News Flash

बदलती शहरं : बदलती गृहवसाहत संस्कृती

बदलत्या गृहवसाहतींना नवनवीन समस्यांना समोरे जावे लागत आहे; त्यांचा ऊहापोह व त्यावरील उपाययोजनांचा वेध घेणारे सदर. गे ल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये आणि त्यातही विशेषत: जागतिकीकरणानंतरच्या काळात विविध

| January 12, 2013 01:03 am

बदलती शहरं : बदलती गृहवसाहत संस्कृती

बदलत्या गृहवसाहतींना नवनवीन समस्यांना समोरे जावे लागत आहे; त्यांचा ऊहापोह व त्यावरील उपाययोजनांचा वेध घेणारे सदर.
गे ल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये आणि त्यातही विशेषत: जागतिकीकरणानंतरच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये झपाटय़ाने बदल होत गेले. या गोष्टीला शहरंही अपवाद नव्हती. इंग्रजांनी मुंबईचा विस्तार करताना त्या काळी दादर, माहीमसारखी विस्तारित मुंबई तयार करताना रस्ते, दादरच्या टिळक पुलासारखे मोठे पूल, दादर ट्राम टर्मिनस (अर्थात आजची दादर टी.टी.) सारखी वाहतूक व्यवस्था, ठाण्यापर्यंत रेल्वेचा विस्तार, पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था असा शहरांचा सर्वागीण विकास केला होता. आपल्याकडे ‘शहरांचा विकास’ असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा त्यात प्रामुख्याने इमारती बांधणं असाच अर्थ बऱ्याच वेळा लावला जाताना दिसतो. पाणी, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन वगरे बाबत उदासीनता, तर रस्ते पूल, सब-वे आणि स्कायवॉकसारखे वाहतूक समस्या सोडवणारे प्रकल्प लोकांच्या गरजांऐवजी सल्लागार, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या गरजा लक्षात घेऊन आखले जाताना दिसतात. म्हणूनच नको तिथे स्कायवॉक किंवा पूल आणि जिथे गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा होतो अशा ठिकाणी कोणताही उपाय नाही, असं नियोजनाचा अभाव असलेलं विरोधाभासाचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळतं. आजच्या शहरांमध्ये केवळ वेगवेगळ्या पायाभूत सुविधांमध्येच बदल आहेत. आणि त्यातून समस्या निर्माण झाल्या आहेत असं नाही, तर एकूणच शहरांमधल्या गृहवसाहतींच्या संस्कृतीतही बदल झालेले आढळून येतात. जर सांस्कृतिकदृष्टय़ा आपण सक्षम असलो, तर इतर समस्या विचाराने आणि विवेकाने सोडवणं सोपं जातं. पण आज तिथेच कोंडी होऊन बसली आहे. त्यामुळे एकेका पायाभूत सुविधेचा आणि गृहवसाहतींच्या समस्यांचा वेध घेताना सर्वात आधी या वसाहतींच्या संस्कृतीत कोणते बदल झाले, त्यातून कोणत्या समस्या निर्माण झाल्या आणि त्यातल्या समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याबाबत विचार करणं गरजेचं आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘बालपणीचा काळ सुखाचा’मध्ये त्यांचं बालपण जिथे गेलं, त्या ‘सरस्वती बाग सोसायटी’चं त्यांनी वर्णन केलं आहे. त्यांनी वर्णन केलेली मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व इथली ही वसाहत, सोसायटी असूनही चाळ संस्कृतीतल्या अनेक सांस्कृतिक खुणा जपणारी अशी वसाहत होती. पण त्याचबरोबर आधुनिकतेची बीजंही त्यात रोवली गेली होती. तो काळ होता १९२०च्या दशकातला. प्रत्येकाचं घर स्वतंत्र असलं, तरी एकमेकांच्या घरात असलेला सोसायटीतल्या लोकांचा वावर, सोसायटीतल्या महिलांनी एकत्र येऊन केलेल्या अनेक गोष्टी, एकमेकांच्या घरात डोकावून विचारपूस करणं, या चाळ संस्कृतीच्या खुणा जशा या सोसायटीत जपल्या गेल्या होत्या. त्याच प्रकारे घरांसमोरच्या सामायिक पटांगणात पांढऱ्या हाफपँटी घालून टेनिस खेळलं जात होतं, असाही उल्लेख पुलंनी केला आहे. त्यांच्या या वर्णनातून आजच्या काळातल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधल्या क्लब हाऊसेस असलेल्या आधुनिक सोसायटय़ांची जणू चाहूलच ही सोसायटी देत होती असं दिसतं. राज्यभरात इतरत्रही वाडे, चाळी यांच्या माध्यमातून एकोप्यानं आणि जिव्हाळ्यानं नांदणारी वसाहत संस्कृती अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत जपली जात होती.
हळूहळू जसा काळ बदलत गेला तशी या वसाहतींची रूपंही बदलायला लागलीत. मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांकडे विकासकांनी आपला मोर्चा वळवला आणि उंचच उंच इमारती आणि टॉवर्समधून काडय़ापेटय़ांसारखी बंद दरवाजाआडची घरं बांधायला सुरुवात झाली. शहरांमध्ये या इमारतींचं तण माजलं. त्यांच्यातून उदयाला येऊ लागलेल्या या फ्लॅट संस्कृतीनं घराघरांमधून असलेला घरोबा, जिव्हाळ्याच्या चौकशा आणि एकमेकांबद्दल असलेली आपुलकी यांना ‘फ्लॅट’ करायला सुरुवात केली. शेजारच्याच्या घरात डोकावणं, हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं, तर चौकशा करणं हा चोमडेपणा ठरू लागला. कधीतरी जाता-येता समोर आलं तर कसे आहात, म्हटलं की झालं. तसं विचारताना चेहऱ्यावर थोडेसे हसल्यासारखे भाव असले की बस्स! दुसऱ्याबरोबर हसणं तर सोडाच पण स्वत:च्या घरात जोरात हसायची-चेष्टामस्करी करायचीही चोरी. घरातल्या एखाद्या ज्येष्ठाने थोडं मोठय़ा आवाजात काही बोललं किंवा विचारलं, तर शेजारचे काय म्हणतील, म्हणून त्यांना दटावलं जाऊ लागलं. पूर्वी चाळीच्या खुल्या पटांगणात मुक्तपणे खेळणारी मुलं त्यांच्या आयांच्या किंवा सांभाळणाऱ्या बाईंच्या देखरेखीखाली सोसायटीच्या बंदिस्त गार्डनमध्ये खेळू लागली. त्यांचे खेळही बदलले. दिवाळीला कोणाच्या घरचा फराळ आणि दरवाजाशेजारच्या रांगोळ्या सुंदर झाल्या आहेत, याची स्पर्धा असायची, ती जाऊन त्या ठिकाणी कोणी किती जास्त रुपयांचे फटाके आणून फोडतो आहे, याच्या स्पर्धा सुरू झाल्यात. घरातलं भरतकाम, विणकाम, तसंच पडदे, चादरी आणि उशीच्या कव्हरांवर असलेलं कशिदाकाम यातून घराची सजावट करायची पद्धत ही बुरसटलेली, मागासलेली ठरू लागली आणि बुगबुगीत सोफे, ग्रॅनाइटच्या चौकटीत बसवलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या आणि ब्रँडेड फíनचर यावरून घर किती सुंदर आणि आकर्षक आहे, ते ठरू लागलं. स्वयंपाकघरात असलेल्या लाकडाच्या फळीवरच्या चकचकीत पितळी डब्यांची जागा लेमिनेट्स आणि काचेचे दरवाजे वापरून तयार केलेल्या बंदिस्त किचन कॅबिनेटमधल्या आधी स्टीलच्या डब्यांनी आणि नंतर प्लॅस्टिकच्या पारदर्शक बरण्यांनी घ्यायला सुरुवात केली. घाईच्या वेळेत रवा, साखर, डाळी, वगरे वस्तूंचा आपल्याच स्वयंपाकघरातला आपल्याला माहीत नसलेला पत्ता शोधणं, या बरण्यांमुळे सोपं झालं, हे मात्र सोयीचं झालं.
गृहवसाहत संस्कृतींमध्ये होणारे सर्वच बदल वाईट होते, असं नाही, पण नकारात्मक बदलांचा जास्त प्रभाव दिसून येतो. पूर्वी गावात लांबलांब अंतरावर घरं होतीच, तरीही लोकांमध्ये दुरावा नव्हता. पण गृहवसाहतींच्या संस्कृतीत असे अंतर्बाह्य़ बदल होत असताना उंचच उंच टॉवरमध्ये चाळीपेक्षाही अधिक माणसं अगदी जवळजवळ खेटून असलेल्या फ्लॅटमध्ये राहायला येऊनही वसाहतींमधलं चतन्य मात्र कमी होऊ लागलं. सण-उत्सव यांत्रिकपद्धतीने साजरे करून उरकले जाऊ लागले. कधी कधी समोरच्या घरात कोण राहतो, हेही काहीजणांना माहीत नसतं. कारण आठवडाभर बाराचौदा तास कामानिमित्त बाहेर आणि मग आठवडय़ाभराचा शीण घालवण्यासाठी वीकएण्ड बाहेरच एन्जॉय करणाऱ्यांसाठी घर म्हणजे केवळ रात्रीचा पडाव असतो. मग अशांना त्यांच्या आजूबाजूचे कसे ओळखणार? तशातच परदेशी गेलेल्या किंवा लग्नानंतर स्वतंत्र राहू लागलेल्या मुलांमुळे अनेक घरांमध्ये एकटीदुकटी म्हातारी माणसं राहतात. त्यातूनच मग वृद्धांच्या हत्यांच्या बातम्यांमध्येही वाढ झालेली दिसून येते. पण त्याची काळजी नको. कायदा आणि सुव्यवस्थेवर खापर फोडलं की झालं! हे असं का होतं, वगरे यावर जास्त विचार करायचाच नाही, नाहीतर डोकं फुटायची पाळी येईल. शिवाय ज्या प्रश्नांची आपल्याकडे उत्तरंच नाहीत, ती शोधण्याची केविलवाणी धडपड करून वेळ कशाला फुकट घालवायचा? हा साधा सरळ सोपा विचार दिवसेंदिवस शहरी आयुष्य अधिकच खडतर आणि गुंतागुंतीचं करतो आहे.
जागतिकीकरणापूर्वीचा काळ हा लोकांना त्यांच्या समस्यांविषयी जागृत करायचा काळ होता, आता लोकांना त्यांच्या समस्या माहीत आहेत, त्यामुळे त्याबाबतच्या जागृतीची गरज आता उरलेली नाही. आता हवी आहेत ती या समस्यांवरची उत्तरं! या समस्यांवरच्या उपायांबाबत चर्चा होऊन त्यातून फलित निघणं आवश्यक आहे. त्यासाठी नवनवीन संकल्पना अस्तित्वात येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, गृहवसाहतीतल्या गृहिणी आणि बेरोजगार तरुण यांनी एकत्र येऊन जर ‘केअर सेंटर्स’ सुरू केलीत, तर या वृद्धांचे ‘तरुण-पालक’ असलेली त्यांची मुलं पसे नक्कीच खर्च करायला तयार होतील. ज्यांना पशाअभावी हे शक्य नसेल, अशा आपल्याच सोसायटीतल्या वृद्धांना माणुसकी आणि समाजसेवा म्हणून या केंद्रांनी मोफत मदत करावी. बँकेत चेक भरणं, पासबुक भरणं अशी बँकेची कामं, भाजी-किराणा आणून देणं, संध्याकाळी जवळच फिरायला घेऊन जाणं किंवा ज्यांना त्यांच्या शारीरिक परिस्थितीमुळे हे शक्य नसेल, त्यांना पुस्तकं किंवा वर्तमानपत्रं वाचून दाखवणं, अशी कामं जर ११ ते ६ या वेळेत करून दिलीत, तर अशा ज्येष्ठांना दिलासा आणि सोबत दोन्ही मिळू शकते. तसंच त्यांच्याकडे सतत कोणाचं तरी लक्ष आहे, हे कळल्यावर त्यांच्यावर होणारे
हल्लेही कमी व्हायला मदत होईल. गृहिणींना आणि बेरोजगारांना त्यांच्या गृहवसाहतीतच रोजगार मिळेल. त्याबरोबरच ज्या घरांमध्ये पतीपत्नी आणि शिकणारी मुलंच राहात आहेत, अशा घरांमध्ये
घरी कोणीही नसताना कुरिअर घेणं किंवा घरातलं एखादं यंत्र बिघडलं, तर ते दुरुस्त करायला आलेल्या माणसाकडून घर उघडून देऊन काम करून घेणं, किंवा ज्यांच्याकडे अजूनही गॅसचे
सििलडर घेतले जातात, अशांच्या घरी कोणी नसेल, तर सििलडर बदलून घेणं, अशी कामंही या केअर सेंटरमधल्या गृहिणी
आणि बेरोजगार तरुण करू शकतात. ते सोसायटीतच राहणारे शेजारी असल्यामुळे निर्धास्तपणे त्यांच्यावर अशी कामं सोपवता येतील. सण आणि उत्सव हे केवळ वर्गण्या गोळा करून
आणि कर्णकर्कश गाणी लावून साजरे करण्यापेक्षा लोकांना
एकत्र आणणाऱ्या आणि उपयुक्त अशा विविध स्पर्धा, सहली
आणि कार्यक्रम यांच्या माध्यमातून साजरे केलेत, तर किमान आपल्या आजूबाजूला कोण राहतंय, याची माहिती तरी लोकांना होऊ शकेल. जिव्हाळा वगरे गोष्टींची पालवी हळूहळू तग
धरू लागेल. अशा प्रकारच्या उपायांमधून गृहवसाहतींमधली सल होत जाणारी शेजाऱ्यांच्या नात्यांमधली वीण पुन्हा घट्ट व्हायला मदत होऊ शकेल. काळ बदलतो, तसं माणसांनाही बदलावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. पण तसे बदल होत असताना मूल्यांचं अवमूल्यन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसं झालं, तर गृहवसाहत संस्कृतीत बदल झाले, तरी ते सकारात्मक असतील. थोडक्यात, आधुनिक गृहवसाहती या पुलंच्या सरस्वती बाग सोसायटीसारख्या जुनं ते सोनं जपतानाच नवतेची कास धरणाऱ्या हव्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2013 1:03 am

Web Title: changing cities changing housing culture
Next Stories
1 मैत्र हिरवाईचे : वास्तूमधील हरितमित्र
2 ग्राहकांवर मुद्रांक शुल्काचा बोजा; असुविधांचे काय?
3 डीम्ड कन्व्हेयन्स करताना…
Just Now!
X