आपल्यापैकी प्रत्येकजण कशाचातरी मनापासून चाहता असतो. फॅन, व्यक्तिपूजा, फॉलोइंग अशी कोणतीही नावं द्या. आपल्या या चाहतेगिरीचा आपल्यावर, घरावर आणि कुटुंबावरही खूप परिणाम होत असतो. अशाच काही मजेशीर गोष्टींविषयी..

मा झी एक बालमैत्रीण, एका प्रख्यात मराठी लेखकाची नात. आम्हा दोघांची आजोळची घरं शेजारी-शेजारी, साहजिकच तिकडे मैत्रीची सुरुवात झाली. ओळख वाढली तशी तिच्याविषयीची एक कमालीची गोष्ट मला समजली. आपल्या आजोबांचं लिखाण, मराठी साहित्यिक किंवा तत्सम कुणी नाही तर ती अमिताभ बच्चनची चाहती होती. दिसायला सुरेख, नाजूक अशी ही मैत्रीण अमिताभ बच्चनच्या सिनेमातल्या जाकिटासारखं जाकीट मिरवायची, थ्रिल म्हणून त्यांच्यासारखी पान खाण्याची मजा लुटण्याकरिता बीटाचे तुकडे चघळायची आणि मासिकं, वृत्तपत्र अशा अनेक माध्यमांतून त्यांची चित्रं, जाहिराती यांची अनंत कात्रणं जमवायची. अमिताभविषयीची कितीएक प्रकारची माहिती या माझ्या मैत्रिणीला होती. त्यांच्या सिनेमातले संवाद, गाणी इतकंच काय तर त्या सिनेमाच्या गोष्टी, गमती आणि असं बरंच काय काय तिला ठाऊक असे. हरिवंशराय बच्चन हे अमिताभचे वडील, त्यामुळे त्यांच्याविषयीची माहितीही तिला होती. अमिताभचे वडील या एका कारणाकरिता तिने हरिवंशरायांचं साहित्यही वाचून काढलं. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर जेव्हा तिच्या मुंबईच्या घरी जायचा योग आला; तेव्हा तिची खोली पाहून मी आवाक्  झालो होतो. खोलीभर पहावं तिकडे अमिताभ बच्चनच! या मैत्रिणीशी असलेला संपर्क आता तुटला असला तरी तिच्या या चाहतेपणाची मला नेहमीच गंमत वाटत राहील. तिचं आयुष्य अमिताभ या एका सुपरस्टारभोवती फिरायचं, हे कायम स्मरणात राहील.
प्रेरणास्रोत : माझ्या लहानपणीदेखील माझ्या कपाटाच्या दारांवर माधुरी दीक्षित, अश्विनी भावे, जुही चावला, आमिर खान, तब्बू हे सारे विराजमान होतेच. आज त्यातले मोजकेच टिकून आहेत. मात्र लहानपणापासून आजतागायात जिच्या व्यक्तिपूजेमध्ये खंड पडला नाही अशी व्यक्ती म्हणजे मराठीतील प्रख्यात लेखिका, विदुषी दुर्गा भागवत. ‘लोकसत्ता’ छापून आलेला, बहुधा केविन डिसूझा यांनी काढलेला दुर्गाबाईंचा एक फोटो, माझ्या अभ्यासाच्या मेजावर ठेवलेला आहे. दुर्गाबाईंच्या लिखाणाचा मी निस्सीम चाहता असल्याने त्यांची जवळ जवळ सारीच पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. मात्र या फोटोमुळे मला एक निरंतर प्रेरणास्रोत मिळत राहतो. बाईंचं छायाचित्र कायमच डोळ्यांसमोर राहिल्याने लिखाणाच्याच नव्हे तर एकूणच कामाच्या बाबतीतला सच्चेपणा, अधिकार, त्यासाठी लागणारी मेहनत यांची आठवण होत राहते. उत्तमाच्या ध्यासाला एक निरंतर प्रेरणा मिळत राहते. काम करायचं तर ते दुर्गाबाईंसारखं अजोड, उत्कृष्ट हा विचार सतत जागता राहतो.
अश्विन डिसूझा हा माझा एक अवलिया सहकारी. वयाची चाळिशी जेमतेम पार केलेला अश्विन पेशाने सेल्स विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे सारेच सहकारी त्याचे चाहते आहेत. सेल्स मीटिंग असो, क्लायंटसोबत मीटिंग असो, कार्यालयात कुणाचा वाढदिवस असो, की कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये सहभाग असो अश्विन सगळ्यांमध्येच अगदी हिरिरीने भाग घेतो. कामाव्यतिरिक्त काही बोलताना अश्विनच्या या सळसळत्या उत्साहाचं रहस्य कळलं- त्याचं  फुटबॉल प्रेम. खास आपल्या ख्रिश्चन बोलीत अश्विन सांगतो, ‘‘देख श्रीपाद, व्हेन आय वॉज इन स्कूल, हमारे यहां ना सिर्फ हॉकी और फुटबॉल होता था. यू नो, आय वॉज नॉट दोज् बुक टाइप स्टुडण्ट.’’ अशी सुरुवात करून अश्विनची गाडी लहानपणीच्या शाळा-कॉलेजच्या दिवसांत रमते. कॅथलिक कॉन्व्हेंण्ट शाळांमध्ये या दोन खेळांवरच कसा भर दिला जायचा आणि त्यावेळच्या राष्ट्रीय हॉकी संघात कसे मुंबईचेच खेळाडू प्रामुख्याने असायचे हे तो अभिमानाने सांगतो. काही कौटुंबिक कारणांमुळे अश्विनला फुटबॉलच्या आपल्या खेळात स्वत:ला पूर्णपणे झोकून देता आलं नाही. मात्र तरीही आपल्या खेळाला न्याय देत अश्विन दर वीकेण्डला मैदानात फुटबॉल खेळायला जातो. अनुभवी, मात्र हौशी संघांतून तो नियमितपणे फुटबॉलच्या सामन्यांमध्ये खेळतो. त्यासाठी नियमित सराव करतो. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपचे सारे सामने त्याने रात्र रात्र जागून पाहिले. लायनल मेस्सीच्या प्रत्येक गोलवर अश्विन जान टाकत होता. नेयमारच्या दुखापतीनंतर अश्विन कळवळून बोलत होता. सुआरेझच्या चाव्यानंतर त्याची यथेच्छ खिल्ली उडवत होता. जर्मनीच्या विजयाचा आनंद लुटतानाच तो मेस्सीच्या खेळाचं अतिशय तोंडभरून कौतुक करत होता. मी सहजच त्याला विचारलं, ‘‘अश्विन, हे सगळं तिकडे दूर होतंय. तुझ्या आयुष्यात या सगळ्यामुळे काय फरक पडणार आहे बाबा?’’ अश्विनचं यावरचं उत्तर अजबच होतं, ‘‘हाऊ  कॅन यू आस्क दॅट मॅन? जबसे मै मेस्सीको देखने लगा हूं, मुझे उसका कूल अच्छा लगता है. यू नो श्री, ही नेव्हर रन्स फॉर द बॉल. बट व्हेन ही गेट्स इट, ही मेक्स बेस्ट ऑफ इट. वो कभी प्रेशर में नहीं खेलता. देख मेरा प्रोफेशन अ‍ॅण्ड फॅमिली भी एक बॉलच है ना. क्लायंट मिला, उसको अच्छा सव्‍‌र्हिस दो. घर में थोडा वक्त मिला तो मेरा वाईफ अ‍ॅण्ड सन्स को खूब प्यार दो. अरे अभी मै खूब कूल हो गया उसको देखके. नाऊ  आय डोण्ट टेक प्रेशर, आय फोकस ऑन परफॉर्मिग माय बेस्ट. डिडण्ट माय गेम अ‍ॅण्ड माय हिरो चेन्ज माय लाइफ?’’ अश्विन पुढे सांगतो की, या फायद्याशिवाय खेळामुळे येणारी खिलाडू वृत्ती, सुदृढता, शारीरिक क्षमता, धैर्य या सगळ्याचा त्याच्या अधिक चांगला माणूस बनण्यात उपयोग होतोच. सहज कुतूहल म्हणून मी अश्विनला विचारलं, ‘‘घरी कुणाचा फोटो लावला आहेस?’’ त्यावर दिलखुलास हसत अश्विन म्हणाला, ‘‘कॉलेज में था तभी था रे बहुत फोटो..अभी तो अपना फॅमिली का फोटो ही लगाया है. एकदम मेस्सीजैसा!’’
 आनंद सोहळा : कुणाघरी त्यांचे हिरो प्रेरणा बनतात, तर कुणासाठी ते आनंद सोहळा ठरतात. माझ्या मामाच्या घरी बहुधा हा आनंद सोहळा मी अनुभवलेला आहे. राज कपूर हा मामाचा आवडता फिल्ममेकर. त्याच्या चित्रपटांची गाणी मामा अगदी आवडीने ऐकायचा. माझ्या मामाचा जीव संगीतावर, आणि त्यामुळेच उत्तम संगीत घडवणारा प्रत्येक संगीतकार, गायक आलटून पालटून त्याच्याकडे नांदायचे. मामाने अनेक वर्षांपासून गाण्याच्या तबकडय़ा जमवायला सुरुवात केली होती. चाकावर फिरणारी काळी तबकडी, त्यावरची गाणी वाचणारी पिन आणि स्पीकर्समधून येणारा गाण्याचा आवाज यांचा अनुभव मी मामासोबत अगदी लहानपणापासून घेतला आहे. सुरुवातीला ‘मेरा नाम जोकर’, ‘आवारा’, ‘बरसात’, ‘अनाडी’, ‘श्री ४२०’, ‘आह’, ‘चोरी चोरी’ अशा राज कपूरच्या गाण्यांची मांदियाळी आली. मग त्याला आवडायला लागले तलत महमूद. त्यानंतर लता आणि आशा. पुढे मन्ना डे त्याच्या अधिक आवडीचे झाले. नौशाद, बेगम अख्तर, रुना लैला, इथपासून ते पार पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर अशा अनेकांच्या तबकडय़ा आमच्या घरी आल्या.
त्याच्या सोबत गाणी ऐकताना कधी कंटाळा यायचा. त्याला आवडणारे कुमार, भीमसेन त्या वयात मला फारसे रुचत ना. मग माझ्यासाठी तो चॉकलेटचा बंगला, बडबडगीतं किंवा बालगीतं लावायचा देखील. मात्र हळूहळू कानावर पडणारे सूर मला भावायला लागले. वय वाढलं तसं मी संगीत जमा करायला लागलो. चित्रपट गीतांपासून सुरुवात होऊन, नाटय़गीतं, सुफी, गजल आणि लोकसंगीत असा माझा प्रवास झाला. आम्हा दोघांमध्ये लता-आशा असे चिरंतन वाद होत, त्यात मग जगजित सिंग विरुद्ध मेहदी हसन यांची भर पडली. गुलजार आणि अहमद फराज या दोन गजलकारांच्या रचनांविषयी आमचं एकमत असे. तर कुमारांच्या निर्गुणी भजनांमधल्या आणि सुफी संगीतातल्या साम्यस्थळांची चर्चादेखील होत असे. मामाच्या मृत्यूनंतर त्याचा हा खजिना माझ्या घरी आला आहे, एक वारसा म्हणून. माझ्या मामाने जमवलेल्या अनेक प्रकारच्या या संगीतातून त्याने जीव टाकलेल्या अनेक गायक-संगीतकारांच्या माध्यमातून त्यांचं काम माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. सुरांशी नातं जोडलं गेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या संगीताच्या रूपाने माझा हिरो, माझा मामा माझ्याकडे नांदणार आहे.
लहानपणी मला असं कोणी आवडायचं नाही. कुणावर अशी जीव ओतून भक्ती करण्याची माझी वृत्तीच नव्हती बहुतेक. मात्र जसजसा मोठा होत गेलो, आणि सुदैवाने जीव ओवाळून टाकावी अशा व्यक्ती आयुष्यात आल्या तसतसं कळलं की या व्यक्तिपूजेत खूप ताकद आहे. घडवण्याची. मोडण्याची. नव्याने घडवण्याची. उभं करण्याची. तुमच्या घराच्या जडणघडणीत अशा कुणा हिरोचा हात आहे का?