आनंद कानिटकर

फाळणीपूर्व भारताचा भाग असलेल्या पाकिस्तानातील काही मंदिरांबद्दल आपण ऐकलेले किंवा वाचलेले असते. पाकिस्तानातील प्राचीन गांधार भाग हा तेथील बौद्ध स्तुपांसाठी जगभरातील संशोधकांत प्रसिद्ध आहे. पण पाकिस्तानातील काही प्राचीन मंदिरे आपल्याला माहीत नसतात. त्यापैकीच इ. स. पाचव्या ते दहाव्या शतकात बांधलेल्या आणि अजूनही उभ्या असलेल्या मंदिरांची ओळख पुढील काही लेखांत करून घेऊ या.

मागील लेखांत बघितल्याप्रमाणे कुषाण काळातील हिंदू देवीदेवतांच्या उदाहरणार्थ शिव, कार्तिकेय, विष्णू इत्यादींच्या मूर्ती अफगाणिस्तान, पाकिस्तान भागात सापडल्या आहेत. तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भागात कुषाणराजांच्या नंतर आलेल्या हूण, तुर्की शाही आणि हिंदू शाही राजवटींच्या काळातील मूर्तीदेखील सापडल्या आहेत. परंतु पुरेसे सर्वेक्षण न झाल्याने मंदिरांचे अवशेष मोठय़ा प्रमाणावर सापडले नाहीत. पाकिस्तानातील उत्तर भागात सिंधू नदीच्या खोऱ्यात स्थानिक आणि परदेशी संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणांतून काही मंदिरांच्या अवशेषांवर अभ्यास झालेला आहे. त्यावरून येथील बहुतांश मंदिरे ही उत्तर भारतात आढळणाऱ्या नागर शैलीतील शिखरांची होती.

ह्युआन त्सांग या सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवाशाने आपले प्रवासवर्णन लिहून ठेवले आहे. त्यात त्याने गांधार प्रदेशाचे वर्णन करताना शेकडो बौद्ध विहार अस्तंगत होत असल्याचे लिहिले आहे. तसेच या भागात अनेक मंदिरे असल्याचेही वर्णन केले आहे. त्या मंदिरांपैकी काही मंदिरे अजूनही उभी असलेली आढळतात. ह्युआन त्सांग याने वर्णन केलेल्या एका मंदिराचे अवशेष प्रसिद्ध संशोधक ओरेल स्टाइन यांना १९४० च्या दशकात पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कटास (कटास राज या नावानेदेखील हे गाव ओळखले जाते) गावाजवळील एका भागात सापडले होते त्या भागाला ‘मूर्ती’ असेच नाव होते. ओरेल स्टाइन यांच्या मतानुसार, येथे सापडलेले एक कृत्रिम टेकाड म्हणजे प्राचीन स्तूप असावा आणि त्यासमोरील भागात एका मंदिराचे विविध अवशेष स्टाइन यांना सापडले होते. ह्युआन त्सांग याने वर्णन केल्याप्रमाणे स्तूप आणि देवाचे मंदिर समोरासमोर असल्याचा हा पुरावा ओरेल स्टाइन यांना मिळाला असे त्यांचे मानणे होते. लाल दगडात बनवलेल्या या प्राचीन मंदिराचे विखुरलेले आमलक, चंद्रशाला, घटपल्लवयुक्त खांब इत्यादी अवशेष ओरेल स्टाइन यांनी गोळा केले आणि आता ते अवशेष लाहोर संग्रहालयात ठेवलेले आहेत.

जरी ‘मूर्ती’ या भागातील या मंदिराचा आराखडा किंवा स्थापत्य शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून पूर्णपणे लक्षात येत नसले, तरी या अवशेषांवरील नक्षीकामावरून पाकिस्तानातील सापडलेल्या हिंदू मंदिरांच्या कालक्रमातील हे सर्वात जुने मंदिर आहे, असे संशोधकांचे मत आहे. या दगडी अवशेषांवरील मूर्ती आणि नक्षीकाम हे भारतातील पाचव्या शतकातील गुप्त मंदिरांवरील मूर्ती आणि नक्षीकामासारखे आहे असे हे अवशेष शोधणारे ओरेल स्टाइन व गुप्तकाळातील कला व स्थापत्यावरील तज्ज्ञ जोआना विल्यम्स या दोघांचेही मत आहे.

हे मंदिर जरी स्थानिक लाल वालुकाश्मात घडवलेले मंदिर असले तरी यावरील मूर्ती आणि नक्षी भारतातील मध्यप्रदेशातील भुमरा येथील गुप्तकाळातील शिवमंदिरावरील मूर्ती आणि नक्षीकामाशी प्रचंड साम्य दाखवणारे आहे. त्यामुळे इ. स. पाचव्या शतकात दगडात कोरीव काम करू शकणारे कारागीर मध्य प्रदेशातून सध्या पाकिस्तानात असणाऱ्या मूर्ती या गावी हे छोटेखानी मंदिर घडवण्यासाठी आणले गेले असावेत.

मध्यप्रदेशातील भुमरा येथील गुप्तकाळातील मंदिराच्या अवशेषांत सापडलेल्या एका गवाक्षाच्या अवशेषांत दोन्ही हातांत कमळ घेतलेली सूर्याची मूर्ती कोरलेली आहे. या सूर्याचा वेश इराणी म्हणजे ज्याला आपण झब्बा आणि सुरुवार म्हणतो तो दाखवलेला आहे. या सूर्याच्या दोन्ही बाजूला असणारे गण किंवा प्रतिहार यांचाही वेश इराणीच दाखवलेला आहे. सूर्याची उपासना जरी वैदिक काळापासून भारतात होत असली तरी सूर्याची मूर्ती मात्र कुषाण काळात भारतात घडवली गेली. आणि तिचा हा इराणी वेश आणि गुढग्यापर्यंतचे बूट हे इराणी वैशिष्टय़ अफगाणिस्तातील सूर्यमूर्तीपासून ते अगदी कोणार्कच्या मंदिरातील सूर्यमूर्तीपर्यंत दिसून येते.

पाकिस्तानातील मूर्ती या जागी सापडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून व त्यांचे भुमरा येथील मंदिराशी असलेले साम्य बघता कदाचित मूर्ती येथील मंदिराची रचना एका चौथऱ्यावर एका बाजूला असलेले चौकोनी गर्भगृह, त्यासमोर खांबयुक्त मंडप, आणि समोर जिना अशी भुमरा येथील शिवमंदिराप्रमाणे असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.

वर उल्लेख केलेल्या कटास या गावातही ओरेल स्टाईन यांना काही मंदिरे आढळली. 1940 च्या दशकात स्टाईन यांनी या ठिकाणाला भेट दिली तेव्हा तेथे पूजा सुरू असल्याचे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. कटास येथील या शिवमंदिरात आजही पूजा होते आणि पाकिस्तानातील हिंदू या मंदिरांत नित्यनेमाने जातात. कटास येथील ही दोन मंदिरे मूळची किमान इ.स. सहाव्या शतकातील आणि इ. स. दहाव्या शतकातील असावीत. कटास येथील मंदिरे वापरात असल्याने अनेक वर्षे त्यांची पुनर्बाधणी आणि जीर्णोद्धार करण्यात आला आहे.  त्यात मध्ययुगातील अगदी अठराव्या शतकातील काही नक्षीकाम आढळते.

कटास येथील एका तळ्याचा उल्लेखही ओरेल स्टाइन यांनी केला आहे. दक्षकन्या सतीने स्वत:ला दक्षयज्ञात जाळून घेतल्यावर शंकराच्या डोळ्यांतून जे अश्रू आले त्या अश्रूंमुळे कटास येथील तळे बनल्याची आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रसिद्ध असल्याचे ब्रिटिश काळापासून नमूद केलेले आहे. आजही तेथील स्थानिक ही आख्यायिका सांगतात.

येथील सतघर समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहातील मुख्य दुमजली मंदिराचे मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकून आहे. यात या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक छोटेखानी मंदिरांतील नऋत्येला असणारे एक मंदिरही आपले मूळ स्थापत्य घटक टिकवून आहे. या छोटेखानी मंदिराची रचना चौकोनी गाभारा, त्यावर घुमट, बाह्य़िभतींवर दोन छद्म कॉरिंथियन (ग्रीक शैली) अर्धस्तंभ अशी आहे. तर समोरील भागात महिरप आणि बाजूला दोन गोलाकार खांबही आहेत. पाकिस्तान, जम्मू व काश्मीर भागात आढळणाऱ्या ग्रीक शैलीची छाप असणाऱ्या हिंदू मंदिरांप्रमाणे हे छोटेखानी मंदिर दिसते. या मूळच्या स्थापत्य घटकांवरून हे छोटेखानी मंदिर इ. स. सहाव्या/सातव्या शतकातील असावे तसे सतघर समूहातील मुख्य दुमजली मंदिर इ. स. दहाव्या शतकात पुन्हा बांधले गेले असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षांत कटास येथील मंदिरांचे पाकिस्तान सरकारकडून जतन संवर्धन करण्यात आले आहे. पाकिस्तानातील इ.स. सातव्या ते दहाव्या शतकात बांधण्यात आलेल्या विटांच्या मंदिरांबद्दल आपण पुढील लेखांत अधिक माहिती घेऊ.

येथील सतघर समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहातील मुख्य दुमजली मंदिराचे मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकून आहे. यात या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक छोटेखानी मंदिरांतील नऋत्येला असणारे एक मंदिरही आपले मूळ स्थापत्य घटक टिकवून आहे. या छोटेखानी मंदिराची रचना चौकोनी गाभारा, त्यावर घुमट, बाह्य़िभतींवर दोन छद्म कॉरिंथियन (ग्रीक शैली) अर्धस्तंभ अशी आहे. तर समोरील भागात महिरप आणि बाजूला दोन गोलाकार खांबही आहेत. पाकिस्तान, जम्मू व काश्मीर भागात आढळणाऱ्या ग्रीक शैलीची छाप असणाऱ्या हिंदू मंदिरांप्रमाणे हे छोटेखानी मंदिर दिसते.

kanitkaranand@gmail.com