१४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर इमारतींचे फायर-ऑडिट व प्रमुख उपाययोजनांचा मागोवा घेणारा लेख.

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’  म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहात स्थानिक स्वराज्य संस्थांचे अग्निशमन दल, विविध कंपन्या/कार्यालये, सामाजिक संस्था त्या अनुषंगाने आग विझविण्याची विविध प्रात्यक्षिके, फायर ड्रिल, मॉक ड्रिल, व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन व चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. परंतु आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात नाही; उलट कमालीची उदासीनता व निष्काळजीपणाच सर्वत्र दिसून येतो. सामान्य व्यवहारातही अग्निसुरक्षेबाबत आढळणारी बेफिकिरीमुळे अग्निसंकटाचे आव्हान सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या सुरक्षित जगण्याच्या हक्कालाच बाधा येऊ पाहात आहे.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी मुलुंडच्या वैती अपार्टमेंट या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखाली असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट-सíकटमुळे आग लागून धुरामुळे गुदमरून तीन जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घाटकोपरच्या पंतनगर येथील सवानी अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील जिन्याखाली असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट-सíकटमुळे आग लागून धुरामुळे गुदमरून दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. त्याचीच पुनरावृत्ती काही दिवसांपूर्वी घोडबंदर रोड येथील पातलीपाडा भागात हिरानंदानी इस्टेट परिसरात असणाऱ्या सृष्टी-कॉम्प्लेक्स इमारतीच्या मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे धुरात अडकलेल्या २०० रहिवाशांची अग्निशमन दलाने सुटका केली.
इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट-सíकट होऊन ही आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी विद्युत केबल आल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि आग सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने इमारतीच्या रहिवाशांमध्ये एकच पळापळ झाली. या घटनेत अग्निशमन दल व ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी वेळेवर धाव घेतल्यामुळे, आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात अडकलेल्या २०० रहिवाशांची सुखरूप सुटका झाली. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. आग ही अत्यंत संहारक आहे. आग त्वरित आटोक्यात न आल्यास धनधान्य, यंत्रसामुग्री, महत्त्वाची कागदपत्रे व चलनी नोटा जळून खाक होतात. बऱ्याचदा प्राणहानीदेखील होते. आत्तापर्यंत लागलेल्या आगींच्या संख्येपकी
९० टक्के आग मानवी निष्काळजीपणा/चुकांमुळे तसेच
शॉर्ट-कट पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आणि शॉर्ट-सíकट झाल्यामुळे आग लागण्याच्या बहुतांश घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वरील घटनांवरून ते अधिक सिद्ध झाले आहे.
खालील तीन गोष्टी एकत्र आल्यास आग लागण्याची शक्यता निर्माण
होते :–
(अ)    कागद, कापूस, कापड, लाकूड, पेट्रोलजन्य पदार्थ, ज्वलनशील वायूरूप पदार्थ, इत्यादी.
(ब)    ज्वलनाच्या क्रियेस आवश्यक असणारा प्राणवायू किंवा हवा.
(क)    आगीने पेट घेण्यासाठी विशिष्ट तापमान, विडी / सिगारेटचे जळके थोटूक, काडय़ापेटीच्या जळत्या काडय़ा, गॅस सिलेंडरने वेल्डिंग/कटिंग करताना
अथवा घर्षणामुळे उडालेली ठिणगी.
वरील तीनही गोष्टी एकत्र आल्यास अत्यंत धोकादायक असा अग्नित्रिकोण तयार होतो. त्यामुळे या तीनही गोष्टी एकत्र येणार नाहीत याची आपण सर्वानी खबरदारी घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे प्रथम आग लागू नये याची काळजी घेणे. परंतु सर्व प्रकारची खबरदारी व उपाययोजना करूनसुद्धा जर आग लागली तर ती अत्यंत परिणामकारक रीतीने विझविणे, इतरत्र पसरू न देणे आणि त्याबरोबरच मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी होऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे. खरे तर, सर्वानी एकत्रित येऊन आगीचे मूळ कारण शोधून काढणे व त्यावर ठोस उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. याची सुरुवात सोसायटीच्या इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखाली असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट-सíकटमुळे आग लागून धुरामुळे गुदमरून वारंवार जीवितहानी होण्याच्या घटना टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना व अन्य प्रमुख प्रतिबंधक उपाय करू शकतो.
वरील उपाययोजना करतानाच आग लागू नये यासाठी सर्वानीच सजग राहणे गरजेचे आहे.    

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
ST Bank in trouble Suspension of loan provision to members
‘एसटी बँक’ अडचणीत! सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती, कारण काय? वाचा…

आग टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय
०    सोसायटीच्या इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखालील विजेची सर्व मीटर्स, मेन स्विच व अन्य विजेची उपकरणे इत्यादी सुरक्षितस्थळी हलवावीत. कारण पावसाळ्यात अशा भागात पाणी भरल्यास शॉक लागण्याची भीती असते. तसेच शॉर्ट-सíकट होऊन आग लागण्याची अधिक शक्यता असते.
०    इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखालील अरुंद व अंधार असलेल्या भागात आग लागल्यामुळे आगीच्या ज्वाळा व धुरामुळे वरच्या मजल्यावरील सर्व सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना विशेषत: अपंग, आजारी व वरिष्ठ नागरिकांना अरुंद जिन्यातून इमारती बाहेर पडणे मुश्कील होते. अशा प्रकारच्या आगीच्या घटनेत आत्तापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावरून धडा घेऊन सर्व सोसायटय़ांनी इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याखालील भागात बसविण्यात आलेली सर्व मीटर्स, मेन स्विच, विजेची उपकरणे, लेटर-बॉक्स, धनादेश-बॉक्स, इत्यादी सुरक्षितस्थळी हलविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
०    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अग्निशमन दलासाठी इमारतीच्या एका बाजूस सहा मीटर मोकळी जागा ठेवण्याच्या आदेशाचे सोसायटीने पालन करावे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत आगीचे बंब, रुग्णवाहिका व आपत्ती निवारण वाहनांना सोसायटीच्या आवारात ये-जा करणे सोपे जाईल.
०    महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या अधीन राहून राज्य सरकारच्या उपरोक्त अधिनियमानुसार घरमालकांना आपले घर आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे याची तपासणी करून घेणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
०    वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलमध्ये ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आगीपासून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सोसायटीच्या इमारतीचे फायर-ऑडिट करून घेणे फायदेशीर ठरेल.
०    सोसायटीच्या इमारतीची अग्निशमन यंत्रणा व आग-प्रतिबंधक उपकरणे व्यवस्थित कार्यरत असल्याची नियमितपणे तपासणी करणे व चाचणी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने आग-प्रतिबंधक उपकरणे वापरण्याजोगी राहातात. तसेच सदरहू यंत्रणा / उपकरणे कशा प्रकारे हाताळावी याचे रहिवाशांना / सभासदांना प्रशिक्षण / माहिती देणे आवश्यक आहे.
विश्वासराव सकपाळ -vish26rao@yahoo.co.in