बांधकामशास्त्र (आर्किटेक्चर) या विषयावर लिहिणे म्हणजे इतिहास किंवा पद्य लिहिणे नव्हे. इतिहास मुळातच रंजक, पूर्वजांच्या पराक्रमाच्या आठवणींनी स्फुरण देणारा; तर काव्य रुंजी घालणारं, मनाच्या हळुवार कोपऱ्यावर मोरपीस फिरवणारं. पण प्रत्येकानं आपलं काम करायलाच हवं ना, असं व्ह्रिटव्हिअसचं मत. म्हणून त्याने बांधकाम या विषयावर एक ना दोन, दहा पुस्तके लिहिली. अंदाजे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात. रोमन सम्राट जुलिअस सीझरच्या दरबारातला हा सिपहसालार, लेखक आणि अभियंताही होता.

पहिल्या पुस्तकात व्ह्रिटव्हिअस आर्किटेक्ट/अभियंता कसा असावा ते सांगतो. तो अर्थात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला असावा, त्याला पेन्सिलचा वापर कुशलतेने येत असावा, त्याला इतिहासाची जाण असावी, तत्त्वज्ञान समजू शकणारा असावा, वैद्यकशास्त्र थोडे माहीत असावे, गायनाची आवड असावी, कायद्याची बांधिलकी मानणारा असावा, त्याला खगोलशास्त्र येत असावे, इत्यादी.. (आज हे सर्व निकष लावून पदवी द्यायची ठरवली तर निकाल किती टक्के लागेल?) हे सर्व का? याचे तो तत्कालीन संदर्भ देऊन स्पष्टीकरण देतो. काटकसर, बांधकाम साहित्याचे योग्य व्यवस्थापन व एकुणातील तारतम्य वापरून होते हे सुचवितो. नगर रचनेत मोठय़ा, मध्यम आणि लहान रस्त्यांची आखणी कशी करावी, त्यात सार्वजनिक इमारती कुठे आणि कशा असाव्यात (समुद्रकिनाऱ्यावरील शहरात समुद्राकडे तोंड करून, तर देशाच्या आतील भागातील शहरात मध्यभागी) आणि  नंतर वैयक्तिक घरकुले वसवावी ही माहिती देतो. सुरक्षेच्या कारणास्तव नगर गोलाकारात वसवावे. चौकोन किंवा आयताकृती आकाराने शत्रूला लपण्यास जागा मिळते.

हवामान आणि बांधकाम यांचा जवळचा संबंध आहे असे तो मानतो. गार वारे मानवत नाहीत. गरम वारे कमजोर करतात तर पावसाळी वारे आजार आणतात. त्यामुळे  रस्ते आणि  घरांची आखणी कोणत्या दिशेने केली तर हा वाऱ्याचा परिणाम कमी होतो, हे त्यात आहे. देवळाची जागा शहरात सर्वात उंच ठिकाणी ठेवावी. ‘त्याचा’ हात/आशीर्वाद सर्वाच्या डोक्यावर हवा ही त्यामागची संकल्पना आजही जगभर रूढ असलेली.

माती अडविण्यासाठी भिंतीचे (रिटेनिंग वॉल) डिझाइन हा वर्षांनुवर्षे स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेत विचारला जाणारा आवडता प्रश्न. या भिंतीची भौमितिक रचना एका विशिष्ट नागमोडय़ा पद्धतीने (फोल्डेड प्लेट) केली तर भिंतीवरचा भार तुलनेने कमी जाडीची भिंत वापरूनही सहन करता येऊ  शकतो हे त्या पुस्तकात आहे. जाता जाता हे फोल्डेड प्लेट प्रकरण अगदी आज, पदव्युत्तर पदवीलाही फारसे शिकवले जात नाही. असो.

जगज्जेता अ‍ॅलेक्झांडरच्या (सिकंदर) दरबारातील दिनोक्रात हे चांगल्या अभियंत्याचे त्याच्यासाठी आदर्श उदाहरण म्हणून सांगतो. नाईलच्या तीरावरील अ‍ॅलेक्झांड्रिया हे व्यापाराचे शहर व बंदर ही दिनोक्रातची निर्मिती. आजही अ‍ॅलेक्झांड्रिया इजिप्तमधील कैरोनंतर दुसऱ्या  क्रमांकाचे शहर आणि सर्वात मोठे बंदर आहे.

दुसऱ्या पुस्तकात प्रामुख्याने बांधकाम साहित्याची माहिती दिलेली आहे. विटांसाठी शक्यतो पांढरी, दुधाळी किंवा तांबडय़ा रंगाची माती निवडावी. पाऊस संपून ते उन्हाळा येईपर्यंतच्या काळातच विटा पाडाव्यात. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे विटा बाहेरून पक्कय़ा दिसल्या तरी आतून न वाळल्यामुळे कच्च्या राहतात. विटा शक्यतो दोन वर्षे वाळवून मग वापराव्यात. वीट बांधकाम करताना सांधमोड (ब्रेंकिंग जॉइंट) करावी. त्यासाठी कोणत्या पद्धतीने विटा रचाव्या हे तो बारीक तपशिलात सांगतो. ही आज वीट बांधकामासाठी वापरात असलेल्या इंग्लिश, फ्लेमिंश वा तत्सम बॉंडची मूळ आवृत्ती. कमी वजनाचे (लाइट वेट), पण तेवढेच सुरक्षित बांधकाम ही अभियंत्याची सर्वकालीन गरज. त्यासाठी ग्रीसमधील पिताने किंवा स्पेनमधील कॅलेत येथील प्यूमिस स्टोन मातीच्या विटा चांगल्या. त्या पाण्यावर तरंगतात, पण पाणी शोषून घेत नाहीत, हे तो सांगतो.

तपकिरी, काळी किंवा तांबडय़ा रंगाची वाळू शक्यतो खड्डय़ांतून खोदाई करून काढलेली वापरावी. नदीपात्रातील किंवा समुद्रकिनाऱ्यावरील वाळू अपरिहार्य परिस्थितीतच वापरावी हे तो सांगतो. आपल्या आजच्या वाळू उपशावर नंतर बोलू. चुना हा वाळू, विटा व खडी यांना बांधून ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक. सिमेंटचा शोध एकोणिसाव्या शतकात लागला. १९७०च्या दशकापर्यंत वीटकाम व गिलाव्या (प्लास्टर) साठी बांधकामाच्या जागेवर चुन्याच्या घाणी असत. त्यात चुना मळून वापरला जाई. व्ह्रिटव्हिअस चुना मऊ  किंवा कठीण परंतु पांढऱ्याच रंगाचा दगड भाजून तयार करावा हे सांगतो. कठीण दगडापासून बनविलेला चुना महत्त्वाच्या बांधकामाला (पक्षी- कॉलम भिंती) तर मऊ  दगडाचा चुना प्लास्टरसाठी योग्य अशी माहिती देतो. चुना आणि वाळूचे प्रमाण १:३ असावे हे लिखित रूपात प्रथम त्याने सुचवले. ज्वालामुखीतील राख (पोझोलोना) आधीही वापरात असेल. पण काम्पानिया ज्वालामुखीत दगडाची राख होते तर तस्कॅनी ज्वालामुखीतील ज्वलनातून एक विशिष्ट वाळू मिळते. दोन्हीही बांधकामास उत्तमच. तरीही पहिल्या राखेचा उपयोग जमिनीवरील भिंतीसाठी करावा तर दुसरी वाळू समुद्रातील पिलर्ससाठी मुद्दाम वापरावी हा शोध त्याच्या नावावर आहे. त्या काळातही इमारतीची किंमत ठरविणारे (व्हॅल्यूअर) होते असे मानायला आधार आहे. कारण व्ह्रिटव्हिअसने बांधकामाचे वय ८० वर्षे धरून व्हॅल्यूएशनसाठी निकष दिलेले आहेत.

घराची बाहेरची भिंत कमीत कमी दीड फूट जाडीची असावी हे तो सुचवितो. एकापेक्षा जास्त मजले बांधायचे असतील तर तळाची भिंत अजून जाड हवी. त्याचबरोबर शहराचं महत्त्व आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता बहुमजली इमारती हाच पर्याय आहे हे स्पष्ट करतो. लक्षात आहे ना, आपण २१०० वर्षांपूर्वीच पुस्तक वाचतोय.

बांधकामासाठी ओक, जुनिपर, सेदार, हॉर्नबीम, इ. झाडे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून हिवाळ्यापर्यंत तोडावीत. वसंत ऋतूत नवी पालवी फुटण्याच्या सुमारास तोडू नयेत. झाड अर्धवट कापून हळूहळू त्यातील द्रव बाहेर पडू द्यावा, नाहीतर तो द्रव झाडातच कुजून लाकडाची प्रत बिघडते. हे नियम तो देतो.

तिसऱ्या पुस्तकात देवळाच्या बांधकामाविषयी भाष्य आहे. काही जणांना माहीत असेल, आपण दोन्ही हात ताणले तर होणाऱ्या लांबीइतकी सर्वसाधारणपणे आपली उंची असते. पण व्ह्रिटव्हिअस याच्या सोबत, एकूण उंचीच्या दहावा हिस्सा हनुवटी ते शिरोभाग हे माप असते, त्याच्या तिसरा हिस्सा हनुवटी ते नाक हे माप असते, यासारखी अनेक प्रमाणे देतो. त्याच अनुषंगाने सममिती (सिमेट्री) व प्रमाणबद्धता (प्रपोर्शन) हे मंदिर नियोजनात महत्त्वाचे घटक कसे असावेत हे विशद करतो. अंतर्गत रचना व पिलरच्या संख्येवर देवळाचे वेगवेगळे प्रकार कसे होतात याचे वर्णन पुस्तकात आहे. मंदिराच्या दर्शनी भागाच्या पायऱ्या नेहमी विषम असाव्यात, म्हणजे उजव्या पावलाने चढायला सुरुवात केली असता उजवे पाऊलच प्रथम मंदिरात पडेल असे बारकावे तो देतो. पायऱ्यांची उंची आणि रुंदीची त्याने दिलेली बहुतेक मापे आपण आजही वापरतो.

बांधकामाचा त्यातही मंदिराचा पाया हा महत्त्वाचा घटक. एक पूर्ण प्रकरण त्याने पायासाठी लिहिले आहे. खडकापर्यंत पाया घ्यावा हे कोणीही समजू, लिहू शकतो; पण दलदलीच्या व कितीही खोल खणले तरी पक्की जमीन न लागल्यास बर्च किंवा ऑलिव्ह (हल्ली आरोग्यासाठी स्थानिक व स्वस्त तेलाऐवजी वापरायची फॅशन आहे.) वृक्षाचे सरळसोट ओंडके पाईल म्हणून वापरावेत. ते यांत्रिक साधनांनी जमिनीत खुपसावेत (मशीन ड्रीव्हन पाईल) पुलाच्या पायासाठी असेच केले जाते हे तो सांगतो. आपल्याकडे २० व्या शतकात या पद्धतीने पाईलवर बांधलेले धर्मस्थळ शोधायला मोहीम घ्यावी लागेल. कशाला अवघडात जाता? रस्त्यावर बांधा ना त्यापेक्षा!

पिलर, दोन पिलरमधील अंतर, त्यांची लांबी व रुंदी, उंची व आकाराचे गुणोत्तर, पिलरवरची टोपी (कॅपिटल) त्याची मापे, इ. सर्व मोजमापे त्याने अत्यंत तपशिलात दिली आहेत. पावसाचे पाणी छतावर न साचता, तसेच भाविकांना न भिजविता व मंदिराच्या सौंदर्यात बाधा न आणता पिलरमधून खाली गटारीपर्यंत कसे आणावे हे त्यात आहे. हल्ली अनेक बहुमजली इमारती सामाजिक बांधिलकी (की महापालिका करात सूट?) म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाइप अभिमानाने दर्शनी भागात मिरवतात.

चौथ्या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारच्या देवळांच्या बांधकामाची माहिती दिलेली आहे. मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असावा म्हणजे भक्तांना उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून चांगल्या कामाची सुरुवात/प्रतिज्ञा करता येईल. हे शक्य नसेल तर जास्तीत जास्त शहर मूर्तीच्या नजरेत येईल अशा दिशेला दरवाजा ठेवावा. हमरस्त्यावरील मंदिरातील मूर्ती, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सहज दृष्टीस पडेल अशी असावी. दरवाजे लांबी-रुंदीला भव्य तरीही मंदिराच्या उंचीशी प्रमाणबद्ध असावेत. रोमन आणि  ग्रीक साम्राज्यात गोल आकारातही मंदिरे बांधत. (पूर्ण मंदिर गोल, फक्त गोपुरे किंवा कळस नव्हे). व्ह्रिटव्हिअस एका स्वतंत्र प्रकरणात अशा देवळांची, नेहमीच्या चौकोनी मंदिरापेक्षा वेगळी वैशिष्टय़े सांगतो. मधल्या डोमची उंची मंदिराच्या व्यासाच्या निम्मी असावी, इ.

पाचव्या पुस्तकात बॅसिलिका अर्थात समाजमंदिर किंवा कोर्टहॉलबद्दल माहिती आहे. चौकोनी इमारतीचे लांबी-रुंदीचे गुणोत्तर ३:२ असे त्यात आहे. बांधकामाचे वरच्या मजल्याचे पिलर खालच्या मजल्यापेक्षा आकाराने लहान असावेत, कारण वरच्या मजल्याच्या पिलरला तुलनेने कमी भार सहन करायचा असतो, हे तो सांगतो. त्याचबरोबर झाडे कशी वरवर निमुळती होत जातात हे बघायला सुचवितो. खजिना व तुरुंग हे समाजमंदिर आणि सिनेट हॉल (निवडून आलेल्या प्रतिनिधींचे सभागृह) यांना खेटून असावे. एकूण पुढारी आणि तुरुंग यांचा निकटचा संबंध २१०० र्वष जुना.

ग्रीसमधील नाटय़गृहांचे प्लान शक्यतो चौरस आकारात, तर रोमन प्लान समभुज त्रिकोणाच्या संकल्पनेवर आधारित असत. स्टेज एकूण रुंदीच्या किती प्रमाणात असावे, त्याची उंची किती, मधल्या पॅसेजची रुंदी किती ठेवावी, उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचा नाटक बघणाऱ्या आधीच्या लोकांना त्रास होऊ  नये म्हणून पॅसेजची रचना कशी करावी हे वर्णन त्यात आहे. नाटय़गृहाला अनेक प्रशस्त दरवाजे असावेत म्हणजे दुर्घटना टळतील हे तो सांगतो. खुच्र्या मांडताना सर्वात उंचावरच्या आणि सर्वात खालच्या खुर्चीच्या वरच्या टोकावर दोरी धरावी आणि  त्या दोरीवर मधल्या खुच्र्या मांडाव्यात हे त्यात आहे.

नाटय़गृहाच्या ध्वनीव्यवस्थेवर त्याने बऱ्याच तपशिलात लिहिले आहे. त्याला संगीतातील रागदारीचे बरेच ज्ञान होते हे त्यातून दिसते. वेगवेगळ्या स्वर श्रोत्यापर्यंत कसे पोहचतात हे तो वर्णन करतो. विशिष्ट ठिकाणी खुच्र्याखाली खड्डे करून त्यात मातीचे किंवा धातूचे घडे ठेवल्यास आवाज कसा कानापर्यंत पोहोचेल हे सांगतो. मोठे नाटय़गृह असल्यास काय आकाराचे खड्डे व त्यात घडे कुठे आणि कसे मांडावेत हे सांगितले आहे. त्या काळात बरीच नाटय़गृहे विना छत (ओपन एअर) असत. अचानक पाऊस आल्यास प्रेक्षकांना आसरा घेता येईल ही सोय हा महत्त्वाचा घटक आहे असे तो बजावतो.

त्या काळात सार्वजनिक अंघोळीची (हमाम) व्यवस्था असे. हमामच्या लांबी-रुंदीचे तपशील त्याने दिले आहेत. गरम पाणी आत येण्यास व नहाणीचे पाणी बाहेर जाण्यास  कशी रचना करावी हे तो सांगतो. इतकेच काय, गरम पाण्याची वाफ जाण्यासाठी छताच्या डोममध्ये उघडझाप करता येण्याजोग्या खिडक्या कशा ठेवाव्यात हे त्यात आहे.

विहिरीपासून पूल, पाणी वाहून नेणारे कालवे, बंदरे अशा अनेक सार्वजनिक बांधकामाबद्दल व्ह्रिटव्हिअसने बारीकसारीक तपशील लिहिले आहेत. आणखी काही पाहू या पुढच्या लेखात.

डॉ. अभय खानदेशे

khandeshe.abhay@gmail.com