26 February 2020

News Flash

वस्तू आणि वास्तू : ताटं, वाटय़ा, तवे, चमचे!

आपल्या घरातली जुनी स्टीलची ताटं एकदा नजरेखालून घाला. त्यांच्या कडा बघा. या कडा अनेकदा खालीवर झालेल्या असतात.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

अनेकदा आपल्या घरात वेगवेगळ्या कारणांनी अनेक डिशेस जमा होत राहतात. आहेरात भेट म्हणून आजकाल स्टीलच्या वस्तू कमी मिळत असतील; परंतु स्वयंपाकघरातील विविध वस्तू नेटवरून मेगा सेलमध्ये, मॉलमधील किचन वेअरच्या आऊटलेटला जाऊन खरेदी करायचं प्रमाणदेखील वाढलेलं आहे. ती ती वस्तू चटकन आकर्षकरीत्या समोरच दिसते, ती हाताळता येते हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे, आपला ‘मॉडर्न’ वगैरे बनायचा एक प्रयत्न असेही फॅन्सी किचन वेअर वापरायला लागून सुरू होत असतो, अशी ग्राहकाला गरज निर्माण होत जाते. ही गरज इतर घरांमध्ये बदलत जाणाऱ्या किचन सेट्समुळेही आपल्याला बदलायला उद्युक्त करत असते.

भाग ६

आजच्या लेखात घराघरांतल्या ताटं, वाटय़ा, पातेली, तवे, कढया, चमचे, पळ्या यांची झाडाझडती घेऊ या. एकतर, भारतातल्या अनेक घरांमध्ये जसजशी आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे, तसतशी स्टीलची ताटं लोकांना डाऊन मार्केट वाटू लागली आहेत. त्यामुळे स्टीलच्या ताटांची सोय, त्यांना ठेवायला लागणारी थोडी जागा, ते हाताळण्यातली सोय, स्वच्छ करण्यातली सोय.. हे सर्व मुद्दे थोडे बाजूला सारूनदेखील लोक स्टीलच्या ताटांना हद्दपार करायला तयार असतात. अर्थात, ज्याची त्याची आवड हा मुद्दा आहेच. फक्त बदलत्या ट्रेंडवर आणि स्वयंपाकघरात वाढत जाणाऱ्या वस्तूंच्या संख्येवर काही भाष्य करण्यापुरताच हा संदर्भ वापरला आहे. कोणत्याही मटेरिअलचं ताट वापरलं तरी घरातली एकूण ताटे, आल्या- गेल्याला लागेल असं करत ठेवलेलं सामान, त्या ताटांची मूलभूत स्वच्छता आणि एकूणच ती वापरण्यातला अ‍ॅस्थेटिक सेन्स या सर्वाचा विचार करता येतो. अनेकदा आपल्या घरात वेगवेगळ्या कारणांनी अनेक डिशेस जमा होत राहतात. आहेरात भेट म्हणून आजकाल स्टीलच्या वस्तू कमी मिळत असतील; परंतु स्वयंपाकघरातील विविध वस्तू नेटवरून मेगा सेलमध्ये, मॉलमधील किचन वेअरच्या आऊटलेटला जाऊन खरेदी करायचं प्रमाणदेखील वाढलेलं आहे. ती ती वस्तू चटकन आकर्षकरीत्या समोरच दिसते, ती हाताळता येते हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे, आपला ‘मॉडर्न’ वगैरे बनायचा एक प्रयत्न असेही फॅन्सी किचन वेअर वापरायला लागून सुरू होत असतो, अशी ग्राहकाला गरज निर्माण होत जाते. ही गरज इतर घरांमध्ये बदलत जाणाऱ्या किचन सेट्समुळेही आपल्याला बदलायला उद्युक्त करत असते. काही लोकांकडे मदतनीस मावशींना स्वच्छ करायला सहज टाकता येईल आणि त्यांच्याकडून वरचेवर फुटणार नाहीत, अशा गोष्टी रोजच्या वापरासाठी ठेवायचा एक अलिखित नियम असतो.

आपल्या घरातली जुनी स्टीलची ताटं एकदा नजरेखालून घाला. त्यांच्या कडा बघा. या कडा अनेकदा खालीवर झालेल्या असतात. त्यांना पोचे पडलेले असतात. त्या कडा कुठे फाटलेल्याही असतात. आकार बदललेल्या कडांच्या मागे, खालच्या बाजूने अन्नपदार्थ चिकटून राहायला लागतात. ते वेळीच धुतले गेले नाहीत, तर तिथे काळपट थर जमा होत राहतात. अनेक स्टीलच्या ताटांच्या डिझाइन्समध्ये काही तरी चित्रं ताटाच्या दर्शनी भागात कोरलेले असतात. त्यांच्या कडा फॅन्सी केलेल्या असतात. या दर्शनी भागाच्या खालच्या बाजूने मात्र लहान लहान खड्डे त्या ताटाला पाडलेले दिसतात. या जागांमध्येही नेहमीच्या वापराच्या ताटांमध्ये भरपूर चिकट थर जमा झालेले असतात. असे थर आणि काळपट डाग वाढत गेले की आपल्याला त्या वस्तू खराब दिसायला लागतात. मग त्या डाऊन मार्केटदेखील वाटायला लागतात आणि आपण नवीन मटेरियलच्या प्लेट्स आणतो. त्यात प्लॅस्टिक, पोस्रेलीन, मेलामाईन, काच, वगरेंपासून बनलेल्या प्लेट्सची भर पडते. यांच्या साफसफाईचे, त्यांच्यावरील नक्षी साफसफाईमुळे निघून न जायचे वेगळे नियम असतात. ते आपण पाळतोच असे नाही. सरसकट तारेच्या, नायलॉनच्या घासणीने याही प्लेट्स घासल्या जाऊ लागतात. त्यातील काहींवर हळूहळू चरे पडायला लागतात. कुठे तडे जातात. त्या तडांमध्ये काळपट रेषा तयार होत जातात. हळूहळू त्या वाढत जातात. परत आपल्याला तो सेट जुना वाटायला लागतो. म्हणजे, नवीन खरेदी होण्यासाठी आणखीन एक कारण यातच जन्माला आलेलं असतं. काचेचे कप फुटून त्यांचे तुकडे तुकडे होत नाहीत, तोवर ते जसे घराबाहेर चटकन पडत नाहीत, तसंच या प्लेट्सचं होऊन जातं. त्यांचे टवके उडाले, कडा वेडय़ावाकडय़ा झाल्या, त्यांच्यावर ओरखडे येऊन त्यात चिकट थर जमा झाले तरी ते असेच पडून राहतात. आपली नेमकी गरज काय आहे, घरात किती लोक राहतात, त्यात पाहुणे-रावळे साधारण किती असतात, असा विचार करून स्वयंपाकघरात मोजक्याच गोष्टी आणल्या जात नाहीत. म्हणूनच तिथे असलेल्या अनेक जास्तीच्या वस्तू पुरेपूर वापरल्या देखील जात नाहीत. कारण कोणत्याही वेळी तुमच्याकडे जास्तीचे काही तरी असलेल्या वस्तूंना रिप्लेस करणारे काही तरी असतेच असते.

घरातल्या विविध आकारांच्या वाटय़ा आणि पातेली यांचंही असं ऑडिट केलं पाहिजे. ताटांच्या, ताम्हणाच्या, पातेल्यांच्या कडा साध्याशा चिमटय़ाने आणि एखाद्या लहानशा बत्त्यानेसुद्धा एकसमान करता येतात. भांडय़ांचा गेट अप तर त्याने वाढतोच, परंतु भांडी धुवायला देखील सोयीचे होते. अगदी थरावर थर साचले, आकार बिघडले, खोलगट झाले, हॅन्डल्स तुटले तरी घरातले तवे वापरतच राहणार, असा जणू पक्का निर्धार केला आहे की काय, असे वाटायला लावणारे तवे घरोघरी दिसतात. एरवी एकदम हाय फाय जीवनशैली असेल तरी तव्यांच्या बाबत मात्र ती दिसून येत नाही. त्यांचं वरचं कोटिंग निघून गेलेलं असतं. तव्याच्या मध्यभागी खोलगट भाग उष्णतेने तयार होतो. त्याच्या कडांना तेलकट पदार्थाचे थरावर थर साचलेले असतात. ते अक्षरश: पटाशीने खरवडूनही चटकन निघत नाहीत. तरीही आपण असे तवे घरात वापरत असतो. एकदा त्यांच्याकडेही लक्ष देऊन ते वापरण्याजोगे असतील, तर ते स्वच्छ करावेत किंवा सरळ मोडीत द्यावेत. अनेक चमचे, पळ्या यांचेही आकार पार बिघडलेले असतात. त्यांच्या खाचाखोचांमध्ये वापरून वापरून काळपट डाग पडलेले असतात. तिथेही थर तयार होतात. ते टोकदार वस्तूनेच काढावे लागतात. वरचेवर अशी नजर टाकून या वस्तू स्वच्छ केल्या, वापरात ठेवल्या तर नवीन वस्तू घेताना आपल्याला त्याची गरज आहे की नाही, हे चटकन समजू शकेल. सध्या स्वयंपाकघरात ज्या वस्तू वापरात आहेत, त्या नेटक्या राहतील आणि त्या उगाच टाकल्याही जाणार नाहीत.

करून पाहा ही झाडाझडती आणि तुमचे अनुभव जरूर शेअर करा.

prachi333@hotmail.com

First Published on October 19, 2019 12:05 am

Web Title: article on modern kitchen abn 97
Next Stories
1 महारेराचे नवीन परिपत्रक : प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणी
2 वास्तुसोबती : सेफी आमची बॉस
3 घर सजवताना : सजली दिवाळी घरोघरी
Just Now!
X