05 August 2020

News Flash

वास्तुसंवाद : रचनाकाराच्या कामाची व्याप्ती

संकल्पना निश्चित केल्यानंतर रचनाकार संपूर्ण कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक देतो.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

अंतर्गत रचनेनुसार कामाचे स्वरूप निश्चित केल्यानंतर त्या कामाच्या खर्चाचा अंदाज काढावा लागतो. मागील लेखात आपण या अंदाजपत्रकासंबंधित (Budgetary Estimate) काही प्राथमिक माहितीचा आढावा घेतला. अंतर्गत रचनाकाराने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार काम करताना कामाच्या खर्चाचा टप्प्याटप्प्यावर अंदाज घेणे आणि खर्चासंबंधित  वैयक्तिक मर्यादांचे भान असणे गरजेचे असते. जेव्हा आपण एक निश्चित अशी मोठी रक्कम जमेस ठेवून अंतर्गत सजावटीचे काम करायचे असे ठरवतो, तसेच अंतर्गत रचनाकाराला त्याच्या सेवेचा (Designing and  Consulting Services) मोबदलाही देत असतो, तेव्हा आपल्याला या कामाची संपूर्ण प्रक्रिया आणि कामामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व व्यक्तींच्या कामाची व्याप्ती यांचे ज्ञान असणे गरजेचे असते.

मूलत: अंतर्गत रचनाकार (Interior Designer) आणि अंतर्गत सजावटकार (Interior Decorator) या दोन संज्ञांमध्ये फरक असून, त्याच्या कामाच्या स्वरूपातही फरक आहे. रचनाकार हा मुख्यत्वे योजनेच्या भूमिकेत असतो. तर सजावटकार हा त्या योजनेची अंमलबजावणी करत असतो.

‘वास्तु-संवाद’ या लेखमालेतील आजच्या लेखात आपण अंतर्गत रचनाकाराच्या कामाच्या व्याप्तीचा विचार करणार आहोत. यापैकी काही भागांचा विचार आत्तापर्यंतच्या लेखात प्लानिंग अँड डिझाइिनग या टप्प्याअंतर्गत आपण पूर्वीच केला आहे. त्याचाही संक्षिप्त आढावा घेऊ.

वास्तूमधील अंतर्गत रचना करताना अर्थात अभिकल्पाचा (Design) विचार करताना ती वास्तू, तेथील विविध वस्तू आणि व्यक्तींमध्ये एक संवाद निर्माण करणे, किंबहुना तेथील संवादाचे सुसंवादात रूपांतर करणे हे अंतर्गत रचनाकाराचे मुख्य काम असते.

उपभोक्त्याच्या गरजा, सवयी, आवडी-निवडी, व्यक्तिमत्त्व आणि कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार रचनाकार अंतर्गत आराखडा तयार करतो. दोन ते तीन पर्यायी आराखडे देऊन, त्यांच्या योग्यायोग्यतेवर मुद्देसूद चर्चा करून नंतर रचनेचा आराखडा निश्चित केला जातो. ही रचना उपभोक्त्याच्या गरजा लक्षात घेऊनच केलेली असावी (Need base Design) अन्यथा तयार फर्निचर (Ready made Furniture) तर बाजारात उपलब्ध असतेच ना?

त्याचप्रमाणे सद्य:स्थितीत असलेल्या वस्तू किंवा फर्निचरपैकी कोणते पुन्हा वापरणे किंवा ते सुस्थितीत असेल तर त्यात आवश्यकतेनुसार नवीन काही बदल करून त्याला नवे रूप देणे हे महत्त्वाचे. जर शक्य होत असेल तर तसा पर्याय सुचवणे हे रचनाकाराकडून अपेक्षित असते. असे केल्याने खर्चावरही नियंत्रण येते अन्यथा त्या पशामध्ये काही दुसरे आवश्यक काम पूर्ण करता येते. तसेच खर्चाचे अंदाजपत्रक (Budgetary  Estimate) दिल्यानंतर ग्राहकाकडे आवश्यक अशी पुंजी नसेल तर आराखडय़ात पुन्हा काही बदल करून कामाचे नूतनीकरण (Make-over) करता येते. आता बाजारात अशी खूप काही साधने, उत्पादने उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्थात प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता, सौंदर्यता ही त्याच्या किमतीसापेक्ष असणार हे उपभोक्त्यानेही नक्कीच लक्षात घ्यायला हवे.

अंतर्गत रचनेचा आराखडा करताना क्षैतिज जागा (Horizontal Space) आणि अनुलंबित जागा (Vertical Space) या दोन्हीचा सुयोग्यपणे वापर करणे हे रचनाकाराने केले पाहिजे. तसेच त्या जागेचा प्रत्यक्ष वापर करताना, वावरताना तेथे सहज-सुलभता असणे (Comfort) अत्यंत आवश्यक असते, त्याचाही विचार व्हायलाच हवा. त्याचप्रमाणे, हे सर्व करताना तेथील सौंदर्यतेत (Aesthetics) भर घालणे, जागेचा दृश्य समतोल सांभाळून वातावरणात एक ताल (Rhythm) निर्माण करणे हा उपयोजित कलेचा आणि अंतर्गत रचनाशास्त्राचा महत्त्वाचा भाग होय. एखाद्या जागेचा आराखडा किंवा मांडणी (Layout Design) आणि त्याचे उन्नत रेखांकन (Elevational Drawing) तसेच त्या कामामागील संकल्पना (Design Concept) या सर्वाचा निश्चित असा विचार रचनाकार करत असतो. हे करताना तो विविध रचना तत्त्वांचा (Design Principles) वापर करून रचनात्मक मूल्य (Design- value) उन्नत करतो.

संकल्पना निश्चित केल्यानंतर रचनाकार संपूर्ण कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक देतो. त्यामुळे उपभोक्त्याला कामाचा आवाका लक्षात येतो आणि खर्चाची मर्यादा निश्चित करण्यास मदत होते. विविध कंत्राटदारांकडून निविदा मागविल्यावर कंत्राटदार निश्चित करण्यास मदत होते. आणि याच वेळेस रचनाकाराच्या सल्ल्यानुसार उत्पादनांची गुणवत्ताही निश्चित केली जाते.

अंतर्गत सजावटीच्या कामात टाइल्स, ग्रॅनाइट, मार्बल, प्लिम्बग फिटिंग्ज् आणि फिक्स्चर्स इत्यादी बांधकाम क्षेत्रासंदर्भातील, तसेच लॅमिनेट, डोअर फिनिशेस, हॅन्डल्स अशा फर्निचरसंदर्भातील उत्पादनांच्या निवडीबाबतचा सल्ला देऊन रचनाकार ठरवलेली संकल्पना अमलात आणण्यास उपभोक्त्याला मदत करतो. वॉल फिनिशेस, रंगसंगती इत्यादी सर्व ठरवताना त्यांची यथायोग्य निवड (Mix-matching) करावे लागते. अगदी पडदे, सजावटीसाठी वापरले जाणारे दिवे (Decorative Light Fittings), वॉल-आर्ट्स, वॉल-फ्रेम्स, फ्लॉवर-पॉट्स अशा विविध सजावटीच्या वस्तू निश्चित करताना रचनकाराचा विचार नक्कीच सरस  ठरतो.

संकल्पनात्मक रेखांकने (Conceptual Drawings) निश्चित झाल्यानंतर आणि प्राथमिक टप्प्यात आवश्यक असलेले मटेरिअल निश्चित केल्यानंतर कामाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली रेखांकने (Working Drawings) रचनाकार वेळोवेळी सादर करतो. यात सिव्हिल अँड प्लिम्बग, फाँल्स- सीलिंग, इलेक्ट्रिकल, तसेच फर्निचरसंदर्भातील सर्व तपशीलवार तांत्रिक रेखांकनांचा समावेश असतो.

प्रत्यक्षात जागेवर काम सुरू करताना वर्किंग ड्रॉइंगनुसार आखणी करून घेणे, वेळोवेळी कामाच्या तांत्रिक अंमलबजावणीसाठी परीक्षण करणे, विविध कंत्राटदारांच्या कामाचे सुसूत्रीकरण करणे, तसेच काम पूर्ण होताना कामाची गुणवत्ता तपासणे या सर्व गोष्टी रचनाकाराच्या कामाच्या चौकटीत येतात.

याव्यतिरिक्त विविध विक्रेते, कंत्राटदार, सल्लागार यांच्यात समन्वय साधून काम तांत्रिकदृष्टय़ा योग्य होईल हे रचनाकार जाणीवपूर्वक बघत असतो.

कामाची अंमलबजावणी करताना मटेरियल वाया न जाता योग्य पद्धतीने वापरले जात आहे आणि मटेरियलची गुणवत्ता या दोन्ही गोष्टी तो तपासून घेतो.

अंतिमत: काम पूर्ण झाल्यावर मोजमापानुसार विक्रेते, कंत्राटदार यांच्या बिलांची तपासणी, वाढीव कामाची छाननी हा आर्थिक महत्त्वाचा भागही रचनाकाराला पूर्ण करायचा असतो.

वाचकहो, इतक्या विविध विषयांवर लक्ष ठेवून जेव्हा हा रचनाकार आणि सल्लागार वास्तूला सुंदर रूप देतो, तेव्हा नक्कीच उपभोक्त्यानेही वेळेत निर्णय देणे, विचारांची सुस्पष्टता ठेवणे आवश्यक असते. तसेच उपभोक्ता आणि रचनाकार यांच्यात विश्वासार्हता आणि सुसंवाद राखला गेला तर नक्कीच कामाला गती येऊन एक सुंदर रचना आकाराला येते.

अगदी आराखडा तयार करण्याच्या टप्प्यापासून ते काम संपूर्णपणे अमलात आणेपर्यंत पूर्वी  घेतलेल्या निर्णयांमध्ये उत्पादनांच्या उपलब्धतेनुसार किंवा तांत्रिक गोष्टींनुसार किंवा आर्थिक अंदाजपत्रकानुसार वेळोवेळी बदल करावे लागतात. अशा वेळेस उपभोक्ता आणि रचनाकार यांना सारासार विचार करून निर्णयात बदल करणेही गरजेचे असते. अर्थात, योजकाचे महत्त्व अनादिकालापासून आहेच ना? म्हटलेच आहे, अमंत्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलमनौषधम् अयोग्य: पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ:

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 12:06 am

Web Title: budgetary estimate interior designer abn 97
Next Stories
1 विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर
2 गणपती येती घरा!
3 वस्तू आणि वास्तू : भांडय़ांचा हव्यास!
Just Now!
X