14 October 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : घराघरांत लटकलेल्या फ्रेम्स आणि लॅमिनेटेड प्रिंट्सची गर्दी !

आजकाल लॅमिनेशन करून वेगवेगळे फोटो, मंत्र, देवांची चित्रं/ प्रिंट्स, धार्मिक यंत्र वगैरे घरात कुठे कुठे लावून ठेवायचीदेखील एक टूम दिसते.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

आजकाल लॅमिनेशन करून वेगवेगळे फोटो, मंत्र, देवांची चित्रं/ प्रिंट्स, धार्मिक यंत्र वगैरे घरात कुठे कुठे लावून ठेवायचीदेखील एक टूम दिसते. सुरुवातीला त्या लॅमिनेटेड गोष्टी नव्या असतात, चकचकीत दिसतात. त्या कुठेही आणि कशाही खुपसून दिलेल्या असतात किंवा सरसकट सेलोटेप लावून फिक्स केल्या जातात. सेलोटेपसुद्धा भसाभस वापरली जाते. ती लावता लावताच काढायची वेळ आली तर जिथे ती लावली जाते, तिचा रंग उडवून, तिचा चिकटपणा मागे सोडूनच बाहेर काढली जाते. असं करत करत एकेका जागी एकेक लॅमिनेटेड फोटो विराजमान होतो.

सर्वत्र चिटकवून ठेवलेले स्टिकर्स, धूळ खात पडलेल्या लहानसहान शोभेच्या वस्तू यांच्याकडे जणू घरातलं ऑडिट करतोय, अशाच नजरेने पाहून साफसफाई करणं गरजेचं असतं अधूनमधून. तीच गोष्ट घराघरांतल्या फोटो फ्रेम्सबद्दलदेखील लागू पडते. आपण आणलेल्या फ्रेम्स तर असतातच भरपूर; पण लोक त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या अनेक पडीक फ्रेम्स आहेर म्हणून सहजच पास ऑनदेखील करत राहतात. या फ्रेम्स कोणी कौतुकाने खास बनवूनदेखील देतात. काही जण अशा निसर्गविषयक फ्रेम्स मार्केटिंगचा भाग म्हणून देत असतात. एखादा पॅनोरॅमिक फोटो असतो. झकास दिसत असतो; पण त्याखाली मात्र त्या त्या लोकांचे/संस्थांचे मोठाले लोगो, नावं छापलेली असतात. कोणाचे वैयक्तिक फोटो असतात. त्याखाली काही तरी जाहिरात असते. म्हणजे केवळ फोटो फ्रेम किंवा सुंदर देखावा म्हणून ते उरत नाही. तर कोणाची तरी त्या माध्यमातून जाहिरात करायचं साधन होऊन जातं. आपल्याला जर त्या निसर्गदृश्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर सकाळ, संध्याकाळ त्या फोटोच्या आजूबाजूच्या एखाद्या माणसाचे, त्याच्या संस्थेचे, एखाद्या कंपनीच्या नावाचेदेखील सतत दर्शन घेतल्यासारखेच होणार! काही जण याबाबत सजग नसतात; पण काहींना खरोखर सकाळी सकाळी कुठल्याशा बाबा-बुवांच्या नावाचे फोटो असलेले निसर्गचित्र नाही बघावेसे वाटणार. एखाद्याची ती आवड असली तरी घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला ते सतत डोळ्यांसमोर असलेलं नकोसं वाटू शकतं. म्हणूनच घरभर अशा फोटो फ्रेम्स, वेगवेगळी कॅलेंडर्स लावताना त्या-त्या आवडीपलीकडे आपण नेमकी कशाची जाहिरात कळत नकळत करत राहतो, तेदेखील बघावं लागतं. पुन्हा, कॅलेंडर्स तरी वर्षभराने लोक आठवणीने काढून बदलत राहतात. फोटो फ्रेम्स मात्र लटकलेल्याच राहतात, धूळ खात पडतात. कधी खाली पडल्या साफसफाईत, तर त्या तशाच लटकवून दिल्या जातात. त्यांची देखरेख होत नाही. नेमके कोणते सौंदर्यभान त्यातून आपण जपतोय, हे फारसं पाहिलं जात नाही.

आजकाल लॅमिनेशन करून वेगवेगळे फोटो, मंत्र, देवांची चित्रं/ प्रिंट्स, धार्मिक यंत्र वगैरे घरात कुठे कुठे लावून ठेवायचीदेखील एक टूम दिसते. सुरुवातीला त्या लॅमिनेटेड गोष्टी नव्या असतात, चकचकीत दिसतात. त्या कुठेही आणि कशाही खुपसून दिलेल्या असतात किंवा सरसकट सेलोटेप लावून फिक्स केल्या जातात. सेलोटेपसुद्धा भसाभस वापरली जाते. ती लावता लावताच काढायची वेळ आली तर जिथे ती लावली जाते, तिचा रंग उडवून, तिचा चिकटपणा मागे सोडूनच बाहेर काढली जाते. असं करत करत एकेका जागी एकेक लॅमिनेटेड फोटो विराजमान होतो. कालांतराने ते लॅमिनेशन निघून येते कोपऱ्याकोपऱ्याने. त्यात धूळ साठत जाते. वरून कुठून पाणी पडले तर ते आणखीन वाढत जाते, विद्रूप होते. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे, फोटो फ्रेम तरी एक वेळ पुसल्या जातात. या लॅमिनेटेड गोष्टी अगदीच पातळ असल्याने आणि कुठेही कशाही लावून ठेवलेल्या असल्याने एकदा का त्या लावल्या, की नंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. त्यात भर म्हणजे वेगवेगळ्या देवस्थानांच्या, संस्थांच्या अशा या लॅमिनेटेड प्रिंट्स विविध आकार-प्रकारांत असतात. कुठेही चटकन विकत घेतल्या जातात किंवा भेट मिळतात. एकदा त्या मिळाल्या की त्या टाकवत नाही आणि घरात त्यांना काही खास अशी जागाही नसते. किंवा त्या आवर्जून लावण्यासारख्या नसतात. मग त्या अशाच घरभर कुठे कुठे कागदपत्रांमध्ये, कपाटांमध्ये पडून राहतात. म्हणूनच या लॅमिनेटेड प्रिंट्स जेव्हा मिळतात, तेव्हाच त्या आपल्या कामाच्या नसतील तर चक्क नाही सांगून द्यावे आणि परत देऊन टाकाव्यात. किंवा ज्यांना त्या कामाच्या असू शकतात, अशा लोकांना त्या देऊन टाकाव्यात.

घरात सर्वत्र टांगून ठेवलेल्या फ्रेम्सवरदेखील अशीच एक नजर टाकावी. आपल्याला फार प्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या फोटो फ्रेमलासुद्धा लोक वर्षांनुवर्षे साफ करत नाहीत. त्यांना कायमस्वरूपी प्लॅस्टिकची फुले वाहून टाकली तर विचारायलाच नको! ती फुलं आणि त्या फोटो फ्रेम्स वर्षांनुवर्षांची धूळ आपल्या अंगावर झेलत राहतात. खोटय़ा फुलांची ही तऱ्हा. खरी फुलं वाहिली तर आणखीन वेगळीच तऱ्हा असते. एक तर, ती फुले चटकन वाळून जातात. ती वरचेवर बदलत राहावी लागतात. त्यात ती ओलसर असतात. ती फ्रेमला अथवा भिंतीला चिकटून बसू शकतात. त्यांचे रंग तिथे लागून तो भाग विद्रूप होऊ शकतो. मोठाले हार वाहिले असतील तर तेही वरचेवर बदलत राहावे लागतात. डेकोरेशनच्या किंवा प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा घातल्या असतील तर त्यांची अतिशय घाणेरडी अशी अवस्था कालांतराने होऊन गेलेली असते. त्यांचे रंग उडालेले असतात. तुटके आणि धागे लोंबकळत राहतात. झिरमिऱ्यांचे हार असतील तर कालांतराने त्यातील बारीक बारीक भाग हवेने उडून जाऊ लागतात. घरातल्या सर्व फोटो फ्रेम्स एकदा नजरेखालून घालून त्यांना साफसूफ केलं पाहिजे. त्या नीट सरळ टांगल्या पाहिजेत आणि त्या भिंतीवर लावताना जरा आजूबाजूच्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. ‘फ्रेमच फ्रेम’ असं करून ठेवू नाही ते दृश्य!

एकेका देवाचे किती फोटो आणि किती फ्रेम्स घरात कुठे कुठे टांगून ठेवावेत, याचाही जरा विचार करावा अधूनमधून. तुम्हाला ते कितीही प्रिय असले, तरी घरातल्या इतर सदस्यांना ते आवडते का, याचेही भान सुटलेले असते भक्तांचे. अशी जबरदस्तीची बटबटीत ‘फोटो फ्रेम भक्ती’ काय कामाची? नाही का! अनेकदा वेगवेगळ्या छोटय़ा मंदिरांमध्ये घराघरांतले बेवारस फोटो फ्रेमरूपी देव असेच आणून टाकून दिलेले असतात. आपल्या आराधनेची चाड ठेवून किमान नेमकं किती, काय आणि कुठे आपण टांगून ठेवणार आहोत, ते तरी स्वत:ला विचारावे. त्याची नीट देखभाल, स्वच्छता करावी. मुळातच या फ्रेम्स आणि लॅमिनेशन्स मिळाले म्हणून आणून ठेवण्यापेक्षा, उगाच तोच नकोसा आहेर पॅकिंग आणि वरचे नाव बदलून इतरांना पास ऑन करण्यापेक्षा तो मुळातच टाळता आला तर बरे! सौंदर्यदृष्टी अनेक लहानसहान बारकाव्यांमध्ये असते, ती अशी!

prachi333@hotmail.com

First Published on May 11, 2019 1:16 am

Web Title: article on framed and laminated prints in the house