सागर कारखानीस

karkhanissagar@yahoo.in

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

अग्नीच्या साहाय्याने विविध घटक पदार्थावर प्रक्रिया करून त्यापासून एक संस्कारित अन्नपदार्थ तयार करण्याची कला म्हणजे स्वयंपाक होय. हा स्वयंपाक रांधत असताना स्वयंपाकघरात आपण विविध भांडय़ांचा व उपकरणांचा वापर करत असतो. अर्थात, प्रत्येक भांडय़ाला त्याच्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे स्वत:चे असे एक नाव असल्याने त्यातील नेमकेपणाही अधोरेखित करता येतो. प्रदेशानुसार- भौगोलिक परिस्थितीनुसार या भांडय़ाचा आकार, बनवण्याच्या पद्धतीही बदलत जात असल्यामुळे एखाद्या अन्नपदार्थाचा वा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील खाद्यसंस्कृतीचा इतिहास रेखाटण्यासाठी ज्या विविध साधनांचा वापर केला जातो त्यामधील एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून भांडय़ांकडे पाहता येते. या सदराद्वारे अशाच महत्त्वपूर्ण स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडय़ांचा इतिहास, त्यांच्या वापरामागील पूर्वजांचा दृष्टिकोन, त्यांच्याशी निगडित संकेत, संकल्पना, समजुती, इत्यादींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मानवी संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत ‘कच्चे मांस’ हाच मानवाचा आहार असल्याने स्वयंपाकासाठी भांडय़ांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवला नसावा. मात्र अग्नीच्या शोधानंतर अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर सुरू झाला. ‘पाने’ ही मानवाने वापरलेली स्वयंपाकाची पहिली उपकरणे होत. असे म्हणतात की, दगडाच्या खड्डय़ात साठलेल्या पाण्यावरून मानवाला दगडांमध्ये खड्डे करून भांडी तयार करण्याची कल्पना सुचली. मात्र भांडी बनवण्याच्या कल्पनेला गती मिळाली ती चाकाच्या शोधानंतर. चाकाच्या आधारे मानवाने अनेक मातीची भांडी तयार केली. पुढे विविध धातूंच्या शोधानंतर नानाविध धातूंची भांडी मानवाने उपयोगात आणली. पुढे त्याने आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर भांडय़ांच्या उपयोगितेची सांगड त्यांच्या आकाराशी घालून विविध आकाराची पाणी, अन्नधान्य साठवण्यासाठी, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी, अन्न वाढण्यासाठी सोयीस्कर अशी आकर्षक भांडी तयार केली.

आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक वाङ्मय, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच ‘क्षेमकुतूहल’, ‘पाकदर्पण’, ‘मानसोल्लास’, ‘शिवतत्त्वरत्नाकर’, इ. पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडय़ांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते. उदा. आयुर्वेदानुसार सोन्याच्या भांडय़ात अन्न ठेवल्याने ते निर्वषि, बलवर्धक होते, सर्व धातूंची पुष्टी करते. चांदीच्या भांडय़ातील जेवण त्रिदोषशामक असून ते मेंदू व डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच कांस्याच्या भांडय़ातील जेवण त्रिदोषनाशक, बुद्धिवर्धक असून ते रक्तशुद्धी करते. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोखंडी पात्रात जेवण शिजवावे असे आयुर्वेदशास्त्रात म्हटले आहे. आयुर्वेदात तांबे व पितळ हे औषधी धातू म्हणून ओळखले जातात. तांब्याच्या भांडय़ात शिजवलेला भात वातशामक, स्मृतिवर्धक असतो. तांबे आणि जस्त मिश्रित धातू म्हणजे पितळ. असे म्हणतात की, धन्वंतरीला पितळ जास्त प्रिय होते म्हणून त्याला नैवेद्य दाखवताना पितळेची थाळी वापरली जातात. पितळेच्या भांडय़ात जेवल्याने वायू-कफ दोष नाहीसा होतो. आयुर्वेदात आणि पाकशास्त्रावरील विविध ग्रंथांमध्ये मातीची भांडी ही स्वयंपाकासाठी सर्वश्रेष्ठ सांगितली आहेत. त्यातून शरीरास कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशिअम, गंधक मिळते.

‘शिवतत्त्वरत्नाकर’कर्ता बसवराजाच्या मते, अतिशय कोरडय़ा जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांडय़ात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात, तर पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते. सामान्यत: राजघराण्यांमधून सोने व चांदीची भांडी आवर्जून वापरत, तर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दगड, माती, तांबे व पितळेची भांडी वापरली जात असत.

कोणे एकेकाळी घरची श्रीमंती ही स्वयंपाकघरातील भांडय़ांवरून ठरत असे. एखादे धातूचे भांडे चेमटून नुकसान झाले तर ठोकून पूर्ववत केले जाई. आणि फुटलेच तर त्याला डाग लावून पुन्हा वापरले जाई. मात्र काळाच्या ओघात तांबे-पितळ महाग झाल्याने व लोखंडी भांडय़ांना गंज येत असल्याने या सर्व भांडय़ांची जागा स्टेनलेस स्टीलच्या आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांनी घेतली. आज ‘फास्ट लाईफस्टाइल’ जमान्यात नॉनस्टिक, उष्णतेमुळे न फुटणाऱ्या पायरेक्ससारख्या काचेच्या आणि ‘ओव्हन फ्रेंडली’ सिरॅमिक्सच्या भांडय़ांमुळे स्वयंपाक करणे सोपे झाल्याने, घरातील जुनी भांडी एक तर ती अडगळीच्या खोलीत जाऊन पडत आहेत किंवा मोडीत निघत आहेत. मात्र ही भांडी म्हणजे केवळ स्वयंपाक रांधण्याचे साधन नसून तत्कालीन सामाजिक, आर्थिक इतिहास समजावून घेण्याचे एक माध्यमही आहे. अनेकदा या भांडय़ांवरून कुटुंबाचा इतिहास समजतो. नवीन भांडे घेत असताना त्यावर आवर्जून नाव व तारीखही नोंदवली जात असल्याने त्यावरून आपल्या कुळाचा इतिहास, तत्कालीन भाषेचा-लिपीचा विकास ज्ञात होतो. अनेकदा या भांडय़ांशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे एखादे भांडे कोणी कोणाला आहेर म्हणून दिले होते? ते कोणत्या निमित्ताने घरात आले होते? ते लग्नात मिळाले होते की मुंजीत की बारशात? या प्रश्नांच्या उत्तरांवरून आपल्या नातेसंबंधाच्या इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. त्यामुळे जेव्हा ही भांडी मोडीत निघतात तेव्हा अप्रत्यक्षपणे त्या घराच्या परंपरा, वारसाही मोडीत निघत असतो. आणि म्हणूनच या भांडय़ांचे दस्तऐवजीकरण करणेही गरजेचे आहे. आज विविध माध्यमांच्या उपलब्धतेमुळे ते शक्यही आहे. मकरंद करंदीकर यांनी स्वयंपाकघरातील विविध भांडीकुंडी, अडकित्ते, दिवे, जुनी सौंदर्य प्रसाधने, इ. दस्तऐवजीकरण करत आपल्या समृद्ध वारशाचे जतन केले आहे. अर्थात असेच प्रयत्न आज प्रत्येकाने करणे गरजेचे आहेत.

हे सदर म्हणजे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अन्नपदार्थ संस्कारित करण्यासाठी स्वयंपाकघरात आपल्याला मदत करणाऱ्या पारंपरिक भांडय़ांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न आहे. अर्थात, अन्नपदार्थ साठवण्यापासून ते निवडीपर्यंत आणि रांधण्यापासून ते ताटात वाढेपर्यंत साहाय्य करणाऱ्या भांडय़ांचा व उपकरणांचा हा आढावा आहे. तेव्हा चला तर मग पुन्हा एकदा इतिहासात रमू या, भांडय़ांशी संवाद साधू या..