17 July 2019

News Flash

तीन खांबांची ओटी

आमचं हे गाव, काहीसं झाडीत लपलेलं, वळणावळणाच्या, नागमोडी रस्त्याच्या बाजूला डोंगर टेकडय़ांमध्ये वसलेलं एक छोटं कोकणी खेडं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संजय साळवी

कोंकणातल्या गुहागर तालुक्यातलं आमचं ते छोटंसं गाव ‘जामसूत.’ तसं कोकणातलं म्हणजे कुणाला वाटेल, समुद्रकिनारीचं, नारळपोफळीच्या झाडात लपलेलं एखादं गाव असावं, पण तसं आमचं हे गाव समुद्रकिनारी वगैरे नाही. समुद्र आमच्या गावापासून तसा २५ – ३० मैल लांब. आमचं हे गाव, काहीसं झाडीत लपलेलं, वळणावळणाच्या, नागमोडी रस्त्याच्या बाजूला डोंगर टेकडय़ांमध्ये वसलेलं एक छोटं कोकणी खेडं आहे.

इथे आपले पूर्वज शेदोनशे वर्षांपूर्वी येऊन कसे वसले असतील? हे गाव त्यांनी कसं वसवलं असेल?  इथली श्रद्धास्थानं कशी उभारली असतील?  आणि मुळात म्हणजे या गावात सारेच आमचे भाऊबंद.. सारेच एकाच आडनावाचे. याचा अर्थ म्हणजे काही भावाभावांनी येऊन इथे वस्ती केली असावी, आणि आपापली घराणी रुजवली असावी.

मला या साऱ्याचं खूप कुतूहल होतं. याविषयी बोलताना काही विचारताना आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या गावाचा भूगोल आणि अर्थातच आपल्या भाऊबंदांचं आणि गावाचे नागरिकशास्त्र याची माहिती घेता अनेक रंजक आणि सुरस गोष्टी समजत असत. सांगणारा जर गोष्टीवेल्हाळ असेल आणि त्याला जर बरक्या फणसाची आणि रसाळ आंब्याच्या गोडीची वाणी असेल तर आमच्या या कोकणात असंख्य गुपितं दडलेली आहेत, जी कुणाही रसिकाला पुन:पुन्हा ऐकावीशी वाटतील.

तर आमच्या या गावातली घरं बघताना आणि त्या विषयीच्या गोष्टी ऐकताना अनेक जुने आणि वयस्कर गावकरी आम्हाला आमच्या आजोबांविषयी मोठय़ा आत्मीयतेने सांगत. त्यांची धडाडी, उद्योगी वृत्ती, त्या काळी म्हणजे १९१०-१५ साली गावाबाहेर पडून मुंबईतून व्यापाराचा जम बसवताना उभारलेल्या व्यापारी मालाच्या वखारी आणि त्यावरून पडलेलं त्यांचं वखारवाले हे नाव आणि म्हणून आमचं घर हे वखारवाल्यांचं घर, असं म्हटलं जाई. तशी गावात वेगवेगळ्या  नावानं ओळखली जाणारी घरे होती. हवालदारांचं घर, फौजदारांचं घर. पण ती सर्व घरं पाहताना मला जाणवलं होतं ते एक म्हणजे प्रत्येक घराला क्वचित पडवी असते, पण ओटी तर असतेच असते. या सर्व घरांच्या ओटय़ा बहुतेक एका खांबाच्या असत तर क्वचित दोन खांबांच्या असत. म्हणजे ओटी मोठी असेल तर दोन खांब आणि लहान असेल तर एका खांबाची असे. मात्र आमच्या म्हणजे वखारवाल्यांच्या घराला मात्र लांबलचक पडवी आणि चक्क एक दोन नव्हे तर ‘तीन खांबांची ओटी’ होती. आणि तेच वखारवाल्यांच्या घराचं वैशिष्टय़ होतं. गावात इतर कुणाचंही नसलेलं असं ते तीन खांबांच्या ओटीचं, ऐसपैस मोठं घर होतं. आमची सर्वात मोठी आत्या म्हणजे ज्यांना आम्ही ‘आक्का’ म्हणत असू त्या कुटुंबात सर्वात मोठय़ा होत्या. त्यांनी या घराविषयी विचारल्यावर सांगितलेला त्या घराच्या निर्मितीमागचा इतिहास ऐकल्यावर मला तो लिहून काढावासा वाटला आणि त्यासाठीचाच हा माझा लेखप्रपंच.

आमचे आजोबा म्हणजे लक्ष्मणराव साळवी हे पूर्वी या आत्याच्या म्हणजे जामसूत या गावी राहत नव्हते. त्यांची सासूरवाडी तिकडे रत्नागिरी बंदराजवळील मिऱ्या येथील होती. लग्नानंतर सासूरवाडीकडच्या मंडळींनी या आपल्या तरतरीत तरुण जावयाला रत्नागिरीसारख्या मोठय़ा बंदर शहराजवळच राहावयास सांगितले होते. आणि त्याचं कारणही तसं रास्तच होतं. कारण आमचं गाव हे तसं फार आडमार्गावर होतं. एकतर त्या काळी म्हणजे शे-सव्वाशे वर्षांपूर्वी रस्ते आतासारखे गावोगाव झालेले नव्हते आणि वाहतुकीची पुरेशी साधनेही नव्हती. म्हणून लेकी-जावयाची सोय पाहणाऱ्या सोयऱ्यांनी त्यांना रत्नागिरीजवळच राहावयास सांगितले आणि आमच्या आजोबांनीदेखील हरहुन्नरीवृत्तीने रत्नागिरीसारख्या मोठय़ा बंदर शहराजवळ राहणे पसंत केले. गावंढय़ा गावात राहून निव्वळ भातखेताची शेती करण्यापेक्षा शहरात काही उद्योग व्यवसाय करावा असा त्यांचा मानस होता.

असेच एकदा सासूरवाडीच्या गावच्या लोकांची गावातील काही घरं बांधण्याविषयी गावकीची एक बैठक चालू होती. वयाने तरुण असलेले आणि वृत्तीने उत्साही असलेले आमचे आजोबादेखील त्या बैठकीत सहभागी झालेले होते. घरबांधणीबाबत विचारविनियमय करताना काही अननुभवी लोक अयोग्य सूचना करत होते. आमचे आजोबा उद्योग-व्यवसायानिमित्ताने चार गावं फिरणारे होते. अंगी उद्यमशीलता असल्यामुळे निरीक्षणशक्ती उत्तम होती. त्यांनी उत्तमोत्तम बांधलेली घरे बघितलेली होती. आणि म्हणून त्या बैठकीत त्यांनी त्या अयोग्य सूचना करणाऱ्यांना अडवले आणि घर बांधणीच्या योग्य पद्धतीबाबत ते सांगू लागले. आपल्याला भर बैठकीत अडवले जाते असे वाटल्याने त्या सासूरवाडीकडच्या काही ग्रामस्थांनी, ‘‘पाहुण्यांनी या विषयी काही बोलू नये.. त्यांनी त्यांच्या गावी त्यांना हवे तसे घर बांधावे. इथे आम्ही ठरवू तसे घर बांधू,’’ असे बजावले. आजोबा, आपल्या योग्य त्या सूचनांचा विचारदेखील ही मंडळी करीत नाहीत हे पाहून त्या बैठकीतून स्वाभिमानाने ‘‘मी माझ्या गावी तुम्हाला सरस असे घर बांधून दाखवतो.’’ असे ठणकावून सांगून तेथून तडक निघाले आणि हे आडमार्गावरचे आमचे गाव त्यांनी शोधून काढले. गाव शोधून तर काढले, पण आपल्या वाडवडिलांचे घर पाहता त्यांना ते त्याहीपूर्वी अनेक वर्ष अगोदर अतिशय साध्या पद्धतीने बांधलेले व कुणीच राहत नसले कारणाने, कोकणातला मुसळधार पाऊस, ऊन-वारा अंगावर झेलत कसेबसे उभे असलेले ते घर पाडून नव्याने बांधावेसे वाटले. ते जुने पडायला आलेले घर पाडून आणि ती सर्व जागा साफसूफ करून त्यांनी आता नवे घर बांधण्यासाठीचा सरळसपाट असा जमिनीचा तुकडा तयार करून ठेवला आणि ते पुढील तजविजीसाठी रत्नागिरीला परतले.

स्वाभिमानाने सासूरवाडीच्या ग्रामस्थांच्या बैठकीतून, माझ्या गावी सरस घर बांधून दाखवतो असे ठणकावून आल्यामुळे ते उत्तम घर कसे बांधावे याचा विचार करू लागले. कारागिरांची जमवाजमव करता त्यांना अतिशय कसबी असे काही सुतार भेटले. ते जामसूत या आडमार्गावरच्या त्या छोटय़ाशा गावात येऊन काम करायला आणि आपले कसब दाखवायला तयार झाले. आजोबांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला असावा. आजोबांनी बहुधा त्यांना चांगली दामदुप्पट मजुरीदेखील देऊ केली असावी.

त्या काळी घराचा मुख्य आराखडा म्हणजे सागवानी लाकडाचे मजबूत खांब आणि त्यावर पेरलेले आढे. त्यासाठी आजोबांनी अतिशय उत्तम प्रतीचे मजबूत असे सागवानी लाकडाचे भले थोरले ओंडके बैलगाडय़ांवर टाकून जामसूत गावी आणले. त्या काळी लोखंड सिमेंट नव्हते. त्यामुळे सारी भिस्त या मजबूत लाकडी सांगाडय़ावरच असे. त्या कसबी सुतारांनी त्यासाठी सागाचे ते मोठमोठे ओंडके तासले. आजोबांनी सर्वसाधारणपणे घर बांधणीसाठी सर्वत्र जी साधी रचना केली जात असे तसे न करता. घरासाठी भला रुंद असा चौरस आणि जमिनीपासून उंच असा चौथरा गवंडय़ांकरवी बांधून घेतला. पण त्यासाठी त्यांना हवा तसा कठीण काळा दगड मात्र त्या परिसरात मिळाला नाही. आणि म्हणून जोत्यासाठी मिळतील ते दगडगोटे ठासून घराचा पाया घातला. आता त्या पूर्वाभिमुखी घराचे जोते बांधून तयार झाले. जोत्यासमोर मोठे अंगण ठेवले. त्या अंगणातच सुतारांचे सारे सुतारकाम सुरू झाले. अंगणापासून अदमासे दोन फूट उंचीवर घराची जवळजवळ आठ फूट रुंद आणि चाळीस फूट लांबीची पडवी करण्यात आली. पडवीपासून पुन्हा दोन फूट उंचावर रचण्यात आले ते घराचे मुख्य जोते. जसे अंगणातून एका मोठय़ा दगडी पायरीने पडवीवर चढता येई आणि पडवीतून पुन्हा दोन, नीट रचलेल्या दगडी पायऱ्यांनी चढता येई, आमच्या त्या प्रसिद्ध ओटीवर. या पायऱ्यांसाठी आणि ओटीसाठी मात्र चांगला दगड पाथरवटांकडून तासून घडवून आणण्यात आला होता. मधोमध मोठी ओटी, तिच्या उजवीकडे एक खोली, जिला बाळंतिणीची खोली म्हणत, तर डावीकडे तशीच अजून एक खोली, तिला कोठीची खोली म्हणत. ओटीवरून त्या बाळंतिणीच्या खोलीलगत अतिशय मजबूत अशा सुमारे आठ इंच रुंदीच्या नक्षीदार महिरपी काढलेल्या सागवानी चौकटीवर आणि दणदणीत रुंद उंबरठय़ावर पितळी कडय़ा आणि भरीव टोकेरी टोप्या असलेला नक्षीदार चौकोन असलेला दरवाजा बसवण्यात आला. आता या आमच्या घराची शान असणाऱ्या ओटीवर पाथरवटांकडून चांगले घडवून घेतलेले घंटेच्या घाटदार आकाराचे, पण चारी बाजूने धार काढलेले आणि पायाशी वळणदार वेढणी काढलेले खांबांच्या आधाराचे अतिशय मजबूत असे तीन दगड, मूळ जोत्याच्या दगडी किनारीवर बसवण्यात आले.  मूळ दरवाजातूनच आत गेल्यावर माजघर, त्याच्या उजव्या बाजूला अजून एक खोली, तिथेच माडीवर जाणारा लाकडी जिना. माजघराच्या पूर्वेकडच्या कोपऱ्यात देवघर. त्या पुढे डाव्या बाजूला स्वयंपाकघर, पण ते माजघरातून एक पायरी उतरून जावे लागेल अशा पातळीवर, आणि त्याही पुढे मावळतची म्हणजे पश्चिम दिशेची पडवी. जशी घरात प्रवेश करतानाची चाळीस फूट लांब पडवी तशी ही पाठीमागची पडवी. ओटी, माजघर, बाळंतिणीची खोली, डाव्या बाजूंची कोठीची खोली; यावर होता तो लाकडी फळ्यांचा माळा आणि त्यासाठी ओटीवरचे ते मानबिंदू असणारे तीन सुबक आणि मजबूत खांब. आणि आतील आवश्यक ते इतर आधारावरचे खांब त्यावर उभारण्यात आलेला तो कडीपाट. आणि त्यावर तो माळा. माळ्यावर पुन्हा जरा कमी रुंदीचे, पण मजबूत असे खांब आणि त्याला नीट टेकू दिलेले आणि कोनासांदीत बसवलेले इतर आधाराचे लाकडी खांब. त्यावर बसवलेले लाकडी छप्पर. असा सारा मजबूत लाकडी सांगाडा त्या सुतारांनी कोने, कप्पे, अढय़ा, सांदी सपाटी यामध्ये इतका चपखल आणि फसवून बसवला होता की त्यानंतर शेसव्वाशे वर्ष तो तसूभरही हलला नव्हता.

बाकी कोकणातल्या खेडवळ शिरस्त्याप्रमाणे घराच्या सर्व भिंती मापाच्या होत्या. त्यामुळे दीड दोन फूट रुंदीच्या भिंती होत्या. इतक्या रुंदीमुळे त्या भिंतीत अनेक ठिकाणी चौकोनी आणि डोक्यावर निमुळते असलेले कोनाडे काढण्यात आलेले होते. साऱ्या भिंती लाल तांबडय़ा मातीने लिंपलेल्या होत्या. जमीन मातीची धोपटलेली आणि शेणाने सारवलेली असे. भिंती मापाच्या म्हणजे मळलेल्या मातीचे मोठमोठे चौकोनी मापं एकावर एक रचलेले असे असत. या भिंती आणि आढय़ांच्या लाकडांमध्ये चार-पाच इंचांचे अंतर ठेवलेले असे. धूर बाहेर जावा म्हणून असावे किंवा मातीच्या भिंतीमधून किडे, वाळवी आढय़ाच्या लाकडाला लागू नये म्हणून असावे.

छप्परावर मंगलोरी कौले बसवलेली होती. छप्पर दोन पाखी असल्यामुळे माळ्यावरील छप्पर उंच होते. माळ्यावरच्या भिंतीला छोटी खिडकी होती. माळ्यावर मधोमध उभे राहता येईल इतकी छताची उंची होती. तिथे आमच्या घराण्यातल्या मुलांची लग्ने झाल्यावर आढय़ाला बाशिंग बांधायची प्रथा होती. म्हणजे पुढील काळात मुले मुंबईला राहायला गेली आणि त्यांच्या मुलांची मुंबईत लग्ने झाली तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जोडीने गावी येताना, नवऱ्यामुलाला लग्नात बांधलेले बाशिंग नीट जपून गावी आढय़ाला बांधण्यासाठी आणावे लागे. जणू तो एक महत्त्वाचा कुळाचारच होता. तर असे ते घर आजोबांनी अगदी सढळ हाताने खर्च करून बांधले होते. मनापासून आणि मनाजोगती बांधली होती ती तीन खांबांची ओटी. तीवरील ते कोनाडे आणि भिंतीत बसवलेल्या टोकाला बाळमुठीसारख्या असणाऱ्या आणि बाकदार तासलेल्या लाकडी खुंटय़ा. घरातही भिंतीवर ठिकठिकाणी होत्याच, पण पडवीतही या खुंटय़ा आणि कोनाडे होते. बाळंतिणीच्या खोलीच्या भिंतीला बाहेरील बाजूला असणारा पडवीतला कोनाडा तर आमच्या धाकटय़ा आत्याला चांगलाच स्मरणातला होता. ती सांगे की, ती शाळेतून आली की तिची चप्पल त्या कोनाडय़ात ठेवायची. ती लाडकी होती म्हणून तिची चप्पल अशी उंचावर कोनाडय़ात ठेवायची. इतर कुणाची अशी चप्पल वर ठेवायची शामत नव्हती. अजूनही ही आमची आत्या आता इतकी वयस्कर झाली तरी गावी गेल्यावर पडवीतल्या त्या कोनाडय़ाजवळ गेल्यावर ती तिथे चप्पल ठेवत असे ते अगदी कालपरवाच्या आठवणीसारखी सांगते. गावातले आमचे वयस्कर भाऊबंद सांगायचे.. ‘‘तुमचा आजा काय असातसा माणूस नव्हता. फार दिलदार होता. या घराच्या घरभरणीला त्याने गावातल्या प्रत्येकाला पोशाख आणि टोपी दिली होती. बायकांना लुगडीचोळी देऊन आपल्या भाऊबंदांचा सन्मान केला होता. घरभरणीचा तो दिमाखदार सोहळा, ते गावजेवण, त्या भाऊबंदांच्या तृप्त होऊन उठणाऱ्या पंक्ती आणि नंतरची ती रात्रभर चालणारी भजनं. सांगणारे हरखून जात.. स्वाभिमानी आजोबांनी सासुरवाडीच्या ग्रामस्थांना ठणकावल्याप्रमाणे ते भले मोठे चौसोपी घर बांधले आणि ते निव्वळ वखारवाल्यांचे घर न राहता ‘तीन खांबांच्या ओटीचे’ घर म्हणूनही गावात ओळखले जाऊ लागले, कारण तशी मोठी ओटी असणारे दुसरे घर नव्हते. असे ते आमचे ‘वखारवाल्यांचे घर’.

पुढेआमचा एक चुलत भाऊ अचानक गावी जाऊन राहू लागला, त्याची बायको एक मुलगा आता घराला आधार झाले आणि आजोबांनी मोठय़ा जिद्दीने बांधलेले ते घरदेखील त्यांना आधार झाले. आमच्या चुलत भावाला त्या घरात राहता राहता त्याच्या सुटलेल्या भिंती, खचलेलं जोतं आणि जवळजवळ १०० वर्षे उन्हापावसात तग धरून राहिलेलं, पण आता मात्र धीर सुटू लागलेलं ते मातीच्या भिंतींचं घर खुणावू लागले. थोडंफार दुरुस्त करून बघितलं.. शाकारून बघितलं, पण भलेमोठे ऐसपैस घर त्या छोटय़ामोठय़ा दुरुस्तीला बधणारं नव्हतं. तेव्हा चुलत भावाने ते घर पाडून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव मांडला. नवे घर बांधायचे म्हणजे खर्चही तसाच येणार होता. सारी जमवाजमव करता प्रत्येकी वर्गणी ही काढावीच लागणार होती. आता सर्वापुढे उभ्या ठाकलेल्या व्यवहाराला पाहून नात्यांमधला गोडवा घाबरून दूर कोपऱ्यात उभा राहिला. पण आजोबांच्या आशीर्वादाने सारे सुरळीत झाले.

घर बांधले जात असताना शेजारच्या घराच्या पडवीत दिवस काढले, सारे हाल सोसून ते घर त्याने बांधून काढले. जुन्या घराचे सागवानी लाकडी खांब, तुळया, वासे, रिपा सारं सारं सोडवताना अलीकडचे कारागीर थकून गेले. मातीच्या भल्या रुंद भिंती पाडताना गवंडी दमून गेले, पण दमला नव्हता तो आमचा चुलत भाऊ.. कोण जाणे, त्यांच्याही अंगात ती आजोबांची जिद्द अवतरली असावी.

आणि घर बांधून झाले. आता काकी भाऊ वहिनी आणि त्यांचा मुलगा सारे त्या नव्या घरात  राहू लागले. साऱ्यांनाच नवे घर बघण्याची उत्सुकता लागली होती. जमेल तसे जो तो गावी चक्कर टाकून नवे घर बघत होता, कौतुक करत होता. आणि मग माझेही सहकुटुंब गावी जाणे झाले. डोळ्यांसमोरून जुने घर हटत नव्हते आणि डोळ्यांसमोर दिसत असणारे नवे घर.. मी पाहत राहिलो. नवे घर सुबक आणि छोटे होते. काळानुरूप गरजेनुसार आटोपशीर होते. मी जुन्या घराच्या खुणा शोधत नव्या घरासभोवती फिरत होतो.. आणि तेवढय़ात मला अंगणाच्या एका टोकाला कुंपण भिंतीवर ठेवलेली ती भक्कम दगडी ओटींवरल्या खांबांची बैठक दिसली.

एकदम मला आजोबांच्या काळतालं कुणी भेटल्यासारखं वाटलं. आता सांजावू लागलं होतं.  मी त्या दगडी बैठकांजवळ गेलो. काळजाच्या आतल्या आपुलकीने मी त्यांना स्पर्श केला. दिवसभराच्या उन्हाने तापलेला त्यांचा तो गरम स्पर्श मला जणू जिवंत असल्यागत जाणवला. मी डोळे मिटून त्यांना हात लावून मनोमन नमस्कार केला.  मला एकदम आजोबांच्या पायाला हात लावून नमस्कार केल्यासारखे वाटले. माझ्या डोळ्यांतल्या पाण्याचे थेंब नकळत त्या दगडी बैठकांवर पडले.. त्या गरम दगडांवर ते झटकन् सुकूनही गेले. मला एकदम आजोबांच्या पायाला हात लावून नमस्कार केल्यासारखे वाटले. माझ्या डोळ्यांतल्या पाण्याचे थेंब नकळत त्या दगडी बैठकांवर पडले.. त्या गरम दगडांवर ते झटकन् सुकूनही गेले. मला एकदम वाटून गेलं, आजोबांचा स्पर्श झालेले आणि त्यांच्या अभिमानाचे खांब पेलणारे ते बैठकीचे मजबूत घडवलेले दगड आपण आपल्या घरी घेऊन जावे. शहरी घराच्या बाल्कनीत नीट ठेवावे आणि नित्य त्यांना वंदन करावे. मी सरसावलो आणि ते कुंपण भिंतीवर ठेवलेले दगड हलवायचा प्रयत्न करू लागलो.. ते तसूभरही हलत नव्हते.. आजोबांच्या स्वाभिमानासारखेच ते अढळ आणि निश्चल होते.

sanjaysalvi28@gmail.com

First Published on March 2, 2019 1:57 am

Web Title: article on jaamsut villege