बाणभट्टलिखित ‘हर्षचरित’ आणि ‘कादंबरी’ या साहित्यकृतींमधील वास्तुसंकल्पनांविषयी..
संस्कृतमध्ये गद्यकाव्याला फार उंचीवर नेऊन ठेवणारा कवी म्हणजे बाण! बाणाची ‘कादंबरी’ आणि ‘हर्षचरित’ ही दोन काव्ये. ललित कथासाहित्याला ज्याच्यावरून ‘कादंबरी’ हे नामाभिधान प्राप्त झालं ती कादंबरी नावाची महाकथा बाणभट्टाने स्वत:  रचली. त्यामुळे त्याने दिलेली वर्णनं ही ‘आँखो देखा हाल’ अशा प्रकारची आहेत. याच बाणांनी हर्षांच्या राज्यातील वैभवाची केलेली वर्णनं फार महत्त्वाची ठरतात. बाणाच्या या वर्णनांशी हुएत्संगने केलेली वर्णनंही जुळत असल्यामुळे बाणाची वर्णनं ही केवळ कविकल्पना ठरत नाही. या वर्णनावरून त्या वेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती कळण्यास मदत होते. या सगळ्या कारणांमुळे बाणाचं साहित्य महत्त्वाचं ठरतं. त्यावरून एकूणच भारतातील वैभवाची माहिती मिळते. या वैभवाचं एक उदाहरण पाहून आपण आपल्या विषयाकडे वळू या.
हर्षवर्धनचा पिता- राजा प्रभाकर वर्धन सूर्योपासक होता. तो रोज सूर्याला कमलपुष्पांचा गुच्छ अर्पण करायचा. ही गोष्ट खूप सामान्य आहे. कोणताही भक्त आपल्या आराध्य देवतेला फुलं अर्पण करणार यात विशेष असे काही नाही. पण प्रभाकर वर्धन ही फुलं ज्या पात्रातून द्यायचा ते पात्र विशेष होतं. मी माझ्या आराध्य देवतेला हृदयरूपी कमळ अर्पण करतो या भावनेने राजा हृदयाच्या वर्णाप्रमाणे लाल असणाऱ्या माणिकरत्नापासून बनवलेल्या हृदयाच्या आकाराच्या पुष्पपात्रातून ही फुलं अर्पण करायचा, असं वर्णन बाणाने केलं आहे. यावरून वर्धन घराण्याच्या वैभवाची कल्पना येते. अशा वैभवात राहिलेल्या बाणाने आपल्या साहित्यातून केलेले प्रासादवर्णन, वास्तूंचे वैभव डोळ्यापुढे उभे करते.
बाणाच्या दोन्ही काव्यांत प्रासादांतर्गत स्कंधावार, गृहोद्यान, गृहदीíघका, आस्थानमंडप, व्यायामभूमी, स्नानगृह, महानस, आहारमंडप अशा विविध रचनांचे आकर्षक वर्णन केले आहे. याशिवाय ‘कादंबरी’त चंद्रापीड गुरुकुलातून परत आल्यावर त्याच्यासाठी कुमार-भवन असा वेगळा प्रासाद दिला होता. असाच कुमारी-अंत:पूर नावाचा प्रासाद ‘कादंबरी’ या काव्यातील नायिका कादंबरी हिचा होता. रामायणात अशाच प्रकारे रामाचा वेगळा प्रासाद होता.
स्कन्धावार
राजप्रासादाची सर्वात बाह्य कक्षा म्हणजेच ‘स्कन्धावार’. स्कन्धावारात हत्ती, घोडे, सेना यांच्या जोडीने महत्त्वाच्या सामंत राजांच्या राजवाडय़ांचा समावेश होतो. या स्कन्धावारांतर्गत ‘राजकुल’ व राजकुलांतर्गत ‘धवलगृह’ अशा प्रकारे प्रासादांची रचना असे. स्वाभाविकपणे अनेक कक्षा किंवा चौकांचा असा हा स्कन्धावार असे. स्कन्धावारातील सर्वात आतील भाग म्हणजे ‘धवलगृह’. ‘हर्षचरिता’ची सुरुवात बाण व हर्षांच्या भेटीने होते. हर्षांचा भाऊ कृष्ण याच्या बोलावण्यावरून बाण हर्षांला भेटायला अजिरवती ऊर्फ राप्ती नदीच्या काठी असलेल्या त्याच्या ‘स्कन्धावारात’ म्हणजे प्रासादात जातो. राजभवनात प्रवेश केल्यावर बाणाला ‘मंदुरा’ म्हणजे अश्वशाळा दिसते. त्याच्या पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला किंचित मागे ‘इभधिष्ण्यागार’ म्हणजे गजशाळा होती. या गजशाळेत हर्षांचा खास हत्ती ‘दर्पशात’ याच्यासाठी अतिशय उंच असे निवासस्थान होते. ‘कादंबरी’त गुरुगृहातून परत आलेला चंद्रापीड राजप्रासादात प्रवेश करतो तेव्हा त्याला प्रथम गजशाळा दिसते. या गजशाळेत गंधमादन नावाच्या हत्तीसाठी खास व्यवस्था केलेली आहे, असे वर्णन आहे. म्हणजे हर्षचरितात ‘दर्पशात’ आहे, तर ‘कादंबरी’त ‘गंधमादन’. हुएत्संगच्या वर्णनानुसार हर्षांच्या सन्यात ६०००० गजदळ, आणि १००००० अश्वदळ होते. हे सारे सन्य जरी हर्षांच्या राजवाडय़ात नसले तरी यातील काही खास अश्व व गजांसाठी राजाच्या राजवाडय़ातच व्यवस्था करण्याची पद्धत कौटिल्य काळापासून होती. अश्व, गज व असंख्य सनिकांची व्यवस्था या प्रासादात झाली असल्याने, त्या प्रासादाला एखाद्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार स्कन्धावार म्हणजे सन्याची छावणी. म्हणूनच बाणाने हर्षांच्या प्रासादाचा उल्लेख प्रासाद न करता स्कन्धावार असा केला आहे.
घरात आल्याबरोबर प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. राजकुल एवढे मोठे आहे की बाहेरून आलेली व्यक्ती मुख्य प्रासादात पोहोचण्यास बराच वेळ लागणार म्हणून या स्कन्धावाराच्या प्रवेशद्वारावर ‘अिलदक’ म्हणजे पाण्याची व्यवस्था केलेली होती. अिलदक या शब्दाचा कोशातील अर्थ ओटा आहे व शब्दाची व्युत्पत्ती ‘अिल ददाति’ म्हणजे जो पाणी देतो तो ओटा असा होतो. थोडक्यात, घोडा किंवा हत्तीवर बसलेल्या माणसालाही खाली न उतरता पाणी देता यावे अशी सोय येथे केलेली आहे. हर्ष स्कन्धावारात प्रवेश केल्यावर बाजारात यमपट्टिकाला पाहतो, या वर्णनावरून स्कंधावाराच्या सुरुवातीला बाजार होता असे लक्षात येते. किल्ल्यात बाजार असणे हे रामायण काळापासून होते. कारण अयोध्येत नियमित अंतरावर बाजार असल्याचा उल्लेख रामायणात आहे. प्रासादांतर्गत बाजार ही भारतीय स्थापत्यातील संकल्पना पुढे अगदी मध्ययुगीन मुघलकालातदेखील अस्तित्वात होती. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या समोरील मदानात ‘उर्दू बाजार’ आहे. उर्दू या शब्दाचा अर्थ ‘छावणी’. अर्थात छावणीसाठी असलेला बाजार म्हणजे उर्दू बाजार होय.
राजकुलात प्रवेश केल्यापासून दुसऱ्या चौकापर्यंतचा भाग बाह्य व त्यानंतरचा भाग अभ्यंतर समजला जाई. अिलदापासून या दुसऱ्या चौकात ज्या नोकरांची ये-जा असे त्यांना बाह्य प्रतीहार तर दुसऱ्या चौकापासून धवलगृहापर्यंत ये-जा करणाऱ्या नोकरांना अभ्यंतर प्रतीहार असे म्हटले जाई. याचा अर्थ कोणत्याही नोकरांना कुठेही येण्याजाण्याची मुभा नव्हती. आणि हे र्निबध काटेकोरपणे पाळले जात असावेत. म्हणूनच कौटिलीय अर्थशास्त्रात राजप्रासादातील बातम्या आणण्यासाठी अभ्यंतर आणि बाह्य अशी गूढपुरुषांची नियुक्ती करण्याची सूचना कौटिल्याने केली आहे.
आस्थानमंडप
आस्थानमंडप दोन आहेत – बाह्य आस्थानमंडप व भुक्त आस्थानमंडप.
बाह्य आस्थानमंडप
राजकुलाच्या दुसऱ्या चौकातील या स्थानाला बाह्य आस्थानमंडप, महा आस्थानमंडप, राजसभा असेही म्हटले आहे. बाणाने कादंबरीत याच मंडपाचा उल्लेख सभामंडप असा केला आहे. चंद्रापीडाच्या दिग्विजयाचा निर्णय येथेच घेण्यात आला होता. ‘हर्षचरिता’त प्रभाकर वर्धन आजारी पडल्यावर याच आस्थानमंडपात त्याच्या अगदी जवळचे राजे सखेद बसलेले हर्षांला दिसले. मुघल काळात हाच भाग ‘दरबार ए आम’ या नावाने ओळखला जाई.
भुक्त आस्थानमंडप
भुक्त आस्थानमंडप ह्यालाच प्रदोषस्थान असे म्हणतात. हा मंडप धवलगृहाच्या समोर म्हणजे राजगृहाच्या अगदी अंतर्गत भागात होता.
‘समतिक्रम्य त्रीणि कक्ष्यान्तराणि’ म्हणजे तीन चौक ओलांडून बाणाने भुक्त आस्थानमंडपातील अंगणात हर्षांची भेट घेतली. भुक्त आस्थानमंडप हे जेवणानंतर बसण्याचे ठिकाण. येथे राजा विशेष लोकांची भेट घेतो. भोजनानंतर थोडीशी विश्रांती घेत घेत राजा अगदी जवळच्या लोकांची भेट घेत असे. म्हणूनच तिथे पलंगाची व्यवस्था होती. ‘शशिमुक्ताशैल शिलापट्टशयन’ असे या पलंगाचे वर्णन बाणाने केले आहे. शिला म्हणजे दगड, जो मोती आणि चंद्राप्रमाणे शुभ्र आहे. याचाच अर्थ हर्षांचा हा पलंग संगमरवरी दगडाचा बनलेला होता. अगदी असेच वर्णन ‘कादंबरी’तील राजा शूद्रकाच्या आस्थानमंडपाचे आहे.
हर्षांच्या प्रासादात पाहिलेल्या अनेक गोष्टी ‘कादंबरी’त प्रतििबबित झाल्या आहेत. हर्षांच्या या पहिल्या भेटीचे प्रतििबब ‘कादंबरी’त दिसते. राजा शूद्रकानेही भोजन झाल्यावर आस्थानमंडपात प्रवेश केला. येथे अगदी महत्त्वाच्या व्यक्तींची पलंगावर पडून राजाने भेट घेतली. ‘हर्षचरिता’त दिग्विजयाचा निश्चय केल्यावर हर्ष फार वेळ प्रदोषस्थानात न बसता (प्रदोषास्थाने नातिचिरं तस्थौ) शयनगृहात निघून गेल्याचा उल्लेख बाणाने केला आहे.
वरील वर्णन भुक्तास्थानमंडपाचे आहे. या मंडपापर्यंत केवळ खास लोकांनाच यायची परवानगी होती. थोडक्यात, मुघलकाळातील  ‘दिवान ए खास’चे हे अतिप्राचीन रूप आहे.
पुढील भागात आपण धवलगृह, व्यायामगृह, सूतिकागृह अशा वेगवेगळ्या कक्षांसह प्राचीन काळी एअरकंडिशनिंग कसे केले जाई ते समजून घेणार आहोत.
पूर्वार्ध

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन