कविता भालेराव

आजकाल घराचे इंटिरियर करताना बऱ्याच लोकांचा कमीतकमी फर्निचर करण्याकडे कल असतो. कमीतकमी, पण उपयुक्त आणि सुंदरही! यामुळे घरात वावरायला जागा राहते. आधीच घरं लहान आणि खूप फर्निचर, वस्तूंचा भरणा असल्यास मग ते घर अजूनच लहान वाटते. मुलांना खेळायला जागाही राहत नाही आणि खूप फर्निचर असल्यामुळे अंगावर येणाऱ्या भिंती, सूर्यप्रकाशाचा अभाव, कोपऱ्यात जमणारी आणि साफ न करता येणारी धूळ यांमुळे आपण त्रस्त होतो.

लहान जागा पुरत नाही म्हणून मोठे घर घेणे हे काही जणांच्याच आवाक्यात असते,  पण बाकीच्यांचे काय? सगळ्यांना हे शक्य नाही. मग ते लहानसे घर कसे सजवावे यासाठी आपणच काही गोष्टी ठरवाव्या लागतात.

गरजेनुसार सामान ठेवणे.

फर्निचर हे आपल्या रूमनुसार बनवून घेताना ते उपयुक्त तर हवेच, पण सुबकही हवे. आजकाल या दोन्ही गोष्टी लक्षात घेवून आपण फर्निचर बनवू शकतो. छोटय़ा घरासाठी किंवा मोठय़ा घरातील सर्वात छोटय़ा रूमसाठी आपण फोल्डिंगचे किंवा जागा वाचवणारे अर्थात स्पेस सेव्हर फर्निचर बनवून घेऊ शकतो. जसे- बेड, स्टडी टेबलचे डायिनग टेबल करणे, इत्यादी जादूचे वाटणारे फर्निचर आपण करून घेऊ शकतो. हे फर्निचर जादूचेच वाटते, कारण एका वस्तूतून दुसरी वस्तू बाहेर येते.

आपण बघुया की प्रामुख्याने कुठले फर्निचर  हे स्पेस सेव्हर आणि आणि ते सहजच उपलब्ध होऊ शकते.

सोफा कम बेड –  सोफा कम बेड आपण हॉल तसेच एखाद्या छोटय़ा बेडरूममध्येही ठेवू शकतो. दिसताना सोफाच दिसतो. जेव्हा झोपायचे असेल तेव्हा त्याचा बेड बनविता येतो. पूर्वीही सोफा कम बेड होते, पण ते खूपच जड होते. शिवाय त्यावर असलेल्या गादीची रचना अशी होती की त्यात गॅप असायची. त्यामुळे पाठीला त्रास होत असे. ते ओढताना फारच कष्ट पडायचे.

आता नवनवीन तंत्रज्ञान वापरून हे बेड बनवले जातात. सर्व वयोगटातील माणसे अगदी सहजपणे सोफ्याचा बेड किंवा बेडचा सोफा करतात. लहान घरात त्या तुमच्या साइजनुसार आपण या प्रकारचा सोफा बनवून घेऊ शकतो.

सेंटर टेबल – थोडं आश्चर्य वाटेल की सेंटर टेबलमध्ये काय नवीन? मटेरियल आणि डिझाइन बदलले की छान दिसेलच आणि छोटे बनवले की जागा कमी लागणारच आहे. हे बरोबरच आहे, पण याचाही वेगवेगळा वापर करू शकतो. जसे- थोडे उंचीला कमी टीपॉय घेतले तर त्याचा वापर खाली बसून जेवायला होतो. याशिवाय काही सेंटर टेबल खाली स्टूल किंवा पुफी ठेवायची जागा असते. त्यामुळे डायिनग टेबलसाठी जर जागा नसेल तर हे सेंटर टेबल डायिनग टेबलचे काम करते. काम झाले की स्टूल परत आत सरकवून द्यायचे, म्हणजे पसारा होत नाही. आणि खूप लोक आले की बसण्यासाठीही याचा वापर होतो. काही सेंटर टेबलला हायड्रॉलिक फिटिंगज् असतात. त्यामुळे त्याची उंची थोडी वाढवता येते. आणि काम झाले की परत बंद करून आपण त्याच्या मूळ डिझाइन आणि साइज ठेवून हे वापरू शकतो. पटकन उचलता येतील असे टेबलही महत्त्वाचे. वर वर अगदी शुल्लक वाटणाऱ्या वस्तू आपण छान डिझाइन केले तर फार उपयुक्त ठरतात.

सेटी/ओटा मन (ottoman) – लिव्हिंग रूममध्ये आपण अशा पद्धतीचे सिटिंग बनवून घेऊ शकतो. ज्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि त्याचा बसण्यासाठीही वापर करता येऊ शकतो. सेटी पूर्ण कुशनचीही बनवू शकतो. याशिवाय आपण टॉप फक्त कुशन आणि बाकी वेगळे मटेरियल असेही बनवून घेऊ शकतो. जिथे जागा कमी आहे तिथे आपण बसायला वेगळी गादी बनवून घेतली आणि सिटिंग जर का बेसिक मटेरियलमध्येच ठेवली तर आपण याचा वापर सेंटर टेबल म्हणून पण करू शकतो.

डायिनग टेबल – आजकाल डायिनग टेबल ठेवायला जागा असते, पण बऱ्याचदा ती फारच लहान असते. आणि पाहुणे आले की टेबलवर सगळ्यांना बसून जेवणे हे अवघड होते. खूप पाहुणे आले की टेबल कमीच पडते, पण चार लोकांच्या घरात सहा जणांना जेवायची वेळ आली तर मग टेबल मागे- पुढे करावे लागते. आणि एकत्र जेवणाचा आस्वाद घेता येत नाही. जर का आपण फोल्डिंग टेबल केले असेल आणि जास्त लोक जेवायला असतील तर फोल्डिंगची बाजू वर उचलून आपण टेबलची लांबी आणि रुंदी वाढवू शकतो. अशावेळी डिझाइन फारच विचारपूर्वक करावे लागते नाहीतर ते टेबल बॉक्ससारखे वाटते.

आजकाल काही फिक्स्चर मिळतात, ज्यामुळे आपण सायडिंग टेबल टॉप बनवून घेऊ शकतो. जसे मोठे करण्याच्या वेळी टेबल टॉप ड्रॉवरसारखे जागी असते तिथून ओढले की लांब होते आणि काम झाले की परत आत सरकवून देता येते. यात आपण छान डिझाइन तयार करू शकतो.

जागा अगदी लहानच असेल तर भिंतीवर फोल्ड करता येईल असे डायिनग टेबल बनवणे उपयुक्त ठरते. भिंतीवर असलेल्या बॉक्सला टेबल तयार झाल्यावर आपल्याला एक छान स्टोअर मिळते ज्यात आपण लोणचं, जॅम, मीठ अशा पदार्थाच्या बरण्या ठेवू शकतो, म्हणजे सारखे उठायला नको.

फोल्डिंग बेड – या प्रकारच्या बेडला मर्फी बेडही म्हणतात. डबल बेड, सिंगल बेड- जो आपण फोल्ड करू शकतो आणि अगदी सहजच. म्हणजे दिवसभर खोली मोकळी मिळते. शिवाय जागा नसेल तर फक्त झोपण्यापूर्वी बेड ओढला की झाले. यातच गादी ठेवायची सोय असते. म्हणजे थोडक्यात गादी सकट बंद होतो आणि उघडतो. त्यामुळे परत गादी कुठे ठेवायची हा प्रश्न येत नाही. या प्रकारच्या बेडला बॉक्स करावा लागतो कारण त्याचे फिटिंग त्यात फिट होते आणि गादी सकट आपण तो फोल्ड करू शकतो. आपण जर का सिंगल बेड आडवा बनवला तर फोल्डिंग बेडच्या वरच्या जागेचा आपण छान वापर करून घेऊ शकतो. जसे- बुक स्टोरेज, छोटे बंद कपाट. आपण आपल्या सोयीप्रमाणे या जागेचा वापर करून घेऊ शकतो. फोल्डिंग बेड आणि सोफा असेही बनवता येते. जिथे एकाच रूममध्ये सोफा ठेवायचा आणि रात्री तीच रूम झोपायला वापरत असू तर या पद्धतीच्या फर्निचरचे ऋ्र३३्रल्लॠ बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर करून हे युनिट बनवू शकतो.

साइड टेबल कम स्टूल – कधी कधी जागा इतकी कट टू कट असते की बेडच्या शेजारी साइड टेबल ठेवायला पुरेशी जागा नसते, पण रात्री पाणी, मोबाइल ठेवायला जागा हवी म्हणून आपण जर का सिंपल चेअर किंवा स्टूल जर का व्यवस्थित बनवून घेतले तर त्याचा वापर रात्री झोपताना साइड टेबल म्हणून करता येतो.

रूम डिव्हायडर – कधी कधी एकाच रूममध्ये आपण वेगवेगळ्या जागा तयार करतो जसे लिव्हिंग रूममध्ये डायिनग. अनेक लोकांना ओपन डायिनग रूम आवडत नाही, पण ते बंद केले तर फारच कमी जागा राहते आणि वेळ प्रसंगी हॉल लहान पडतो. अशा वेळी रूम डिव्हायडर फार उपयोगाला येतात. याचा आपण छान वापर करून घेऊ शकतो. शोभेच्या वस्तू ठेवायला, पुस्तके ठेवायला अर्धे बंद अर्धे खुले.. असे सुंदर डिझाइन बनवून आपण घराची शोभा वाढवू शकतो. काही बेडरूम लांबीला फारच मोठय़ा असतात. तिथेही आपण याचा वापर करून एका बाजूला टीव्ही आणि दुसऱ्या बाजूला ड्रेसिंग अशी रचना करू शकतो. आपल्या जागेनुसार याचा वापर करू शकतो.

फोल्डिंग इस्त्री टेबल –  आजकाल घरीच इस्त्री करतात, पण त्याचे टेबल ठेवायला पुरेशी जागा नसते. तेव्हा आपण भिंतीला फोल्ड होईल असे टेबल बनवून घेऊ शकतो. त्याचा वापर आपण स्टडी टेबल म्हणूनही करू शकतो. लॅपटॉप ठेवूनही काम करू शकतो.

फोल्डिंग कटिंग बोर्ड – किचनमध्ये याचा छान वापर होतो. ओटा लहान असेल तर भाज्या चिरायला जागा नसते. अशा वेळी आपण एक ट्रे बनवून त्याला ड्रॉवरसारखे फिट करून भाज्या चिरण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. पाहिजे तेव्हा ओढा नाहीतर आत ढकलून द्या, अशी रचना करू शकतो.

अगदी महत्त्वाच्या आणि खूप जागा लागणाऱ्या या फर्निचरला आपल्याला पाहिजे तसे बंद करता येते आणि परत उघडून वापरता येते आणि तेही अगदी सहज आणि सोपे. आता घर लहान म्हणून नाराज न होता आपण जरा वेगळ्या पद्धतीने घर सजवूया. मोठय़ा घरासाठी जेवढे जास्त बजेट ठरवले असेल त्यापेक्षा फारच कमी बजेटमध्ये तुम्हाला तुमचे घर हे सर्व सोयींनी युक्त असे बनवणे आणि सुंदर करणे हे आपल्याच हातात आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करून आपण टेंशन फ्री राहूया..

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com