आज जागतिक स्तरावरचे पर्यटन क्षेत्र विकसित होत असताना पूर्वापारच्या पर्यटनच्या संकल्पना आता कालबाह्य़ होताहेत. हे कलाटणी देणारे संक्रमण होताना पर्यटनाच्या विविध शाखांचा विचार होऊन त्या लोकप्रिय झाल्यात, त्यात वन पर्यटन, आरोग्य पर्यटन, सहसी पर्यटन, कृषी पर्यटन, सामाजिक ई-शाखांबरोबर इतिहासाचे मापदंड ठरलेल्या वारसवास्तूंचे दर्शन घडवणारे पर्यटन या नवीन शाखेद्वारे शैक्षणिक मोल असलेले ऐतिहासिक पाश्र्वभूमीचे स्थळदर्शन घडवणाऱ्या वारसावास्तू दर्शन सहलीनी मोलाची भर घातली आहे. युनेस्कोनी जागतिक वारसा यादीत काही स्थळांचा समावेश केल्यावर ही शाखा अधिक कार्यरत झाल्याचे जाणवते. मुंबई शहरात युथ हॉस्टेल संचालित Heritage Walk ‘ ही सहल आयोजित केली जाते, हे विशेष.

नेहमीच्या आयोजित सहलींमध्ये एखाद् दुसरे वारसावास्तू स्थळदर्शन असतेच. परंतु अल्प वेळच्या भरगच्च कार्यक्रमातील तो एक भाग असतो. त्यातून वारसावास्तू उभारणीची पाश्र्वभूमी, त्याचे वैशिष्टय़पूर्ण बांधकाम, त्याचा वास्तू रचनाकार, त्याची कल्पकता याबाबत माहिती प्राप्त होणे तसे दुरापास्त. हे साध्य होण्यासाठी फक्त वारसावास्तू स्थळदर्शनाच्या आयोजनाची आवश्यकता आहे. वास्तविक या सहल प्रकाराकडे शासकीय-निम शासकीय पातळीवरून गांभीर्याने पाहिले जात नाही. हेही तितकेच खरे आहे.

वारसावास्तूंचे परिपूर्ण मोल समजावून घेण्यासाठी शालेय महाविद्यालयीन पातळीवर जसा पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम अनिवार्य आहे, तशाच स्वरूपाच्या वारसावास्तू अभ्यासक्रमाचा समावेश अमलात यावा. अजूनही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहलीचा ओढा नैसर्गिक स्थळी किंवा वन पर्यटनाकडे आहे. शाळेतील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांची अभिरुची वाढण्यासाठी त्याकरिता मोठय़ा आकाराची वारसावास्तूंची भित्तीचित्रे थोडक्यात माहितीसह कायमस्वरूपी प्रदर्शित केल्यास प्रत्यक्ष स्थळदर्शनाआधी त्या स्थळांची कल्पना येऊन विद्यार्थी वर्गाला आकर्षित करणे सोयीचे होईल.

यालाच पूरक म्हणून पुरातत्त्व विभागातर्फे, तसेच वारसावास्तू व इतिहासतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केल्याने त्याद्वारे प्रत्यक्ष स्थळदर्शनाआधी माहिती मिळाल्यास विद्यार्थी वर्गाला त्या-त्या वारसावास्तूंची पूर्वकल्पना येईल. जोडीला वारसावास्तू दर्शन या अलक्षित पर्यटनाला चालना गती मिळण्यासाठी त्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि दृक् श्राव्य स्वरूपाचे सादरीकरण केल्यास विद्यार्थी खचितच वारसावास्तूंकडे जिज्ञासूपणासह अभ्यासपूर्ण बघायला उत्सुक होतील.  राज्यपातळीवरील सभोवतालच्या परिसरातील अज्ञान उपेक्षित वास्तू कलाकृतींची हवी तशी दखल घेतली जात नाही.

मराठवाडा, विदर्भ, खान्देश कोकण प्रदेशातील अनेक धार्मिक, ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या वारसावास्तू उपेक्षितच राहिला आहे.

सध्या क्रांतिकारी मोबाइल संपर्क साधनानी त्यांच्यातील आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक घटकांचा उपयोग प्रत्यक्ष स्थळदर्शनात होत असतो. त्यात जसे जी.पी. एस., नकाशे, वेळापत्रक, परस्परातील अंतर ई प्रत्यक्ष सहल काळात उपयुक्त ठरतेच. त्याला पूरक म्हणून वारसावास्तूंची सविस्तर माहिती देण्यासाठी या मोबाइलमध्ये वारसावास्तूंसंबंधी एखादे अ‍ॅप उपलब्ध करून दिल्यास समाजातील सर्वच वर्गाला ते निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्याच्या बरोबरीने वारसावास्तूविषयक एखादे संकेतस्थळ (Webside) निर्माण केल्यास सर्वानाच माहितीपूर्ण ठरेल.

हे सुचवण्याचा उद्देश याचसाठी की, सध्याच्या गतिमान जीवनात लिखित साहित्यापेक्षा संगणक, नेट, गुगल यांच्या बरोबरीने मोबाइल हे संपर्क साधन सर्वानाच परिचित आहे..

वारसावास्तूंच्या स्थळदर्शनात देशव्यापी बोलबाला झालेल्या आणि युनेस्कोची मुद्रा उमटलेल्या वास्तूंच्या ठिकाणी सहल संयोजकांचा ओढा आहे हे आयोजित सहलींच्या जाहिरातीतूनही जाणवते. परंतु इतिहासासह धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान असले की लेणीसमूह, प्रार्थना स्थळ, देवदेवतांची प्राचीन मंदिरे प्रत्येक जिल्ह्यत आडगावी उपेक्षेचे धनी ठरलेत. या वास्तू म्हणजे प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा असून त्यांचे शिल्पवैभवही चित्ताकर्षक आहे.

मराठवाडा म्हणजे असंख्य शिल्पवैभवाची खाण आहे. त्यातील बहुसंख्य पुरातन वास्तू आपलं अलौकिक प्राचीन शिल्पवैभव अजूनही सांभाळून आहे. परंतु या प्रदेशातील अजिंठा, वेरूळ, घृष्णेश्वर, औंढय़ा नागनाथ, परळी वैजनाथ यापलीकडे सर्वसामान्य पर्यटकांची नजर जात नाही. परंतु उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यतील प्राचीन, मध्ययुगीन मंदिर वास्तूंची आमच्या पर्यटकांनी तशी दखल घेतलेली नाही. या वास्तूंचे अनोखे, कलापूर्ण भलेभक्कम बांधकाम म्हणजे पर्यटकांबरोबर अभ्यासकांनाही पर्वणी आहे. या भूमीवरील आडवाटेच्या लेणीशिल्प समूहाची पर्यटकांना माहिती नाही.

भिवंडी येथील लोनाड लेणी, धाराशिव लेणी समूह माणकेश्वर शिवमंदिर, कोल्हापूर नजीकचे खिद्रापूरचे मंदिर यांच्या बांधकामातील भक्कमपणा, कलाविष्कार साधताना हे उभारणारे अज्ञात वास्तुविशारद पर्यावरण आणि भूमिती शाखाचेही अभ्यासक होते आणि त्यांची दूरदृष्टी कशी होती याची जाणीव होते.

शासकीय पातळीवरून या अज्ञात वारसा वैभव स्थळांची योग्य ती प्रसिद्धी सातत्याने होणे अपेक्षित आहे. आडगावी असलेल्या बऱ्याच वारसावास्तूंबद्दल माहिती देणारे मार्गदर्शकच नसतात. अिजठा वेरुळ, घारापुरीसारख्या लेण्यांजवळ मान्यताप्राप्त मार्गदर्शक (Guide) उपलब्ध असतात. ही उणीव भरून काढण्यासाठी पुरातत्त्व विषयासह इतिहास, संस्कृती यात गती असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि जाणकार स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन तयार केल्यास पर्यटक अभ्यासकांची सोय होईल. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभागही हवा. याव्यतिरिक्त राजकीय पक्षांनीही मार्गदर्शकांची उणीव दूर करण्यासाठी त्यांच्या अभ्यासू कार्यकर्त्यांमार्फत खूप काही साधता येईल. पण याची अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय नियमांचा कोलदांडा आड यायला नको.

पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील अनेक वारसावास्तूंचे जतन संवर्धन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाकडे पुरेसा निधी नाही असे समर्थन केले जाते. त्यासाठी लोकसमूहानी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध व्हावा ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे काही उद्योग समूहानी जशी मागासलेल्या भागातील काही ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी काही गावे दत्तक घेऊन त्यांच्या अत्यावश्यक गरजा भागवल्यात (उदा. वीज पाणी, रस्ते, शाळा इ.) याच आधारावर उद्योग समूहांना Corporate Social Responsibility (CSR) योजनेनुसार उद्योगसमूहांनी एक सामाजिक बांधिलकीने आपल्या अस्थापनेच्या नफ्यातील काही भाग अविकसित ग्रामीण भागाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी खर्ची घालावा  हे त्यापाठीमागे अभिप्रेत असून ते अनिवार्यही आहे. अर्थात कोणत्या स्थळांसाठी काय करायचे हे ठरवण्याचा अधिकार उद्योगसमूह व्यवस्थापनाकडे आहे.. अविकसित खेडय़ांप्रमाणे उद्योगसमूहांनी

उपेक्षित एक-दोन वारसावास्तू स्थळे दत्तक

घेऊन त्यांच्या संवर्धनाच्या जबाबदारीचा स्वीकार करावा याची जाणीव वारसावास्तू संवर्धनाविषयी आस्था असलेल्यांनी करून देणे अपेक्षित आहे.. बडय़ा उद्योगसमूहांकडे जनसंपर्कासह समाज कल्याण विभाग सांभाळणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यानी एका सामाजिक जाणिवेनी वारसावास्तू संवर्धन जनताचे मोलाचे काम मार्गी लागेल.

अरुण मळेकर

vasturang@expressindia.com