19 October 2019

News Flash

वास्तुसंवाद : संकल्पनेचा सुसंवाद!

मुक्त चित्रकाराला ( Fine Artist ) कुंचला  घेऊन चित्र रंगविताना रेषांचे, आकारांचे आणि रंगांचे बंधन पाळावे लागतेच असे नाही.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

एखाद्या विचारसरणीनुसार, अंतर्गत रचना करताना संकल्पना कशी आकाराला येते हे मागील लेखात आपण सोदाहरण पाहिले. पण ती संकल्पना प्रत्यक्षात आणताना कलेच्या माध्यमाचा, रचना तत्त्वांचा कसा उपयोग केला जातो ते पाहू.

कोणताही विचार प्रत्यक्षात येण्याआधी तो मनाशी नीट मांडावा लागतो. त्याचे कृतीत रूपांतर करण्याआधी त्याला निश्चित स्वरूप द्यावे लागते. विषयाची स्पष्टता आणून बारकाईने काढलेल्या मुद्दय़ांची क्रमवारी ठरवावी लागते. त्याचप्रमाणे अंतर्गत रचना करताना विषयानुसार संकल्पना आकारात आणण्यापूर्वी त्या विषयाची स्पष्टता, सदर विषय वास्तवात, दृश्य स्वरूपात आणताना व्यावहारिकदृष्टय़ा असलेली बंधने, कला माध्यमांच्या दृष्टीने त्या विषयांची व्याप्ती, संकल्पनेची अंमलबजावणी करताना लागणारे आणि उपलब्ध होऊ शकणारे तंत्रज्ञान अशा अनेक अंगांचा विचार करावा लागतो.

मुक्त चित्रकाराला ( Fine Artist ) कुंचला  घेऊन चित्र रंगविताना रेषांचे, आकारांचे आणि रंगांचे बंधन पाळावे लागतेच असे नाही. पण उपयोजित कलाकार (Commercial Artist ) किंवा अंतर्गत रचनाकार (Interior Designer) यांना वास्तवाचे भान आणि व्यावहारिक उपयोगिता या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच रंग, रेषा, घनाकार, प्रकाशयोजना, इत्यादी रचना घटकांचा वापर करावा लागतो. जागेचा आराखडा निश्चित करताना तसेच विषयानुसार संकल्पना विकसित करताना उपभोक्त्याच्या दैनंदिन गरजा, आवडी-निवडी, सवयी, छंद तसेच उपलब्ध नैसर्गिक सूर्यप्रकाश या सर्वाचा विचार केला जातो.

संकल्पना किंवा कलाप्रवृत्ती या काळानुसार बदलत जातात. काळानुसार पारंपरिक, आधुनिक, अत्याधुनिक असे त्याचे वर्गीकरण तर आपण पाहिलेच. बरेचदा संकल्पना ही एका विशिष्ट विषयाला अनुसरून केली जाते. जो विषय उपभोक्त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असू शकतो. व्यावसायिक जागेसाठी अंतर्गत रचना करताना त्या व्यावसायिक क्षेत्रातील सेवा किंवा उत्पादनाच्या संदर्भातील असू शकतो. परंतु काही झाले तरी संकल्पना ही  स्वप्नवत नसावी तर त्यामागे  एखादा चांगला  विचार असावा. त्या विषयाला गाभा असावा. हा विचार कधी सामाजिक विषयासंदर्भातील असू शकतो, राजकीय वर्तुळातील असू  शकतो, शास्त्रीय तत्त्वावर आधारित असू शकतो किंवा भौतिक, आधिभौतिक, आध्यात्मिक असाही असू शकतो.

रचनाकार संकल्पनेच्या बाबतीत साधारणपणे दोन ते तीन पर्याय सुचवतो. यावर उपभोक्त्याशी चर्चा करून मगच त्यापैकी एका संकल्पनेवर सविस्तरपणे काम केले जाते. कधी कधी अंतर्गत सजावट ही एखाद्या नैसर्गिक संकल्पनेवर किंवा घटकावर आधारित असते. घरांच्या अंतर्गत रचनेचा विचार करताना बरेचदा संकल्पना ही एखाद्या विशिष्ट घनाकारावर किंवा रंगसंगतीवरदेखील आधारित असू शकते. विशेषत: लहान मुलांची खोली किंवा स्वयंपाकघर असेल तर काही अंशी अनुस्फुरक रंगांचा (fluorescent colours) वापर केलेला आढळतो. किंवा देवघर असेल तर शांत किंवा मंगलमय वातावरण निर्माण करणारे रंग जसे की- पांढरा किंवा सौम्य केशरी रंगाचा वापर केलेला आढळेल. रंगांचा वापर करताना कोणता रंग किती प्रमाणात आणि कोणत्या वस्तूच्या कोणत्या भागात वापरला जातो आणि मग त्यावर नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाशाचा कसा प्रभाव पडतो या गोष्टींचा सखोल विचार होणे महत्त्वाचे. नैसर्गिक प्रकाशाचे परावर्तन, त्यानुसार जाणवणारा रंगांचा तजेलदारपणा यानुसार त्या खोलीतील नैसर्गिक ऊर्जेची देवाणघेवाण अवलंबून असते. म्हणूनच आपल्याला एखाद्या खोलीत इतर खोल्यांच्या मानाने उत्साही वातावरण जाणवते. त्याचप्रमाणे भौमितिक आकारावर आधारित संकल्पना प्रत्यक्षात आणताना त्या आकारांचे मोजमाप (Measurement), प्रमाणबद्धता (Proportion), स्थान (Location  किंवा Placing ) या गोष्टी लक्षात घेतल्याच पाहिजेत. ज्याच्या दोन्ही बाजू सारख्या नाहीत असे म्हणजे विषममितीय (Unsymmetrical ) डिझाइन करणे याचा अर्थ रचनात्मक  प्रमाणबद्धता (Design Balance) नसणे असा होत नाही. अशा प्रकारच्या रचनाही खूप उत्तम प्रकारे मनाला भावतात. रचनेचा समतोल (Balance) राखणे आणि ताल (Rhythm) सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे. बरेच वेळा ग्राहकांची अशी मागणी असते की, छानसे टी.व्ही. युनिट डिझाइन करून हवे असते. परंतु दिवाणखान्यातील रचना करताना फक्त टी.व्ही. युनिटचा विचार न करता त्या संपूर्ण खोलीचा विचार करून डिझाइन केले तर तेथे रचनेत नक्कीच एक सुसंवाद (Harmony) जाणवतो. आराखडा तयार करताना तसेच विषयाला अनुसरून संकल्पनेनुसार  रेखाटन करताना हा सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा.

हा सुसंवाद कोणाचा? कोणाशी? तर रचनाघटकांचा म्हणजे रेषा, आकार, घनाकार, रंग, प्रकाश यांचा एकमेकांशी चाललेला सुसंवाद..  किंवा त्या खोलीतील वस्तूंचा, व्यक्तींचा परस्परांशी चाललेला सुसंवाद..  उपभोक्त्यांकडून त्या जागेत होणाऱ्या गतीचा (Movement) त्या जागेच्या आणि तेथील वस्तूंच्या मितींशी (Movement) होणारा सुसंवाद. रंगसंगतीच्या, भौमितिक आकारांच्या आणि प्रकाशाच्या खेळातून निर्माण होणारा सुसंवाद. आणि अंतिमत: डोळ्यांना झालेला आनंद आणि मनाला भावणारा सुखदपणा यामुळे आपला आपल्याशी होणारा सुसंवाद.

अशा या सुसंवादाला गणिताच्या कोष्टकात कशाला बरे बसवतात? डोळ्यांना सुखकर वाटत असेल तर सुंदरतेची मोजमापे कशाला हवीत? अर्थात ती तशी नसावीतच.  विस्तीर्ण पाणथळीमध्ये निश्चल उभा असलेला निष्पर्ण वृक्ष हा एक निसर्गात दिसणारा चमत्कारच नाही का? म्हणूनच म्हणतात की, सुंदरतेची कधी व्याख्या करता येत नाही. ती एक अनुभूती असते. अशी अनुभूती आपल्याला निसर्गातच नाही तर मानवी कलाकृतींमध्येही होते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला पाठबळ देत असते. म्हणूनच आपण जेथे राहतो, वावरतो तेथील वातावरण, रचना, त्यामागील संकल्पना उच्च विचारांवर आधारित असेल आणि कलेचा सुसंवाद साधला गेला असेल तर आपल्या जीवनात आनंद-तरंग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

First Published on June 29, 2019 1:32 am

Web Title: conceptualization of concept vastusanwad seema puranik abn 97