सीमा पुराणिक

आपल्या खेडेगावांमधून फार पूर्वीपासून खेळला जाणारा आणि आधुनिक जगात मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक नेमलेला एक खेळ म्हणजे Hoop Rolling… अर्थात खेळण्यातला गाडा..

या खेळाची मजा तुम्ही कधी स्वत: अनुभवली आहे का? हा खेळ खेळताना दोन गोष्टींचे सतत भान ठेवावे लागते. ते म्हणजे चाकाची गती (Movement ) आणि चाकाचा तोल (Balance). खरे तर माणसाच्या जीवनाचे गणितही असेच असते- गती आणि तोल या दोहोंशी निगडित. एवढेच कशाला, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीत गती आणि तोल यांना अत्यंत महत्त्व असते.

मागील लेखात, अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण हा विषय हाताळताना जागेचे मूल्यांकन वाढविण्याच्या दृष्टीने आपण गतीचे महत्त्व लक्षात घेतले. मितींच्या बंधनातही गती कशी साधली जाते याची काही सोपी उदाहरणेही बघितली. गाडय़ाच्या (Hoop  Rolling) खेळाप्रमाणेच अंतर्गत जागेचे मूल्यांकन वाढविण्यासाठी गती इतकाच तोलही महत्त्वाचा असतो. म्हणूनच जागा म्हणजे अवकाश (Space) हा रचना घटक (Design Element) आणि त्याचा तोल

(Balance) हे रचना तत्त्व (Design -Principle) या दोन्ही बाबी रचनाकारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

रचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून अवकाश म्हणजे जागा (Space) एक रचना घटक आहे. याचाच अर्थ असा की, ज्या जागेसाठी अंतर्गत रचना करावयाची असते, मूलत: ती जागा हीच एक त्या रचनेतील महत्त्वाचा घटक असते. अंतर्गत रचनाशास्त्राचा विचार करता अवकाश (Space) हा रचना घटक हा त्याच्या मर्यादांनी, अर्थात लांबी, रुंदी व उंची अशा तीन मितींनी बांधलेला असतो. ही त्रिमितीय जागा (Three- Dimensional Space) फर्निचर किंवा तत्सम वस्तूंनी एकतर भरली जाते किंवा जात नाही, या दोनच शक्यता असतात. आणि हे जागेचे वस्तूंनी व्यापणे हे त्या जागेची कशा प्रकारे उपयुक्तता साधायची आहे किंवा अंतर्गत रचनेचा ओघ कसा आहे यावर ठरते.

अशा प्रकारे जागेचे दोन भाग असतात. एक म्हणजे व्याप्त जागा. ही जागा वस्तूंनी भरलेली असते आणि दुसरी म्हणजे अव्याप्त जागा- जी रिकामी असते. उदाहरणार्थ, दोन वस्तूंमधील रिकामी जागा अथवा अंतर- पॅसेज, एन्ट्रन्स लॉबी येथील मोकळी जागा. अशा व्याप्त आणि अव्याप्त अवकाशाचा तोल साधणे हे त्या जागेचे मूल्यांकन वाढविण्यासाठी आणि तिचा अधिकाधिक उत्तम प्रकारे वापर करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. कारण हा तोल ढळला की घरात सामानाची भाऊगर्दी व्हायला सुरुवात होते. किंवा उलटपक्षी असलेल्या जागेचा सुयोग्य वापर न होता रिकामीच राहते.

अव्याप्त जागा ही चलनवलनासाठी आवश्यक असते. मोकळेपणाने वावर करता आला तर क्रिया सहज सुलभ होतात व माणूस निवांतपणा (Comforts ) अनुभवतो.

अंतर्गत रचनाकाराला जागेचा आराखडा (Layout  Designing) करण्याच्या टप्प्यापासूनच जागेचा तोल जाणीवपूर्वक सांभाळावा लागतो. उपभोक्त्याच्या गरजेनुसार रचना केली जात असल्याने (Needbase Design) हा तोल उपभोक्त्याच्या त्या जागेतील गरजांवर अवलंबून असतो.

याव्यतिरिक्त त्या जागेतील आधीपासून असलेले आणि रचनेच्या पूर्णत्वानुसार निर्माण होणारे इतर रचना घटक जसे की, रेषा, आकार, घनाकार, रंग, पोत, प्रकाश यांची योग्य ती सांगड घालणे व सुसंगती निर्माण करणे हे रचनाकाराचे खरे कौशल्य असते.

खोलीच्या मूळ आराखडय़ानुसार, रचनेनुसार त्या जागेत (अवकाशात) काही आडव्या आणि उभ्या रेषा अस्तित्वात असतातच. जसे की, जमिनीची आणि छताची रेषा. किंवा भिंतींच्या कोनात निर्माण होणाऱ्या रेषा, दरवाज्या खिडक्यांच्या चौकटींच्या रेषा. रचनाकार याव्यतिरिक्त ज्या रेषा समाविष्ट करतो त्या मुख्यत्वे आडव्या असतात. कारण मनुष्याची (मानेची आणि डोळ्याची ) सहज सुलभ क्रिया डावीकडून उजवीकडे अशीच होत असते. म्हणूनच उभ्या रेषा या आडव्या रेषांना पूरक म्हणून वापरून, जागेचा अर्थात त्रिमितीय चित्राचा तोल सांभाळला जातो. आणि यामध्ये तिरक्या रेषा स्वत:च्या अस्तित्वाने आकर्षक केंद्रे (Focal  Points) निर्माण करतात. रेषा घनाकारांची निर्मिती करतात. त्या घनाकारांचे, त्यांच्या मितींचे आणि जागेच्या मितींचे गणित जमणे, त्यायोगे उपभोक्त्याच्या गरजा पूर्ण होणे आणि तरीही दृश्य समतोल साधणे हीच रचनाकाराची खरी कसोटी असते.

जागेच्या अथवा खोलीच्या आकारमानाप्रमाणे तेथील फर्निचर आणि इतर वस्तूंचे मोजमाप ठरवावे लागते. जसे की, १०’ ७ १२’ या मापाच्या बठकीच्या खोलीत एखादा बॉक्स टाइप सोफा किंवा आराम खुर्ची पूर्ण खोली व्यापून टाकतात. रिकामी जागा उरतच नाही. त्यापेक्षा तेथे एखादी आटोपशीर  बैठक व्यवस्था सोयीची ठरते. ही बैठक व्यवस्था जागेचा तोल सांभाळते आणि शोभाही वाढवते. याचप्रमाणे एखाद्या भारदस्त सोफ्याची बैठक व्यवस्था जागेच्या प्रमाणबद्धतेनुसार शोभून दिसते.

जमिनीवरील चौरस फूट (Horizontal  Space) जागेइतकेच तेथील अवकाशातील जागेला (Vertical Space) महत्त्व देणे आवश्यक आहे. गरजेनुसार बठकीच्या खोलीतही एखाद्या सुंदरशा कपाटामध्ये (Formal Unit) धान्याची कोठी सोयीस्कर पद्धतीने ठेवता येते.

हा तोल त्रिमितीय असतो. लांबी, रुंदी आणि उंची या सर्वाचा नीट विचार केला तरच योग्य प्रकारे साधला जातो. जसे की, सहा फूट उंचीचे कपाट झोपण्याच्या खोलीच्या लांबीच्या दिशेत न ठेवता रुंदीला समांतर असलेल्या भिंतीला टेकून उभे केले तर त्या खोलीचा तोल सांभाळला जातो.

वेगवेगळ्या प्रकारच्या रचनाशैलीनुसार जागेचा विभिन्न प्रकारे वापर केला जातो. उदाहरणार्थ, MInimalistic Design Style ही Electic Design Style पेक्षा अधिक अव्याप्त जागा निर्माण करते. म्हणजेच वस्तूंची अजिबातच गर्दी नसते. अर्थात तुमच्या रचनाशैलीला जराही बाधा न आणता तुम्ही त्या जागेचा कसा खुबीने वापर करता व दृश्य समतोल साधू शकता यावर त्या रचनेचे आणि अनुषंगाने त्या जागेचे मूल्यांकन ठरते. संतुलित (Symmetrical ), असंतुलित (Unsymmetrical) किंवा केंद्रीय (Radial)अशा कोणत्याही प्रकारच्या रचनेसाठी तोल हा महत्त्वाचा असतो.

Hoop Rolling चे उदाहरण पुन्हा एकदा पाहुयात. या चाकाला एक गती असते आणि गती देत असतानाच तोलही सांभाळावा लागतो. त्यातूनच मग एक ताल (Rhythum) निर्माण होतो. ते चाक, जमीन, गती आणि तोल याच्या एकत्रीकरणातून एक संवाद.. सुसंवाद (Harmony ) निर्माण होतो.

अशाच प्रकारे आपल्या अवतीभवतीच्या वस्तूंमधल्या आकारांची संगती, रंगांची संगती, दृश्य समतोल, त्यातून निर्माण होणारा ताल आणि सुसंवाद आपले जगणे सुंदर करत असतो.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)