17 November 2019

News Flash

वेस्कट

साऱ्या वाडय़ाला संरक्षक भिंती असत. त्याचाच हा समोरील भाग असे

(संग्रहित छायाचित्र)

श्रीनिवास गडकरी

वेस्कट म्हणजे आता इमारतीचे ज्याला गेट म्हणतात त्याचे पूर्वरूप. पण त्याचीही स्वत:ची अशी वैशिष्टय़े होती. भल्या मोठय़ा वाडय़ांना दिंडी दरवाजे आणि मोठी प्रवेशद्वारे असत. अनेक वेळा ही प्रवेशद्वारे सुशोभित कमानींनी अंकित असत. साऱ्या वाडय़ाला संरक्षक भिंती असत. त्याचाच हा समोरील भाग असे. वेस्कट ही त्याहून काहीशा कमी आर्थिक वर्गातील घरांना असत. ही घरं त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ऐसपैस आणि मुख्य रस्त्यापासून आत असत.

आता हा शब्द तसा फारसा प्रचलित नाही. नव्या पिढीला तर त्याचा फारसा अर्थही कळणार नाही. पण मागच्या जमान्यातील अनेक घरांचे ते वैशिष्टय़पूर्ण अंगही होते. एकत्र कुटुंब पद्धतीत भरपूर सदस्य असलेल्या आणि काहीशा शांत आणि निवांत जीवनशैलीचे ते निदर्शक होते.

वेस्कट म्हणजे आता इमारतीचे ज्याला गेट म्हणतात त्याचे पूर्वरूप. पण त्याचीही स्वत:ची अशी वैशिष्टय़े होती. भल्या मोठय़ा वाडय़ांना दिंडी दरवाजे आणि मोठी प्रवेशद्वारे असत. अनेक वेळा ही प्रवेशद्वारे सुशोभित कमानींनी अंकित असत. साऱ्या वाडय़ाला संरक्षक भिंती असत. त्याचाच हा समोरील भाग असे. वेस्कट ही त्याहून काहीशा कमी आर्थिक वर्गातील घरांना असत. ही घरं त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ऐसपैस आणि मुख्य रस्त्यापासून आत असत. वेस्कटीतून आत शिरलं की प्राजक्त, अनंत, आंबा या वर्षांनुवर्षांच्या झाडांबरोबरच घरमालकाने किंवा गृहस्वामिनीने हौशीने लावलेली तगर, जास्वंद, मोगरा, जाई, गोंडा या झाडावेलींनी सुशोभित असत. दुधी किंवा लाल भोपळा, काकडी, तोंडली यांचे हंगामी वेल आणि मांडवही असत. सारवलेले मोठे अंगण वा एखाद्या वेताळ वगैरेसारख्या देवाची इथे स्थापना केलेली असे. पण यासाठी आधी वेस्कट ओलांडून आत यावं लागे. इथे भिंतीची कमान भक्कम दरवाजा वगैरे काही नसे. फक्त बाजूला दोन उभे बांबू आणि मध्ये एक किंवा दोन सरकते बांबू घालून फक्त गुराढोरांना येण्यासाठी प्रतिबंध केलेला असे. क्वचित एखाद्या आर्थिकदृष्टय़ा बऱ्या घरी हे सारं लोखंडी आणि म्हणून मजबूत आणि टिकाऊ केलेलं असे. क्वचित याला पेरकूट, चिकाडी किंवा एखाद्या संरक्षक झाडावेलीची जोड असे. रस्ता आणि घर यांना जोडणारी एखादी पायरी इथे असे. घरातल्या गोठय़ातले एखादे ढोर जाता-येताना या वेस्कटीतला बांबू काढून मार्ग प्रशस्त करावा लागे. घरचा गणपती  वगैरेसारखी मोठी वस्तू, शेतातले धान्य किंवा बैलगाडी यायची असेल तर आडवे बांबू अडसर ठरत. त्यांना काढावे लागे.

पण या वेस्कटीचे घरातील साऱ्यांच्याच आयुष्यातील स्थान महत्त्वाचे असे. बोलण्यात अनेक वेळा याचा उल्लेख येई. शाळेतून संध्याकाळी घरी परत येणारी मुलं वेस्कटीत आल्या आल्याच त्यांच्या आरडाओरडय़ाने आयांना वर्दी पोचवत. गावातील एखादे आप्पा किंवा नाना किंवा आण्णा या घरातील कर्त्यां पुरुषाला काही कारणाने भेटायला येत जेव्हा त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे वेस्कटीतूनच ‘गजाभाऊ’ अशी जोरकस हाळी देत. म्हणजे त्या घरातील काय, पण आजूबाजूच्या चार-दोन घरांनाही ती वर्दी पोहोचे. घरात आलेल्या पाहुण्याची बातमीही अशी ती व्यक्ती वेस्कटीत आल्या आल्याच आरडाओरडय़ाने इतरांना कळे. एखादा बरावाईट निरोप घेऊन आलेली व्यक्ती ही इथे वेस्कटीतच उभी राही. साऱ्यांनाच ते कळे.

कुत्रा, मांजर, गोठय़ात गाय क्वचित पिंजऱ्यात पोपट घराघरात असत. माणसाळलेले हे प्राणी पक्षी त्यांची संबंधित व्यक्ती वेस्कटीत दिसताच गोठय़ात हंबरे. कुत्रा-मांजर त्यांचे वेस्कटीतच उडय़ा मारून अंग चाटून स्वागत करी. एकमेकांच्या घरी गप्पा मारायला जाण्याची पद्धत होती. त्याला बसायला जाणे म्हणत. घरात सोप्यात, माजघरात, माडीवर बसून कितीही वेळ गप्पा मारल्या तरी संपत नसत. विशेषत: बायकांच्या आणि तरुणांच्या. मग या सोबत्यांना निरोप द्यायला आल्यावरही इथे वेस्कटीत उभं राहून तासन्तास गप्पा चालत. दारावर काही विकायला आलेली मंडळी इथे वेस्कटीत उभी राहूनच हाळी देत. पूर्वी बैलगाडीतून कांदे बटाटे दारावर विक्रीला येत. ते व्यवहार असे वेस्कटीत उभे राहूनच चालत.

गणपती पाच दिवसांचा मुक्काम संपवून निघाला की या वेस्कटीतच उभा राहून तीनदा मागे वळून बघे. तेव्हा खरोखरच जिवाभावाचा आप्त सोडून चालल्याचा भास होऊन गलबलून येई. गावदेवाच्या दारी आलेल्या पालखीची पूजाही इथे उभे राहूनच केली जाई. होळीत तरुण मुली घरोघर डेरे घेऊन जात. ते इथेच उभे राहून घुमवले जात. अर्थात एखाद्या घराच्या वेस्कटीत अवेळी अगदी दहा-बारा माणसांची गर्दी दिसली तरी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या माणसांच्या छातीत धस्स  होई. त्या घरातल्या काही दु:खद घटनेची ती वर्दी असे.

वेस या शब्दावरून हा वेस्कट शब्द आला असावा. ते त्याचे लघुरूपच असावे. पण आपल्या भाषेत अनेक वाक्प्रचार त्याने बहाल केले. जाहीर वाच्यता करणे याला ‘‘वेस्कटीत जाऊन बोलणे’’ असा शब्द प्रचलित होता. तर ‘वेस्कटीतून घालवून लावणे’, ‘वेस्कटीत स्वागत करणे,’ ‘वेस्कटीतून आत येणे’, ‘वेस्कट ओलांडणे’ अशा विविध अर्थछटा दाखवणारे विविध शब्द आणि वाक्प्रचार तेव्हा अस्तित्वात होते. त्या वेळच्या समाजजीवनाशी ते संबंधित होते.

काही वेळा या वेस्कटीत सलदं लावून ते बंद-उघडायची तात्पुरती सोय केलेली असे. आता सलदं म्हणजे काय हे सांगितले पाहिजे. सलदं रानातल्या झाडांच्या फांद्यांपासून केलेली एक छोटी भिंतच असे. ती साधारण एक पुरुषाने दोन हात लांब केल्यावर जेवढी लांबी होईल तेवढीच होई. अशी चार सलदी जोडून लावून एक आडोसा अंघोळीसाठी तयार केला जाई. त्याला न्हाणी म्हणत. या सलद्यांचाच वापर करून कधी कुठे या वेस्कटीत दारसदृश आडोसा केला जाई. ते हाताने उघडून आत-बाहेर पडायचे, पण पावसात हे फारसे टिकत नसे.

या वेस्कटीत विरंगुळा म्हणून उभं राहण्याचीही काही ठिकाणी पद्धत होती. आमच्या रोह्यत तर खूप होती. तिथं उभं राहून गप्पाही मारल्या जात. अगदी तासन्तास. बदललेल्या जीवनशैलीत जुनी घरं गेली, अंगण गेलं, झाडे-वेली, गोठे नाहीसे झाले. त्यात वेस्कटही काळाच्या उदरात गडप झाली.

nisha.gadkari@ril.com

First Published on June 22, 2019 1:19 am

Web Title: building gate decorated arches vasturang abn 97