दादर शिवाजी पार्कला हेरिटेज दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे आणि महापालिकेने काही निर्णय त्या दृष्टीने घेण्यास सुरुवातही केली आहे. अर्थातच त्या विभागात पिढय़ान् पिढय़ा राहणाऱ्या नागरिकांचा, रहिवाशांचा त्याला विरोध असणे स्वाभाविक आहे. कारण एखाद दुसरी वास्तू सोडता त्या विभागात ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करावी, अशी वास्तुरचना किंवा समुद्र सोडला तर नसíगक रचना कुठेही दिसत नाही. कुठल्याही प्रकरणात जमीन किंवा भूखंडाची उपलब्धता दिसून येते तेथे आपोआप बिल्डर अदृश्यपणे कार्यरत असतो, अशी लोकांची समजूत आहे. येथेही सामान्य जनतेला तोच संशय येत आहे. या विषयावर आता बराच खल आणि चर्चा घडत आहेत, पण तेथील रहिवाशांनी एक सत्य मात्र जाणून घेतले पाहिजे आणि ते मान्य करण्याचा सुज्ञपणा दाखवला पाहिजे; ते हे की, दक्षिण मुंबईत अगदी माहीमपर्यंत चारी बाजूंनी फुटपाथने वेढलेल्या लहान-मोठय़ा बेटांवर अत्यंत दाटीवाटीने इमारती उभ्या केलेल्या आहेत. यातील बहुतेक इमारती आता आपली शंभरी लवकरच पूर्ण करतील. बहुतेक इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारे रहिवासी आहेत. भाडय़ाचे अत्यल्प उत्पन्न आणि मालक महापालिकेला देत असलेले कर यातील मोठी तफावत पाहता मालकाने या इमारतींच्या देखभालीकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. यामुळे या जीर्ण इमारती कशाबशा तग धरून उभ्या आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेल्या अशा जरा जर्जर इमारती शासनाला दुरुस्त करता येणे अशक्य आहे. समजा तसे प्रयत्न जरी झाले तरीही ती वरवरची मलमपट्टीच ठरणार, त्यामुळे त्या इमारतींचे वय वाढून वाढून किती वाढणार? कारण बऱ्याच इमारती या लोड बेिरग वास्तुकलेप्रमाणे बांधलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पायाच्या मजबुतीसंबंधी काही कळण्यास मार्ग नाही. दादर शिवाजी पार्क या विभागात कितीतरी अनुभवी वास्तुरचनाकार आणि नगररचनाकार राहत असतील. त्या सगळ्यांनी मिळून त्या विभागातील रहिवाशांसोबत शासनाच्या हेरिटेज संकल्पनेला विरोध करावा, पण त्याचबरोबर तेथील राहिवाशांना विश्वासात घेऊन जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारतीत, सुधारित राहणीमानाला साजेशी नगररचना करणे तेथील रहिवाशांच्या आणि भावी मुंबई शहराच्या दृष्टीने कसे अगत्याचे आणि गरजेचे आहे हे समजावून द्यावे आणि तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा. शासन आणि बिल्डर यांना खलनायक ठरवून मूळ प्रश्न सुटणार नाही, हे वास्तव सर्वानी समजून घ्यावे. शासनाने आणि नागरिकांनी सहमतीने आणि सामंजस्याने हा मुद्दा हाताळला नाही तर ग्रीकमध्ये आणि मोहोन-जादोरोमध्ये ज्याप्रमाणे मानवी वस्तीचे भग्नावशेष आता फक्त जतन केले आहेत तसे हेरिटेज म्हणून मानवी वस्तीचे भग्नावशेष दादर शिवाजी पार्क म्हणून भावी काळात दाखवावे लागतील. दादर शिवाजी पार्कमधील सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक तशी वेळ येऊ देणार नाहीत, अशी आशा करायला हरकत नाही.