झुरळे, पाली, चिलटे, डास इत्यादी कीटकांपासून घर मुक्त ठेवायचे हे कठीण वाटले तरी अशक्य नक्कीच नाही. मोठमोठय़ा उद्योग समूहातून, सरकारी आस्थापनांमधून आणि शैक्षणिक संकुलाचे जसे जमा-खर्चाचे वार्षिक ताळेबंद केले जातात तसाच ताळेबंद आपल्या घराचादेखील करणे आवश्यक आहे. काही खर्च जसे आवर्ती स्वरूपाचे असतात (दरमहा भरावे लागणारे वीज बिल किंवा दूरध्वनी बिल) व त्यांची नोंद आपल्याला नीट ठेवावी लागते अन्यथा त्यासाठी भरुदड भरावा लागतो. ताळेबंद फक्त पैशांचाच असतो असे नाही तर आवर्ती स्वरूपात येणाऱ्या सर्वच बाबींचा ठेवावा लागतो. अन्यथा त्याचा कोणत्या स्वरूपात भरुदड भरावा लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे घरातील वस्तूंची देखभाल करण्याच्या देखील तारखा नियमितपणे ठरवून ठेवल्या तर त्याची नक्कीच मदत होते. आपल्या नजीकच्या परिवारातील व्यक्तींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस यांची जशी आपण भ्रमणध्वनीमध्ये नोंद करून ठेवतो तशाच नोंदी जर विविध गोष्टींच्या देखभालीसाठी करून ठेवल्या तर घर स्वच्छ व सुंदर राहील आणि एकदम मोठा खर्चही करावा लागणार नाही. अन्यथा एखाद्या दिवशी एखादी गोष्ट पूर्णपणे कामातून गेल्याचे लक्षात येते! घरात असे नियमित करण्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे बाथरूमची स्वच्छता!
भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त होऊन निधन पावले होते. बाथरूममध्ये पाय घसरून हात-पाय मोडलेल्यांची संख्या कमी नाही. विशेषत: उतारवयात हाडे ठिसूळ झालेली असल्यामुळे व ओल्या फरशीवर पाय सटकन घसरत असल्यामुळे असे अपघात होतात. या अपघातांना बाथरूमची निगा राखण्याकडे झालेले दुर्लक्ष जबाबदार असते. बाथरूम ओले राहात असल्यामुळे त्यातील भिंतींवर व कधी कधी फरशीवरदेखील बुरशीसारख्या कवकांची वाढ होते व त्यामुळे फरशी व भिंती बुळबुळीत होतात. साबण पावडरने बाथरूम धुतले व त्या पावडरचा थोडा जरी अंश फरशीवर शिल्लक राहिला तर त्या अल्कधर्मी वातावरणात काही जातीच्या बुरशींची चांगली वाढ होते. अशा बुरशीच्या वाढीमुळे बाथरूम निसरडे तर होतेचे, शिवाय विविध प्रकारच्या चर्मरोगांनाही सहज आमंत्रण मिळते. प्लास्टिकच्या बादल्या, मग्गे, प्लास्टिकचेच टेबल ठाण मांडून बसलेले असते. किंवा आसने, साबणासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या छोटय़ा पेटय़ा यांसारख्या वस्तूंवर बुरशी किंवा जिवाणू व शेवाळे वाढू शकते. विशेषत: बादली किंवा आसनांच्या खालच्या बाजूस असलेल्या जागेत अशा सूक्ष्म जीवांची वाढ होत राहते व तिकडे लक्ष दिले नाही तर तो स्रोत मग बाथरूममध्ये ठाण मांडून बसतो. प्लास्टिक हाताला बुळबुळीत लागले तर त्याचे कारण हे बुरशी किंवा जिवाणूंच्या वाढीमुळे तरी असेल. किंवा पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे तरी असेल.
बाथरूममध्ये वायुविजन बरोबर होत नसेल तर हवा कोंदट व दमट राहून सूक्ष्म जीवांच्या वाढीला आणखीनच प्रोत्साहन मिळत राहते. त्यामुळे बाथरूममध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी वरच्या बाजूस हवा बाहेर फेकणारा पंखा (ी७ं४२३ ऋंल्ल) असणे आवश्यक असते. बाथरूममध्ये आत शिरले की हा पंखा चालू करावा व बाहेर पडताना आठवणीने बंद करावा. हल्ली बाथरूम व कमोड एकाच ठिकाणी बांधण्याची पद्धत रूढ झाली आहे. जागा वाचविण्यासाठी हे केले जाते, हे उघडच आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने बाथरूम व शौचालय हे वेगळे बांधणेच योग्य आहे. मुंबईसारख्या ठिकाणी बाथरूम लहानात लहान कसे बांधता येईल या दृष्टीनेच काम केले जाते व त्यातच कमोड असले तर त्याचा मानसिक परिणाम वाईट होऊ  शकतो. कमोड व बाथरूम स्वच्छ करण्यासाठी दोन वेगळ्या झाडूंची किंवा ब्रशांची सोय करून ठेवावी, म्हणजे घराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कमी राहील.
हल्ली बाथरूममध्ये त्याच्या छतापर्यंत विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टाइल्स लावण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्याने बाथरूम स्वच्छ राहते असे समजले जाते. काही अंशी ते खरे असले तरी ही स्वच्छता फक्त टाइल्सवरच अवलंबून असते, हे समजणे मात्र चूक आहे. कारण टाइल्स लावणारा कारागीर जर निष्णात नसेल (तसा असण्याची शक्यता कमीच असते) तर त्या लावताना फटी तरी राहतात किंवा टाईल्स व भिंतीच्या मध्ये पोकळी तरी राहते. त्यामुळे झुरळे, पाली यांचे आयतेच फावते. उंच इमारतींमध्ये बाथरूमची गळती हा बहुतेक वेळा ज्वलंत प्रश्न असतो. अशा सतत होणाऱ्या गळतीमुळे ते अस्वच्छ व ओंगळवाणे तर दिसतेच, शिवाय आरोग्याच्या दृष्टीने घातकही असते. कारण या ओल असलेल्या ठिकाणी जी बुरशी वाढते ती दमा व त्यासारख्या श्वसनाच्या रोगांना प्रवर्तक असते. बाथरूमच्या दारांना तैल रंग लावणे आवश्यक असते. अन्यथा सततच्या ओलीमुळे ही लाकडी दारे लवकर सडतात. हल्ली बाजारात तयार दारे मिळतात. ही दारे पार्टिकल बोर्ड (ऊसाच्या चिपाडापासून) ची केलेली असतात. मात्र या दारांना स्टीलचा पत्रा लावणे जरुरीचे असते.
बाथरूमची फरशी किंवा टाइल्स तीन-चार दिवसांनी घासून धुवाव्यात म्हणजे त्यावर माती चिकटून राहात नाही. शहरी भागात वाहनांच्या प्रदूषणामुळे हवेतील जे कार्बनचे बारीक कण निर्माण होतात ते टाइल्सवर असलेल्या ओलसरपणामुळे तिथे सहजपणे चिकटून बसतात. त्यांचा थर दाट झाला तर निघता निघत नाही. त्यामुळे तसा तो साचू न देण्याचेच उपाय केले पाहिजेत. त्यासाठी स्पंज किंवा तत्सम घासणीचा वापर करावा. तारेचे ब्रश सहसा वापरू नयेत. कारण त्यामुळे टाइल्सवर चरे पडतात. आपली अंघोळ झाली की बाथरूम कोरडे करून ठेवण्याची शिस्त अंगी बाणवायला हवी. त्यामुळे आपल्यानंतर जो किंवा जी बाथरूम वापरणार आहे ती व्यक्ती अनवधानानेदेखील पाय घसरून पडणार नाही. ज्यांच्याकडे टब बाथची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकडे टब कोरडा ठेवणे तुलनेने अधिक सोपे असते. अर्थात टब बाथ मावेल एव्हढे बाथरूम आणि त्यासाठी लागणारे पाणी कदाचित फक्त मलबार हिल्स किंवा नेपियन सागरी रस्त्यांवरील किंवा नरिमन क्षेत्रातील घरांमध्येच शक्य आहे!
बाथरूममधील नळांची जोडणी करताना शक्यतो बाथरूमच्या बाहेरून जिथे नळ आत शिरतो त्या ठिकाणी एक नियंत्रक नळ बसविणे आवश्यक असते. म्हणजे नळाचे वॉशर्स बदलताना हा नियंत्रक नळ  बंद केला की त्रास होत नाही. एक नियंत्रक नळ आपल्या घराच्या बाहेर असणेही आवश्यक आहे. त्यामुळे जर चुकून नळ चालू राहिले तर शेजारपाजारचे लोक हा नियंत्रक नळ बंद करून वाहून चाललेले पाणी वाचवू शकतात.
शहरी भागात हजारो किंवा त्याच्या कैकपटीने अधिक घरांमधून पाणी साठवून ठेवले जाते व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अपूर्ण पाणीपुरवठा होत असला पाहिजे. पण नेमक्या याच कारणामुळे पाण्याचा अपव्ययदेखील होतो. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा नळाला पाणी आले की घरात साठवून ठेवलेले पाणी ओतून दिले जाते व नळाला आलेले ताजे पाणी नव्याने साठविले जाते! ओतून दिलेले पाणी वास्तविक खराब झालेले नसते. अक्षरश: २००-३०० लिटर पाणी ओतलेले आम्ही पाहिलेले आहे.
एक ठोकताळा असा आहे की जर सर्वाना आपण २४ तास पाणी उपलब्ध करून दिले तर पाणी आहे त्याच्यापेक्षा निम्म्याने वापरले जाईल. पण वैयक्तिक वापरात मात्र कोणतीही कमी येणार नाही. पाणी वापरात तारतम्य असणे फार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचे आहे.     
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र    

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!