गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील ढोलका तालुक्यातील सारगवाला या गावी पुरातन गोदीच्या बांधकामाची रचना बघायला मिळते. नैसर्गिक आपत्ती आणि पृथ्वीच्या स्थित्यंतरातून ही नगरी नष्ट झाल्याने त्याला ‘लोथल’ हे नामाभिधान प्राप्त झाले. त्याचा साधा-सरळ अर्थ असा आहे की, ‘लोथ’ म्हणजे मृत शरीर.. सध्या हे शहर मृतावस्थेतील म्हणजे नष्ट झाल्याने ‘लोथ स्थळ’ यावरून ‘लोथल’ हे नाव रूढ झाले. ‘मोहन-जो-दडो’ या शब्दाचादेखील सिंधी भाषेत मृत झालेले शरीर असाच अर्थ आहे..
पृथ्वीच्या भूपृष्ठावरील अनेक आश्चर्यकारक गोष्टींची शोधयात्राच अद्याप चाललेलीच आहे. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या साहाय्यांनी ही शोधयात्रा आता तशी सुलभही झाली आहे; तरी या प्रवासातील माणसाच्या जिज्ञासेला अंत नाही आणि सापडणारी अनेक आश्चर्य अनाकलनीय आहेत. पण भूपृष्ठावरील दृश्य स्वरूपातील अजब खान्याइतकेच धरिणीच्या गाभ्यातील हजारो वर्षांच्या इतिहासाचे मिळणारे साक्षी-पुरावे म्हणजे आमच्या वैभवशाली इतिहास-संस्कृतीचे जीतेजागते पुरावेच आहेत.
गेल्या शतकात केलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषावरून ३००० वर्षांपूर्वीच्या आमच्या आदर्श सिंधू संस्कृतीचा शोध लागला. तत्पूर्वी ‘मोहन-जो-दडो’ आणि ‘हरप्पा’ म्हणजेच सिंधू संस्कृती असा सर्वत्र समज रूढ झाला होता. पण दुर्दैवाने फाळणीमुळे ही दोन्ही पुरातन नगरं पाकिस्तानात समाविष्ट झाल्याने इतिहास-संस्कृतीप्रेमींना खंत वाटणं स्वाभाविक होतं. पण त्यासाठी दु:ख करण्याचं काहीच कारण नाही. कारण आतापर्यंत सिंधू संस्कृतीचा शोध लागला. त्यातील अनेक अवशेषांवरून ३/४ स्थळं भारत भूमीवर आहेत. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा येथील अनेक स्थळांच्या उत्खननातून या संस्कृतीचे पुरावे हाती आलेत. येथे सापडलेल्या अनेक वास्तू, वस्तू आणि आदर्श  नगररचनेतून अज्ञात संस्कृतीवर प्रकाश पडतोय. त्यातील गुजरातमधील ‘लोथल’ हे ठिकाण म्हणजे त्याकाळचे सागरी व्यापारी केंद्र होते. इतकेच नव्हे तर जगातील पहिली गोदी (Shiping Dock) चा मान या सागरी व्यापारी केंद्राकडेच जातोय हे मात्र निश्चित.
गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील ढोलका तालुक्यातील सारगवाला या गावी या पुरातन गोदीच्या बांधकामाची रचना पाहायला मिळते. नैसर्गिक आपत्ती आणि पृथ्वीच्या स्थित्यंतरातून ही नगरी नष्ट झाल्याने, त्याला ‘लोथल’ हे नामाभिधान प्राप्त झाले. त्याचा साधा-सरळ अर्थच असा आहे की, ‘लोथ’ म्हणजे मृत शरीर. सध्या हे शहर मृतावस्थेतील, म्हणजे नष्ट झाल्याने, ‘लोथ स्थळ’ असे नावावरून ‘लोथल’ हे नाव रूढ झाले. ‘मोहन-जो-दडो’ या शब्दाचा सिंधी भाषेत मृत शरीर असाच अर्थ आहे.
गुजरातमधील कच्छ प्रदेशातील ‘धोलविरा’ या समकालीन प्राचीन नगरीपेक्षा ‘लोथल’ नगरी अधिक सधन आणि पुरोगामी तसेच प्रशासकीय व्यवस्थेत अग्रेसर होती हे जाणवते. ‘लोथल’ हे त्या काळातील महत्त्वाचे सागरी व्यापारी केंद्र म्हणून सर्वत्र महशूर होते. हरप्पाचे सागरी प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोथल’मधून पाश्चिमात्य देशांबरोबर व्यापार चालत असे. तर खुष्कीच्या मार्गाने वायव्येकडील बलुचिस्तान, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्य़ातील दायमाबाद, कच्छ, हरियाणा प्रदेशांबरोबर व्यापार चालत असे.
‘लोथल’ शहर भूमिगत कसे झाले या बाबतीत मतभिन्नता आहे. या अज्ञात स्थळाचा शोध लागून उणीपुरी ५५ वर्षे झालीत. या शोध यात्रेचा मान पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉक्टर एस. आर. राव यांच्याकडे जातो. अनेक वर्षांच्या परिश्रमातून येथील बांधकामाचा शोध घेता घेता ‘लोथल’ येथे सागरी वाहतुकीची गोदीच होती, या संशोधनाला अनेक अभ्यासकांनी मान्यता दिली आहे. आजच्या प्रगत सागरी, जल वहातुकीसाठी जे काम केले जाते त्याच धर्तीचे काम या पुरातन गोदीतून केले जात होते. जहाजावरील मालाची चढउतार, जहाजाची देखभालीसह त्याच्या दुरुस्तीचे कामकाजही याच गोदीतून व्हायचे. सागरी प्रवाहापासून जहाजांना रोखण्यासाठी प्रचंड आकारमानाचे दगडी नांगरदेखील येथे आढळतात.
लोथलच्या वेशीवर जे विटांचे बांधकाम आढळते तो म्हणजे गोदीसाठी निर्माण केलेला बंधारा आहे. त्याची लांबी ७१० फूट तर रुंदी १२० फूट इतकी आहे. समुद्राच्या भरतीच्या वेळी गोदीक्षेत्रात पाणी आतमध्ये घेण्यासाठी पूर्वदिशेला तर पाणी बाहेर काढण्यासाठी दक्षिण दिशेला दरवाजा आहे. लोथलवासीय नौकानयन क्षेत्रात जाणकार, कुशल होतेच म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी निसर्ग लहरीवर आधारलेली जहाज वाहतूकव्यवस्था त्यांनी कल्पकतेने हाताळली आहे. त्याकाळी जहाज बांधणीसाठी जे टिकाऊ लाकूड वापरले जायचे त्याचे अवशेष आजही आढळतात. तर या गोदीचे बांधकाम ज्या विटांच्या आधारावर केले गेले आहे, त्या विटांची निर्मिती आगभट्टीतून केल्याचे पुरावेही आहेत. या गोदीचे आकारमान मात्र मर्यादित स्वरूपाचे आहे. एकूण लांबी ३७ मीटर, रुंदी २१.८ मीटर, तर खोलीमात्र ४.२६ मीटर आहे. सागरीमार्गे व्यापार करणारे केंद्र म्हणून जरी लोथलचा लौकिक सर्वत्र होता तरी तेथे आढळलेल्या अनेक कलापूर्ण वस्तूंमुळे ही नगरी अनेक प्रकारच्या कलाकृती करण्यातही अग्रेसर होती. येथे सापडलेल्या अनेक कलापूर्ण वस्तूंमधून त्यावेळच्या सामाजिक जीवनशैलीवरही प्रकाश पडतोय. सूत कातणे, आकर्षक दागिन्यांची निर्मिती, बिडापासून, हस्तिदंतांपासून तयार करण्यात आलेल्या कलाकृती तयार करण्यासाठी आगभट्टय़ा व कार्यशाळाही होत्या.
देशविदेशातील सागरी वहातूक करणाऱ्या जहाजावरील फिरस्त्या कर्मचाऱ्यांसाठी येथे विश्रामधाम स्वरूपाची स्वयंपूर्ण निवास व्यवस्था होती. या निवास व्यवस्थेत न्हाणीघर, स्वच्छतागृहांसारख्या प्राथमिक सोयी होत्या. सागर किनारीच्या या स्थळाला पाण्याची प्राथमिक गरज भागविण्यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात विहिरींची सोय केली होती. आजची आधुनिक यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान नसतानाही लोथलवासीयांनी उभारलेली ही नगरी म्हणजे सामाजिक भान असलेली अद्ययावत-परिपूर्ण नगरी होती. लोथलनगर उभारताना त्रिस्तरीय रचना होती हे जाणवते. शहरातील अती उंच भागावर सुरक्षित गढीसदृश निवास व्यवस्था होती, तर मध्य आणि सखल भागात उर्वरित शहरवासीयांची निवास व्यवस्था होती.
लोथलनगरीची उभारणी करताना त्या वेळच्या प्रशासन व्यवस्थेनी स्थानिकांचे लोकजीवन  सुखकारक आणि आरोग्यदायी होण्यासाठी दूरदृष्टी दाखवली आहे. नगरातील कामगार वर्ग तसेच सुरक्षा रक्षकांसाठी स्वयंपूर्ण निवास व्यवस्था होती. प्रशस्त सार्वजनिक स्नानगृह आणि सुरक्षित धान्य कोठारं हे जसे येथील वैशिष्टय़ आहे, तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था हेही वाखाणण्यासारखे आहे. या सांडपाण्याच्या टाक्या पक्क्य़ा विटांनी बांधलेल्या होत्या. निचरा होणारे सांडपाणी नलिकाद्वारे शहराबाहेर सोडून त्याचा योग्य तो निचरा केला जात असे. नगराच्या वेशीवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही होती. मृतदेह दफन करण्याची पद्धती त्या काळी प्रचलित असावी. कारण उत्खननात अनेक मानवी सांगाडे सापडले असून, त्याच्या सभोवताली मडकी, थाळ्या, कटोरे अशा प्रकारची गृहउपयोगी मातीची भांडीही ठेवल्याचे दिसून येते.
बाळबोध-धार्मिक लोथलवासीयांनी नगर उभारणी करताना जे प्रशस्त ओटे बांधलेत त्याचा उपयोग बहुधा कौटुंबिक-सार्वजनिक होम-हवनासारख्या धार्मिक विधीसाठी होत असावा.
लोथलमधील उत्खननात शिक्के-मुद्रांवर काही अज्ञात अक्षरे आणि प्राण्यांच्या चित्राकृतीही दिसतात. येथे तयार झालेला माल निर्यात करताना त्यांच्या वेष्टनांवर उमटवण्यासाठी या मुद्रा-शिक्क्यांचा ठसा उमटवण्याची पद्धती अस्तित्वात होती असाही निष्कर्ष काढला गेलाय.
इतिहास, पुरातन शास्त्र, संस्कृती यात स्वारस्य असलेल्या अभ्यासक, पर्यटकांना या प्राचीन नगरीच्या लोकजीवनासह संस्कृतीची परिपूर्ण माहिती होण्यासाठी येथे सापडलेल्या अवशेषांचे एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. उत्खननात सापडलेल्या दुर्मीळ कलाकृतीच्या वस्तू, अनेक चित्राकृती, अनेक आकाराची मातीची भांडी, नाणी, सोन्याचे मणी, माळा, गज, वस्तरे, शंखशिंपल्यापासून तयार केलेला ओळंबा अशा आश्चर्यकारक वस्तू पाहावयास मिळतात. सापडलेल्या नाण्यांवरील मुद्रांवरून लोथलवासीयांचा मध्यपूर्व देशांबरोबर व्यापार चालला होता, असाही निष्कर्ष जाणकारांनी काढला आहे.
सापडलेल्या अनेक वस्तू, वास्तूंचे अवशेषांवरून ‘लोथल’नगरी समृद्ध आणि सुसंस्कृत होती हे कुणीही मान्य करेल. तीन हजार वर्षांपूर्वीच्या या वैभवशाली नगरीला महापूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसल्याने ती लयाला गेली असावी.
अरुण मळेकर – vasturang@expessindia.com

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Shivaji High School Janefal
धक्कादायक! मुख्याध्यापकाने शाळेतच घेतला गळफास