News Flash

काचेचा करिश्मा घर सजवताना

लहानपणी कधी तरी शाळेत बाईंनी सांगितले, ‘वाळूपासून काच तयार होते.’

|| गौरी प्रधान

लहानपणी कधी तरी शाळेत बाईंनी सांगितले, ‘वाळूपासून काच तयार होते.’ आणि आमची तोंडे अख्खा एक बुंदीचा लाडू आत मावेल इतकी उघडली. इतकी नितळ पारदर्शक काच या वाळूपासून बनते? आणि हिऱ्यानंतर जगातील सर्वात कठीण वस्तू काच आहे असे कळल्यावर तर काचेबद्दल मनात भक्तिभावच दाटून आला. खरोखरच काच हे एक मोठ्ठं आश्चर्यच आहे. विशेष गोष्ट म्हणजे, मानवनिर्मित काचेलाही हजारो वर्षांचा इतिहास आहे, इतकी काच आपल्या चिरपरिचयाची आहे.

विचार करा, काचेशिवाय मानवी जीवन कसं असतं? आपल्यापकी बऱ्याच जणांची सकाळच मुळी काचेचे अर्थात आरशाचे दर्शन घेऊन होते. मग दिवसभरात आपला काचेशी किती आणि कशा कशा प्रकारे संबंध येतो याची तर मोजदादच करायला नको.

विषय जेव्हा गृहसजावटीचा येतो तेव्हा तर काचेला वगळून चालणारच नाही. टेबलांचे पृष्ठभाग, पार्टिशन, इ. स्वरूपात फर्निचरशी काचेचा संबंध येतो. काच ही मुळातच नाजूक, एकदा तडा गेला कीपुन्हा सांधली न जाणारी. त्यामुळे पूर्वी फर्निचरमध्ये काचेचा वापर करताना सर्व शक्यतांचा विचार करूनच तो करावा लागे; परंतु आता मात्र बाजारात आपल्या प्रत्येक गरजेप्रमाणे विविध प्रकारच्या काचा उपलब्ध असल्याने काचेचा सढळ हस्ते वापर होऊ लागला आहे.

काचेमध्ये साधी पारदर्शक काच, अति पारदर्शक काच, रंगीत काचा, बॅक पेंटेड काच, सॅन्डविच काच, टफन काच, इ. अनेक प्रकार बाजारात सहज उपलब्ध आहेत. यातील एका एका प्रकाराबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

साधी पारदर्शक काच : बाजारात सहजपणे कुठेही उपलब्ध असणारी ही काच. काचेचे जे काही म्हणून भलेबुरे गुणधर्म आहेत ते सगळे अंगी बाळगते. गडद हिरवी कड असणारी काच दिसली की समजा ही तीच सर्वसामान्य काच आहे, परंतु यातही चांगला-वाईट दर्जा हा आहेच. मुळात काच हा एक अतिथंड अवस्थेतील द्रव पदार्थ आहे, त्यामुळेच द्रव पदार्थात ज्याप्रमाणे बुडबुडे किंवा लहरी उमटतात त्या तशाच्या तशा काचेतदेखील येऊ शकतात. सर्वसाधारणपणे काच फ्लोट पद्धतीने बनवली जाते. चांगल्या दर्जाच्या काचेत बनविण्याच्या प्रक्रियेतच हे बुडबुडे आणि लहरी येणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. साधी पारदर्शक काच ही इतर काचांच्या तुलनेत स्वस्त असते. हिला एक प्रकारचा हिरवट रंग असल्याने हिच्या मागील वस्तूवर त्या रंगाचा प्रभाव पडून वस्तूचा मूळ रंग दिसत नाही. कपाटांच्या आतील भागातील शेल्फ, ज्या ठिकाणी हिची गडद हिरवी कड दृष्टीस पडणार नाही अशा पार्टिशनमध्ये या काचांचा वापर केला जातो.

अति पारदर्शक काच : या काचेच्या नावातच हिचे गुणधर्म दिसून येतात. तसे तर हादेखील फ्लोट काचेचाच प्रकार. साध्या पारदर्शक काचेत आणि या काचेत महत्त्वाचा फरक पारदर्शकतेचाच. ही काच ओळखणेदेखील फारच सोपे आहे, ज्याप्रमाणे साध्या पारदर्शक काचेची कड गडद हिरवी दिसते, तसेच या काचेची कड स्वच्छ आणि पारदर्शक दिसते. निसर्गत:च कमी लोह तत्त्व असणारा कच्चा माल वापरून या काचेची निर्मिती केली जाते. फर्निचरमध्ये विशेषत: जिथे कड दिसणार आहे अशा ठिकाणी या काचेचा जास्त उपयोग केला जातो. किमतीच्या दृष्टिकोनातून साध्या पारदर्शी काचेपेक्षा महागडी असणारी ही काच दृश्यमानतेबाबत साध्या काचेहून चार पावले पुढेच असते. फर्निचरमध्ये डायिनग टेबल, टी पॉय, शो केसमधील शेल्फ अशा ठिकाणी या काचेचा सर्वात जास्त वापर होतो. शिवाय या काचेतून मागील बाजूची वस्तू तिच्या रंगरूपासकट जशी आहे तशी दिसू शकते. त्यामुळेच कपडय़ांच्या शोरूम, दागिन्यांच्या दुकानातील काऊंटर या सर्वासाठी ही काच महत्त्वाची ठरते.

रंगीत काच : रंगीत काचेचा मुख्य उद्देश हा प्रखर प्रकाश किंवा घरात येणाऱ्या अतिरिक्त उन्हापासून संरक्षण व्हावे हाच. फर्निचरमध्येही गरजेप्रमाणे रंगीत काचांचा वापर केला जातो. काचा रंगीत करण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. यात सर्वात सोपा प्रकार म्हणजे काचेवर पातळ रंगीत फिल्म लावणे. खिडक्यांच्या काचांसाठी हा प्रकार जास्तच लोकप्रिय आहे. एक तर या प्रकारात खिडक्यांच्या काचा बदलाव्या लागत नाहीत, कामही झटपट आणि स्वस्तात होते; परंतु दूरचा विचार करायचा झाल्यास हा पर्याय फारसा उपयुक्त नाही. त्यामुळेच थेट  रंगीत काच अर्थात ‘टिंटेड काच’ वापरण्याचा पर्याय दीर्घकालीन परिणाम साधणारा ठरतो. काचेच्या कच्च्या मालातच रंग मिसळून या काचा तयार करण्यात येतात. यातील गडद रंगांमुळे घरात येणारा प्रखर प्रकाश सौम्य होतो, ज्यामुळे घराचा आतील भाग थंड राहण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे, या रंगांमुळे काचेची दृश्यमानताही काही प्रमाणात घटते. घरातील डायिनग टेबल, सेंटर टेबल, पॅसेजमधील दरवाजे, इ. ठिकाणी हिचा वापर होऊ शकतो.

बॅक पेंटेड काच : पाठीमागच्या बाजूने विशिष्ट संस्कार करून रंगवलेली ही काच आधुनिक इंटेरीअरमध्ये एक स्टाइल स्टेटमेंट झालेली आहे. या काचेचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे हिच्यावर लावलेल्या रंगांच्या पुटांमुळे ही पूर्णपणे अपारदर्शक बनते. अनेक वेळा कपाटांची दरवाजे, टीव्ही पॅनल, तसेच डायिनग टेबल, इ. ठिकाणी लॅमिनेटला पर्याय म्हणून तसेच श्रीमंती बाज मिरवण्यासाठी या काचेचा उपयोग केला जातो. यातील चांगल्या दर्जाची काच ही अति पारदर्शक काचेचा वापर करूनच बनविली जाते, ज्यामुळे मागील बाजूस लावलेला रंग उठून दिसतो. अनेक रंगांत उपलब्ध असल्याने आपल्या घरातील फर्निचर किंवा पडदे यांच्या रंगांशी मिळतीजुळती काचदेखील आपण वापरू शकतो.

सॅन्डविच काच : शक्यतो पार्टिशन, दरवाजे यांच्यासाठी वापरली जाणारी ही काच नावाप्रमाणेच दोन काचांच्या मध्ये पातळ कापडाचे सॅन्डविच करून बनवली जाते. यात दोन्ही बाजूंनी अति पारदर्शक काचा घेऊन मधे एखादे झिरझिरीत कापड सॅन्डविच केले जाते. याची गंमत म्हणजे हे मधले कापड आपण आपल्या आवडीनुसार निवडू शकतो. साधारणपणे ज्या दुकानात ही काच मिळते त्याच दुकानात यात वापरता येण्याजोग्या कापडांचे डिझाईन्स असणारे पुस्तकही असते. आपण फक्त आपल्या आवडीचे डिझाईन निवडायचे. ही काच मशीनवर सॅन्डविच केली जात असल्याने कापड अगदी सर्व बाजूंनी घट्ट बसवले जाते, त्यामुळे ते निघून येण्याची चिंता राहत नाही.

टफन काच : सर्वसाधारण काचेहून ताकदवान असणारी ही काच सहजासहजी तुटत नाही आणि तुटली तरी तिचे अशा प्रकारे लहान तुकडे होतात, की त्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. इथे आपण जे जे काचांचे प्रकार पाहिले त्या सर्व काचांवर प्रक्रिया करून त्यांना टफन काचेमध्ये परावíतत करता येते. इंटिरीयरमध्ये या काचांचा उपयोग न्हाणीघरातील शॉवरचे पार्टिशन, फ्रेम नसलेले पिव्होटचे दरवाजे, जिथे पटकन काही लागून काच फुटू शकेल अशा ठिकाणच्या फर्निचरमध्ये होतो. त्याचप्रमाणे हल्ली स्वयंपाकखोलीतही शेगडीच्या मागे बॅक पेंटेड काचा लावण्याची पद्धत जोरात आहे. तर अशा ठिकाणीही काच टफन करून घेतलेली असल्यास कोणत्याही अपघाताची शक्यता उरत नाही. मात्र ही काच एकदा तयार झाली की त्यात कोणताही बदल करता येत नाही, ही गोष्ट ध्यानात घेता जर काचेत एखादे छिद्र हवे असेल. किंवा एखादा कट पाहिजे असल्यास काच टफन करण्यापूर्वीच हे बदल करून घ्यावेत.

इथे नमूद केलेल्या सर्व प्रकारांसोबतच अ‍ॅसिड वॉश किंवा सॅण्ड ब्लािस्टग करून बनवलेल्या फ्रॉस्टेड काचादेखील तितक्याच लोकप्रिय आहेत. कोणत्याही पारदर्शक काचेवर फ्रॉिस्टग करून तिला अपारदर्शक किंवा कमी पारदर्शक बनावट येते. न्हाणीघराच्या खिडक्यांना यांचा जास्त वापर होतो. याचे वैशिष्टय़ म्हणजे यातून प्रकाश तर आरपार जातो, पण पलीकडचे काही दिसू शकत नाही.

आधुनिक फर्निचरमध्ये काचेचा विपुल प्रमाणात वापर होतो. अगदी कपाटांची दरवाजे, कपाटांच्या आतील ड्रॉव्हरचे पुढील भाग, टीव्ही पॅनल अशा अपारंपरिक ठिकाणीही काचेचा वापर वाढला आहे. काचेचा वापर केलेले फर्निचरदेखील दिसायला हलकेफुलके दिसते. काचेला टफन करणे, हव्या त्या आकारात वळवता येणे या सर्व आधुनिक तंत्रामुळे काचेची अवाढव्य पार्टिशनदेखील उभी करणे सोपे झाले आहे. लाकडाची टेबले, कॉन्सोल इत्यादींच्या वरील भागावर काच ठेवल्याने तेथील लाकूड व्हिनीअर किंवा लॅमिनेट सुरक्षित राहण्यास मदत मिळते. काचेच्या गुळगुळीत व कोणताही पदार्थ न शोषण्याच्या गुणामुळे काचेचा पृष्ठभाग असणारे फर्निचर जंतूविरहित तर राहतेच, पण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून देखभालीसही सोपे जाते. शिवाय काचेच्या कठीण गुणधर्मामुळे यावर कोणत्याही प्रकारचे चरे, ओरखडे पडत नाहीत, जेणेकरून फर्निचरचे आयुष्यही वाढते.

अशी ही अष्टपलू काच मानवाचा इतिहास, वर्तमान तर भरून राहिलीच आहे; पण भविष्यही व्यापणार यात शंकाच नको.

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:12 am

Web Title: design tips to use mirrors for interior design mpg 94
Next Stories
1 ज्येष्ठ नागरिक आणि बक्षीसपत्र
2 घर खरेदीदारांची नवी मुंबईला पसंती
3 थोरोचं घर!
Just Now!
X