News Flash

निवारा : नैसर्गिक आपत्ती आणि पारंपरिक घरे

१९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर दगडी भिंतींचं भयंकर भय तिथल्या लोकांच्या मनात बसलं.

(संग्रहित छायाचित्र)

 

प्रतीक हेमंत धानमेर

‘‘काय हो, ही मातीची घरे भूकंपामध्ये टिकतील का? जोरदार पावसाला ही मातीची भिंत पडणार तर नाही ना?’’ जेव्हा जेव्हा बांधकामात मातीच्या समावेशाचा प्रश्न येतो तेव्हा हमखास विचारले जाणारे हे प्रश्न. मुळातच स्थानिक नैसर्गिक साहित्याबाबत आपल्यात ही उदासीनता कधी आली याचा विचार करणे गरजेचे आहे. सिमेंट आणि स्टीलचे युग येण्याअगोदर कित्येक शेकडो वर्ष या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत उभी असलेली पारंपरिक घरे आजही अस्तित्वात आहेत.

१९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर दगडी भिंतींचं भयंकर भय तिथल्या लोकांच्या मनात बसलं. सर्वाधिक जीवितहानी ही दगडी भिंत लोकांच्या अंगावर कोसळल्याने झाली, असे अहवाल सांगत होते. लोकांचा दगडी बांधकामावरून विश्वास पार उडून गेला. जेव्हा थोर वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांनी भूकंपग्रस्त घरांची पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, दगडी बांधकाम करताना दगडांची सांधे बांधणी योग्यरीतीने न केल्याने भिंती दुभंगून कोसळल्या. त्यावर त्यांनी योग्य दगडी बांधकामावर सचित्र पुस्तकही लिहिले. पण लोकांच्या मनातील दगडी भिंतीचे भय ते संपवू शकले नाहीत. परिणामी इग्लू सदृश गोल आणि झटपट कारखान्यात तयार होणाऱ्या घरांनी आपल्या लोभस गावांचे विद्रुपीकरण केले.

भारतात जितकी भौगोलिक विविधता आहे, तितक्याच नैसर्गिक आपत्तीसुद्धा. भूकंप, पूर, वादळे, दुष्काळ एवढंच काय तर जंगली श्वापदांचे हल्लेसुद्धा नैसर्गिक आपत्तीचा भाग आहेत. लडाखसारख्या शुष्क शीत प्रदेशात भूकंपापासून वाचण्यासाठी मातीच्या जाड भिंतींची घरे बांधली जातात. भूकंपानंतर या भिंतींना तडे जरी गेले तरी त्यातून बाहेर पडलेल्या मातीनेच त्या तडा पुन्हा भरता येतात. घरांची उंची कमी असल्याने शक्यतो घरे पडत नाहीत. आणि कमी उंचीची घरे तेथील वादळातसुद्धा तग धरून उभी राहतात. हिमाचल प्रदेशातील काटकोनी बांधकामसुद्धा भूकंप प्रवणक्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान. लाकडी ओंडक्यांची एकमेकांत कैची बनवून त्यामध्ये दगडगोटे भरायचे. अशा भिंतींची घरे भूकंपाला हलतात; पण पडत नाहीत. भूकंपात त्यातील काही दगडगोटे बाहेर पडतात. पण तेच दगडगोटे पुन्हा त्या लाकडी ओंडक्यांच्या कैचीत बसवता येतात. भूकंपानंतर डागडुजीचा खर्च शून्य. हिमाचल प्रदेशातील चनी कोठी येथील काटकोनी बांधकामातील ४५ मीटर उंच मनोरा १९०५ साली कांगरा येथे झालेल्या भूकंपानंतरही जसाच्या तसा उभा राहिला तेव्हा बांधकाम क्षेत्रातील दिग्गज अभियंत्यांनीसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

आसाम, मेघालयातील धो धो पावसाला झेलणारी बांबूची घरे पाहिली की बांबूसारख्या बारीक गवताचे एकीचे बळ दिसून येते. बांबूला एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने बांधून जमिनीपासून घराला थोडे वर उचलून ब्रह्मपुत्रेच्या पुरापासून बचाव केला जातो. राजस्थानातील वालुकाश्म दगडातील जाड भिंतींची घरे तेथील भयंकर उष्णतेलाही आतून थंड राहतात. लहान खिडक्या आणि नक्षीदार जाळ्या जोरदार वाऱ्याला घरात धूळ घेऊन येण्यास मज्जाव करतात. कोकणातील कौलारू चिऱ्याची घरे म्हणा किंवा विदर्भातील पांढऱ्या मातीची घरे; प्रत्येक स्थानिक बांधकाम कौशल्याने तेथील भौगोलिक रचनेप्रमाणे स्थानिक नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची क्षमता विकसित केली आहे. या बांधकामशैलीचा विकास हा हजारो वर्ष बांधकामातील झालेल्या चुकांमधून आणि ज्ञानातून झाला आहे. या ऐतिहासिक ज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. आज या ज्ञानाला झुगारून आपण औद्योगिक साहित्याने ताठ उभी राहणारी घरे विकसित करत आहोत. नैसर्गिक आपत्तीला सहन करू शकणाऱ्या घरांऐवजी आपण त्याचा प्रतिकार करणारी घरे बनविण्यात मग्न आहोत. २००४ मधील कच्छच्या भूकंपात ५ मजली उंच आर.सी.सी.च्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, पण लहान लहान कच्च्या मातीचे भुंगे तसेच उभे होते. विदर्भातील किंवा हिमालयातील केवळ दगड एकमेकांवर रचून बनवलेल्या (dry stack masonry) जाड भिंती, दगडातील परस्पर घर्षणाने पडण्याची शक्यता कमीच. माती किंवा बांबूची घरे पडली तरी त्यात जीवितहानी जवळजवळ होत नाही आणि त्याच पडलेल्या साहित्यापासून ही घरे पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभी राहतात. खरं तर अग्निशामन दलांच्या अहवालाप्रमाणे भूकंपानंतर आर. सी. सी. इमारतीखालील लोकांना बाहेर काढताना बराच त्रास होतो. किंबहुना जीवितहानीसुद्धा जास्त होते. सिमेंटची घरे पडताना माती किंवा नैसर्गिक साहित्याप्रमाणे विखुरली जाऊन पडत नाहीत. त्यामुळे बचाव कार्यात slab फोडून लोकांना वाचवणे जोखमीचे होते. म्हणजे सिमेंट स्टीलची घरे वाईट का? नाही. नैसर्गिक साहित्याबरोबर आधुनिक साहित्याच्या संगमातून बरेच तोडगे निघू शकतात. मातीच्या भिंती आणि त्यावरील छापरामधील आर. सी. सी.च्या बीमने त्याची भूकंप झेलण्याची क्षमता कित्येक पटीने वाढवता येऊ शकते. दगडी पाया एकसंध ठेवण्यासाठी त्यावर आर. सी. सी बीम हा उत्तम उपाय आहे. अशा कित्येक पद्धतींनी आपण पारंपरिक बांधकामाला आधुनिक बळकटी आणू शकतो.

आज पालघर जिल्ह्यतील डहाणूमध्ये सतत होणारे भूकंप चच्रेचा विषय आहेत. पण कुडाच्या घरात राहणाऱ्या आदिवासी लोकांना याचे भय नाही. त्यांची घरे हलकी आहेत आणि कुडाला तडे गेले तरी फक्त शेणाने भिंती लिंपण्याचा काही तो त्रास. नर मादा सांध्याने बनवलेले लाकडी छप्पर हलले तरी पडायची भीती नाही. म्हणून दिवसाला ७-८ भूकंप होत असतानाही आज येथील आदिवासी रात्री सुखनिद्रा घेतो आहे. हीच नसगिक घरांची माया आणि किमया.

आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक शक्तींचा नेहमीच आदर केला किंबहुना निसर्गाला देवत्वच बहाल केल. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे  ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती,’ या उक्तीप्रमाणे नैसर्गिक आपत्तीला सहन करू शकतील अशी घरे आपल्या पूर्वजांनी बनवली; नैसर्गिक आपत्तीचा विरोध करतील अशी नव्हे. निसर्गाचा विरोध करणे खरंच शक्य आहे का? हा साधा प्रश्नही आपला मानवी अहंकार समजून घेत नाही. नसगिक आपत्तीने आपल्या बांधकाम पद्धतीवर काही मर्यादा घातल्या आहेत हे खरे; परंतु याच मर्यादेतून कित्येक नवनवीन बांधकाम कौशल्यांचा विकास झाला. नैसर्गिक आपत्तींनी घरांना वेगळेपण दिलेच; पण नैसर्गिक सौंदर्यसुद्धा बहाल केले. आपण निसर्गाला आणि त्याच्या अमर्याद ताकदीला स्वीकारले होते आणि म्हणूनच महापुरातील लव्हाळ्याप्रमाणे आपली पारंपरिक नैसर्गिक घरे हजारो वर्षांपासून या आपत्तींना तोंड देत नम्रतेने उभी आहेत.

भारतात जितकी भौगोलिक विविधता आहे, तितक्याच नैसर्गिक आपत्तीसुद्धा. भूकंप, पूर, वादळे, दुष्काळ एवढंच काय तर जंगली श्वापदांचे हल्लेसुद्धा नैसर्गिक आपत्तीचा भाग आहेत. लडाखसारख्या शुष्क शीत प्रदेशात भूकंपापासून वाचण्यासाठी मातीच्या जाड भिंतींची घरे बांधली जातात. भूकंपानंतर या भिंतींना तडे जरी गेले तरी त्यातून बाहेर पडलेल्या मातीनेच त्या तडा पुन्हा भरता येतात. घरांची उंची कमी असल्याने शक्यतो घरे पडत नाहीत. आणि कमी उंचीची घरे तेथील वादळातसुद्धा तग धरून उभी राहतात. हिमाचल प्रदेशातील काटकुनी बांधकामसुद्धा भूकंप प्रवणक्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान. लाकडी ओंडक्यांची एकमेकांत कैची बनवून त्यामध्ये दगडगोटे भरायचे. अशा भिंतींची घरे भूकंपाला हलतात; पण पडत नाहीत. भूकंपात त्यातील काही दगडगोटे बाहेर पडतात. पण तेच दगडगोटे पुन्हा त्या लाकडी ओंडक्यांच्या कैचीत बसवता येतात. भूकंपानंतर डागडुजीचा खर्च शून्य. हिमाचल प्रदेशातील चनी कोठी येथील काटकुनी बांधकामातील ४५ मीटर उंच मनोरा १९०५ साली कांगरा येथे झालेल्या भूकंपानंतरही जसाच्या तसा उभा राहिला तेव्हा बांधकाम क्षेत्रातील दिग्गज अभियंत्यांनीसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

आज पालघर जिल्ह्यतील डहाणूमध्ये सतत होणारे भूकंप चच्रेचा विषय आहेत. पण कुडाच्या घरात राहणाऱ्या आदिवासी लोकांना याचे भय नाही. त्यांची घरे हलकी आहेत आणि कुडाला तडे गेले तरी फक्त शेणाने भिंती लिंपण्याचा काही तो त्रास. नर मादा सांध्याने बनवलेले लाकडी छप्पर हलले तरी पडायची भीती नाही. म्हणून दिवसाला ७-८ भूकंप होत असतानाही आज येथील आदिवासी रात्री सुखनिद्रा घेतो आहे. हीच नसगिक घरांची माया आणि किमया.

pratik@designjatra.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:18 am

Web Title: article on natural disasters and traditional houses
Next Stories
1 गणेश दर्शन ते गणेश रचना ६० वर्षांचा प्रवास
2 रखडलेला पुनर्विकास, मेट्रो प्रकल्प आणि हताश गिरगावकर!
3 कलात्मक पुष्करणींचा
Just Now!
X