18 June 2019

News Flash

कढीपत्ता

वडिलांनी तीस वर्षांपूर्वी बदलापूरमध्ये घेतलेल्या प्लॉटवर अनिलने चार वर्षांपूर्वी सुरेख बंगला बांधला आणि लगेच बोहल्यावरसुद्धा उभा राहिला.

| January 18, 2014 08:39 am

वडिलांनी तीस वर्षांपूर्वी बदलापूरमध्ये घेतलेल्या प्लॉटवर अनिलने चार वर्षांपूर्वी सुरेख बंगला बांधला आणि लगेच बोहल्यावरसुद्धा उभा राहिला. ‘लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून’ या उक्तीप्रमाणे त्याने खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीत आणले. बाबांचे मित्र या नात्याने मला वास्तुशांतीसाठी अगत्याचे आमंत्रण होते. बंगला पाहताना माझे लक्ष सभोवतीच्या बागेकडे गेले. पाठीवर कौतुकाची थाप मारताना मी बंगल्याबरोबरच बागेचीसुद्धा स्तुती केली, पण अनिल उत्तरला ‘नाही सर, बाग अजून पूर्ण झाली नाही, मला दोन रोपे ताबडतोब हवी आहेत!’ ती कोणती? हे विचारण्याआधीच त्याने कढीपत्ता आणि पारिजातक हे उत्तरसुद्धा देऊन टाकले. हेच दोन का? यास त्याचे उत्तर होते, ‘बागेच्या  कंपाऊंडमध्ये  आंबा, नारळ, केळी, पपई, पेरू, शेवगा असे काहीही नको. समोरच्या आप्पांनी सहा फुटांचे उंच कंपाऊंड बांधूनसुद्धा घरातील कुणाच्याही ओठास फळाचा स्पर्श नाही. उलट काका-काकूंना निद्रानाश मात्र झाला आहे, उंच उडीमध्ये आम्ही प्रगतिपथावर आहोत, पदक मिळाले नाही म्हणून कुठे बिघडले! अशी मोफत ताजी फळे तर मिळतात ना! तीही स्वादिष्ट! कढीपत्ता बाजारातील भाजीवाला भय्या मसाल्याबरोबर मोफत देतो. घरच्या झाडाचेसुद्धा तसेच! मागितला कोणी तर दिला थोडा! जेवढा दिला त्याच्या चारपट जास्त पाने येतात!  फळांचे तसे आहे का?’ अनिलच्या कढीपत्त्यावरच्या लॉजिकने मला निरुत्तर केले. काही दिवसांनी त्यास कढीपत्ता आणि पारिजातकाचे रोप देऊन मी माझे आश्वासन मात्र पूर्ण केले. दोन महिन्यांपूर्वी मी आवर्जून त्यांच्या बंगल्यास भेट दिली. दोन्हीही वृक्ष बहरून आले होते. एकाच्या पानाचा सुगंध आणि दुसऱ्याच्या फुलांचा सडा पाहून मन हरखून गेले. गरम पोह्य़ांमध्ये बागेतील हिरव्या कढीपत्त्याची पाने उठून दिसत होती. त्यांच्या स्वादाने दुसरी प्लेट कधी संपली हे कळलेसुद्धा नाही. परतीच्या प्रवासात त्याने माझ्यासह अजून दोघांना दिलेला कढीपत्ता माझी सोबत करत होता. जेव्हा मी इतर घरमालकाकडे जातो तेव्हा अनिलची गोष्ट आवर्जून तर सांगतोच, पण कढीपत्ता आणि पारिजातकाबद्दलसुद्धा भरभरून बोलत असतो. कढीपत्त्याचा लहानसा वृक्ष बंगल्यावाल्यांच्याच नशिबात असावा का? यास माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. कढीपत्त्याचे मोठे रोप सदनिकाधारकाच्या बाल्कनीमध्ये मध्यम आकाराच्या मातीच्या कुंडीत अतिशय शोभून दिसते. पानांना एक विशिष्ट प्रकारचा हवाहवासा सुवास पदार्थाची चव वाढवतो. दाक्षिणात्य ‘करी’मध्ये त्यांनी कायमचे घर केले आहे. म्हणूनच त्याचे ‘करीपत्ता’ असे बारसे झाले. महाराष्ट्रीयन आणि गुजराती कढीचा अप्रतिम स्वाद याच पानामुळे म्हणून आपल्याकडे त्यास कढीपत्ता असे म्हणतात. कोिथबीर, मिरची यांच्याबरोबर कढीपत्ता हा स्वयंपाक घरात हवाच. गरम पदार्थात हा सुवास पटकन जाणवतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेल्या विशिष्ट तेलामुळे हा सुवास असतो. पण याचबरोबर तेथे अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. अपचन, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याबरोबरच कढीपत्त्याचा अजून एक महत्त्वाचा औषधी गुणधर्म म्हणजे अकाली पांढरे होत असलेले केस पुन्हा काळे होणे. स्वादाबरोबरच औषधी गुणधर्माचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पदार्थामधील कढीपत्त्याची पाने चावून खावी लागतात. आपण खाण्याचा पदार्थ हातात घेतला की सर्वप्रथम ही पाने बाजूस काढून टाकतो, आहारशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. कढीपत्त्याचा मातृवृक्ष प्रतिवर्षी त्याच्या सावलीत अनेक बाळांना रोपांच्या रूपांमध्ये जन्म देतो. बंगल्याच्या बागेतून आणलेले रोप सदनिकाधारकांच्या बाल्कनीमध्ये एखाद्या लहान कुंडीमध्ये सहजपणे वाढू शकते. रोपवाटिकेमध्येसुद्धा अशी रोपे उपलब्ध असतात. कढीपत्त्याचे रोप एक वर्षांचे झाल्यावर त्याच्या खालच्या बाजूची पाने काढण्यास तयार होतात. सुरुवातीस पाने कमी काढावी. पाने काढल्यावर रोपाची वाढ जोमाने होते. दोन महिन्यांतून एकदा कुंडीमध्ये थोडे शेणखत टाकावे. पाणी मोजकेच द्यावे. जेवढे पाणी कमी तेवढा पानांना सुवास जास्त असतो. कढीपत्त्यावर केव्हातरी अचानकपणे एखाद्या हिरव्या अळीचे आगमन  होते आणि रात्रीतून सर्व पाने गायब होऊन फक्त काडय़ा शिल्लक राहतात. अळीचा रंग हिरवा असल्यामुळे तिला ओळखणे आणि शोधणे कठीण होते, मात्र असाध्य नाही. अळी काढून टाकल्यावर कुंडीमध्ये खत घालून पाणी द्यावे. कढीपत्ता पुन्हा छान फुटतो. कीटकनाशक मात्र मारू नये. बाल्कनी आणि स्वयंपाकघर यांना एकत्र जोडण्यामध्ये कढीपत्त्याचा वाटा फार मोठा आहे. घरातील सर्व लहान-मोठय़ा सदस्यांनी घरच्या स्वादिष्ट अन्नाची चव घ्यावयास हवी असा जर तुमचा अट्टहास असेल तर बाल्कनीमध्ये या सुवासिक मित्रास तुमच्या पाकशास्त्र नैपुण्यात जरूर स्थान द्या. स्वादिष्ट भोजनाचा पोटाकडील प्रवास बाल्कनीमधील या बल्लवाचार्याच्या कुंडीमधूनच जातो, हे जेव्हा प्रत्येक सदनिकाधारकास समजेल तो दिवस खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आरोग्यदिन ठरावा.

First Published on January 18, 2014 8:39 am

Web Title: curry leaves
टॅग Loksatta Vasturang