09 July 2020

News Flash

देशमुखांचा वाडा

चौसष्टसालीसुद्धा त्या ओटय़ावर ग्रेनाईटसारखा टाइल्सचा दगड होता. दादांची झोपायची खोली पश्चिमेला होती.

(संग्रहित छायाचित्र)

शुभांगी पासेबंद 

कातरवेळी त्या ओटय़ावर बसून आम्ही परवचे, पाढे आणि आरत्या म्हणत असू. तिथेही वृंदावन होते. कुंद व जाईचा वेळ होता. स्वयंपाकघरात सिमेंटचा ओटा होता. सिंक होते. हवेशीर खिडकी होती. चौसष्टसालीसुद्धा त्या ओटय़ावर ग्रेनाईटसारखा टाइल्सचा दगड होता. दादांची झोपायची खोली पश्चिमेला होती.

कौलारू घराचे वेड माणसाला लहानपणापासूनच लागते. डोंगरावरचा सूर्य, नदी आणि पक्षी.. घर जेव्हा ते बाळ चित्रात काढतो, तेव्हा त्या चित्रात कडेला कौलारू घर काढले जाते. भिंती उभ्या केल्या जातात. माणसाच्या मनाची, घराशी संदर्भ असलेली संकल्पना अशी कौलारू घराशी निगडित आहे.

घराबद्दल, म्हणजे साधारण कुणाविषयी लिहायचे? बंगल्याच्या मालकाबद्दल सांगते. निवृत्तीनंतर राहण्यासाठी १९६४ साली जेव्हा आमच्या वडिलांनी- लक्ष्मणराव देशमुख यांनी नाशिकला तो बंगला बांधायला सुरुवात केली, दादांना तेव्हा तो जमिनीचा तुकडा पाच हजार रुपायांना पंधरा हजार स्केअर फूट असा विकत मिळाला. त्यावेळी नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आधुनिक खेडे होते. कॅनडा सर्कल म्हणजे एक ख्रिस्ती मिशनरी लोकांनी चालविलेला दवाखाना, वाचनालय होते. खरे तर जुने नाशिक तरी ठीक, पण नवे नाशिक त्यावेळी खेडय़ाहून खेडे होते. सर्वत्र शेते आमराया होत्या. न शिकणारी माणसं नाशिकला राहतात, असे आमचे मुंबईत राहणारे नातेवाईक आम्हाला चिडवत असत. जवळपास पंचक्रोशीत वस्ती नव्हती. किराणा माल आणण्यासाठीसुद्धा दोन मल दूर पंचवटी कारंजावर जावे लागे किंवा अशोक स्तंभावर पटेल नावाचे एक दुकान होते तिथे जावे लागे. रस्ते तर डांबरीदेखील नव्हते, मातीचे होते.

प्रवासासाठी वाहने सायकली, टांगे, बैलगाडय़ाही होत्या. पाटील कॅालनीतील त्या घरापासून तीन किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर होते. शेजारी शाळा होती. अर्धा किलोमीटर अंतरावर दत्त मंदिर होते. तो प्लॉट घेताच आधी त्यात तीन खोल्यांचे कौलारू चाळीसारखे दिसणारे आऊट हाऊस दादांनी बांधून घेतले. कारण आम्ही धुळ्याचे घर विकून नाशिकला आलो होतो. मात्र, मुख्य घराचे बांधकाम अर्धवट होते. त्या मोठय़ा प्लॉटमध्ये पुढच्या बाजूला लहानबाग, मग मुख्य बंगला होता. मध्यभागी विहीर होती व मागे टोकाशी उभे हे आऊट हाऊस होते. घर गावाबाहेर होते. तरीही त्या काळी दादांनी प्रयत्न करून मोठय़ा कष्टाने वीज आणली होती. पाण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकून घेतली होती. सर्व आधुनिक सोयी करून घेतल्या होत्या.

१९६४ सालचा तो काळ फ्लॅट स्कीमचा नव्हता आणि कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याचादेखील नव्हता. साल १९६४ आठवा. घराच्या विभाजनाने पुढील बंगला, त्याच्या पुढची बाग, अंगण, मध्ये मुख्य गृह आणि मागील भाग, आऊट हाऊसमागील भाग आणि विहीर अशी होत होती. बागेतील विहीर आणि बाग सर्वासाठी खुली होती. पाण्यासाठी आलेले पांथस्थ, मजूर, कामगार, वाटसरू त्या विहिरीवर पाणी भरत असत. नळाचे पाणी देखील होते, पण ते पाणी गेले की विहीर सर्वानाच उपयोगी पडत असे. विहिरीच्या बाजूला कठडय़ाला लागून वडिलांनी एक गणपतीची रंगीत टाइल लावली होती. विहिरीसमोर दगडी तुळशी वृंदावन बनवले होते. बाजूला एक हौद बांधला होता, त्या हौदावर एक झाकण होते. वर धातूची मोठी तपेली होती. ती भरून बलांना, पक्ष्यांना पाणी ठेवले जाई आणि बलांचीही तहान भागवली जाई. बलगाडी त्या ऐसपस जागी लावून गुरांना मोकळे करून चरात वाहणारे पाणी, तपेलीतले पाणी पाजले जाई. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर तीन अर्धगोल पायऱ्या होत्या. अगदी आम्ही संपूर्ण कुटुंबातील भावंडे, वीस माणसं त्या पायऱ्यांवर मावत इतक्या त्या मोठय़ा होत्या. फोटो काढायला आदर्श जागा होती. घराचे मुख्य गृह जमिनीपासून चार फूट उंचीवर होते. याचे कारण त्याकाळी बुजुर्ग लोक सांगतात, गंगापूरचे धरण फुटले तर पाणी घरात शिरेल. अर्थात ते घर उंचावर बांधल्यामुळे त्या घरात विंचू, साप कधीही आले नाहीत. त्या काळी घराला भिंतींना सहा इंची टाइल्सचा डेडो दादांनी बनवून घेतला होता. एकोणीसशे चौसष्ट सालीसुद्धा सर्व खोल्यांना लोखंडी जाळी लावली होती. आमच्या वाडय़ाचा बाहेरचा हॉल प्रशस्त मोठा होता. त्याकाळीसुद्धा प्रवास करून वडिलांनी मुंबईहून गोळे कॉन्ट्रॅक्टरला बोलावून आणले होते.

रचना : हॉलला फुलाफुलांची नक्षी केली होती. द्राक्षांचा मोठा घड असावा असे एक झुंबर त्या हॉलमध्ये लावलेले होते. कोपऱ्यातून पितळी समया होत्या. तरीही द्राक्षांच्या झुंबराचे सौंदर्य वेगळेच होते. त्याच्या आत लाइट लावले की द्राक्षांचे घड वेलीवर मस्त पसरावेत तसा हिरवट प्रकाश सर्वत्र पसरत असे. अर्थात कमी ओळखीच्या किंवा तोंडओळखीच्या व्यक्तींनी थेट घरात येऊ नये म्हणून या हॉलच्या पूर्वी एक व्हरांडा होता. लोखंडी जाळीने तो व्हरांडा बंद केला होता. बाहेर एक मोठा ओटा होता. कातरवेळी त्या ओटय़ावर बसून आम्ही परवचे, पाढे आणि आरत्या म्हणत असू. तिथेही वृंदावन होते. कुंद व जाईचा वेळ होता. स्वयंपाकघरात सिमेंटचा ओटा होता. सिंक होते. हवेशीर खिडकी होती. चौसष्टसालीसुद्धा त्या ओटय़ावर ग्रेनाईटसारखा टाइल्सचा दगड होता. दादांची झोपायची खोली पश्चिमेला होती. आम्हा भावंडांसाठी वरच्या मजल्यावर खोल्या होत्या. भिंतीत खिळा ठोकला जाणार नाही असे मजबूत बांधकाम होते. स्वयंपाक घरात कोपऱ्यात खास बनवलेल्या, उंच ओटय़ावर खास हैदराबादहून आणलेला सिसमचा देव्हारा होता. त्या ओटय़ाच्या खाली देवाच्या पोथ्या व पूजा साहित्याची व घट बसवण्याची व खंडोबाचे नवरात्रीच्या मांडणीची खास जागा होती. बसूनही आरामात पूजा करता येत असे. घराच्या बांधकामाच्या आजूबाजूला विविध फळझाडे व फुलझाडे होती.

सोयी : सर्व खोल्यांमध्ये कपडे, वस्तू, पुस्तके ठेवण्यासाठी भरपूर रुंद लाकडी फळ्यांची भिंतीतील कपाटे होती. वरच्या मुलांच्या खोलीत तर आम्ही आत बसून पत्ते खेळत असू, इतके मोठे कपाट होते. हॉलमध्ये कोपऱ्याला काच लावून त्रिकोणी कपाट बनवले होते. त्या त्रिकोणी कपाटात वडिलांची, माझी, बक्षीसे, कप आणि मेडल्स रचून ठेवले होते. दरवाजांच्या दाराच्या मागे दार उघडताच झाकली जाईल अशी चप्पलांची मांडणी होती. आधुनिक शु-रॅकचे ते रूप होते. अंगणात घडीच्या लोखंडी खुर्च्या होत्या. काम झाले की त्या घडी करूनओटय़ाला टेकून ठेवल्या जात. तिथेच एक जुना रुंद सिमेंटचा गोल पाइप उभा ठेवला होता. त्यात सर्व कचरा जमवून झाडून पाने गोळा करून जाळला जाई. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जो जिना होता, त्या बंदिस्त खोलीला जिन्याची खोली म्हणत. त्या खोलीला लोखंडी गेट होते. हल्लीच्या हॉलमधून वर जाणाऱ्या आतल्या जिन्याप्रमाणे येथे लोखंडी दार बंद केले की आतला जिना आतच राही. दोन मजल्यांचा डुप्लेक्स फ्लॅट तयार होई. तसे आम्हा चारही बहिणींना सुरक्षितता मिळावी म्हणून दादांनी ही सोय केली होती. गच्चीतून डोंगरांचा तुकडा, डोह, चांभार लेणी, निरभ्र आकाश दिसत असे.

बाग : मागच्या दारी तांब्याचा मोठा बंब होता. तसे घरात गिझर होते, पण नोकर, पाहुणे आणि आंब्याची जांभळाची झाडे सांभाळणाऱ्या नोकरांसाठी बंब आणि चूल उपयोगी पडत असे. विहिरीच्या मागे एक पंधरा फूट लांब पंधरा फूट रुंद मोठी मोरी, कम बाथरूम होते. महिलांना अंघोळी, कपडे धुणे व गॉसिप करणे या कामांसाठी तिथे एकांत मिळत असे. चारी बाजूंना आणि वर पत्रे टाकून बनवलेली असल्यामुळे बघू नये अशा नजरांपासून सुटका मिळे. त्या विहिरीजवळ फणसाच्या झाडापाशी त्या बंगल्यात दहा गाडय़ा पार्क करता येतील इतकी जागा होती. बाहेरच्या काही लोकांनी तिथे पार्किंगसाठी जागा मागितली तर ती द्यायला दादा तयार असत. पण त्या गाडी असलेल्यांबद्दल त्यांच्याच नातेवाईकांनी मन कलुषित केल्यामुळे आम्हा भावंडांच्या सुरक्षिततेसाठी वडिलांनी ते गाडी लावणे नाकारले. विशेषत: घरातील मुलींसाठी दादा नाही म्हणाले. स्त्रियांसाठी आवश्यक सर्व सोयी होत्या. अगदी दार उघडण्यापूर्वी बाहेर कोण उभे आहे ते बघण्यासाठी पीप होल, साखळीची सोय त्याकाळी दादांनी केली होती. तो बंगला सांस्कृतिक म्हणजे संस्कृती जपणारा होता, तरीही त्याकाळी आधुनिक होता. दुधात केशर मिसळावी तसा परंपरा आणि आधुनिकतेचा संगम होता.

मुख्य दरवाजाच्या बाहेर चार लोखंडी अँगलवर पंचवीस फूट उंच खांबांची चौकट बनवून त्यावर द्राक्षाच्या वेली लावण्यात आल्या. या वेलींमुळे गारवा व प्रायव्हसी मिळाली, पण खूप कष्ट करूनही द्राक्षे आंबटच राहिली व ते वेल वाढू शकले नाहीत. पुढच्या बाजूच्या आंब्याच्या झाडाला दोरखंडाचा झोपाळा बांधला होता, तर बंगल्यावरच्या गच्चीवर लाकडी कोरीव कामाची बंगाळी होती. तिला पितळी कडय़ा होत्या. घराच्या गरोदर सवाष्णींची व गल्लीतील डोहाळकरणीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिथे होई. कधी हा डोहाळ कौतुक कार्यक्रम आमराईत होई.

संस्कृती : दरवाजाच्या बाजूला कुंदाचा वेल होता, तर पुढे दोन मोठी उंच सरळ ताठ वाढलेली, लाडाने वाढवलेली सिंगापुरी नारळाची मोठीच्या मोठी झाडे द्वारपालाप्रमाणे उभी होती. देवळाच्या बाहेरील अवसराप्रमाणे ती झाडे रक्षक वाटत होती. आमच्या वाडय़ाच्या त्या घराबाहेरील ओटय़ावरून कोणीही स्त्री हळदी-कुंकू वानोळा घेतल्याशिवाय व बाळंतीण बाळाच्या टाळूवर तेल न घालता गेली नाही. ते घर ते दार नेहमी उघडे राहून हात पसरून सर्वाचे स्वागत करीत असे. लोखंडी फाटकांचे बाहेरूनच त्या अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ लावलेला दिवा दिसत असे. मंदसा प्रकाश पसरवून अंधाराला दूर पळवताना दिसत असे. तो काळ रस्त्यावरच्या दिवेबत्तीचा, गाडय़ांचा नव्हता. टय़ूबलाइटचा देखील शोध नुकताच लागला होता, पण पसरला नव्हता. मिणमिणते जुन्या पद्धतीचे पिवळसर बल्ब असायचे. त्यामुळे बाहेरच्या लोकांना, रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्या दिव्याचा आधार वाटे. तसे कुंकवाच्या बोटाला व चहाच्या घोटाळा देशमुखांचे घर कायमच तत्पर होते.

अनेक वर्ष हा बंगला ताठ मानेने व पूर्व पुण्याईने रुबाबात उभा होता. आजूबाजूची सर्व रिकामी जमीन सिमेंटच्या जंगलात परावर्तित झाली, पण त्या उंच इमारतीमध्येही तो बंगला फारच आकर्षक वाटत असे. नयना देवीच्या डोळ्यांप्रमाणे म्हणजे ननितालप्रमाणे चमकत असे.

काळ : काळ बदलला. जवळच मॅकडोनल्ड, बग बाजाराने आले. अनेक दुकाने, मॉल, हॉस्पिटल्स, थिएटर्स आली. त्या भागाची मार्केट व्हॅल्यू वाढली. जमिनीचे बाजारमूल्य वाढले. ती जागा माझ्या माहेरच्या बंगल्याची- वाडीची जागा जेव्हा पुनर्वकिसित करण्याची वेळ आली तेव्हा तिथे आर्ट गॅलरी व्हावी असे मला वाटे. एखादे मंदिर, मंगल कार्यालय, झुळझुळते कारंजे, वाचनालय व्हावे अशी माझी खूप इच्छा होती. मी अनेक कलाप्रेमींना आणि श्रीमंतांना विनंती देखील केली, पण यश आले नाही.

मोठमोठय़ा राजवाडय़ांचे ऐतिहासिक स्मारकांचे बुरुज जर्जर व्हावेत तसेच सर्व रखरखावाअभावी घर जुने होत गेले. काळाच्या पडद्याआड सर्वाना जायचे असते. कुणाला लवकर तर कुणाला उशिरा! आई-वडील वारले. आम्ही बहिणी सासरी गेलो. घराची रया गेली. जमिनीवर बांधकाम करणाऱ्यांच्या आक्रमणाला तोंड न देऊ शकून हा बंगला जमीनदोस्त होणार हे सत्य मी स्वीकारले. माझ्याकडे वसुंधरेचे रक्षण करायची ताकद नव्हती. पसाही नव्हता. आधुनिकतेच्या आक्रमणात तो वाडा जमीनदोस्त झाला.

उरले मागे काय?

त्या ठिकाणी मागच्या वर्षीपर्यंत तरी माझ्या डोळ्यांतील अश्रूंप्रमाणे तुडुंब भरलेली एक विहीर होती. आता तर ती विहीरदेखील बुजवलेली आहे. प्लॉटवर देखील सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. आजूबाजूच्या उंच इमारतींच्या गर्दीत व ठोकळेवजा इमारती बघून जीव दडपतो. तो वाडा आता तिथे नाही. तोडलेल्या नारळाच्या झाडांची लाकडे कापून बटाटय़ाच्या वेफर्सप्रमाणे तोडलेल्या झाडांचे लाकडी तुकडे, त्या रिकाम्या प्लॉटच्या कडेला रचून, कडेकडेने रचून ठेवले आहेत. हरवलेल्या झाडांचा, पर्यावरणाचा, वसुंधरेचा विचार फार थोडे लोक करतात.

आरे मेट्रोच्या जन विरोधाच्या प्रश्नावरून ते आपल्याला सगळ्यांना समजत आहे. एक दिवस सर्वानाच घरदार इथेच सोडून जायचे असते, मग माणूस इतका अहंकार, इतकी हाव का बाळगतो? पर्यावरणाचे नुकसान का करतो? नंतर अवकाळी पावसाला कोसतो. अतिपावसाळा, दुष्काळ पडला, हवामान बदल झाला म्हणून रडण्यापेक्षा वेळीच असे बंगले-वाडे आणि रिकाम्या जागा, उद्याने, बागबगीचे जपणे आवश्यक आहे. माझ्या माहेरचा देशमुखांचा वाडा तर गेला. असे अनेक बुजुर्ग वाडे गेले, मी बघत बसले. विरोधसुद्धा करू शकले नाही. आता त्या वाडय़ाच्या आठवणीत लिहिण्यापलीकडे मी काय करू शकते? पशाच्या मोहामुळे या शहरात कितीसे हिरवेवाडे उरले आहेत? फक्त हा प्रश्नच शिल्लक आहे. विरोध करणारा, करणारी थकते. बाकी काही राहत नाही- ‘बाबुल मोरा नहर छुटो जाय.’

scpaseband@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 2:14 am

Web Title: deshmukhs palace vasturang abn 97
Next Stories
1 पर्यावरणप्रेमी मुंबईकर?
2 सुंदर माझं स्वयंपाकघर!
3 नियम निश्चिती व आचारसंहितेमुळे सोसायटी निवडणुकांना मुदतवाढ
Just Now!
X