News Flash

आरामदायी फर्निचर

लहानपणी आपण सर्वानीच कोल्हा आणि त्याच्या बोलणाऱ्या गुहेची गोष्ट ऐकली असणार.

आरामदायी फर्निचर

|| गौरी प्रधान

लहानपणी आपण सर्वानीच कोल्हा आणि त्याच्या बोलणाऱ्या गुहेची गोष्ट ऐकली असणार. मीदेखील ऐकली होती, पण त्या गोष्टीचा खरा अर्थ मात्र इंटेरिअर डिझायनर झाल्यावर कळला. आश्चर्य वाटलं का? पंचतंत्रातली गोष्ट आणि इंटेरिअर डिझाइनचा काय संबंध, असा प्रश्न पडला का? पण जरा तुम्ही विचार करा बरं! गुहेत सिंह बसलाय हे लक्षात आल्यावर कोल्हा म्हणतो ‘‘अगं गुहे, आज तू माझं स्वागत का नाही करत? मालक या बसा असे का नाही म्हणत?’’ बाकी गोष्ट वेगळ्या अर्थाची असली तरी मला मात्र घराने असं स्वागत करणंच फार भावतं.

सांगा, तुम्हाला नाही आवडणार असं स्वागत करणारं घर? आपलं घर प्रत्यक्षात जरी बोलू शकत नसलं तरी त्याचा आविर्भाव मात्र स्वागताचा हवा, आणि यात फार महत्त्वाची भूमिका ही असते घरातील फर्निचरची. बैठकीच्या खोलीतील आरामदायक खुर्च्या, सोफे या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे. घरातील बैठक व्यवस्था सुखकारक झाली तर इंटेरिअर डिझाइनमध्ये तुमच्या घराने अर्धी बाजी मारलीच म्हणून समजावे. मागे एका लेखात फर्निचर आरामदायक होण्यासाठी त्याची मोजमापे कशी योग्य हवीत हे आपण पाहिलेच होते. परंतु फक्त योग्य मोजमाप असले म्हणजेच आपला सोफा पूर्णपणे आरामदायक झाला असे नाही, तर त्यावरील ‘अपहोलस्ट्री’ अर्थात आच्छादनदेखील तेवढेच महत्त्वाचे.

सोफ्यासाठी किंवा खुर्चीसाठी आच्छादन निवडणे हीदेखील एक कलाच. सोफ्याचे आच्छादन निवडताना त्याच्या रंगसंगतीचा, पोताचा विचार सर्वात आधी करावा. शिवाय टिकाऊपणा आणि पुढील देखभालीचादेखील विचार करणे गरजेचे.

सोफ्याचे आच्छादन निवडताना सोफ्याचा आकार, तो जिथे ठेवायचा आहे त्या खोलीचा आकार.. अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन निवडावे. खोली लहान आणि त्यामानाने सोफ्याची व्याप्ती जास्त असल्यास शक्यतो जास्त डोळ्यात भरतील असे रंग अथवा फार मोठमोठय़ा नक्षीचे कापड न निवडलेले चांगले. त्याऐवजी हलक्या नक्षीचे किंवा किंचित मळखाऊ रंग घेणे चांगले. पांढऱ्या रंगाचे सोफेही लहान जागेत शोभून दिसतात, परंतु ते निवडताना घरातील इतरही फर्निचरच्या रंगसंगतीला ते शोभतात अथवा नाही हे पाहणे महत्त्वाचे. त्यातल्या त्यात ब्राऊन किंवा कॉफी रंग हे कोणत्याही प्रकारच्या इंटेरिअरसोबत सहज मिसळून जातात.

आपली जागा जर मोठी असेल तर मात्र आपण थोडे उठावदार किंवा भडक रंगदेखील निवडायला हरकत नाही. बऱ्याच मोठय़ा घरांमध्ये एक फॉर्मल तर दुसरी इनफॉर्मल प्रकारची बैठक व्यवस्था आढळते. अशा वेळी फॉर्मल बैठकीसाठी एकरंगी आच्छादन तर इनफॉर्मल व्यवस्थेकरिता थोडी पानाफुलांची  किंवा लक्षवेधक रंगसंगतीही निवडायला हरकत नाही.

सोफ्याच्या आच्छादनासाठी कापड, चामडे म्हणजेच लेदर, तसेच रेक्झिनचादेखील वापर होऊ शकतो. यामध्ये कापड आणि लेदर हे नैसर्गिक घटक तर रेक्झिन हा कृत्रिम पर्याय. ज्यांना सोफ्यासाठी कापडच योग्य पर्याय वाटतो त्यांच्याकरता बाजारात कापडाचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. अगदी कॉटन, खादीपासून ते थेट वेलवेटपर्यंत आपल्याला आवडेल तो पर्याय आपण निवडू शकतो. शिवाय  काही पॉलिएस्टर मिक्स कापडेही फार सुंदर दिसतात. ज्यांना कापडाचा मऊ मुलायम आणि उबदार स्पर्श आवडतो त्यांनी जरूर सोफ्याचे आच्छादन कापडात बनवावे, पण त्याचसोबत काळजी कशी घ्यावी, निगा कशी राखावी हेदेखील समजून घ्यावे. बरेचदा केवळ अतिकाळजी घ्यावी लागेल या भीतीपोटी सोफ्यासाठी कापडाचा पर्याय नाकारणारे लोक मी पाहिले आहेत. पण परत एकदा आधुनिक विज्ञान आहेच की आपल्या मदतीला. सोफ्याचे कापड स्वच्छ राहावे तसेच त्यावर काही द्रवपदार्थ सांडला तर आत शोषला जाऊ नये यासाठी सोफ्यावर एक प्रकारचे रासायनिक लेपन केले जाते. विशेष म्हणजे या  लेपनामुळे कापडाच्या मूळ गुणधर्मात कोणतेही बदल आपल्याला जाणवत नाहीत. तरीही कालांतराने सोफे मळतातच, तर त्यासाठी चक्क सोफे धुतादेखील येतात. या धुण्याच्या प्रक्रियेला शॅम्पूइंग असे म्हटले जाते. साधारणपणे वर्षांतून एकदा जरी या पद्धतीने सोफे स्वच्छ केले तरी चालतात. अर्थात, हे सर्व करणाऱ्या कंपन्या असतात. त्यांना कंत्राट दिले की आपण मोकळे.

कापडाच्या नंतर येते लेदर. लेदर तसे म्हटले तर कापडापेक्षा काळजी घ्यायला सोपे, पण तितकेच महागदेखील. लेदर घेताना खात्रीशीर दुकानातूनच घ्यावे अन्यथा फसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. लेदर कोणत्या प्राण्यापासून मिळवले आहे यावर त्याचा पोत ठरतो, परंतु दर्जेदार लेदर टिकतेही चांगले आणि त्याचा स्पर्शदेखील छान उबदार लागतो. लेदरची काळजी घेताना त्याला नियमित कोरडय़ा कपडय़ाने पुसावे. त्याचे कानेकोपरेदेखील व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून स्वच्छ ठेवावेत. बाजारात लेदर स्वच्छ करण्यासाठी म्हणून काही खास उत्पादनेदेखील मिळतात, त्यांचा वापर करून वर्ष-सहा महिन्यांनी संपूर्ण सोफा स्वच्छ करून घ्यावा. याखेरीज घेण्याची महत्त्वाची काळजी म्हणजे लेदरचे फर्निचर कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. नाहीतर थोडय़ाच काळात त्याची सालटी निघायला सुरुवात होईल.

लेदरचा विचार करता तसा तो एक महागडाच प्रकार. म्हणूनच त्याला पर्याय म्हणून तसेच दिसणारे रेक्झिन आपण सोफ्याचे आच्छादन म्हणून वापरू शकतो. पूर्वी रेक्झिन वापरणे हे कमीपणाचे मानले जात असे, परंतु आज मात्र लेदरलाही मागे टाकेल इतक्या विविध प्रकारांत आणि रंगसंगतीत रेक्झिन मिळते. रेक्झिन हे एक प्रकारे कृत्रिम लेदरच म्हणता येईल, पण लेदरपेक्षा स्वस्त, टिकाऊ आणि फार काळजी घ्यायला न लावणारे असल्याने आधुनिक काळात फारच लोकप्रिय झाले आहे. रेक्झिनची काळजी घेताना ते नियमित कोरडय़ा किंवा थोडय़ा ओलसर कपडय़ाने पुसून घ्यावे, आणि लेदर सोफ्याप्रमाणेच कानेकोपरे व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने स्वच्छ करावेत. द्रवपदार्थदेखील सांडल्यास यात तो शोषला जात नसल्याने फक्त ओल्या कापडाने पुसले की काम झाले. अशा तऱ्हेने रेक्झिन फर्निचरची विशेष काळजी घ्यावी लागत नसली तरी लेदरप्रमाणेच हेही फर्निचर थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. म्हणजे ते अधिक काळ टिकून आपल्याला अधिक काळ आनंद देत राहील.

ginteriors01@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 12:16 am

Web Title: comfortable furniture
Next Stories
1 शासकीय जमिनीवरील सोसायटीच्या पेईंगगेस्टना काढून टाकण्यास अंतरिम मनाई
2 एकटय़ादुकटय़ा वृद्धांची सुरक्षा
3 दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!
Just Now!
X