प्राणी आपल्याला शिस्तही लावतात, हा अनुभव आम्ही सर्व रोज घेतो. घरात एकही गोष्ट तिच्या दातांच्या तावडीतून सुटत नाही, म्हणून घर टापटीप ठेवणं आलंच. साधा टॉवेलही खुर्चीवर लोंबकळत ठेवणं अशक्य. मग तो फाटलाच म्हणून समजा.
लवकर निजे लवकर उठे! हा नियम तिनेच आम्हाला शिकवला. रात्री जेवून झोपली की सकाळी पाच वाजता कुई कुई सुरू होते. मग तिच्या निमित्ताने सकाळी मॉर्निग वॉक व रात्री जेवणानंतर शतपावलीही होते. तर अशी आहे आमची ब्राउनी..
एका दुपारी माझ्या मिस्टरांचा फोन आला- ‘एक कॅरवान हाँडचं पिल्लू मिळतंय, आणू का?’ मी क्षणाचाही विचार न करता ‘नको’ म्हटलं आणि फोन ठेवला. मात्र संध्याकाळी खोक्यात पिल्लू घेऊन ते दारात हजर. बापरे! त्यात ती कुत्री, माझा पारा चढला. ‘कोण करणार हिचं?’ कुत्रा पाळायचा म्हणजे त्याची पूर्ण जबाबदारी आली. ह्य़ात मिस्टरांची फिरतीची नोकरी.
पण खोका उघडला आणि माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. बावरलेले डोळे, दोन महिन्याचं आईपासून लांब आणलेलं पिल्लू. मी तिला जवळ घेतलं आणि २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मला पुन्हा ‘मम्मा’ झाल्याचा अनुभव आला.
माझ्या मुलीला मांजरांची फार आवड. ती जाम खूश झाली. नवरात्रात पिल्लू घरी आलं म्हणून तिचं नाव ‘दुर्गा’ ठेवावं का? यावर ऊहापोह झाला, पण तिचा रंग तपकिरी असल्याने तिचं नामकरण सर्वानुमते ‘ब्राउनी’ असं झालं. माझ्या सासरी जवळ जवळ १५ वष्रे टायगर नावाचा कुत्रा होता. त्यामुळे मिस्टरांना व सासूबाईंना कुत्र्याची सवय होती. माझी मुलगी लहान असताना एकावेळी ५ ते ६ मांजरीची पिल्लं अंगणात असायची, पण कधी त्यांचं वेगळं करावं लागलं नाही. इथे मात्र ब्राउनीची जबाबदारी होती. ती सर्वानी आनंदानं स्वीकारली.
आमच्या घरातली नवीन मेंबर म्हणून तिचा उल्लेख होऊ लागला. माझी मुलगी एकुलती एक. त्यामुळे तिला तशी शेअरिंगची सवय कमीच. आम्ही दोघे नोकरी करणारे. त्यामुळे दिवसभर बाहेर. ती पाळणाघरात वाढलेली. एकुलती एक असल्याने इतर पालकांप्रमाणे सर्व आशा, अपेक्षा, राग, लोभ तिच्यावरच एकवटलेला. तिला त्यात हक्काचं भागीदार कोणी नाही. मात्र आता ब्राउनी आल्यापासून यात मुलीबरोबर ती या सर्वात वाटेकरी झाली. घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. वादविवादांनी आता थट्टामस्करीची जागा घेतली आहे.
कोणीतरी आपल्यावर खाण्यापिण्याकरता अवलंबून आहे. तिचं नीट केलं पाहिजं, तिची प्रथम काळजी घेतली पाहिजे, याची जाणीव प्रकर्षांनं आम्हा सर्वाना तिनं करून दिली. जसं लहान मूल भूक लागली की मूकपणे सांगतं तसंच हीही सांगते.
मुंबईच्या लोकल प्रवासातून घरी आल्यावर ब्राउनी प्रत्येकाचे तेव्हढय़ाच उत्कटतेने उडय़ा मारून स्वागत करते. कसे काय जमतं तिला? असा नेहमी मला प्रश्न पडतो. संध्याकाळी घरी ती आमची वाट पाहात असते. न कंटाळता स्वागत करते, तिला उचलून घेतलं की प्रेमाने हात चाटते. मग आम्हा सर्वाचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो.
प्राणी आपल्याला शिस्तही लावतात, हा अनुभव आम्ही सर्व रोज घेतो. घरात एकही गोष्ट तिच्या दातांच्या तावडीतून सुटत नाही, म्हणून घर टापटीप ठेवणं आलंच. साधा टॉवेलही खुर्चीवर लोंबकळत ठेवणं अशक्य. मग तो फाटलाच म्हणून समजा.
लवकर निजे लवकर उठे! हा नियम तिने आम्हाला शिकवला. रात्री जेवून झोपली की सकाळी पाच वाजता कुई कुई सुरू होते. मग तिच्या निमित्ताने सकाळी मॉर्निग वॉक व रात्री जेवणानंतर शतपावलीही होते. तर अशी आहे आमची ब्राउनी. माझी स्ट्रेस रीलिजर, मानसशास्त्रात डॉग थेरपी वापरतात हे आपल्या सर्वाना माहीत आहेच. आज आम्ही ब्राउनीचे पालक आहोत. छोटय़ा मुलांबरोबर ती मनसोक्त खेळते. तिला खूप मित्र-मैत्रिणी आहेत. ब्राउनीमुळे आम्हाला वाढदिवसांचीही आमंत्रणे येतात. तिच्यामुळे आज आमची वेगळी ओळख  झाली आहे.
माझी स्ट्रेस रीलिजर, माझ्या मुलीची मैत्रीण, आजीची दिवसभराची सोबतीण आणि प्रवीणची लाडोबा ब्राउनी!