09 July 2020

News Flash

घर.. एक सोबती, एक सच्चा मित्र

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची साक्षीदार असलेली अशी ही व्यक्ती असते.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

दिवाळीचा फराळ, दिवाळीची खरेदी, दिवाळीच्या निमित्तानं घर नव्यानं लावणं, ते सजवणं यापलीकडे जाऊन आपण ‘आपल्या घराशी मत्री जोडायचा एक अवकाश’ असंही दिवाळीच्या सुट्टीकडे बघू शकतो. आपलं घर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कसं भासतं, ते आपल्याला काही सांगू पाहत असतं दरवेळी, हे आपल्याला जाणवतं का?

आपलं घर ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, अशा नजरेने आपण आपल्या घराकडे बघतो का? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची साक्षीदार असलेली अशी ही व्यक्ती असते. आपलं घर अतिशय स्थिरचित्ताने आपलं जगणं साक्षीभावाने पाहत असतं. आपल्या जगण्यातले सर्व बारीकसारीक तानेबाने आपल्या वास्तूला माहीत असतात. कधी आपल्याला नीट विचार करून निर्णय घ्यायला हक्काची आरामदायी स्पेस या घराने पुरवलेली असते. तर कधी आपल्या आयुष्यातलं सुख चार लोकांसोबत वाटून घ्यायची जागादेखील दिलेली असते. आपली हक्काची एखादी जागा असणं, आपला एक हळवा कोपरा कुठे तरी असणं, तिथे आपल्याला पूर्णत: सुरक्षित वाटणं, तिथे हवं तसं आणि हवं तेव्हा जगता येणं, हवं ते शिजवून खाता येणं, याचं मुळातच आपल्याला आकर्षण असतं. म्हणूनच माणसं गर्दीत धक्के खात, उन्हा-पावसांत थकत अनेक अंतरावरच्या नोकरीच्या संधी शोधतात आणि आपला स्वत:चा एक निवारा असावा म्हणून आपल्या आवाक्यापेक्षा जरा मोठं असं स्वप्न स्वत:च्या घरासाठी बघतात. भले एकेटेपणाचा ताण राहील काही वर्षे आणि भलेही त्या ताणातून उपजीविकेचा सुरू असलेला घाणा जराही बंद करता येणार नाही, लोक गाडी बंगल्याचे स्वप्न आणि मोठय़ा घराचे स्वप्न बघतातच. भलेही त्या कर्जामुळे उपजीविकेचा वेगळा विचार करता येणार नाही. सुरू असलेलं मानेवर दगड ठेवून सुरूच ठेवावं लागेल, तरी लोक त्या एका हक्काच्या जागेसाठी सर्व हालअपेष्टा सोसायला तयार असतात.

घर म्हटलं की एकत्र कुटुंब, असं चित्र पालटून काही पिढय़ा गेल्या. भल्यामोठय़ा एकत्र कुटुंबाच्या घराच्या गोष्टी आता जुन्या कथा कादंबऱ्यांमधूनच वाचायला मिळतात. अथवा, अशी घरं, असा गोतावळा बटबटीत मराठी मालिकांमध्ये मुद्दाम दाखवतात. सध्याची अनेक लोकांची घरं ही माणसांचा प्रसंगानुरूप जेमतेम राबता असलेली घरं आहेत. एरवी ते आई-वडील आणि मूल/ मुलं, वृद्धावस्थेत पोहोचलेले पालक, एकेकटे राहणारे वृद्ध, सोबतीने राहणारे वृद्ध, एकटे राहणारे तरुण, लिव्ह इनमध्ये राहणारी मंडळी, समिलगी जोडीदार असलेली कुटुंबं, होस्टेलवर राहण्यापेक्षा सर्व सुखसोयींनी युक्त असे फ्लॅट्स भाडय़ाने घेऊन राहणारे, ज्यात आपली वेगळी खोली असेल असे नोकरदार, अशी वेगवेगळ्या शक्यतांची घरं असतात. या सर्व शक्यतांमध्येसुद्धा स्वतंत्र घराच्या सोबतीची, आरामदायी सुविधांची, अ‍ॅस्थेटिक सेन्सची आस असतेच असते. अलीकडच्या काळात शिक्षणासाठी काही वर्षे होस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठीच्या सोयी सुविधादेखील अतिशय अद्ययावत आणि पॉश झालेल्या दिसतात. कारण, कुठेही काही काळ राहणं म्हणजे आपलं आयुष्य त्या चार भिंतींच्या साक्षीनं जगणं! स्वत:ला त्या परिसराशी जोडून घेणं. तिथे चार प्रसन्न गोष्टी असतील, बऱ्या सुविधा असतील, आजूबाजूला निसर्ग असेल, थोडी शांतता आपल्या कोपऱ्यात मिळवता येत असेल, तर आपला ‘स्टे’ आरामदायी होतो. आणि त्या आठवणीसुद्धा आपल्याला हव्याश्या अशाच असतात. अशाही राहत्या जागेत/घरात दिवाळीचा दिवा लावावासा वाटतो. दिवाळीची स्वत:च्या घरी होते, तशी थोडीफार का होईना, स्वच्छता रूढार्थाने आपल्या नसणाऱ्या; परंतु काही काळ आपण राहत असलेल्या जागीदेखील होतेच होते. स्वत:चं घर असेल, तर आवर्जून ते सणाच्या निमित्तानं सजतं. ज्या आयुधांनी आपण घराची स्वच्छता केली, अशा प्रतीकात्मक केरसुणीची पूजाही आपण दिवाळीत करतो.

दिवाळीचा फराळ, दिवाळीची खरेदी, दिवाळीच्या निमित्तानं घर नव्यानं लावणं, ते सजवणं यापलीकडे जाऊन आपण ‘आपल्या घराशी मत्री जोडायचा एक अवकाश’ असंही दिवाळीच्या सुट्टीकडे बघू शकतो. आपलं घर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कसं भासतं, ते आपल्याला काही सांगू पाहत असतं दरवेळी, हे आपल्याला जाणवतं का? एरवी धकाधकीच्या आयुष्यात शांतपणे आपल्या घराशी संवाद साधत एकही दुपार आपण जगलेली नसते, असं कोणाला लक्षात येऊ शकतं. दुपारच्या वेळी आपल्या घराच्या अमुक खिडकीतून कसे उन्हाचे कवडसे पडतात, ते कधी सहजच मनात नोंदवतो का आपण? आपल्या खिडकीतून, बाल्कनीतून सहजच समोर दिसतो, त्या वू पलीकडे आणखीन काही मजेदार त्याच खिडकीतून, त्याच बाल्कनीतून दिसू शकेल का, याचा वेध आपण घेतो का? घरातल्या एखाद्या खिडकीतून फक्त सिमेंटचं जंगल दिसतं, रस्त्यावरच्या रहदारीचे आवाज येतात, असं आपलं नकळत कंडिशिनग होऊन गेलेलं असतं. त्याच खिडकीतून एखाद्या कोपऱ्यातून दूरवरचा आजवर न दिसलेला डोंगरसुद्धा आपल्या फ्रेममध्ये आहे की, हा शोध लावायला जरा उसंत काढून घराचा आस्वाद घ्यावा लागतो. त्याच बाल्कनीत, त्याच एखाद्या खिडकीत खालीवर, पुढेमागे, दूरवर कुठं तरी एखादा पक्षी आपलं घर बनवत असतो. एखाद्या ठिकाणी घर बनवावं इतकी सुरक्षित ती जागा आहे, असं त्या जीवाला वाटलेलं असतं. त्यांना आपण आपल्या दिनचय्रेत जरासा वेळ देतो का? घरातल्या एखाद्या सॉकेटमध्ये एखादी कीटक मादी फार काही माती न करता आपली अंडी घालून ते सील करून जाते आणि कालांतराने त्यातून पिल्लू कीटक उडून निघूनही जातात. इतका सुंदर ‘आँखो देखा हाल’ आपल्याला माहीत तरी होतो का? सकाळच्या वेळी आपलं घर कसं भासतं, भर दुपारी तिथे आजूबाजूला निसर्ग काय खेळ खेळत असतो, मध्यरात्री दोन-अडीच वाजता घराचं, त्याच्या आजूबाजूच्या निसर्गाचं काय सुरू आहे, असा कानोसा आपण घेऊ शकतो. आपल्या घराच्या आजूबाजूने डोकावणारी झाडं हीच एक वेगळी वसाहत असते. ती एक स्ट्रेस बस्टर निसर्ग सफरदेखील होऊ शकते घरबसल्या. कोणत्या वेळी कोणते पक्षी आपल्या खिडकीच्या ग्रीलवर बसून गेले, हे तरी कधी शोधणार आपण?

यंदाच्या दिवाळीची जराशी फुरसत घराशी संवाद साधण्यासाठी बाजूला काढू. घर म्हणजे घरातल्या वस्तू, घरातल्या सोयी, इंटेरिअर, माणसांच्या नात्यांचे तानेबाने यापलीकडे एक जिवंत वास्तू म्हणूनसुद्धा काही अस्तित्व असतं. त्यात खूप प्रसन्नता आणि ऊर्जा साठलेली असते. तिच्याशी बोलायचा, तिला साद घालायचा अवकाश..

बोलून तर पाहा तुमच्या वास्तूशी..

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 12:53 am

Web Title: decorate renovate the house on the occasion of diwali abn 97
Next Stories
1 वस्तू आणि वास्तू : ताटं, वाटय़ा, तवे, चमचे!
2 महारेराचे नवीन परिपत्रक : प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणी
3 वास्तुसोबती : सेफी आमची बॉस
Just Now!
X