नव्या इमारतीत जो तो आपापली गरज आणि सोयीने राहायला येत असला तरी सर्वसाधारणपणे गृहनिर्माण सोसायटय़ांचा वर्धापन दिन हा हटकून २६ जानेवारीला असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतीय प्रजासत्ताक दिनाशी हा एक नवा संदर्भ जोडला जाऊ लागला आहे. या दिवशी सोसायटीतर्फे सत्यनारायण पूजा, लहान मुलांसाठी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम साजरे होत असतात. चाळींमधल्या दीड खोल्यांमध्ये ज्यांच्या आयुष्याची उमेदीची वर्षे गेली, ती पिढी सदनिकांमध्ये मनाने रमू शकली नाही. तुलनेने चाळीमध्ये अनेक गैरसोयी असल्या तरी तेथील वास्तव्य स्वर्गसुखासारखेच होते, असा त्यांचा नॉस्टेल्जिक दृष्टिकोन असतो. अर्थात तो सर्वस्वी खरा असतो असे नाही. कारण चाळीच्या तुलनेत अपार्टमेंटमध्ये आपापल्या कोषात राहण्याचे प्रमाण अधिक हे मान्य केले तरीही ‘चाळी फक्त नांदत्या आणि अपार्टमेंट भांडत्या’ अशी ढोबळ विभागणी करता येत नाही. कारण चाळीतून अपार्टमेंटमध्ये येताना इतर वस्तू्ंप्रमाणे आपला स्वभाव आणि शेजारधर्मही माणसं घेऊन आली. त्याचे प्रत्यंतर अशा प्रकारच्या सोसायटीच्या कार्यक्रमांमधून घडते. एकमेकांविषयी मनात कितीही अढी असली, कशातही न गुंतण्याची अलिप्तता असली तरीही चाळींप्रमाणेच अपार्टमेंटमधूनही कोजागिरी, नवरात्र असे सण उत्साहाने साजरे होतात. होळीच्या दिवशी सुट्टी असली तरीही त्या दिवशी रंगांच्या दहशतीमुळे कुणी सहसा बाहेर पडत नाही. मग सोसायटीचे मेंबर आपापल्या इमारतींमधील पाण्याच्या टाक्या साफ करून तो दिवस सार्थकी लावतात. असाच सोसायटी म्हणून सामूहिकरीत्या साजरा केला जाणारा दिन म्हणजे प्रजासत्ताक. या दिवशी इमारतीत सत्यनारायण ठेवले जाते. टेरेसवर अथवा इमारतीच्या आवारात सोसायटीच्या सभासदांचे स्नेहसंमेलन होते. त्या दिवशी सदनिकांमध्ये गॅस पेटविले जात नाहीत. सर्वजण एकत्र जेवतात. एरवी एकमेकांच्या सदनिकांमध्ये डोकाविण्यास कुणालाही वेळ आणि स्वारस्य नसते. अशा दिवशी मात्र हटकून एकमेकांची विचारपूस केली जाते. अपार्टमेंटमध्येही पहिल्या मजल्यावाले, दुसऱ्या मजल्यावाले असे गट-तट असतात. साधा मेंबर ‘सेक्रेटरी’ झाला की भाव खातो, असे बाकीच्यांचे मत असते. अशा एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने मात्र सगळे काही वेळेपुरते का होईना एका पातळीवर येतात. सोसायटीच्या या संमेलनामध्ये एकमेकांच्या सुखदु:खांबरोबरच इमारतीच्या भवितव्याचीही चर्चा केली जाते. कारण चाळींप्रमाणेच काही वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या अपार्टमेंटही आता जुन्या होऊ लागल्या आहेत. किरकोळ डागडुजी आणि रंगकामानंतरही इमारतीचे वय लपून राहत नाही. त्यामुळे अनेक सोसायटी सभासदांना आता पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. वाढीव अथवा शिलकी एफएसआय वापरून टॉवर उभारण्याचे मनसुबे रचले जाऊ लागले आहेत. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेल्या बहुतेक इमारती तिथेच असल्या तरी परिसरातील भूगोल मात्र कमालीचा बदलला आहे. ‘आम्ही जेव्हा राहायला आलो, तेव्हा खिडकीतून सूर्योदय दिसायचा. आता नव्या इमारतीमुळे भरदिवसा या खोलीत लाइट लावावे लागतात.’ किंवा ‘पूर्वी बाल्कनीतून इतकी हवा यायची की, पंख्याची गरजच लागायची नाही आणि आता..’ असे उसासे ऐकू येतात. त्यामुळे आता लख्ख उजेड आणि मोकळ्या हवेसाठी त्यांना टॉवर हवासा वाटू लागला आहे. माणसांप्रमाणेच घरांच्याही पिढय़ा असतात. सुरुवातीला शहरी संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण असलेली चाळ नावाची पिढी स्वातंत्र्यानंतर हळूहळू लोप पाऊ लागली. मग त्यानंतर अपार्टमेंट संस्कृती आली आणि आता टॉवरचा जमाना आहे.