|| डॉ. शरद काळे

गेल्या ३०-४० वर्षांमध्ये आपल्या घरात झालेले बदल पाहिले तर मन विज्ञानाने घेतलेली झेप आणि सामान्य माणसाच्या जीवनावर त्याच्या झालेल्या परिणामाने आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. आजही पन्नाशीच्या किंवा साठीच्या घरात असलेल्या लोकांना आपले बालपण आठवत असेल. कंदिलाच्या उजेडात अभ्यास करण्याचे नवल फारसे नव्हते, कारण काही अपवाद वगळता सर्वाच्याच घरी तीच परिस्थिती होती. पायात चप्पल घालणे ही देखील ज्या काळात चैन समजली जाते असे त्या तुलनेने आजचा काळ फारच वेगळा आहे. वृत्तपत्रे ज्ञानगंगेची प्रमुख आधारस्तंभ होती. शाळेतील आणि महाविद्यालयातीळ वाचनालये यावरच जीवनाची सर्व प्रगती अवलंबून होती. त्या काळात कोपऱ्यावरच्या वाण्याचे दुकान, एखादे पानपट्टीचे दुकान, एखाद्या टपरीमधील केशकर्तनालय, रद्दीचे दुकान, एखादे पुस्तकांचे दुकान आणि काही कपडय़ाची तर काही भांडय़ांची दुकाने एवढाच बाजार होता. ‘धोका विजेचा, दाब ४४० व्होल्ट’ असे लिहिलेली एकमेव पिठाची गिरणी असे. रेशनचे दुकान आणि एखादा दवाखाना देखील असायचा. एखादे कळकट हॉटेल, त्यात माशा बसलेली शिळी मिठाई, सकाळपासून सतत त्याच भुकटीवर उकळत असलेला  चहा आणि त्यात वर्तमानपत्र वाचत बसलेले काही फुकटे टोळभैरव हे दृश्य प्रत्येक गावातून दिसत असे. गावातील एकमेव जुन्या देवळाभोवती एखादा वळू, दोन तीन भाकड गाई फिरत असायच्या आणि कुत्री केकाटात राहायची. सकाळी दूध आणि वर्तमानपत्रे मात्र नाक्या नाक्यावर मिळायची! भाजीवाला, पाव आणि बटर वाला, फळवाला, आईस्क्रीम कुल्फीवाला हे सर्व ‘वाले’ फिरते असायचे. त्यांची स्वतंत्र दुकाने ही कल्पना देखील करू शकत नव्हतो, असा हा काळ भारतातील प्रत्येक खेडय़ाने, तालुक्यांनी आणि काही ठिकाणी जिल्ह्यच्या गावांनी देखील अनुभवला आहे.  गावात मोटार नावाचा प्रकार असलाच तर डॉक्टर, वकील किंवा सरकारी बडा अधिकारी यांच्या घरी असायचा. दोन चार टांगे फिरत असत. दोन-तीन लाल डब्ब्याच्या एसटय़ा यायच्या. यावरच सर्व दळणवळण अवलंबून होते. आगगाडीचे स्थानक असेलच तर एखादी पॅसेंजर गाडी येऊन जायची. बाकी मेल धडधडत जायच्या. सायकली मात्र दिसायच्या आणि पंक्चरचे ‘येथे  पंच्चर काढून मिळेल’ अशी खडूने लिहिलेली पाटी असलेले दुकान देखील असायचे. छोटय़ा छोटय़ा गल्लय़ांमधून बहुधा पडझडीच्या अवस्थेत असलेली घरे असायची. घरांना रंगरंगोटी झाली म्हणजे दिवाळी जवळ आली एवढे समजायचे!

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

मागच्या दोन अडीच दशकांमध्ये मात्र आपल्या देशात प्रगत देशांमध्ये गेल्या ७-८ दशकांमध्ये घडत असलेल्या वैज्ञानिक क्रांतीचे पडसाद अतिशय वेगाने उमटताना दिसत आहेत. या क्रांतीचा वेग फार प्रचंड आहे. आपल्या शहरांचा बकालपणा तसाच असला तरी नाक्या नाक्यावर मोबाईलची दुकाने, सायबर कॅफे, अत्याधुनिक उपकरणे आणि मोठमोठे मॉल्स यांनी बाजार भरले आहेत. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची लखलखीत दुकाने डोळे दीपवीत असतात. जागोजागी बँका दिसतात आणि पूर्वीच्या एस. टी. डी. बूथच्या जागा आता ए. टी. एम. ने घेतल्या आहेत. ट्रॅव्हल्सच्या दुकानांचे देखील पेव फुटले आहे. टपरीमधील केश कर्तनालयाची एअर कंडिशन्ड युनिसेक्स सलून्स झाली आहेत. तिथे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही असे म्हणतात! पॉलिक्लिनिक्स तर फुटा फुटावर आढळतात. खाण्याची दुकाने, हॉटेल्स, खाऊगल्लय़ा तर इतक्या वाढल्या आहेत की देशातील कोणीच घरी स्वयंपाक करीत नसावे असे वाटावे! घरामधील सुविधा वाढल्या. पाणी आणि विजेचा पुरवठा बराचसा नियमित झाला. साधे फोन जाऊन मोबाईल आले. दूरदर्शन संच प्रत्येक घरात दिसू लागले. आपापल्या ऐपतीप्रमाणे फ्रीज, मायक्रोवेव्ह, दूरदर्शन संच, पंखे, कुलर्स, वातानुकूलित यंत्रे, धुलाई यंत्रे यांसारखी उपकरणे गरज म्हणून घरात शिरली. कोळसा आणि रॉकेल घरातील इंधन म्हणून वापरणाऱ्या घरांची संख्या कमी होऊन गॅस वापरला जाऊ  लागला. या सर्व उपकरणांची सवय लागली. सायकल हरवली आणि पेट्रोल वरील दुचाक्या आणि चार चाक्या यांचा सर्वदूर वापर सुरू झाला. सर्व पैशांचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला. इंटरनेट या शब्दाचे अप्रूप राहिले नाही. या लेखमालेतील सुरुवातीच्या लेखात गुगलच्या माध्यमातून इंटरनेट आपल्या घराचा कसा ताबा घेऊ  शकते याची मनोरंजक, पण वास्तव चर्चा आपण केली होतीच.

हे सर्व होत असताना घराचे घरपण बदलत गेले. उघडी दारे बंद झाली. अपॉइंटमेंट घेऊन, फोन करून आवश्यकता असेल तेव्हाच भेट ठरवायची प्रथा निर्माण झाली. इंटरनेट ने जगाचे दरवाजे उघडले, पण मनाचे दरवाजे एक एक करून बंद होऊ  लागले.

आणखी पंचवीस तीस वर्षांनी आपल्या घराचे स्वरूप कसे असेल याचा विचार केला तर तो फारच मनोरंजक असेल यात शंका नाही. संगणक विश्वात होत असलेल्या क्रातीची झलक आपल्याला गेल्या वीस वर्षांत पाहायला मिळाली आहेच. टेबलावर पसारा मांडून बसलेला डेस्कटॉप संगणक जाऊन मांडीवर स्थानापन्न होऊ शकणारा लॅपटॉप आला, तो जाऊन वहीच्या आकाराचा नोटपॅड आला, मग टॅबलेट आणि आता तर मोबाइलवर संगणक उपलब्ध झाला आहे. विद्यार्थी सोडले तर दैनंदिन जीवनात पेनची आवश्यकताच संपवून टाकणारी ही क्रांती आणखी काही वर्षांनी पेनने लिहिण्याची कला कालबा करणार आहे. हे योग्य की अयोग्य असा प्रश्न आयुष्याच्या उतरणीवर असणारे कदाचित विचारू शकतील, पण नवीन पिढीला हा प्रश्न पडणारच नाही कारण डिजिटल सह्यंमुळे सही करण्यासाठी देखील पेन लागणार नाही. एक वर्षांपूर्वी परदेशी जाताना दोन-तीन ठिकाणी तरी फॉम्र्स भरावे लागायचे, आता त्यातील एक ही फॉर्म भरावा लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. घर घेताना रजिस्ट्रार कार्यालयातील सही फक्त अनिवार्य असेल या दिशेनेच वारे वाहात आहेत. बँकेत अजून सही लागते हे खरे असले तरी एटीएम कार्डामुळे पैसे काढण्यासाठी सही लागतच नाही. पेन कालबा झाला तर आपण निरक्षर होऊ ही भावना मनात येण्याचे काहीच कारण नाही, कारण टायपिंग करताना ही कसर भरून निघेल. किंवा फारसे लिहिता येत नाही, पण वाचता मात्र येते हे नक्की म्हणता येईल! अगदी दीड-दोन वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाईल दिला तरी त्यांना त्यात व्हिडियो नेमका कुठे बघायचा हे सांगावे लागत नाही. किंवा गेम कसे शोधायचे हे त्यांच्याकडून शिकता येईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे संगणकाने कागद कालबा ठरविला तर मोबाईलने त्यापुढे जाऊन पेन कालबा ठरविला. आता मोबाईल देखील कालबा होणार आहे.

तुमच्या घराच्या खिडक्या दारे याच आता संगणकाच्या खिडक्या असणार आहेत. पूर्वी कर्त्यां माणसाच्या नजरेच्या धाकात सारे घर चालत असे! आता या कर्त्यां माणसाची जागा संगणक घेणार आहे. त्याच्या नजरेच्या ताब्यात घरातील सर्व व्यवहार असतील. घरातील मंडळी आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृत्रिम अवयवांचा आणि औषधांचा अधिकाधिक वापर करू लागतील याच दिशेने विज्ञानाची पावले पडत आहेत. हे योग्य की अयोग्य हे काळच ठरविणार आहे. माणसांचा परस्परांमधील संवाद अगदी कमी होत जाईल. मानववंश आता उत्क्रांतीच्या सीमारेषेवर पोहोचला आहे. यानंतर त्याच्यात फारसा बदल होण्याची शक्यता उरलेली नाही. नजीकच्या भविष्यकाळात आपण सर्वस्वी औषधांवरच अवलंबून असणार आहोत असे दिसते. पाश्चिमात्य जगात ९० टक्कय़ांहून अधिक विद्यार्थी आकलन वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधे घेत आहेत. जागतिक पातळीवर हे प्रमाण सध्या जरी कमी असले तर एकदा का हे लोण भारत आणि चीनमध्ये पसरले तर घरोघरी या औषधांचा परिणाम जाणवू लागेल. म्हणजेच अंगात हुशारी बाणविण्यासाठी आपल्याला अभ्यासाची मेहेनत न घेता औषधे मदत करतील! आपले कमी ताकदीचे अवयव आपण अधिक क्षमतेच्या कृत्रिम अवयवांनी बदलू शकणार आहोत आणि मग आपली बुद्धी आणि ताकद आपल्याला हवी तशी आपण विकसित करू शकणार आहोत!

संगणकांप्रमाणे आपली स्मृती देखील बाह्य स्मृती मेघांवर असेल. आताही आपण आपली स्मृती आपल्या मोबाईल फोनकडे ठेवलेली आहेच! कोणाचे फोन नंबर, बँकेचा अकाउंट नंबर, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, क्रेडिट कार्ड क्रमांक, पॉलिसी क्रमांक लक्षात असण्याची किंवा वेगळे लिहून ठेवण्याची आवश्यकता अजिबातच उरलेली नाही. ही सर्व माहिती मोबाईल मध्ये असतेच. आपली सर्व प्रमाणपत्रे, पासपोर्टसारखी महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून आपल्याच मोबाईल मध्ये कायमची उपलब्ध राहतील आशा रीतीने आपण साठवून ठेवू शकतो. आपली आवडती गाणी ऐकण्यासाठी वेगळ्या रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर किंवा सी. डी. ची गरज आता उरलेली नाही. यु टय़ूब वर हवे ते सिनेमे, हव्या त्या मॅचेस आपण हव्या तेंव्हा बघू शकतो. कुणाचे वाढदिवस लक्षात ठेवण्याची मोबाईलमुळे गरज राहिलेली नाही. रात्रीचे बारा वाजताच त्याची सर्व रिमाईंडर्स तुमच्या मोबाईलवर हजर असतात. शुभेच्छा पाठवायच्या की नाही एव्हढेच तुम्ही ठरवायचे असते! म्हणजेच आपण आपली स्मृती मंजुषा मोबाईलकडे गहाण टाकली आहे असे म्हणावयास हरकत नाही! आता मोबाईल फोनच्याच अस्तित्वाबद्दल शंका निर्माण झाली आहे! या मोबाईल फोनची हकालपट्टी होऊन आपल्या घरातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक घराच्या, इमारतीच्या, विमानतळांच्या, रेल्वे स्टेशनच्या, वाहनांच्या खिडक्या आणि दारे आता कॅमेरा आणि मोबाईल असणार आहेत. आपला आवाज हे मोबाईल्स ओळखतील आणि आपल्याला हवी ती माहिती हवी तेव्हा आणि हवी तिथे आपल्याला मिळेल. म्हणजे आता मोबाईल हरविण्याची देखील भीती उरणार नाही! मग  विश्वची माझे घर हे खऱ्या अर्थाने अनुभवयास मिळेल!

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.