News Flash

विकास आराखडय़ात शहर सौंदर्यविषयक नियमांचे योगदान

मुंबई शहराचा विकास, त्याच्या सौंदर्यीकरणाच्या बाता मारून उपयोगाचे नाही, तर शहराच्या बकालीकरणाच्या बाबींकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

| April 18, 2015 01:56 am

मुंबई शहराचा विकास, त्याच्या सौंदर्यीकरणाच्या बाता मारून उपयोगाचे नाही, तर शहराच्या बकालीकरणाच्या बाबींकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी स्थानकात गर्दीने केलेला विक्रम मोडण्याचा प्रयत्न पुढील प्रत्येक स्थानकावरील प्रवाशांकडून केला जातो. रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरासाठी ते एक संघर्षमय आव्हान असते. मुख्य स्थानकातून निघून पुढे येणाऱ्या प्रत्येक स्थानकावर नवीन प्रवाशांना सामावून घेत, सर्वाना इच्छितस्थळी पोहोचवण्याचे काम या उपनगरीय रेल्वे वाहतुकीद्वारे केले जाते. प्रत्येक स्थानकात किती प्रवाशांनी आत घुसावे याला ना बंधन ना नियम असतो. तसेच, रोजच्या प्रवासात साध्या कारणावरून जेव्हा वाद होतात तेव्हा इतर प्रवासी न्यायाधीशाच्या भूमिकेतून असंतुष्ट प्रवाशांना सुनावण्याचे आणि समजावण्याचेही काम बिनधोकपणे करतात. शहरातील अनेक समस्या एकत्र आल्यामुळे या शहराची अवस्था, नेमकी या लोकलसारखीच झाली आहे! मुंबईकरांचा जीवनसंघर्ष येथेच थांबत नाही तर दिवसभरात त्याला अनेक शारीरिक, मानसिक, कर्कश आवाज, दरुगध व मनास न पटणाऱ्या अनेक दृक्श्राव्य गोष्टींना स्वत:च्या घरात पाऊल ठेवेपर्यंत सहन करावे लागते. यात पुरुषांपेक्षा महिलांना व शाळा/कॉलेजांतील विद्यार्थ्यांना अधिक त्रासातून जावे लागते. गर्दीच्या वेळी मुंबईतील कुठल्याही स्थानकावरून कर्जत, कसारा व विरार लोकलमध्ये शिरणाऱ्या प्रवाशांकडे नजर टाकल्यास याची सहज कल्पना येते. मुंबईच्या लोकसंख्येपैकी काही मोजके ‘सुदैवी’ लोकच या जाचातून सुटलेले आहेत. बाकी सर्व या ना त्या मार्गाने यातून सुटका करून ‘त्या सुदैवी’ लोकांत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.
मुंबई शहराचा पूर्व व सद्य:विकास कामाचा आढावा- निवासी क्षेत्रातील घडामोडी : मुंबई शहरात लोक दाटीवाटीने राहतात हे खरे आहे. विशेषकरून झोपडी किंवा चाळवजा लोकवस्त्यांत, समान बोलीभाषा बोलणारे व राज्याच्या एकाच भागातून आलेले अनेक लोक, कुटुंब सुरक्षितता व अडीअडचणीत एकमेकांची मदत होते या कारणास्तव एकत्र रहाणेच पसंत करतात. याच कारणामुळे नव्याने येणाऱ्याला मुंबईकर सहजपणे सामावून घेतो. गेल्या २० वर्षांपासून शहरात एकाचवेळी सुरू केलेल्या विविध प्रकारच्या पायाभूत विकासकामाबरोबर साधारणत: १९७० च्या दरम्यान बांधलेल्या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राला अनुसरून इमारतींची वेळोवेळी डागडुजी केल्यास, त्या किमान ६० ते ७० वर्षांपर्यंत टिकू शकतात. मुंबईच्या पहिल्या आराखडय़ानुसार बांधलेल्या बहुतांश इमारती, निकृष्ट काम व निवासी लोकांनी डागडुजी न केल्यामुळे त्या राहण्यास अयोग्य ठरल्या. काही इमारतींचा डागडुजीचा खर्च नवीन बांधकाम खर्चाच्या जवळपास गेल्याने त्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्याचा प्रस्ताव पुढे आल्यामुळे इमारत पुनर्विकासाचा जन्म झाला! पण दुर्दैवाने या प्रस्तावाला चुकीचे वळण मिळत गेल्यामुळे आजच्या जाचक व विकृत स्वरूपाला तोंड द्यावे लागत आहे! आज अनेक इमारतीचे काम बिल्डर/सोसायटी वाद किंवा इतर कारणामुळे अनेक वर्षे रेंगाळले आहे. या जागेतील बांधकाम साहित्य बरेच वर्षे पडून राहिल्यामुळे अस्वच्छता व इतर कारणामुळे जवळपास राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याला घातक ठरत आहेत. मुंबईत तयार घरांची संख्या कमी आहे, जागेची कमतरता आहे असे जाणीवपूर्वक भासवले जात आहे! नागरिकांना घरे विकत हवी आहेत, पण ती ‘त्यांना परवडतील’ या किमतीत मिळायला हवीत! तज्ज्ञांच्या मते, अल्प उत्पन्न असणाऱ्या गटातील परवडणाऱ्या घराचे चटई क्षेत्र ३५० चौ.फूट असावे व त्याची किंमत सरासरी दहा लाखापेक्षा अधिक नसावी! ज्यांना ऐषआरामात जगायचे आहे त्यांनी जरूर जगावे यास कुणाचीही हरकत नाही. दुर्दैव असे की या परवडणाऱ्या घराच्या किमतीला एक मापदंड (Yard-stick) असायला हवा! या मापदंडाशिवाय ‘परवडणारे’ या शब्दाचा उपयोग करणे हेच मुळात चुकीचे आहे आणि ते थांबले पाहिजे.
सार्वजनिक क्षेत्र-रस्ते, पदपथ, रेल्वे, स्कायवॉक, केबल इत्यादी- नवीन बनविलेले रस्ते, थोडय़ाच दिवसांनी चालण्यास योग्य रहात नाही हे वास्तव आहे. शहरातील अति लाडावलेल्या भागातील काही रस्ते वगळल्यास इतर सर्व रस्त्यांवर खड्डे पडण्याचे व बुजवण्याचे काम वर्षभर चालू असते! वरील सर्व कारणामुळे बऱ्याचशा भागाला कारखान्याचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेले रेलिंग नेमके कशाकरिता आहे हे कळणे अशक्य आहे. उपनगरातील रेलिंग, हेरिटेज आवारातही लावले जाते! चेंबर्सवरील तुटलेली झाकणे व पेव्हर ब्लॉकच्या असमान पृष्ठभागामुळे सहज चालणे जिकिरीचे झाल्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना रहदारीच्या रस्त्यावरून चालणे भाग पडते. वृद्ध, महिला व मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
शहराच्या एका भागात मोनोरेल, दुसरीकडे मेट्रो तर तिसऱ्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उपनगरीय रेल्वेचा विस्तार नेमका काय आहे हे कळायला मार्ग नाही. रस्त्यावरून बहुवळणे घेत चाललेला स्कायवॉक तर बांधणाऱ्यांची मौज व बघणाऱ्यांची करमणूक झाली आहे. नव्याने होत असलेल्या सुविधा व असुविधांच्या कात्रीत अडकल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. जगातील सर्वात सुंदर शहर बनवण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मुंबई शहरातील केबल जुन्या नव्या इमारतीच्या गच्चीवरूनच नागरिकांच्या घरात पोहोचत आहेत! भविष्यात सर्व जगच ज्या प्रगतशील संगणकाच्या तंत्रज्ञानावर चालणार आहे त्या केबल बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर किंवा पेव्हर ब्लॉकच्या खाली दाबून बसवल्या जातात.  विदेशात अशा केबल वाहण्यासाठी रस्ता तयार करतानाच गरजेपेक्षा अतिरिक्त पाईप ठेवले जातात.
आराखडा २०९१-१४ : या आराखडय़ाप्रमाणे आजतागायत उपलब्धFSI/TDR च्या साह्य़ाने जागोजागी उंच इमारतींचे सुळके दिसून येतात. नवीन आराखडय़ात सुचवण्यात आलेले FSI   वाटप जर का मंजूर झाले तर या शहराचे आकाश झाकोळले जाईल की काय ही भीती निर्माण झाली आहे. अगोदरच या शहरात मोकळ्या जागांची कमतरता आहे ती नवीन आराखडय़ामुळे मोठय़ा प्रमाणात भरून निघेल अशा भ्रमात मुंबईकरांनी राहू नये! मुंबईला लागलेले विकासाचे वेड कधी संपणार किंवा विकासानंतरचे चित्र कसे असेल हे कुणीही सांगू शकणार नाही.
शहराचे सद्यदृश्य : रस्त्यावरील धूळ, कचऱ्यांचे ढीग, अनधिकृत फेरीवाले, उघडय़ावर खाद्यपदार्थ व भाजीपाला/फळे विकणारे विक्रेते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या काही बऱ्यांपैकी सुंदर, काही सामान्य तर काही अति बेढब दिसणाऱ्या इमारतींच्या खिडक्यावरील लोखंडी गजांचे संरक्षक कवचांचे चित्रविचित्र डिझाइन्स, हे शहराची प्रतिमा काय आहे हे सांगण्यास पुरेसे आहेत! या जागा कपडे वाळवणे व अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरणे हा त्या वास्तूवर केलेला अन्याय आहे! अरुंद रस्त्यावरील स्कायवॉक व पेव्हरब्लॉकच्या अतिवापरामुळे मुंबई बेढब दिसण्यास भर पडत आहे. दुर्दैवाने, चुकीच्या दिशेने भरकटणारे हेच महानगर महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी रोल मॉडेल बनले आहे. उपनगरातील मोठय़ा नाल्यांना लागून असलेल्या जुन्या इमारती पाडून १० ते २० मजल्यांचे टॉवर बांधण्यात आले, पण सांडपाणी वाहून नेणारे नाले अजूनही उघडेच आहेत! इमारतींच्या गच्चीवरील  मोबाइलचे टॉवर आरोग्यास घातक ठरत आहेत व ते शहराच्या सौंदर्यास बाधा आणतात. मोनोरेलच्या उड्डाणपुलावरील मनोरेसुद्धा नीटनेटके लावण्यात मोठय़ा कंपन्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. मग सार्वजनिक काम करणारे असंख्य लहान/मोठे कंत्राटदार व त्यांच्या अशिक्षित, अकुशल कामगारांकडून काय अपेक्षा बाळगणार? ब्रिटिशकालीन मुंबईतील, सर्व इमारती तेलगू समाजातील अशिक्षित कामगारांनी बांधल्या आहेत हे ऐकून अनेकांना विश्वास बसत नाही! सुंदर मुंबई दिसण्यास या लोकांचे योगदान फार मोठे आहे.
या शहरातील, बहुसंख्य अशिक्षित व अकुशल लोकांनी शहराच्या अध्र्याअधिक सार्वजनिक जागेवर अनधिकृत मार्गाने अतिक्रमण केले आहे. मुंबईत येणारे स्थलांतरित हे केवळ गरीब लोकच असतात हा समज चुकीचा आहे. अतिगरीब लोकांना मिळेल त्या जागेवर झोपडय़ा बांधून राहणे भाग पडते व अतिश्रीमंत मात्र श्रीमंत वस्त्यांमध्ये सहजपणे मिसळून जातात. ते आपल्या नजरेत येत नाहीत; कारण अतिश्रीमंत वस्तीत ते बेमालूमपणे सामावले जातात. सरकारनेच, दोन्ही गरजूंना, सरकारी भाडेतत्त्वावरील घरांची निर्मिती करून त्यांना सामावून घेण्याचा उत्तम उपाय असताना सरकारचे लक्ष याकडे जात नाही हे दुर्दैव आहे! मग ती स्टुडिओ अपार्टमेंटस् असोत की छोटेखानी घरे. रस्त्यावर बसून वस्तू विकणारे विक्रेते, मुंबईतील, मोकळ्या जागांच्या वापराचे नियोजन जर का ही मंडळी स्वत:च ठरवणार असतील तर त्यांना शहर व्यवस्थेचा आणि गरजेचा एक भाग बनवून त्यांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे असे मी समजतो. विक्रेते, पदपथ व रहदारीच्या मुख्य रस्त्याचा काही भागही वापरतात, त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वेळेचा अपव्यय व पेट्रोलचा वापरही अधिक होतो. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वापरात नसलेल्या नादुरुस्त गाडय़ा धुळीने माखलेल्या असतात. ४० फूट रुंद रस्त्याच्या दुतर्फा, किमान सात मजल्यापासून ते बावीस मजले उंच इमारतीमुळे एकमेकाचा सूर्यप्रकाश व हवा अडवली जाते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईचे स्वास्थ्य व सौंदर्यास बाधा येत आहे.
राजकीय पक्ष/ नेते व सामाजिक संस्थांनी लावलेले फलक, शहराच्या सौंदर्यात बाधा आणतात. हे फलक लावण्यास आक्षेप नाही तर ते कसे लावावेत याला नियमाने वेळेचे बंधन असावे व त्या जागा शहर प्रशासनाने निश्चित करायला हव्यात. जगातील सर्व महानगरचा तोंडवळा तेथील संस्कृतीचे प्रतीक व नागरिकांच्या मनोवृत्तीचे प्रतिबिंब असते! भारतातील मिश्र संस्कृतीमुळे आपली महानगरेसुद्धा त्याच धर्तीवर बनली आहेत. जगातील महानगरे, भूतकाळात केलेल्या चुका कशा दुरुस्त कराव्या या विवंचनेत ग्रस्त आहेत! आपणास हे माहीत असूनही त्यातून बोध घेणार आहोत की नाही? चलनी नोटा, परत परत छापता येतात, निसर्ग थोपवता येत नाही की त्याला आव्हानही देता येत नाही!
मुंबई शहरातील, जुन्या सार्वजनिक विकासाचा कलासंवेदन सौंदर्यशास्त्राचा (Aesthetics दृष्टिकोनातून घेतलेला त्रोटक आढावा : जगातील कुठल्याही महानगरास भेट दिल्यास त्या शहरातील सार्वजनिक कामे किती सक्षम, सुंदर आहेत व स्थानिक लोकांच्या एकंदर राहणीमानावरून त्या त्या महानगरचा दर्जा लक्षात येतो. शहराला बेढब करण्यामागे आपले नागरिकच जास्त जबाबदार आहेत! पण त्यांना वळण लावण्याचे काम प्रशासनाने करायला हवे.
उपनगरीय रेल्वे स्थानके : ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले, बांद्रा उपनगरीय स्थानक, छत्रपती शिवाजी स्थानकानंतर बांधलेले सुंदर उपनगरीय स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकाचा विकास, शैलीला अनुसरून का झाला नाही? सर्व बाजूने सुंदर दिसणाऱ्या या स्थानकाच्या विविध छटा, दिवसा व संधेच्या चंद्रप्रकाशात, वेगवेगळ्या कोनातून अधिकच सुंदर दिसतात. परदेशात अशा वास्तूंचे संवर्धन संवेदनशीलपणे हाताळले जाते. स्थानकाच्या निर्मितीपासून आजपर्यंत टिकणारे कास्ट आयर्न व लाकडाचा वापरातून बनविलेले आरामदायक बाकडे जाऊन त्या ठिकाणी तिन्ही ऋतूत बसण्यासाठी अयोग्य वाटणारी व त्या वातावरणाला न शोभणारी आहेत! रेल्वे स्थानकाच्या छपराचा रंग जुन्या छपराशी मिळताजुळता नसल्यामुळे विसंगतीत आणखी भर पडत आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांचा विस्तार इतर कुठल्याही सार्वजनिक कामापेक्षा आकाराने मोठा व नजरेआड करण्यासारखा नाही. ही स्थानके मुंबई शहराच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक म्हणूनच निर्माण झाली व भविष्यातही आपणासोबतच राहणार आहेत. मग त्याचे जतन त्या प्रमाणेच व्हायला हवे.
लोखंडी सुरक्षा कठडे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांना लागून असलेले कास्ट आयर्न रेलिंग शोभिवंत असून आजतागायत ते टिकून आहे.
 स्कायवॉक : कित्येक वर्षांपूर्वी, चर्नीरोड रेल्वे स्थानक व रस्त्याला लागून बांधलेला स्कायवॉक हे साधा, सोपा व कमी खर्चीक या कसोटय़ावर सर्व दृष्टीने उत्तम असल्याचे उदाहरण होय. हा स्कायवॉक स्थानकाशी एकरूप झाल्यासारखा वाटतो, चटकन नजरेत भरत नाही, असे साधे सोपे उदाहरण आपल्यासमोर असताना उपनगरातील नवीन स्कायवॉक असे का बांधले असावेत?
मोठय़ा आकाराचे रुंद रस्ते व पदपथ : कुलाबा ते फोर्ट परिसरात असलेले आच्छादित/ उघडे रुंद पदपथ व रस्ते, उपनगरात का नाहीत?
मैदाने व बागबगिचे : आझाद/ओव्हल/क्रॉस मैदानासारखी मोठय़ा आकाराची मैदाने व बागबगिचे उपनगरात का ठेवले नाहीत? शंभर वर्षांपूर्वी बनविलेल्या आराखडय़ातील खाजगी व सार्वजनिक वापरात असलेल्या इमारती व परिसराच्या जवळपास पोहोचणारी किंवा स्पर्धा करू शकेल असे एक काम आज आम्ही दाखवू शकतो का? भविष्यातील ज्या वास्तू अनेक वर्षे टिकणार आहेत त्यांचा विकास ठराविक शैलीतूनच व्हायला हवा आणि खऱ्या अर्थाने हीच त्या शहराची ओळख असते. ज्या वास्तू शंभर वर्षे आपल्या सोबत आहेत, ज्यांची अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता आहे, हे जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे असे मी मानतो. वारसाहक्काने मिळालेले जे असेल ते आम्ही जतन करू शकलो नाही हे सर्वाना मान्य आहे, जर का हे आम्ही नाकारत नाही तर ते सौंदर्य टिकून रहावे म्हणून आम्ही संवेदनशीलपणा का नाही दाखवत?
शहर प्रतिमा : मुंबई शहराची प्रतिमा दिवसेंदिवस डागळत चालली आहे हे खरे आहे. त्या प्रतिमेला समजून घेऊन ती प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी झटताना प्रत्येक सूक्ष्म व दीर्घ गोष्टीपासून सुरुवात करावी लागेल. सद्य:स्थितीत पायाभूत सुविधांमध्ये भरभक्कम फेरबदल तसेच जवळपास सर्व ठिकाणी, निवासी आणि अनिवासी क्षेत्रात सुरू केलेल्या अति विकास कामाच्या रेटय़ामुळे शहराचा पायाच डळमळीत झाला आहे. जे शहर या पूर्वी उल्हासित होते ते आता अधिकच बहुढंगी होत चालले आहे! या शहरावर आतून विकासकामाचा व बाहेरून स्थलांतरीत लोकांचा दबाव सारखा वाढत आहे. या दबावामुळे आंतरिक व्यवस्थाच साफ कोलमडून पडत आहे. आपण त्याच त्या अवस्थेतून परत परत मार्गक्रमण करीत आहोत! प्रत्येक पाच किंवा दहा वर्षांने तर एक नवा चेहरा, एक नवे चुरचुरीत घोषवाक्य घेऊन जनतेसमोर येतो; सत्ता प्रस्थापनेनंतर गरज नसलेल्या अनेक विकास योजना जनतेच्या माथी मारल्या जातात! मित्रांनो, मुंबईची खऱ्या अर्थाने हीच शोकांतिका आहे! कित्येक वर्षांपासून या शहरात राहणाऱ्या नागरिकांना हे शहर आता त्रासदायक वाटायला लागले आहे. आजच्या लोकसंख्येला सामावून घेण्याच्या शहराच्या क्षमतेलाच या दुरावस्थेने आव्हान निर्माण केले आहे. या शोकांतिकेमागचे सर्वात मोठे कारण काय असेल, तर ते या शहराला मिळालेले, दूरदृष्टीहीन व कमकुवत नेतृत्त्व हेच आहे. वास्तविक पाहता, वेळीच उपाय करण्याची गरज असतानाही, तो न केल्यामुळे हे शहर आता अती महागडय़ा पण नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या मोटार गाडी प्रमाणे दिसते आहे! नेमका कोणत्या क्षेत्रातील विकास आणि तो किती मोठय़ा प्रमाणात केल्याने, नागरिक समाधानाने जगू शकतील याचे नेमके उत्तर या सरकारकडे आहे ना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे!
अभ्यासकांचे मनोगत : गरज, नवीन विकास आराखडय़ात शहर सौंदर्य विषयक नियम अंतर्भूत करण्याची आराखडय़ात सुचवलेल्या सेक्टर किंवा झोनमध्ये वेगवेगळ्या वास्तूशैलींचा वापर करून  विकास साधल्यास भविष्यातील मुंबई सुंदर दिसेल. आजपर्यंत मुंबईत कार्यान्वित असलेल्या नमुन्याचे पुन:परीक्षण करणे आवश्यक आहे. बऱ्याच वर्षांच्या अनुभवाने जे नमूने ठीक वाटतील ते पुढे न्यावे व जे प्रचलित काळात कुचकामी ठरतील ते रद्दबदल करावेत; आज आपल्याला आवडो किंवा नाही, पण कोणती गोष्ट आपल्याकडे असावी व कोणती नसावी या विषयीच्या मूलभूत सुविधांचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. राजकीय बडवेगिरीच्या फसव्या विधानाला न बळी पडता सर्व नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबईतील जागेचा नुसताच विकास नाही तर ‘सौंदर्यपूर्ण विकास’ साधण्याचीसुद्धा तेवढीच गरज आहे. प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मसुदा विकास आराखडय़ात मुंबई शहराची माहिती संकलन तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. प्रशासनाच्या सल्लागारांनी मुंबई शहराची विभागणी १५० सेक्टरमध्ये सुचवली आहे. त्यांनी सुचवलेले नियम शहराच्या निकोप वाढीसाठी योग्य की अयोग्य आहेत हे नागरिकांच्या हरकती व सूचना/प्रस्तावाद्वारे समजून येईल. पण या आराखडय़ात शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लागणाऱ्या योग्य नियमांचा अंतर्भाव दिसून येत नाही. सुचवलेल्या कुठल्याही सेक्टरचे/झोनचे एक मॉकमॉडेल तयार करावे. या लेखात, सर्व काही सांगून झाले आहे व वरील सूचना अंमलात आणल्याने शहराचे सौंदर्य बदलेल असा अभ्यासकाचा दावा अजिबात नाही. पण दिवसेंदिवस डागळत चाललेल्या प्रतिमेला समजून/अभ्यासून घेतल्यास ती अधिक जवळ व आमच्या जीवनशैलीला अधिक पूरक सिद्ध होईल याचा शहर प्रशासन व सरकार विचार करेल असा विश्वास वाटतो. मुंबई शहराची सध्याची वस्तुस्थितीचा अभ्यास करून त्या जागी व्यवहार्य पर्यायासाठी लागणाऱ्या आवश्यक व्यवस्थेला पर्याय निर्माण केल्याशिवाय मुंबई-शहराचा नवीन विकास कार्यान्वित करणे चुकीचे आहे, असे अनेकांचे मत आहे. आपला देश स्वतंत्र झाल्यापासून साधारणत: ४० वर्षांनंतर शहर व नागरिकांच्या नवीन तंत्रज्ञानामुळे गरजा बदलल्या, गरजेत वाढही झाली तरीसुद्धा शेकडो वर्षांपूर्वी शहर म्हणून वसवलेल्या शहरांचे महानगरात अनेक स्थित्यंतरे होऊनही आपल्या गरजांना त्या त्या राज्यातील महानगरे उरत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
राजकीय घडामोडीतून दर पाच किंवा दहा वर्षांनंतर येणाऱ्या प्रत्येक नव्या सरकारचे धोरण व मनमानीतून आकाराने मोठय़ा व गजबजलेल्या मुंबई शहराचा विकास साधायचा असेल तर शहर विकास नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे. मुंबई शहर, भरकटण्याची क्षमता संपेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत की या शहराला भरकटण्यापासून वाचवणार आहोत? जर का कालपरवापर्यंत योग्य असलेल्या आराखडय़ात आमूलाग्र बदल करणार असू तर २० वर्षे मुदतीचे आराखडे का म्हणून बनवण्यात वेळ व पैसा वाया घालवायचा? अभ्यासकाच्या मते, भारतातील सर्व जुन्या शहरांचे आराखडे किमान, पुढील ४० वर्षांचा विचार करून बनविणे योग्य आहे. मग सरकार कुणाचेही येवो त्यात अमूलाग्र बदल करणे चुकीचे आहे. शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी शहर प्रशासनाने विकास नियमावलीत योग्य त्या नियमांना अंतर्भूत करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रहो, एक गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे आणि ती म्हणजे कोणताही राजकीय पक्ष मुंबईला जगातील सर्वात सुंदर शहर बनवू शकणार नाही;  पण या शहराच्या दृष्य रुपात लक्षात येण्याइतपत बदल घडवून आणणे सहज शक्य आहे. हा बदल घडवून आणण्याचे व या शहराला भरकटण्यापासून वाचविण्याचे काम राजकीय इच्छाशक्तीच करू शकते हे ही तेवढेच सत्य आहे. फक्त राजकीय नेत्यांनी जनहिताला व शहराच्या जडणघडणीला बाधा आणणारी विधाने करण्याचे टाळून हे काम करावे. उदाहरणार्थ, अनधिकृत बांधकामांना पुष्टी देणे, अधिकृत करणे किंवा रात्रजीवन, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे इत्यादी. या शहराचे दृष्यरुप बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास नागरिक तयार आहेत; प्रश्न आहे तो त्यांनी निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींचा नागरिकांशी असणाऱ्या विश्वासार्हतेचा. अनेक वर्षांनंतर मिळालेल्या विकासाच्या संधीचा उपयोग गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुंबईतील सर्व नागरिकांना योग्य जीवनशैलीत जगण्यायोग्य स्वच्छ व सुंदर शहरात राहण्याचा अभिमान वाटावा, असे शहर भविष्यात घडले जावे, हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवूनच लिहले आहे!   
आर्किटेक्ट,
fifthwall123@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:56 am

Web Title: development plan and beautification of city
टॅग : Development Plan
Next Stories
1 आठवणी दाटतात..
2 नवीन आदर्श उपविधी स्वीकारणे गरजेचे
3 अमेरिकेतील गृहव्यवस्थापन : सुखकर, पण कष्टसाध्य
Just Now!
X