News Flash

स्वयंपाकघरातील प्रकाश योजना

काही जणांकडे गावाहून वर्षभराचं धान्य येतं अशांनी जागा नसेल तर वर छतापर्यंतच्या उंचीची कपाटं करायला हरकत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. मनोज अणावकर

आजच्या महिला या त्यांच्या करिअरबद्दल अधिक सजग झाल्या आहेत. घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. पूर्वी महिलांचा दिवसाचा बराचसा काळ स्वयंपाकघरातच जायचा. लोणची, मसाले, पापड अशा अनेक जिनसा निगुतीनं घरच्या घरीच करून त्या बरण्यांमध्ये भरून त्यावर कापडी आवरणं गच्च झाकून फडताळांमध्ये त्या वपर्यंत रचून ठेवायच्या. मग गरज लागेल तेव्हा घरातल्या कोणा पुरुषाला किंवा मुलांना हाक मारून उंच स्टुलावर चढून बरण्या काढून घ्यायच्या. त्या काळी या पद्धतीने काम करणं शक्य होतं. पण आता सकाळच्या दीडदोन तासांमध्ये जेवणाचा सगळा व्याप उरकून घराबाहेर पडायचं असतं. मदतीसाठी कोणाला हाका मारायला वेळही नसतो आणि बऱ्याचदा घरातली इतर माणसंही या वेळी घाईतच असतात. अगदी मुलंसुद्धा शाळा-कॉलेजला नाहीतर क्लासला गेलेली असतात. तेव्हा घाईच्या वेळेत सगळं हाताशी पटकन सापडणं गरजेचं असतं. तसंच सध्या शहरांमध्ये एकमेकांना खेटून इमारती उभ्या असतात. काही ठिकाणी स्वयंपाकघराच्या खिडकीलगतच रस्त्यावर महापालिकेनं लावलेल्या झाडांमधून किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये बिल्डरांनी लावलेल्या झाडांच्या माध्यमातून शक्य तितका निसर्ग निर्माण करायचा जो प्रयत्न केलेला असतो, त्यामुळे स्वयंपाकघरात दिवसासुद्धा काळोख जाणवतो. अशा काळोखी खोल्यांमध्ये काम करताना वस्तू आणि जिनसा शोधणं जिकिरीचं होतं. जरी या गोष्टींच्या जागा ठरलेल्या असल्यामुळे सरावानं त्या ठिकाणी हात जात असला, तरी मीठ, मसाले, आणि इतर जिनसा योग्य प्रमाणात जेवणात पडण्यासाठी त्या काढून घेत असताना, भाज्या निवडून त्या चिरताना तिथे पुरेसा प्रकाश असायला हवा. खोलीत प्रकाश योग्य प्रमाणात येत असला, तरी कपाटांची आणि त्यांच्या दरवाजांची दिशा ही जर प्रकाशाला सामोरी जाणारी नसेल, तर कित्येकदा खोलीत प्रकाश चांगला असूनही किचन कॅबिनेट्समध्ये मात्र काळोख असतो. तसंच स्वयंपाकघरात एकूणच दिवसा काय किंवा रात्री काय पुरेसा प्रकाश असेल, तरच स्वयंपाक करताना प्रसन्न वाटेल. तसंच स्वयंपाकघरात जे फर्निचर आहे, त्याचं सौंदर्यही उठून दिसलं पाहिजे. त्यामुळे स्वयंपाकघरातल्या प्रकाशाचं व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे.

नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी गॅसची शेगडी शक्यतो स्वयंपाकघराच्या खिडकीखाली येईल असं पाहावं, म्हणजे शेगडीवर थेट प्रकाश पडेल. ते शक्य नसेल, तर शेगडीवर आपली सावली पडणार नाही अशा प्रकारे खिडकीपासूनचं शेगडीचं अंतर ठेवून खिडकीला काटकोनात शेगडी ठेवावी. मीठ, मसाले वगरे स्वयंपाकाच्या जिनसा असलेली स्वयंपाकघरातली कॅबिनेट्स शक्यतो खिडकीला काटकोनात करावीत आणि त्याला काचेचे दरवाजे करावेत. म्हणजे दरवाजे उघडले तरी खिडकीतून येणारा प्रकाश दरवाजांमुळे न अडता तो थेट कपाटाच्या आतल्या भागापर्यंत पोहोचू शकेल. खिडकीच्या उंचीच्या वर असलेल्या कपाटाच्या भिंतीवर जागा शिल्लक असली, तरी तिथे अगदी छतापर्यंत जाणारी कपाटं बसवू नयेत. कारण त्या भिंतीवर खिडकीतून येणारा उजेड पडू शकत नसल्यामुळे तिथे काळोख असतो.

हे झालं नैसर्गिक प्रकाशाबद्दल. आता कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे ते पाहू. खोलीत किती तीव्रतेचे दिवे बसवायचे ते खोलीच्या आकारावर ठरवावं. म्हणजेच मोठय़ा आकाराच्या खोल्यांसाठी जास्त तीव्रतेचे दिवे लागणार. त्याचबरोबर खोलीतल्या रंगांची छटा जर उजळ असेल, तर तुलनेने कमी तीव्रतेचे दिवे चालू शकतील. पण जर खोलीत गडद छटा वापरलेल्या असतील किंवा कॅबिनेट्ससाठी वापरलेला सनमायका किंवा पॉलिश जर गडद रंगाचं असेल, तर जास्त तीव्रतेचे दिवे खोलीत बसवावे लागतील. त्यामुळे खोलीतली काळोखी कमी होण्याबरोबरच हे फर्निचर उठूनही दिसेल.

काही जणांकडे गावाहून वर्षभराचं धान्य येतं अशांनी जागा नसेल तर वर छतापर्यंतच्या उंचीची कपाटं करायला हरकत नाही. पण मग एखादी टय़ूबलाइट किंवा एलईडी दिवा बसवताना त्याचा प्रकाश वपर्यंतच्या कपाटाच्या भागात पोहोचेल, अशा पद्धतीने ते दिवे बसवावेत.

स्वयंपाकघरात प्रकाशयोजना करताना लक्षात घ्यायच्या मुख्य मुद्दय़ांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या खोलीत दिवे कुठल्याही प्रकारचे वापरले तरी प्रकाश खोलीत सर्वत्र सारखा आणि संपूर्ण खोलीत पसरलेला हवा. ओटा, सिंक इथं काम करताना कॅबिनेट्सच्या किंवा इतर वस्तूंच्या सावल्या पडता कामा नयेत, अशा प्रकारे दिव्यांची जागा ठरवणं गरजेचं आहे. ओटा आणि सिंक यांच्यावर थेट प्रकाश पाडणारे दिवे बसवावेत. स्वयंपाकघरातल्या कॅबिनेट्समध्ये किंवा कपाटांमध्ये शक्य असल्यास आतल्या बाजूलाही दिवे बसवावेत. म्हणजे त्यांचे दरवाजे उघडल्यावर आत झाकोळल्यासारखं वाटणार नाही. तसंच क्रॉकरी वगरे ठेवलेल्या कपाटांमध्ये समोरच्या बाजूने काचेचे दरवाजे लावून त्यात जर स्पॉट लाईट बसवले, तर त्या क्रॉकरीची एक वेगळी शोभा दिसेल. शक्यतो या खोलीत पांढरा प्रकाश देणाऱ्या टय़ुबलाईट्सचा किंवा एलईडी दिव्यांचा वापर करावा. त्याने विजेचीही बचत व्हायला मदत होते आणि पांढऱ्या प्रकाशात मनाला एक प्रकारची प्रसन्नता वाटते. बऱ्याचदा स्वयंपाकघरातच देवघर असतं. अशा वेळी खोलीत देव असल्यामुळे संध्याकाळी आपण त्या खोलीत काम करत नसलो, तरीही आपण देवाकडे दिवा असावा म्हणून त्या खोलीतला दिवा लावून ठेवतो. त्याबरोबरच बऱ्याचदा

कुकर लावून आपण बाहेरच्या खोलीत टीव्ही बघायला जाऊन बसतो. तेव्हाही आपण या खोलीत दिवा लावून ठेवतो. त्यामुळे विजेचा काहीसा अपव्यव होतो. पण म्हणून काय देवाच्या खोलीत दिवा ठेवायचा नाही की, कुकर गॅसवर असताना खोलीतला दिवा काढून टाकायचा? छे, या दोन्ही गोष्टी मनाला पटणाऱ्या नाहीत. पण यावर उपाय म्हणजे, आपण जर या खोलीतल्या दिव्याला इलेक्ट्रनिक डिमर स्विच बसवला,

तर दिवे मंद करून आपण खोलीबाहेर जाऊ शकतो. यामुळे खोलीत प्रकाशही राहील आणि कमी प्रकाश असल्यामुळे विजेची बचतही होईल.

शेवटी स्वयंपाकघरात काम करताना प्रसन्न वाटायला हवं, हे महत्त्वाचं. कारण घरातली स्त्री, हे जशी अन्नपूर्णा असते, तशीच गृहलक्ष्मीही असते आणि स्वयंपाकघर हे एक प्रकारे तिचं मंदिरच असतं. त्यामुळे ती जर प्रसन्न असेल, तरच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.

anaokarm@yahoo.co.in

(इंटिरिअर डिझाइनर आणि स्पेस मॅनेजमेंट कन्सल्टंट)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:30 am

Web Title: article on kitchen lighting abn 97
Next Stories
1 मुद्रांक शुल्क सवलतीत मुदतवाढ होईल का?
2 गृहनिर्माण संस्था : निवडणूक संभ्रम कायम
3 माझ्या स्वप्नातलं घर!
Just Now!
X