मंडळी, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे मुख्य चार दिवस.. परंतु त्यापूर्वी वसुबारस, धनत्रयोदशीपासूनच दिवाळीचे वेध लागायला सुरुवात होते आणि तुलसी विवाहपर्यंत म्हणजे जवळजवळ तीन आठवडय़ांपर्यंत हा दिवाळीचा माहोल आपल्या सर्वाना धुंद करून टाकतो. असं म्हटलंच आहे, ‘दिवाळीचा सण मोठा नाही आनंदा तोटा’. या कालावधीत घराघरांत विविध प्रकारचे आकाशकंदील व भव्य अशी विद्युत रोषणाई केल्याचे आपण पाहात असतो; आणि मित्रांनो, इथेच आपल्या आनंद आणि उत्साहाला थोडय़ा प्रमाणात वेसण घालणे आवश्यक आहे, ते म्हणजे सुरक्षेचे! दिवाळीपूर्वी आपल्या घरात किंवा इतरत्र आपल्याला काही रोषणाई, पर्यायाने तात्पुरती वायरिंग करायची असल्यास ती महाराष्ट्र शासनाच्या परवानाधारक वायरमनकडूनच करून घ्यावी, आणि त्यासाठी लागणारे सामान हे (आएसआय)चे वापरले तर संपूर्ण रोषणाईस विद्युतसुरक्षा प्राप्त होईल.

आज आपण मुख्यत्वे याच गोष्टीची चर्चा करणार आहोत. दिवाळीला सर्व सणांचा राजा म्हटलं जातं व हा दिव्यांचा सण व तोही बरेच कालावधीपर्यंत चालणारा असल्यामुळे दिव्यांची माळ, सिरीज इत्यादी वापरून तात्पुरती वायरिंग करण्याची प्रवृत्ती ही बहुतांश लोकांत आढळते. हे करीत असताना अतिउत्साहात सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे अनेक प्राणघातक अपघात घडतात.
आपण प्रथम घरच्या घरी रोषणाईची कामे करणाऱ्यांचा आढावा घेऊ. आजकाल दिवाळीमध्ये प्रत्येक घरात बाल्कनीमध्ये आकाशकंदील व कमी अधिक प्रमाणात दिपमाळा लावल्या जातात. बाल्कनीमध्ये सामान्यत: थ्रीपिन प्लग दिलेले नसतात, मग आकाश कंदील किंवा दिपमाळांसाठी विद्युतप्रवाह हा आतूनच एखादा प्लग वरून घेतला जातो. हे करीत असताना वायर कमी पडली तर मुख्य प्लगला एक्स्टेन्शन बोर्ड जोडून त्याला आकाशकंदील अथवा दिपमाळा जोडल्या जातात.
दिवाळीमध्ये दारू कामसुद्धा मोठय़ा प्रमाणात होते. लहान मुले यामध्ये जास्त प्रमाणात रुची घेतात. फटाके उडवताना सर्वापासून व स्वत:पासून दूर ठेवूनच बॉम्बसदृश्य फटाके उडवणे श्रेयस्कर ठरते. अनार, भुईचक्र इत्यादी पेटवताना जवळपास इमारतीचा मीटरबोर्ड किंवा प्लग पॉइंट नाही ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी एका इमारतीतीत काही मुले फटाके उडवत असताना एका मुलाने भुईचक्र पेटवले व पायाने सरकवत असताना ते एका प्लगजवळ गेले आणि शॉर्टसर्किट होऊन आग लागली व तो मुलगाही जखमी झाला.
आम्ही काही वर्षांपूर्वी एक अद्भुत घटना बघितली. दिवाळीच्या फटाक्यांमुळे विद्युत सुरक्षा कशी धोक्यात येते त्याची ही काही उदाहरणे.
साधारण १५-२० वर्षांपूर्वी घरासमोरील मोकळ्या जागेत फटाके उडवत असताना फुलबाजी पेटवून उंच झाडावर, फेकून द्यायचे व अशा काही फुलबाजी तिथे अडकल्यावर झाडातून रोषणाई झाल्याचा आभास निर्माण व्हायचा. एकदा एक फुलझडी जवळच असलेल्या वीज कंपनीच्या तारांवर जाऊन अडकली. त्यामुळे उपरी तारमार्गामध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठा स्फोट झाला. त्या लाइनवरच्या ट्रान्स फॉर्मरचे फ्यूज गेले व सर्व परिसरात अंधार झाला. पोलीस आणि वीज कंपनीच्या कार्यवाहीमुळे पुढील अनर्थ टळला.
काही वर्षांपूर्वी रस्त्यावर मुलांची अनार उडविण्याची स्पर्धा सुरू होती. उंचच उंच अनारची रोषणाई पोहोचण्याच्या नादात त्यांच्या लक्षात आले नाही, की हे करताना ते वीज कंपनीच्या ओव्हरहेड लाइनच्या अगदी खाली आले आहेत. त्या लाइनची स्ट्रिगिंग बरोबर झाली नसल्यामुळे ती खूपच खाली आली होती. अनारमधून निघणारी ठिणगी त्या उपरी तारांवर सतत आदळल्यामुळे ‘आर्क फ्लॅश’ निर्माण होऊन स्फोट झाला व परिसरात अंधार निर्माण झाला व चेंगराचेंगरीत बरेच लोक जखमी झाले.
वरील दोन उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. प्रत्येक दिवाळीत अशा प्रकारच्या घटना व अपघात हे घडतच असतात, ते पुनश्च होऊ नयेत म्हणून सर्वानीच दक्षता घेणे आवश्यक आहे. विशेषत: पालकांनी मुलांना फटाके उडविताना कुठल्याही विद्युत संचमांडणीपासून दूर राहूनच दारूकामाचा आनंद सुरक्षितपणे घेण्यास सांगणे, सर्वाच्याच सुरक्षित दिवाळीसाठी आवश्यक आहे.
मित्रांनो, वर चर्चा केल्याप्रमाणे विद्युत नियमांचे पालन करून घरातील सर्वानी पूर्णपणे दक्षता घेऊन विद्युत रोषणाई आणि फटाके याबाबत कार्यवाही केल्यास आपण सर्वच संपूर्ण सुरक्षित दिवाळी साजरी करू, हे नि:संशय! तुम्हा सर्वाना सुरक्षित दिवाळीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
plkul@rediffmail.com
एक्स्टेन्शन बोर्डला वायर्स जोडताना खालीलप्रमाणे काळजी घेणे जरुरी आहे.
मुख्य प्लग वरून बोर्डला कनेक्ट करताना थ्रीपिन टॉपने जोडणी करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्थिग न मिळाल्याने अपघात संभवतो.
बोर्ड कनेक्ट केल्यावर त्याच्या वायर्स या भिंतीला क्लिप्सच्या मदतीने सरळ रेषेत न्याव्यात, म्हणजे कुणाच्याही पायात येणार नाहीत.
बऱ्याच वेळेला अगोदर प्लगमध्ये किंवा मेनस्विचमध्ये वायर टाकली जाते व नंतर पुढील काम करण्यात येते. हे काम करताना वायर सोलताना (कधी दातानेसुद्धा) स्विच अनवधानाने चालू केल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत.
अनेक वेळेस थ्रीपिनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात खोचतात. अशा वेळी वायरिंगच्या खेचाखेचीमुळे अथवा ओव्हर लोडमुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग सुरू होऊन आग लागण्याचा संभव असतो.
रोषणाई करताना वायर्सची जमिनीपासून पुरेशी उंची, अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे माणसे इकडे-तिकडे फिरताना, सामान हलवताना, त्या वायरमध्ये अडकतात. त्यामुळे वायर, पिन किंवा प्लग मधून सटकतो व चालू लाइनला स्पर्श झाला की अपघात होतो.
रोषणाई करतानाच्या वायरमध्ये जे जोड (Joints) देण्यात येतात ते बऱ्याच वेळेस उघडे असतात, त्यामुळे त्या जोडाला स्पर्श झाला की माणूस दगावतो.
दिवाळीनिमित्त जी रोषणाई केली जाते ती बहुतांशी बाल्कनीच्या ग्रिलला निरनिराळ्या ठिकाणी जोडून अथवा सेलो टेपच्या मदतीने लावली जाते. अशा वेळी विजेच्या दिव्यांच्या माळेला स्पर्श होऊन किंवा माळेमुळे लोखंडी जाळी किंवा फ्रेममध्ये वीजप्रवाह आल्यास अपघात होतो.
एकाच प्लगमधे बहुमार्गी पिन (multiplug) लावून अनेक ठिकाणी वायरिंगचा विस्तार केल्यामुळे त्या प्लगवर विजेचा भार येऊन वीजरोधक आवरण खराब होते व अपघात होण्याची शक्यता असते.
दिवाळीमध्ये सोसायटीजच्या परिसरात, मैदानात चौकाचौकांत रस्त्यांवर इत्यादी ठिकाणीसुद्धा विद्युत रोषणाई करीत असल्याचे दिसते. त्यासाठी अशा सर्व ठिकाणी तात्पुरती वायिरग करावी लागते. यापाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खाली काही टिप्स दिल्या आहेत.
सामान आय. एस. आय. मार्कचेच वापरावे. हे कायद्याने बंधनकारक आहे.
परवानाधारक वायरमन व ठेकेदारकडूनच काम करून घ्यावे. त्यांच्याकडून तपासणी करून टेस्ट रिपोर्ट घ्यावा.
अर्थिग करणे आवश्यक असून, ते व्यवस्थित झाले की नाही याची खातरजमा करावी.
रोषणाईसाठी घेतलेल्या तात्पुरत्या वीजपुरवठय़ामध्ये दोन वायर एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी साधन वापरावे व दोन वायरच्या आधारासाठी आणि अर्थिगसाठी जी. आय. वायर असावी.
अंगणात वा परिसरात वायर फिरविताना वरील दोन वायर्स जमिनीपासून कमीत कमी आठ फुटांच्या लाकडी खांबावरूनच न्याव्यात.
ज्या वेळी या वायर्स घरातून बाहेर घेतल्या जातात, त्या वेळी दारातून, खिडकीतून किंवा जाळीतून असणाऱ्या खोल जागा, उंचवटे किंवा शार्प कॉर्नर्सपासून त्यांचे संरक्षण केले पाहिजे. तसे न केल्यास आकाशकंदील अथवा रोषणाईला कनेक्ट करणाऱ्या वायर्सचे इन्सुलेशन निघून अपघात घडतात.
सििरज वायर किंवा तात्पुरत्या वायर या कधीही भिंतीला, कंपाऊंडला वा लोखंडी वस्तूला चिकटून नेऊ नयेत.
नियमांची व त्यांच्या परिणामांची कल्पना असल्याशिवाय कुठलेही काम करू नये.
वीजवाहक तारेचा, तसेच अर्थिगच्या जी. आय. वायरचा कपडे वगैरे टांगण्यासाठी उपयोग करू नये.
रोषणाईसाठी वीजपुरवठा घेताना तीन पिन प्लग सॉकेटद्वारेच घ्यावा. तिसरी पिन कार्यक्षम अर्थिगला जोडावी.
जमिनीखालून वायर घेताना ती जमिनीच्या खाली कमीत कमी दोन फूट असावी व तिला विटा आणि रेतीचे संरक्षण असावे.
सर्व जोड (Joints) चांगल्या प्रकारे इन्सुलेशन टेपने सुरक्षित राहतील, असे करावे.
आकाशकंदील किंवा सिरिंजसाठी तात्पुरती वायिरग करताना प्लॅस्टिक लवचीक (flexible) वायर लटकत्या स्थितीत वापरू नये.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?