16 July 2020

News Flash

भवानीशंकर मंदिर अतिप्राचीन मंदिरात पुरातन दुर्मीळ वस्तूंची जपणूक

भवानीशंकर मंदिराची रचना भव्य सभामंडप, गाभारा आणि चारही बाजूंनी भाविकांच्या विसाव्यासाठी गॅलरी अशी आहे

(संग्रहित छायाचित्र)

मधुसूदन फाटक

दोन शतकांपूर्वी १८०६ मध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांचे वडील बाबुलशेट यांनी आपली माता भवानी आणि पिताश्री शंकरशेट यांच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर, ग्रँटरोड पश्चिमेला गर्द वनराईने नटलेल्या तडदेवला जाणाऱ्या रस्त्यावर बांधले. ते आता ‘भवानीशंकर मंदिर’ या नावाने भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. बसाल्ट स्टोन नावाच्या काळ्या दगडामध्ये बांधलेल्या या मंदिराकडे एक देखणी पुरातन वास्तू म्हणून नावजले जातेच, पण सिमेंटचाही शोध न लागलेल्या काळात याची चिरेबांधणी कशी केली असेल, याचेही आश्चर्य वाटते. गेल्या दोन शतकांहून अधिक काळ हजारो भाविकांना आकर्षणाऱ्या या मंदिराच्या दगडी भिंतींना एक चराही गेलेला दिसत नाही. गतकाळात स्टीव्हनसन नामक एका ब्रिटिश इंजिनीअरने अशी बांधणी महापालिकेची मुख्यालय इमारत, छ. शिवाजी महाराज स्थानक आदी इमारतीची उभारणी केली होती. एक कुतूहल म्हणून मी चिरेबंद उभारणीबद्दल माझ्या एका इंजिनीअर स्नेह्यला विचारले असता, तो म्हणाला की तेव्हा काळ्या पत्थराचे हे चिरे, चुना आणि गूळ यांच्या मिश्रणाचे सांधले जाऊन ती इमारत उभी करीत असत आणि ती बांधणी शतकानुशतके निधरेक राहत असे.

भवानीशंकर मंदिराची रचना भव्य सभामंडप, गाभारा आणि चारही बाजूंनी भाविकांच्या विसाव्यासाठी गॅलरी अशी आहे. मंदिराभोवतीच्या या ओवरीमध्ये ठेवलेल्या बैठकाही शतकाहून पुरातन असून त्या अजून उत्तम स्थितीत राखीव आहेत. या बैठकांसंबंधीचे कुतूहल माझ्या तेथील रोजच्या बैठकीत जाणवले. ओवरीत असलेली ही बाके शिसवी लाकडाची (बहुधा वर्माटिकची) असून त्याची जोडणी एकसंध अशा लोखंडी कांबीने केली आहे. या कांबीला दिलेल्या एका सर्पाचा आकार पाहिला की त्या कलाकाराच्या कल्पकतेचे कौतुक वाटते. कारण ही बैठक आहे शिवमंदिराच्या ओवरीत. आणि शंकराच्या गळ्यामध्ये सर्प हे जनावर एखाद्या माळेसारखे विराजमान असते. त्यामुळे ही प्राचीन बैठक म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जाते.

मंदिराच्या प्रांगणात प्रचंड वजनाच्या आणि मोठय़ा आकाराच्या फुलदाण्या (floorbeds) आहेत. त्याही शतकभर तरी सांभाळलेल्या दिसतात. फुलदाण्यांवर केलेल्या कोरीव शिल्पात नरसिंहाचे चित्र साकारले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारी दोन द्वारपालांचे पुतळे, हातात भाले घेतलेले, पहारा देत उभे असलेले मी लहानपणी पाहिले होते. आता मात्र ते सुरक्षित जागी हलविण्यात आले आहेत असे समजले. मंदिराच्या सभामंडपात आणि ओवरीच्या एका भागात, मोठमोठी झुंबरे लटकावल्यामुळे त्याला अध्यात्माचा वारसा लाभला आहे. इंग्रजांनी ज्याला ‘हॉल चॅडेलिअर’ म्हणतात अशी विविधरंगी मण्यांनी मंढविलेली झुंबरे, सणासुदीला दिव्यांनी उजळली गेली की सभामंडपाला एक आगळेच सौंदर्य लाभते. ओवरीतील ही झुंबरे पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यकिरणांनी दिवसा चमकतात.

घुमटवजा छत असलेल्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग पुजले जात आहेच, तरीही याच्या सुशोभीकरणासाठी एक चांदीचा मुकुट काही काळांनी करण्यात आला तो प्राचीन मुकुटही सांभाळून ठेवण्यात आला आहे. विशेष सणांच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्र, श्रावण सोमवार आणि मंदिराच्या दत्तजयंतीच्या स्थापनादिनी तो शिवलिंगावर आच्छादून ते सजविले जाते.

भवानीशंकर मंदिराच्या प्रांगणाच्या प्रवेशद्वारी दोन भव्य दीपमाळा उभ्या केल्या आहेत. अशा दीपमाळा आपण खेडेगावातील अनेक मंदिराबाहेर पाहतो. पण महानगरवासीयांना दीपमाळ म्हणजे काय हे शब्दांनी समजवण्यापेक्षा ती प्रत्यक्ष दाखविली जाण्याची ही सोय. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी या दीपमाळा तेलाच्या दिव्यांनी उजळल्या जातात तेव्हा मंदिर प्रांगण लकाकून जाते.

अशा या अतिप्राचीन मंदिरातील तितक्याच पुरातन अशा आगळ्याच वस्तूंची जपणूक केली आहे. त्या मंदिराचे व्यवस्थापक शंकरशेट कुटुंबाचे कौतुक वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 12:47 am

Web Title: bhavanishankar temple is a collection of ancient rare objects in ancient temples abn 97
Next Stories
1 आनंददायी ‘स्वप्नपूर्ती’
2 निसर्गलिपी : माझी निर्सगसंपत्ती
3 भांडीकुंडी : चूल : स्वयंपाकघरातील माय
Just Now!
X