|| डॉ. अभय खानदेशे

एके काळी पर्यटन याचा अर्थ आपल्या देशात धार्मिक स्थळांना (शक्यतो कुलदैवताला) भेट देऊन काही कुळाचार पार पाडणे, इतपतच मर्यादित होता. त्या काळचे रस्ते इतके खडतर आणि वाहतुकीची साधने एवढी अपुरी असत, की माणसं घरून प्रवासाला बाहेर पडताना, शेवटचा निरोप घेऊनच निघत. साहजिकच आपल्या देशातील महत्त्वाच्या बांधकामांची निर्मिती  या ना त्या धर्माशी सबंधित आहे.

गया शहरातील बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना दिव्यज्ञान प्राप्त झाले असे मानले जाते. अर्थात त्या काळीही मंदिर, विहार बांधले गेले असतीलच. पण आज त्या बांधकामातील काहीच अस्तित्वात नाही. भोपाळजवळचा सांचीचा स्तूप हे बहुतेक भारतातील सर्वात जुने, ख्रि.पू. ३०० च्या आसपास सम्राट अशोकाने उभारलेले आणि अजून दिमाखात उभे असलेले बांधकाम. सांची, अशोकाची पट्टराणी ‘देवी’चे माहेर आणि त्यांचे विवाहस्थळ. महेंद्र व संघमित्रा ही देवीचीच मुले. संपूर्ण वीटकामात असलेला, अर्धगोलाकृती आकाराचा हा स्तूप, युनेस्कोच्या मते, हे बुद्ध धर्मीयांचे सर्वात जुने धर्मस्थळ.

चलनी नोटांपासून अनेक ठिकाणी आपल्या देशाचे प्रतीक म्हणून विराजमान असलेले चार सिंह, ही अशोकाचीच देणगी. वाराणसीजवळील सारनाथ येथील स्तंभावरील सिंहाची प्रतिकृती आपण स्वीकारली आहे. त्याने २३०० वर्षांपूर्वी बांधलेल्या व आज अस्तित्वात असलेल्या सातपकी पाच अशोक स्तंभावर सिंह आहेत. त्यातील एक स्तंभ सांचीला आहे. जाता जाता अशोकाने किलगाच्या युद्धानंतर विरक्ती येऊन केवळ धार्मिक कर्मकांडेच केली असे नसून त्याने मौर्य साम्राज्यात दवाखान्याची साखळी उभारली होती.

आंध्रप्रदेशच्या अमरावती (नवी राजधानी येथेच होतेय) जवळील महाचत्य स्तूप आजच्या मापानेदेखील महाकाय. जवळजवळ ५० मी. व्यास व २७ मी. उंचीचा (अंदाजे ९ मजले) होता. अगदी १९ व्या शतकापर्यंत आपण तो स्तूप अक्षरश: मोडून खाल्ला. बांधकामाचा चुना खरवडून नेला, दगड विटा काढून नेल्या. अर्थात यालाही जागतिक वारसा आहे. अगदी ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप अर्बन ६ यांनी रोममधील पॅन्थेऑनचे  बांधकाम तोडून त्यातील ब्राँझचे ट्रस वितळवून वापरण्याचे दिलेले आदेश सापडले आहेत.

कैलास पर्वत मानसरोवर भूभागातील (की नऋत्य चीनमधील सिशुआन प्रदेशातील) अष्टपद मंदिर हे बहुतेक जैन धर्माचे सर्वात जुने धर्मस्थळ. त्याचं निर्माण पहिले र्तीथकर भगवान आदिनाथ तथा ऋषभदेव यांनी केलं असं मानतात. त्याचं निर्वाणही तिथेच झालं असा समज आहे. परंतु अष्टपद मंदिराच्या नक्की ठिकाणाचा सबळ पुरावा आजतागायत न मिळू शकल्याने, गुजरातमधील पालीथाना किंवा झारखंडमधील सम्मेतशिखर यांना हा मान जातो. पालीथाना शहराजवळील शत्रुंजय पर्वतावर तीन हजारांहून अधिक मंदिरांचं बांधकाम, साधारण ९०० वष्रे चाललं असावं असा अंदाज आहे. साहजिकच अनेकांचा त्याला हातभार लागला आहे. अगदी शहाजहानचा मुलगा मुरादबक्षपासून ब्रिटिशापर्यंत अनेकांनी या मंदिरांच्या उभारणीसाठी आíथक आणि इतरही मदत केली आहे. (वल्लभभाई पटेलांनी खालसा करेपर्यंत पालीथाना ९ तोफांची सलामी असलेले संस्थान होतं).

जैन धर्माप्रमाणे, चोवीसपकी वीस र्तीथकरांनी, छोटा नागपूर पठारावरील सम्मेतशिखर येथून मोक्षप्राप्ती केली असं मानलं जातं (त्याचं निर्वाण झालं). येथल्या मूर्ती जुन्या असल्या तरी मंदिराचं बांधकाम १७ व्या शतकाच्या आसपास झालं असावं असा अंदाज आहे.

माउंट अबूजवळील दिलवाडा मंदिरे बरीच प्राचीन काळातील असून संगमरवराच्या अत्यंत कोरीव कामासाठी जगप्रसिद्ध आहेत. कर्नाटकात श्रवणबेळगोल येथील गोमटेश्वराची(बाहुबली) मूर्ती सन ९८३ मध्ये गंगा राजवटीत उभारण्यात आली असावी. दर बारा वर्षांनी महामस्तिकाभिषेक होणारी ही ५७ फुटी मूर्ती जगातील उंच आणि जुन्या मूर्तीपकी एक. अर्थात येथे आपण राजकीय वा ऐतिहासिक, होत असलेल्या किंवा होऊ घातलेल्या अजस्र पुतळ्यांचा विचार करत नाही आहोत.

इसवी सन ही ख्रिचन धर्माची जगाला देणगी समजली जाते. अर्थात चर्च बांधण्यास इ. स. नंतर सुरुवात झाली. ७५% हून जास्त मुस्लीम लोकसंख्येच्या, आणि अंतर्गत यादवीने लाखो बळी घेतलेल्या मध्य पूर्वेतील सीरिया देशात, जगातील सर्वात जुने चर्च आहे.  इ. स. २३५च्या जवळपास बांधलेल्या या चर्चचे आज फक्त अवशेष शिल्लक आहेत. त्यामुळे जुन्याचा मान जातो त्या रोमजवळील सेंट पीटर्स बॅसिलिकाचे बांधकाम इ.स. ३३३ च्या आसपासचे.

आज आपण व्हॅटिकन सिटी म्हणून ओळखत असलेल्या या संकुलाला भव्य दिव्य रूप मिळाले १५ व्या शतकाच्या आसपास. सामान्यांना खरा धोका मोठी स्वप्ने पाहणे आणि ती सफल न होणे हा नसून, क्षुद्र स्वप्नांचा पाठलाग करणे आणि ती खरी होणे हा आहे असे सांगणारा मायकेल अँजेलो (काय म्हणू याला शिल्पकार, आíकटेक्ट, चित्रकार, कवी.. शब्दच काय अनेक लेख अपुरे पडतील) त्या बॅसिलिकाच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वाचा कर्ताधर्ता होता. त्याच्याइतकाच महत्त्वाचा वाटा आहे बेनिनीचा. बरोक ज्यात विरुद्ध गोष्टीची तुलना (कॉन्ट्रास्ट), अनेक भरघोस तपशील, भव्यता आणि आश्चर्यकारक बाबींचा समावेश करून एक आदरयुक्त दबदबा निर्माण केला जातो त्या कलेचा बेनिनी हा खंदा पाईक.

आज जगात अनेक ठिकाणी मेगाचर्च बांधली गेली आहेत. ज्यात नित्यनियमाने पूजा (मास) होत असते. तरी व्हॅटिकन सिटीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही की होणारही नाही. हा प्रकार आपल्याकडेही आढळतो. धनाढय़ उद्योगपती बांधकामात खंड न पडू देता मंदिरांची साखळी जरी उभारत असले, तरीही सामान्य वारकरी आजही ऊन-पावसाची पर्वा न करता पंढरीची वाट धरताना दिसतो.

जगातील सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन. (जगातील तीनपकी एक जण ख्रिश्चन असतो, भारतात पन्नासपकी एक) भारतात या धर्माची सुरुवात इ. स. ५२ मध्ये येशू ख्रिस्ताच्या मुख्य बारा शिष्यांपकी एक सेंट थॉमस  केरळच्या किनाऱ्यावर उतरला, तेव्हापासून झाली असावी असा एक मतप्रवाह आहे. केरळची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या त्रिसूरमधील पलायूर इथे त्याने भारतातील पहिल्या चर्चची उभारणी केली असं मानतात. मात्र, कुठलाच खात्रीशीर पुरावा उपलब्ध नसल्याने, पाश्चिमात्य इतिहासकार  या मांडणीला वा तर्काला दुजोरा देत नाहीत.

जागतिक इतिहासात मलाचा दगड ठरलेली एक घटना म्हणजे, इ. स. १४९८ मध्ये वास्को द गामा कालिकतला उतरला. तेव्हापासून पोर्तुगीज भारतात आले. तत्कालीन कोचीन राजाच्या परवानगीने, त्यांनी किल्ल्याबरोबर चर्चही बांधण्यास सुरुवात केली. फोर्ट कोच्ची येथे १५१० मध्ये बांधलेलं सेंट फ्रान्सिस चर्च हे भारतातलं सर्वात जुनं युरोपिअन चर्च समजलं जातं.  वास्को द गामा त्याच्या तिसऱ्या भारत स्वारीत (तो आता व्हाइसरॉय बनला होता) १५२४ ला मरण पावला. त्याचे दफन याच चर्चच्या आवारात केलं गेलं. चौदा वर्षांनी कबर उकरून त्यातील अवशेष शासकीय इतमामाने लिस्बनला पाठविण्यात आले. अगदी मुंबईतील दादरचं पोर्तुगीज चर्चसुद्धा सन १५९६ इतकं जुनं. चार वेळा नव्याने बांधलं गेलेलं पण मूळ ठिकाणीच.

त्यामानाने इंग्रजांनी भारतात चर्च बांधण्यास उशिरा सुरुवात केली. सन १६०८ च्या सुमारास इंग्रजांनी भारतात सर्वप्रथम सूरत येथे वखार उभारली. शिवाजी महाराजांच्या सूरत स्वारीत मुगल सुभेदार लपून बसला असताना इंग्रज व्यापाऱ्यांनी प्रतिकार केल्याचे पुरावे आहेत. औरंगजेब बादशाहने उपकाराची परतफेड म्हणून इंग्रजांना एक वर्ष आयात शुल्क (कस्टम डय़ुटी) माफ केली होती. इतका जुना संबंध असूनदेखील सूरतमध्ये चर्च उभारण्यास एकोणीसावं शतक उजाडलं. मद्रास, मुंबईचं महत्त्व इंग्रजांसारख्या हाडाच्या व्यापाऱ्याला कळालं नसतं तरच नवल.

चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील, पूर्वेचं वेस्ट मिन्स्टर अ‍ॅबे समजलं जाणारं सेंट मेरी चर्च हे इंग्रजांनी भारतात  बांधलेलं पहिलं चर्च मूळ लंडनमधलं अ‍ॅबे इ.स.१०६६ सालात बांधलेलं तर आपल्या इथलं इ.स.१६७८ मधलं. त्याच्या आधी जवळपास चाळीस वष्रे कारखान्यातल्या भोजनगृहात प्रार्थना (मास) होत असे. हे चर्च, मूळ अ‍ॅबेशी बरंच मिळतजुळतं व तशाच गोथिक शैलीत बांधलेलं आहे. मूळ बांधकामाचा खर्च अधिकारी व सनिकांनी वर्गणी काढून केला अशीही नोंद सापडते. मद्रासनंतर नंबर लागला मुंबईचा.

इंग्रजांनी मुंबईतील चर्च १७१ ८मध्ये बांधलं. या बांधकामासाठीदेखील शासकीय खजिन्यातून निधी देण्यात आल्याची नोंद नाही. नंतरच्या काळात इंग्रजांनी कलकत्ता, दिल्ली, कोलंबो (तत्कालीन सिलोन त्यांच्याच ताब्यात होतं), हैदराबाद, रावळिपडी, पेशावर अशा अनेक महत्त्वाच्या शहरांत चच्रेस उभारली. उद्देश स्पष्ट होता, राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या शहरात वास्तव्यास असणाऱ्या त्यांच्या प्रजेची धार्मिक भूक भागविणे व जमल्यास धर्मप्रसार करणे. जरी राजकोशातून अधिकृतरीत्या खर्च करून, धार्मिक बांधकामे झाली नसली तरी जवळपास सर्व व्हाइसरॉयचा त्यांना वैयक्तिक पाठिंबा होता हे नक्की.

काही काळ डच लोकांचं केरळ, बंगाल अशा ठिकाणी जाणवण्याजोगं वास्तव्य होतं. अर्थात राजकीयदृष्टय़ा डच भारतात कधीच प्रबळ नव्हते. साहजिकच व्यापार करून नफा स्वदेशी पाठविणे, एवढाच त्यांचा उद्देश राहिला. केरळमधील मुन्रो बेटावर १८७८ मध्ये त्यांनी बांधलेलं चर्च त्यातल्या त्यात जुनं. पण कोच्चीमधली त्यांनी १७२४ मध्ये बांधलेली दफनभूमी (सिमेट्री)भारतातली सर्वात जुनी सिमेट्री समजली जाते. १९१३ पासून तिचा वापर बंद करण्यात आला.

परदेशी आक्रमणात फ्रेंच सर्वात शेवटी, १७ व्या शतकाच्या अखेरीस भारतात आले. त्यांच्या राजवटीत गॉथिक पद्धतीने बांधण्यात आलेले पुददुचेरी येथले सेंट अ‍ॅन्ड्रज चर्च इ.स. १७४५ मधले. बहुतेक सर्वात जुने. सन १७६१ मध्ये लढाईत इंग्रजांनी पॉन्डिचेरी (त्या वेळचं नावं) जिंकल्यावर हे चर्च पूर्णत: पाडून टाकले. एकूण जेत्यांनी पराभुतांची धर्मस्थळे तोडणे ही जगभराची सर्वकालीन थोर परंपरा. आणि कुठलाही धर्म याला अपवाद नाही हे कटू सत्य. आपण आज जे सेंट अ‍ॅन्ड्रज चर्च पाहतो ते सन १८३० च्या सुमारास नव्याने बांधलेलं. गोथिक शैलीत बांधलेल्या या चर्चमधील भिंतीवर त्या काळात तमिळ भाषेत केलेल्या नोंदी आहेत. एके काळी फक्त फ्रेंच धर्मगुरू (बिशप) असणाऱ्या या चर्चमध्ये, आता अर्थात तमिळ भाषिक बिशप असतात. पण अगदी आता आतापर्यंत या चर्चमध्ये फ्रेंच भाषेत मास केली जात असे.

शीख, मुस्लीम आणि हिंदू धर्मातील धार्मिक स्थळांनाही अनेक शतकांचा वारसा आहे. त्यापकी काहींची माहिती घेऊ या पुढच्या लेखांत.

khandeshe.abhay@gmail.com