीन लायनर  लावावे. खराब झालेल्या वस्तू बाहेर काढून, बरण्या स्वच्छ घासून घ्याव्या. बाहेरून नीट पुसून घ्यावे. सामानाची यादी करावी. फार न थकता हळूहळू अगदी कानाकोपरा लख्खं केला की सगळ्या पितळी  वस्तू ब्रासोने लख्खं करून  घ्याव्या. देवघर लाकडी असेल तर पॉलिश करावे. मार्बल असेल तर सौम्य ब्लिच वापरून  स्वच्छ  करावे. सगळ्यात शेवटी ड्राय बाल्कनी केली की झालं. असे  चमकलेले घर सुगंधीही हवेच

बाजारात खूप छान डिफ्युझर्स मिळतात. सुगंधी मंद दिव्यांनी उजळलेल्या घरात दिवाळी किती सुंदर साजरी  होईल ना. सण म्हणजे आणखी असतं तरी काय? त्या निमित्ताने सगळी बोचकी आवरली जातात, स्वच्छता होते घराची अन् मनाचीही. मग दिवे  उजळले की आयुष्य अगदी सुंदर होऊन जात नाही का?

घराची स्वच्छता झाली की यापुढील भाग म्हणजे  सजावट. पितळी  दिवे, फुले वापरून एखादा कोपरा देखणा करावा. तोरण तर सगळे लावतातच. दिवाळी म्हणजे रांगोळ्या, पणत्या, त्यात काही कमी  नको. दिवाळीत नवीन अभ्रे, गालिचा, नवीन  कुंडय़ा, एवढंच काय नवीन चहाचे कप काढले तरी मजा येते. जीवन रसिकतेने जगणे म्हणजेच खरे सण आणखी एक सुंदर गोष्ट  म्हणजे अभ्यंग स्नान. ती पहाट, ते गरम पाण्याने भरलेले घंगाळं, उटणं आईचे हात, ती पहाटेची अंघोळ अगदी अविस्मरणीय असते.

या वर्षी सगळ्यांनी निश्चय  करू या की धूर आणि प्रदूषणविरहित, हसरी, सुंदर  दिवाळी  साजरी करू यात. स्वच्छ आणि सुंदर घर म्हणजे मंदिर असतं.  तर मग लागा  तयारीला. Happy cleaning… दिवाळीच्या खूप शुभेच्छा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 12:19 am

Web Title: article on decorating the house on diwali abn 97
टॅग Diwali
Next Stories
1 ग्राहक कायदा की रेरा कायदा?
2 प्रस्तावित भाडेकरू कायदा
3 दिवाळी.. तारणहार सूट-सवलती
Just Now!
X