अलीकडेच मी डिझाइन केलेल्या एका वास्तूला जवळजवळ तीस वर्षांनी भेट देण्याचा योग आला. आवारात बगिचा, झाडे वाढली होती. घराचा बाहेरचा रंग बदलला होता. आतील फर्निचर बदलले होते. हे सर्व बदल झाले असूनही घर अधिकच प्रेमळ झाल्यासारखे वाटले.
गेली चाळीस वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर मागे वळून बघता एक जाणवते ते म्हणजे देशातील वास्तुकला आणि वास्तुरचना व्यवसायात असलेला संवेदनशीलतेचा अभाव. त्यामुळेच हा व्यवसाय सर्वार्थाने भ्रष्ट झाला आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या वास्तुकला शिक्षणातील त्रुटी आणि वास्तुरचनेकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्याचबरोबर इमारतींचे आराखडे बनविणारे वास्तुकार आणि ज्यांच्यासाठी रचना करायची त्या इमारतीचा, वास्तूंचा वापर करणारे लोक यांच्यातील दुरावलेले संबंधही त्याला कारणीभूत आहेत. आज बहुसंख्य वास्तुरचनाकारांचा संबध येतो तो विकासकांशी आणि प्रशासनातील परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांशी. हा व्यवसाय मानवी अस्तित्वाशी, मानवी जीवनाशी, मानवी संस्कृतीशी आणि समाजाच्या प्रगल्भतेशी अतिशय जवळून निगडित आहे. हा व्यवसाय समाजासाठी वैद्यक शास्त्राइतकाच किंवा कदाचित त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. डॉक्टर एका रोग्याचे आयुष्य वाचवू शकतो, त्याचे जीवन आरोग्यपूर्ण करायला मदत करतो. शक्य ते सर्व प्रयत्न करून जीव जगविणे ही त्यांच्या व्यवसायाची कसोटी असते. तोच त्यांच्या यशाचा निकषही असतो.
वास्तुरचनाकारांवर जीव जगविण्याची जबाबदारी नसली तरी एकेका माणसाचे नाही तर समूहांचेच जीवन घडविण्याची जबाबदारी असते. डॉक्टर चुकला तर एखाद्याचा जीव जातो, एखादे कुटुंब बरबाद होऊ  शकते. मात्र वास्तुरचनाकाराने केलेल्या चुकांमुळे व्यक्ती तर बरबाद होऊ  शकतातच, पण त्यामुळे आजूबाजूचा परिसर, त्यातील लोक आणि लोकजीवनही बरबाद होऊ  शकते. याउलट वास्तुरचना जेव्हा परिसर, लोक, त्यांचे लोकजीवन आणि गरजा लक्षात घेऊन केलेली असते तेव्हा ती वास्तू सर्वानाच लाभदायक ठरते. सौंदर्याच्या व देखणेपणाच्या बाबतीतही ती भव्य-दिव्य नसली तरी व्यक्ती आणि समाजाशी जर ती सुसंगत असेल तर अधिक आकर्षक ठरते. मी डिझाइन केलेल्या वास्तूंच्या अनुभवातून मला हेच जाणवत असे.
अलीकडेच मी डिझाइन केलेल्या एका वास्तूला जवळजवळ तीस वर्षांनी भेट देण्याचा योग आला. ही वस्तू जेव्हा बांधली होती तेव्हा व्यवसायात मी नुकताच प्रवेश केला होता. नंदुरबारजवळच्या एका गावातील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या घराची ती वास्तू होती. गांधीवादी विचारांचे आणि आचारांचे हे शल्यविशारद आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीचा तेथील व्यवसाय, त्यांची राहणी, त्यांची सामाजिक तळमळ आणि साधेपणा अशा अनेक गोष्टी मला त्या निमित्ताने बघायला मिळाल्या, अनुभवला मिळाल्या. त्यांचे घर डिझाइन करता करताच त्यांच्या स्वत:च्या आणि त्यांच्या व्यावसायिक कुटुंबाशी एक जवळचे नाते निर्माण झाले.
चर्चा करून, गरजा लक्षात घेऊन घराचा आराखडा तयार करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या काही व्यावसायिक मित्रांची काही घरेही मला मुद्दाम नेऊन दाखविली. एक खूपच देखणे आणि अतिशय कलात्मक पद्धतीने, श्रीमंती थाटात सजविलेले घर आजही माझ्या लक्षात आहे. ते घर एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा थाट मिरविणारे होते. आमच्या वास्तुकला मासिकांमध्ये अशी सजविलेली, वैभव आणि कलात्मकता यांचा सुरेख संगम असलेली, त्यातील प्रत्येक कोपऱ्यातील तपाशिलांसकट, गालिचे-झुंबरे आणि इतर बारकाव्यांसकट, गुळगुळीत पानावर छापलेली चित्रे असतात, तसेच ते घर भव्य आणि आकर्षक होते. शिवाय त्या घराच्या आवाराभोवती उंचच उंच भिंत होती. अतिशय देखण्या स्वरूपात बांधलेले असले तरी ते घर कोणाला म्हणजे कोणालाच दिसत नसे. बाहेरून जाणाऱ्या कोणालाच त्या वस्तूच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे शक्य नव्हते. त्या तटबंदीच्या बाहेरील सर्व घरे, रस्ता आणि वस्ती अतिशय साधी, सामान्यत: दिसते तशीच होती. परंतु सामान्यतेपासून, सर्वापासून फटकून बांधलेल्या घराची उंच भिंत एक प्रकारची दराराच निर्माण करणारी होती. असे घर आम्हाला नको हे दाखविण्यासाठीच डॉक्टरांनी मला मुद्दाम नेले असावे असे मला नंतर जाणवले. कारण तशा प्रकारचे घर डॉक्टरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वभावाशी आणि राहणीमानाशी न जुळणारे होते.
यथावकाश घराचे आराखडे तयार झाले मोठे, प्रशस्त, मोकळे, हवेशीर आणि खान्देशातील उष्ण हवामानाचा विचार करून अघळपघळ स्वभावाचे घर तयार झाले. त्यात आधुनिक सोयीसुविधा सर्व होत्या, घरातल्या लोकांना, पाहुण्यांना आणि अनेकदा शहरातून तेथे काही कार्यक्रमांसाठी येणाऱ्या आमंत्रित लोकांना सामावून घेईल इतके ते मोठे होते. खूप लोकांचा स्वयंपाक करता येईल, त्यात अनेकांना वावरता येईल इतके स्वयंपाकघर मोठे होते. शिवाय जेवणाचे टेबल १२-१५ जणांना सामावून घेणारे होते. पंचवीस वर्षांनी मी तिथे गेले तेव्हाही ते घर तसेच होते. आगतस्वागत करणारे, कोणीही सहज आत-बाहेर करू शकण्याचा त्या घराचा स्वभाव तसाच होता. डॉक्टरांचा मुलगा-सून आता त्यांना दवाखाना, हॉस्पिटलमध्ये मदत करीत होते. मोठय़ा आवारात आता हॉस्पिटल वाढले होते. डॉक्टरांची मुलगी आर्किटेक्ट झाल्यानंतर तिने ते डिझाइन केले होते. कुटुंबाचा व्यवसाय आणि त्यांचा सामाजिक संस्थांचा पसारा अधिकच विस्तारला होता. लोकांचा राबता आणि घरोबाही तसाच वाढलेला होता. आवारात बगिचा, झाडे वाढली होती. घराचा बाहेरचा रंग बदलला होता. आतील फर्निचर बदलले होते. एक-दोन बेडरूम वाढल्या होत्या. हे सर्व बदल झाले असूनही घर अधिकच प्रेमळ झाल्यासारखे वाटले. आम्ही दहा-बाराजणी त्या गावात काही कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांच्याकडेच उतरलो, जेवलो, झोपलो. खूप वर्षांनी डॉक्टरांशी पुन्हा गप्पा रंगल्या, काळात हरविलेले दुवे परत जोडले गेले. त्या घराची ऊब, प्रेम जाणवत राहिले.
तेथील प्रत्येक जागा मला आठवत होती. त्या कुटुंबाशी असलेले नाते घरामुळे दृढ झाले होते. त्या घराने त्यांना, त्यांच्या कुटुंबाला समाधान दिले होते आणि मलाही. त्यांच्या जीवनशैलीशी आणि आजूबाजूच्या परिसराशी, लोकांशीही ते घर एकरूप झाले होते. ते घर वास्तुरचना मासिकाच्या मुखपृष्ठावर चमकण्यासाठी नव्हतेच, तर घराचे समाजाशी नाते जोडण्यासाठी होते. वास्तुरचनेचे समाधान देणारे होते. मला वाटते कीचांगल्या वास्तूचे हेच खरे निकष आहेत. असले पाहिजेत.