20 September 2020

News Flash

उद्योगाचे घरी.. : चित्रपट वितरकाचं ऑफिस

देशाच्या विकासात चित्रपट उद्योगांचा वाटा कसा असतो, याविषयी याआधी याच सदरात आपण जाणून घेतलं होतं.

(संग्रहित छायाचित्र)

मनोज अणावकर

देशाच्या विकासात चित्रपट उद्योगांचा वाटा कसा असतो, याविषयी याआधी याच सदरात आपण जाणून घेतलं होतं. परंतु या चित्रपट उद्योगाशी निगडित असलेलं आणि तितकंच महत्त्वाचं असलेलं दुसरं एक क्षेत्र म्हणजे चित्रपट वितरणाचं क्षेत्र! चित्रपट वितरणाचं हे क्षेत्र काहीसं असंघटित असल्यामुळे अवजड उद्योग, आयटी उद्योग किंवा चित्रपट आणि टी.व्ही. मालिकांसारख्या आणि इतर मुख्य मनोरंजन उद्योगांइतकं हे क्षेत्र मोठं नसलं तरीही हे क्षेत्र देशाच्या एकूण उत्पन्नात खारीचा वाटा उचलतंच. ग्राफिक डिझाइनर, पोस्टर प्रिंटर, डिजिटायझेशन होण्याआधीच्या काळात एका चित्रपटगृहातून दुसऱ्या चित्रपटगृहात चित्रपटाची रिळं घेऊन जाणारे प्रिंट शटलर्स तर सध्याच्या काळात डिजिटायझेशनच्या कामासाठी लागणाऱ्या रोजगारांचा यात समावेश आहे. याशिवाय वितरकाच्या ऑफिसमध्ये असलेले विविध रोजगार अशा अनेक रोजगारांच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. तेव्हा अशा या चित्रपट वितरणाच्या आणि त्यातही मराठी चित्रपटांच्या वितरणाच्या क्षेत्रात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांचं वितरण करणाऱ्या  ‘पिकल एंटरटेन्मेंट’ या वितरण कंपनीचं नाव या क्षेत्रात आवर्जून घेतलं जातं. याचबरोबरीने मीडिया मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, प्रदर्शनं भरवणं यांसारख्या व्यवसायांमध्येही या कंपनीने चांगला जम बसवला आहे. या कंपनीचे प्रमुख असलेल्या समीर दीक्षित आणि ऋषीकेश भिरंगी या द्वयींकडून त्यांचं ऑफिस उभारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि एकूणच या क्षेत्राबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊ या..

चित्रपट वितरणाच्या या क्षेत्राकडे कसे आणि कधी वळलात?

समीर दीक्षित : आधी २००० सालापर्यंत आकाशवाणीवर काम केल्यानंतर सहा वर्ष संगीताच्या क्षेत्रात काम केलं. २००६ साली म्युझिक आल्बमच्या वितरणाच्या यशस्वी अनुभवानंतर चित्रपटांच्या वितरणात उतरायचं असं ठरवलं. त्याच वेळी ऋषीकेश माझ्याबरोबर या व्यवसायात माझा भागीदार म्हणून आला.

ऋषीकेश भिरंगी :  आमचा कापडाच्या धाग्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. तो मी सांभाळावा अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. मात्र, माझाही कला क्षेत्राकडे ओढा होता. त्यामुळे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्याबरोबर मी गाण्याचे स्टेज शोज करत होतो. त्यानंतर जेव्हा ‘ऐका दाजीबा’ हा आल्बम प्रकाशित होऊन खूप गाजला, तेव्हा अवधूतने माझ्या वडिलांना गळ घातली आणि नंतर मी या क्षेत्रात पूर्णवेळ यायचं असं ठरवलं. मग समीरबरोबर या व्यवसायात सहभागी झालो.

समीर दीक्षित :  आम्ही दोघांनी मग एक गाडी भाडय़ाने घेतली आणि महाराष्ट्रभर फिरून वितरणाच्या व्यवसायाला लागणारी माहिती गोळा केली. त्यात राज्यभरातल्या विविध ठिकाणी जाऊन तिथे कोणकोणती चित्रपटगृहे आहेत, त्यात कोणत्या प्रकारचे प्रोजेक्टर्स आहेत, अशा तांत्रिक माहितीपासून ते अगदी पॉपकॉर्नचे दर काय आहेत इथपर्यंतची माहिती मिळवली आणि मग हळूहळू वितरणाच्या व्यवसायाला सुरुवात केली.

एका चित्रपट वितरकाच्या ऑफिसमधल्या कामाचं स्वरूप कसं असतं?

समीर दीक्षित : या क्षेत्राविषयी आणि त्याच्या कामाच्या स्वरूपाविषयी फारशी माहिती बऱ्याचदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. चित्रपटांचं वितरण हे केवळ चित्रपटगृहांमध्ये चित्रपट लावण्यापुरतंच मर्यादित नसून, एखाद्या चित्रपटाकडे प्रेक्षक कसे येतील ते बघणं, म्हणजे वितरण करणं! एखादा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो वर्तमानपत्रातल्या जाहिराती, रस्तोरस्ती लागणारे बॅनर्स तसंच बसगाडय़ा, लोकल ट्रेन्स, टेम्पो, टॅक्सी इतकंच काय पण काही प्रसिद्ध ब्रँड्सच्या उपाहारगृहांमध्येही चित्रपटाचे पोस्टर्स लावणं आणि तो अधिकाधिक प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत कसा पाहोचेल याविषयी चित्रपट निर्मात्यांना सल्ला देणं या सगळ्याचा अंतर्भाव चित्रपट वितरणामध्ये होतो. त्यामुळेच चित्रपटांचं प्रमोशन, मार्केटिंग, पोस्टर डिझाइिनग, पोस्टर प्रिंटिंग या आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश चित्रपट वितरणाच्या या कामात होत असतो.

या क्षेत्राच्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन ऑफिसची रचना कशी केली?

समीर दीक्षित : चित्रपट वितरकाचं ऑफिस म्हटलं की, इथे चित्रपट निर्मात्यांची वर्दळ असते. निर्माते भेटायला येतात तेव्हा ते एकटेदुकटे येत नाहीत तर त्यांच्या बरोबर त्यांची टीमही भेटायला येते. अनेकदा सेलिब्रिटीजही येत असतात. त्यामुळे या ऑफिसमध्ये आम्हाला एका मीटिंगरूमची आवश्यकता होती. त्यासाठी आमच्या केबिनशेजारच्या जागेत मीटिंगरूम करायचं ठरवलं. पण इथली जागा थोडी लहान असल्यामुळे बठकव्यवस्था ही इंग्लिश अक्षर ‘एल’च्या आकाराची करायची असं ठरवलं. त्यासाठी मग त्या जागेत बसेल, असा सोफा आम्ही घेतला. (छायाचित्र १)

(संग्रहित छायाचित्र)

स्टोअरेज स्पेससाठी लागणाऱ्या जागेचं कसं नियोजन केलं?

ऋषीकेश भिरंगी : आम्ही हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा १३ वर्षांपूर्वी आजच्यासारखा डिजिटल चित्रपटांचा जमाना नव्हता. चित्रपटांची रिळं असायची आणि अनेक रिळांचा मिळून संपूर्ण चित्रपटाची एक प्रिंट तयार व्हायची. अशी ती रिळांची एक प्रिंट जवळजवळच्या अशा तीन ते चार चित्रपटगृहांमध्ये वापरली जायची. त्यामुळे पहिली तीन ते चार रिळं झाली, की एक माणूस ज्याला प्रिंट शटलर असं म्हटलं जायचं, तो ती पहिली तीनचार रिळं चित्रपटाच्या दुसऱ्या शोसाठी शेजारच्या चित्रपटगृहात पोहोचवून यायचा आणि मग पुढली रिळं घेऊन जायचा. त्यामुळे विविध चित्रपटगृहांमधल्या एकाच चित्रपटाच्या विविध शोजच्या वेळा त्याप्रमाणे आखून घेतल्या जायच्या. संपूर्ण महाराष्ट्रासाठी रिळांच्या २० ते ३० प्रिंट असायच्या. पण जर प्रिंट कमी असल्या तर रात्री नागपूरला शो झाल्यावर विमानाने त्या मुंबईत सकाळच्या शोसाठी आणाव्या लागायच्या. हे सगळं लक्षात घेतलं तर या प्रिंट साठवण्यासाठी गोदामं लागायची. पण आता हे सगळं जुनं झालं. डिजिटल क्रांती झाल्यानंतर आता चित्रपटाच्या डिजिटल कॉपी करून एकाच वेळी दोन किंवा अधिक ठिकाणी चित्रपट दाखवणं शक्य झालं आहे. या डिजिटायझेशनसाठी जरी व्हीपीएफ म्हणजे  व्हर्च्युअल प्रिंट फी द्यावी लागत असली, तरी रिळांच्या तुलनेत खर्चात सुमारे निम्म्याने घट झाली आहे आणि मुख्य म्हणजे आता आम्हाला गोदामांची गरज उरलेली नाही. त्यामुळे स्टोअरेज स्पेसचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटला आहे.

समीर दीक्षित : पण आता वेबसिरीज, चॅनल्सची कामं वाढल्यामुळे जागेची गरज वेगळ्या कारणांसाठी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आम्ही आता अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांसाठी वेगळी जागा (छायाचित्र २) तसंच वाढत्या कामाचा आर्थिक डोलारा सांभाळणारा वेगळा अकाउंट सेक्शनही (छायाचित्र ३) ऑफिसमध्ये केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ऑफिसमध्ये येणाऱ्या क्लायंटच्या आदरातिथ्यासाठी आणि इथल्या कर्मचाऱ्यांना कामात थोडी विश्रांती मिळावी यासाठी कोणती व्यवस्था केली आहे?

समीर दीक्षित : येणाऱ्या क्लायंटना मशीनचा चहा द्यायचा नाही. त्यात तयार केलेल्या चहाचा ताजेपणा आणि आपलेपणाही नसतो. त्यामुळे चहा-नाश्त्याची सोय करण्यासाठी एक छोटी पँट्री ऑफिसमध्ये केली आहे. (छायाचित्र ४). आमच्या या व्यवसायाचं स्वरूप १० ते ५ असं नाही. त्यामुळे ठरावीक वेळेची सक्ती कर्मचाऱ्यांवर नाही. पण त्याचमुळे कधी कामासाठी थांबावं लागलं तरी त्यांची तक्रार नसते. अधूनमधून कधीतरी मुद्दाम ठरवून आम्ही सगळे बाहेर जेवायला जातो. ऑफिसमध्ये खेळीमेळीचं आणि प्रसन्न वातावरण राहावं यावर आमचा कटाक्ष असतो.

(संग्रहित छायाचित्र)

समीर दीक्षित आणि ऋषीकेश भिरंगी यांच्याबरोबरच्या गप्पांमधून जाणवलेली या ऑफिसची वैशिष्टय़े : इथल्या गणपतीच्या प्रतिमा. मीटिंगरूममध्ये विठ्ठलाच्या मुद्रेतला गणपतीही तिथे येणाऱ्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतो. (छायाचित्र १) ऑफिसच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर चांदीची श्री गणेशाची मूर्ती मन प्रसन्न करते. (छायाचित्र ५) या मूर्तीशेजारीच असलेला कंपनीचा आंब्याच्या आकाराच्या लोगोवर कंपनीने वितरित केलेल्या मुंबई-पुणे-मुंबई, स्वराज्य, गावठी, श्रीमंत दामोदरपंत, बॉइज यांसारख्या चित्रपटांची छायाचित्रं आहेत. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी अशा विविध गुणरसांनी युक्त असलेल्या चित्रपटांच्या या चित्रांमुळे एखाद्या मिश्र लोणच्याप्रमाणे प्रेक्षकांना मनोरंजनाची मिश्र चव चाखवणाऱ्या कंपनीच्या ‘पिकल’ या नावाची समर्पकता हा लोगो जाणवून देतो, तर त्याच्या वर असलेला आंब्याचा हिरवा देठ हा मनोरंजन करत असताना जपला जाणारा चित्रपटांच्या आशयविषयातला टवटवीतपणा दर्शवतो.

(संग्रहित छायाचित्र)

इंटिरिअर डिझाइनर

anaokarm@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:14 am

Web Title: article on office of the film distributor
Next Stories
1 पसाराऽऽ मांडलाऽऽ सारा..
2 एकतर्फी करार आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
3 वास्तुसंवाद : तेजाचे ऋण
Just Now!
X