जाणूनबुजून वा पूर्ण चौकशी व माहिती न घेता अनधिकृत इमारतीत घर घेतल्यास होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी आपलीच असणार आहे. त्याबद्दल शासकीय यंत्रणेला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
मुंब्रा येथील शीळफाटा डायघर येथील अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७४ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. याआधीदेखील ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील साईराज इमारत व पुणे येथील तळजाई परिसरात अशाच प्रकारच्या इमारत दुर्घटनेत किती तरी निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि कित्येकांना बेघर व्हावे लागले होते. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधलेल्या इमारती पाडून टाकण्याचा महापालिकेचा कायदेशीर कारवाईचा हातोडा पडून बेघर होऊन आर्थिक नुकसान झालेल्या रहिवाशांची संख्यादेखील गंभीरपणे विचार करण्याइतकी आहे. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न पडतो की अशा घटनांना जबाबदार कोण? याचे तर्कसंगत उत्तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व एस. एस. िशदे यांनी दिले आहे. खारघर, नवी मुंबई येथील ‘ग्रीन हेरिटेज’ इमारतीतील अनधिकृत घरे कायम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ‘‘ घरे अधिकृत की अनधिकृत आहेत, हे रहिवाशांनी पाहूनच घरे घ्यायला हवीत’’ असेही स्पष्ट मत न्यायालयाने नोंदविले आहे. याचाच अर्थ असा की आपण जर पूर्ण चौकशी व माहिती न घेता अनधिकृत इमारतीत घर घेतल्यास होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी आपलीच असणार आहे. त्याबद्दल शासकीय यंत्रणेला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
विविध महानगरपालिका वृत्तपत्रामधून व भित्तिपत्रकाद्वारे वेळोवेळी जाहीर सूचना देऊन सर्वसामान्य जनतेला, नवीन बांधकाम होत असलेल्या व बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत घर घेण्यापूर्वी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात येत असतात. परंतु आपण जुजबी चौकशी करून आणि विकासकाच्या भूलथापांवर व आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. खरे तर नवीन घर घेताना आपण अधिक घाई करतो आणि काही अघटित घडल्यास आपण महानगरपालिका व शासकीय यंत्रणेला दोष देतो, अशी आपली मानसिकता असते. अनधिकृत बांधकामाबाबत आपण सावध असणे आणि इतरांनाही सावध करणे अशी आपली मानसिकता तयार होणे बदलत्या काळानुसार गरजेचे आहे. याची सुरुवात मी माझ्यापासून व माझ्या आप्त स्नेहींपासून करीन, अशी आपली ठाम भूमिका असली पाहिजे.

बांधकाम सुरू होणार असलेल्या / सुरू झालेल्या इमारतीबाबत घ्यावयाची काळजी :
(१)    जागेचे खरेदीखत तपासणे.
(२)    जागेची ‘क्लिअर टायटल’ तपासणे.
(३)    प्रॉपर्टी रजिस्टर कार्डाचा उतारा, ७/१२चा उतारा कोणाच्या नावावर आहे ते तपासणे.
(४)    नियोजित इमारतीचे / प्रकल्पाचे महानगरपालिकेने मंजूर केलेले नकाशे व मंजुरी प्रमाणपत्र तपासणे.
(५)  यासाठी महानगरपालिका, नगर भूमापन कार्यालय व अन्य प्राधिकरण कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणे.
(६)    बांधकामाच्या दर्शनी भागाजवळ जागेचा मालक, विकासक, वास्तुविशारद, कायदेशीर सल्लागार इत्यादींची नावे व बांधकामास रीतसर परवानगी दिली असल्याचा पालिकेचा परवाना क्रमांक व तारीख दर्शविणारा फलक लावला असल्याची खात्री करणे. त्यामुळे इमारत अधिकृत आहे किंवा नाही हे समजून येईल.
(७)  करारपत्रात नमूद केल्याप्रमाणे सर्व सोयीसुविधांची पूर्तता केली असल्याची खात्री करून घेणे.
(८)  बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीसंदर्भात बांधकाम सुरू करण्याबाबतचा दाखला, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र असल्याची खात्री करणे, तसेच महानगरपालिकेचा मालमत्ता कर, पाणीपट्टी व विजेचे देयक नियमितपणे भरल्याची व कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याची खात्री करणे.
(९)    विकासकाची व्यवसायातील नेमकी पत व पूर्वेतिहास जाणून घेणे.

अनधिकृत बांधकामासंदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकर्षक जाहिरातबाजी व विकासकाचे मध्यस्थ यांच्यावर अतिविश्वास न ठेवणे व त्यांच्या आहारी न जाणे. कोणत्याही शहरात व कोणत्याही विकासकाकडून एकाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत अथवा गृहसंकुलात घर खरेदी करण्यापूर्वी किंवा नियोजित इमारतीचे बांधकाम सुरू होणार असलेल्या किंवा सुरू झालेल्या प्रकल्पात घर खरेदी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या गोष्टींची आपण स्वत: खात्री केल्याशिवाय व तांत्रिक बाबींचा संपूर्ण तपास केल्याशिवाय यापुढे मी घर खरेदीचा निर्णय घेणार नाही व माझ्या आप्त स्नेहींनादेखील प्रोत्साहित करणार नाही, अशी ठाम भूमिका असली पाहिजे.