26 November 2020

News Flash

कोकणातलं घर.. परिपूर्ण जीवनानुभव

नैसर्गिक वैविध्याने नटलेला कोकण हा एक आकर्षक आणि उत्तम पर्याय ठरत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा प्रभुणे

कामाच्या व्यस्त धावपळीपासून काही क्षण निवांत घालविण्यासाठी सेकंड होमची संकल्पना अलीकडे नावारूपास येत आहे. अशावेळी ते ठिकाण निसर्गरम्य असावं अशी प्रमुख गरज असते. नैसर्गिक वैविध्याने नटलेला कोकण हा एक आकर्षक आणि उत्तम पर्याय ठरत आहे.

‘दर्या किनारी इक बंगलो गो’.. किंवा ‘हा सागरी किनारा ओला सुंगध वारा’ ही अशी काही गाणी ऐकली की, समुद्राकाठी आपलं एखादं घर असावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते. पण निळ्याशार समुद्राचे सुख मुंबईत कुठे सापडणार? ही बाब काही अंशी खरी असली तरी, कोकणच्या भूमीत हे स्वप्न निश्चितपणे आकारास येऊ शकते. त्यामुळेच,अलीकडे सेकंड होमसाठी कोकण हा पर्याय ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागला आहे.

मुंबई आणि ठाणे येथील अनेक लोक रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, खेड आणि गुहागर तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याचा सेकंड होमच्या दृष्टीने विचार करू लागले आहेत. स्वच्छ सागरी किनारे, शुद्ध हवा आणि जोडीला निसर्गरम्य असे वातावरण या गोष्टींची ग्राहकाला भुरळ पडत आहे.

या संदर्भात अलीकडेच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणांमध्ये असे आढळून आले की, ठाणे, मुंबई आणि पुणे येथील लाखांहून अधिक लोक सेकंड होमसाठी कोकणच्या पर्यायाचा विचार करीत आहेत.

या मागचे एक कारण असेही सांगता येईल की, सतत कामाच्या धावपळीत व्यस्त असलेल्या लोकांना निवांत क्षणांसाठी गावाला जाऊन राहायची इच्छा असते . मग गावी जायचे असले की आधी काही महिने आरक्षण करा अथवा सण-समारंभाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु असं एखादं ठिकाण जिथे आवश्यक त्या सुविधाही मिळतील आणि गावी राहण्याचादेखील फिल येईल आणि मनात आले की निघता येईल, त्या दृष्टीने कोकण हा परिपूर्ण असा पर्याय आहे.

मुंबई- ठाणेकरांमध्ये कोकणची असलेली ही लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक नामवंत विकासक देखील आपले प्रकल्प इथे सुरू करण्यास उत्सुक आहेत. निसर्गरम्य असे हे कोकण जितके निसर्गाच्या जवळ आहे तितकेच ते आवश्यक अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी देखील परिपूर्ण आहे. त्यामुळेच निवांत क्षणांसाठी मुंबई -ठाणे येथून उत्कृष्ट असा सेकंड होमचा पर्याय म्हणून कोकण ही एक उत्तम बाजारपेठ ठरत आहे.

त्याचबरोबर, असेही काही लोक आहेत, ज्यांच्या कोकणात जमिनी असून ते स्वत: त्या जमिनीवर वेगवेगळे गृहप्रकल्प विकसित करीत आहेत. त्यामुळे मागणी तसा पुरवठा ही बाजारपेठेची प्रमुख गरज पूर्ण होताना दिसत आहे. शिवाय यामुळे गावातील लोकांनादेखील विविध स्वरूपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

मुळातच कोकण हा निसर्गरम्य प्रदेश आहे, त्यामुळे इथले हे निसर्गरम्य वातावरण तसेच टिकवून ठेवण्यासाठी विकासकदेखील तितकेच प्रयत्नशील असतात. परिणामी, रेन हार्वेस्टिंग, घन कचरा व्यवस्थापन आणि सोलार ऊर्जा प्रकल्प अशा अनेक गोष्टींचा समावेश ते आपल्या प्रकल्पामध्ये करत आहेत.

कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील रमणीय असा प्रदेश आहे. इथली उत्तर किनारपट्टी ही डहाणू- बोर्डीपर्यत तर दक्षिणेकडे वेंगुल्र्यापर्यत पसरलेली आहे. म्हणजेच, कोकण हा प्रांत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे या चार ही जिल्ह्यांबरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे या परिसरातून कमीत कमी वेळेत या ठिकाणी पोहोचता येते. त्या शिवाय मुंबई-गोवा एनएच १७ या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय,भविष्यात नवी मुंबईचा विमानतळ आणि बेलापूर जेट्टीचा मार्ग तयार झाल्यावर फक्त मुंबई – ठाणेकरांनाच नाही तर परदेशातून येणाऱ्या मंडळींनादेखील थेट कोकणात जाणे सहज सुलभ होणार आहे.

रत्नागिरीतील दापोलीचा विचार करता मुंबईहून जवळ असलेल्या दापोलीमध्ये सेंकडहोम घेण्यास अनेकजण पसंती देत आहेत. दापोलीमध्ये पर्यटनस्थळं, देवस्थानं आणि सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना भूलविणारा असाच आहे. त्यामुळे इथे सेकंडहोमचं स्वप्न उराशी बाळणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.

भौगोलिकदृष्टय़ा संपन्न इतकीच कोकणची ओळख पुरेशी नाही, तर सांस्कृतिक आणि वास्तुरचनेच्या दृष्टीनेदेखील तो तितकाच वैभवशाली आहे. स्वच्छ, सुंदर रमणीय असे समुद्र किनारे, आंबे, सुपारी, काजू, फणसांच्या बागा, सर्वत्र पसरलेली हिरवाई आणि त्याचवेळी प्राचीन महत्त्व जपणारी विविध मंदिरे, किल्ले, घरे- वाडे, गरम पाण्याचे झरे अशा मुबलक गोष्टी येथे पाहावयास मिळतात. याशिवाय आध्यात्मिक वारसा या प्रदेशाला लाभल्यामुळे, मनाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा अनुभव येथे घेता येतो. पावसाळा, होळी ,गणपती या काळात कोकणात राहण्याचा अनुभव म्हणजे स्वर्गसुख असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरू नये. या सर्व कारणांमुळे कोकण हे महाराष्ट्राच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते.

विविध गोष्टींचा एकच पर्याय-

अलीकडच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये वीकेण्डच्या काळात लोकांना एकाचवेळी अनेक गोष्टी करून बघायच्या असतात. जसे कुणाला निसर्गाच्या कुशीत निवांत बसायचे असते तर कुणाला गडांवर फिरायचे असते, तर कुणाला आध्यात्मिकदृष्टय़ा अनुभव घ्यायचा असतो तर कुणाला शेती करण्यामध्ये रस असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येकाची आवड वेगळी असते. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही जर सेकंड होमचा पर्याय शोधत असाल तर, हे सर्व पर्याय तुम्हाला कोकणांमध्ये सहज उपलब्ध होतात.

त्याचबरोबर अलीकडे तांत्रिकदृष्टय़ादेखील कोकणचा विकास होत आहे. दळणवळणाची मुबलक साधने उपलब्ध होत असल्यामुळे कमी कालावधीत तुम्हाला खूप काही गोष्टी करता येऊ शकतात. समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त हिंडणे, ट्रेकिंग करणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, काजू-आंबे यांपासून तयार होणाऱ्या विविध प्रकल्पांना भेटी देणे अशा अनेक गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवायास मिळतात. कोकणसारख्या निसर्गरम्य ठिकाणी ताजी फळे- भाज्या यांची मुबलकता असल्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा आपसूकच

स्वीकार होतो. परिणामी, एक आरोग्यदायी जीवनशैली जगण्याची सवय अंगवळणी पडते. गेल्या काही महिन्यांच्या काळात तुम्हाला लक्षात आले असेल की, प्रदूषणविरहित आणि आरोग्यदायी वातावरणात राहणे हे किती आवश्यक आहे ते. अशा ठिकाणी तुमचे सेकंड होम असेल तर खऱ्या अर्थाने जीवनाचा समरसून अनुभव घेता येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:20 am

Web Title: article on home in konkan perfect life experience abn 97
Next Stories
1 निवासी जागेचा व्यावसायिक वापर
2 घरा आनंदाचे तोरण!
3 दसरा सजावटीची सकारात्मक ऊर्जा
Just Now!
X