परवा इंदिरा संतांची ‘उंच उंच माझा झोका..’ कविता वाचताना मीसुद्धा आठवणींच्या झोपाळ्यावर बसून पार गावाकडच्या आजोळघरी पोचले. पोचले म्हणजे काय? तर तिथल्या ओटीवरच्या झोपाळ्यावर चक्क झुलायला लागले. संध्याकाळच्या वेळी आम्हा सर्व मामे-मावस भावंडांची झोपाळ्यावर चिकटून चिकटून बसायची धडपड; तरीही जागा पुरली नाही तर विरुद्ध दिशेला तोंड करून, म्हणजेच पाठीला पाठ चिकटवून बसणे, उरलेल्यांनी दांडय़ा धरत उभे राहणे, दोन्ही बाजूला बसलेल्यांची पायाला रेटा देत झोपाळा उंच उंच न्यायची धडपड आठवली. आजोबांनी अंगणात फेऱ्या मारायला सुरुवात केल्यावर आमचे एकसुरातले रामरक्षा पठण, परवचा चालू होई. एकसुरात चाललेल्या आमच्या श्लोक-स्तोत्रांसोबत झोपाळ्याच्या कडय़ांचा कर्र.. कर्र असा लयबद्ध आवाज पाश्र्वसंगीताचे काम करायचा. त्या मंतरलेल्या संध्याकाळच्या आठवणीतून भानावर आल्यावर लक्षात आले की, झोपाळा हा एकेकाळी गावाकडच्या प्रत्येक घरातील अविभाज्य आसनव्यवस्था होती. घटकाभरासाठी आलेल्या प-पाहुण्यांचा पाहुणचार ओटीवरच्या झोपाळ्यावरच होई. अपवाद शक्यतो स्त्री पाहुणीचा! तिचे आगतस्वागत मात्र माजघरात किंवा स्वयंपाकघरात पाटावर बसवून होई. खरं तर बायकांना दिवसाढवळ्या ओटीवरच्या झोपाळ्यावर बसलेले कधीच पाहिले नाही. झोपाळ्याची चन शहरातील स्क्वेअर फुटांच्या मोजपट्टीतील घरांना कुठली परवडायला; पण तिथेही काही आलिशान घरांतील अंतर्गत सजावट झोपाळ्याच्या मांडणीने खुलवलेली आढळते. आटोपशीर घरातील मंडळी आपली हौस निदान बाल्कनीत किमान एकापुरता छताला टांगता, काढता येणाऱ्या वेताचा लंबगोलाकार झोपाळ्यावर किंवा दणकट सुंभाच्या झोपाळ्यावर भागवताना दिसतात. सुंभाच्या दोऱ्यावरून पुन्हा गावातील खाटांची बठक आठवली. प्रत्येक घराच्या अंगणात चार लाकडी खुरांभोवती सुंभाने विणलेल्या ओबडधोबड अशा एक-दोन तरी खाटा दिसणारच. सुंभाचा खरखरीतपणा टोचू नये म्हणून त्यावर बरेचदा काही अंथरलेले असे. उन्हाळ्याच्या दिवसात त्यावर पापड कुरडया किंवा वर्षभराची वाळवणे पसरली जात आणि रात्री त्याच खाटांवर लोळून आकाशदर्शन करताना निद्रादेवी प्रसन्न होई.

घरातील बठकीच्या अनेक प्रकारांतील जेवणासाठीची एकेकाळची आसनव्यवस्था म्हणजे मजबूत लाकडी पाट; अगदी अलीकडेपर्यंत.. म्हणजे सर्वाच्या गुडघेदुखीने अचानकपणे डोके वर काढेपर्यंत घरोघरची जेवणे जमिनीवर म्हणजे पाटावर बसूनच होत. फार तर पाटाला पर्याय म्हणजे बसकर.. छोटी आसने चटया वगरे.. काही वेळा छोटय़ा चौरंगावर ताट वाढणे म्हणजे खास पाहुणचाराचा नमुना. पाटाचा वापर निदान सध्यातरी धार्मिक कार्यापुरताच होताना दिसतोय. धार्मिक कार्यावरून माझ्या आजीची सवय आठवली. ती खूपच धार्मिक होती. दिवेलागणीला घरात लक्ष्मी येते यावर तिचा ठाम विश्वास म्हणूनच दिवेलागणीला मोठय़ा देव्हाऱ्यासमोर  सांजवात करताना ती नियमितपणे लक्ष्मीसाठी पाट मांडून ठेवायची आणि त्याच लक्ष्मीला रात्रभर तिथे ताटकळत बसायला नको म्हणून झोपायला जाताना तो उचलून ठेवायची. असो.. एकीकडे आपली पाट चौरंगावरची जेवणे बंद झालीत, पण खेडेगावचा आभास असणाऱ्या रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवायला गेलेल्यांना झापाच्या झोपडीत गावरान जेवणाचा आस्वाद बरेचदा खाट चौरंगावर घेता येतो.

लाकडाची मुबलकता असण्याच्या काळात घरातील बसण्यासाठीचे फíनचर लाकडाचेच बनलेले असायचे. उदा. पाटापासून ते खुच्र्या, पलंग, स्टुल, कोच, सेटी, दिवाण. खुच्र्याचे प्रकारही कितीतरी. पूर्ण लाकडाच्या कोरीव काम केलेल्या, सीट आणि पाठीला नाजूक पट्टय़ांनी विणलेल्या किंवा गुबगुबीत गादीच्या हात टेकायची सोय असलेल्या.. नसलेल्या, नावाप्रमाणेच आरामदायी असणाऱ्या आरामखुर्चीवर बसण्याचा पहिला हक्क. कायम घरातील ज्येष्ठ मंडळींचा. आरामखुर्चीची बहीण रॉकिंग चेअर; बॅरिस्टर नाटकात सुरुवातीपासून अखेपर्यंत मागेपुढे डुलताना दिसणारी. त्यातील पात्रांची दोलायमान मन:स्थिती, झिंगावस्था पुरेशी सूचित करणारी रॉकिंग चेअर कधीच न विसरण्याजोगी..

आरामात हात किंवा पाठ वगरे अजिबात टेकवता येणार नाही असा बठक प्रकार म्हणजे स्टुल. बहुतेक घरांत त्याचा उपयोग बसण्यापेक्षा उंचावरचे सामान काढण्यासाठीच अधिकतर केला जातो. मात्र, सदोदित स्टुलावरच बसण्याचा मान असतो कुठल्याही कचेरीत साहेबाच्या केबिनबाहेर बसणाऱ्या शिपाईदादाचा!

जागा मुबलक असताना सर्वच फíनचरही ऐसपस; परंतु शहरात मोजक्या जागेतील फíनचर आटोपशीर झाले. म्हणूनच मग घडीच्या खुच्र्या, घडीचे पलंग कोच अस्तित्वात आले. तसेच फíनचरसाठी लाकडाऐवजी स्टील, लोखंडी रॉट आयर्नचा वापर होऊ लागला. काथ्या किंवा फोम भरून वरून रेक्झिन किंवा खास कापडी कव्हरच्या सोफ्याच्या पोटात भरपूर अंथरुण-पांघरुणं ठेवण्याच्या सोयीमुळे सोफा दिवसा बठक आणि रात्री पलंग अशी दुहेरी भूमिका करतो. त्यातल्या स्प्रिंगमुळे आम्हाला त्यावर उडय़ा मारायला मज्जा वाटायची, पण त्यामुळे त्याची कडेची शिवण उसवली. आजकालसारखी हौसेपायी दोन-चार वर्षांत फíनचर बदलण्याची चन त्याकाळी परवडण्यासारखी नव्हतीच, म्हणून कुणी पाहुणे येणार असले की सोफ्यावर छानशी चादर वगरे घालून ते न्यून लपवले जाई. सोफ्याप्रमाणेच लोखंडी कॉटचासुद्धा दुहेरी उपयोग व्हायचा. झोपा-बसायची सोय हा एक आणि त्याखालच्या मोकळ्या जागेत भरपूर सामान ठेवता येई. पलंगावर मोठीशी चादर अंथरली की खालचे सामान बुरख्यात लपून जाई. त्यानंतर सुरू झाले प्लॅस्टिकचे युग. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या प्लॅस्टिकच्या खुच्र्या, टेबल, स्टुल, तिपाई बाजारात आल्या. स्वस्त आणि मस्त अशा फíनचरमुळे वाळवी गंज धुळीसारख्या समस्या निकालात निघाल्या. मोठमोठय़ा बंगल्यांत, घरांत किंवा बागबगिच्यांत दिसणारे वेताचे कोच, टेबल्स, मोडे किंवा ऐसपस खुच्र्याना सामान्यांच्या टीचभर घरात मात्र कधी प्रवेश मिळाला नाही; त्याचे कारण त्यांचे आकारमान आणि साफसफाईची कटकट.

अशा अनेक प्रकारच्या आसनव्यवस्थेहून जरा हटके.. स्वत:चा रुबाब असणारा बठकप्रकार म्हणजे पांढऱ्याशुभ्र लोड तक्क्यांची बिछायत. आजकाल क्वचितच दिसणारा हा प्रकार एकेकाळी खासकरून निमशहरी किंवा गावाकडच्या सामान्यांच्या घरातही बघायला मिळत असे. त्याच्या शेजारी बरेचदा चर्चा किंवा गप्पाष्टक रंगण्यासाठी जय्यत तयारीनिशी पानदान ठेवलेले असायचे. दिवाणखान्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या गालिचाचे स्थानसुद्धा धनिकांच्या घरात, बंगल्यात  असे, कारण त्याचे मोल सामान्यांच्या बजेटच्या बाहेर असे. शिवाय त्याची नियमित साफसफाई कठीण आणि त्याहीपेक्षा खर्चीक. त्यामुळे सामान्यांच्या घरात वापरलाच तर तो अगदी खास प्रसंगी, सणावाराला घरात खास कार्यक्रम असेल तरच. त्यानंतरही  लगेचच तो आवरून ठेवला जाई. गालिचाला स्वस्त पर्याय म्हणून बऱ्याच घरात दिवाणखान्याची शोभा एकेकाळी सहजपणे पुसता येणाऱ्या रंगीबेरंगी कार्पेटनी वाढवली जाई. मुळात जमिनीवर मांडी घालून बसणे कुणालाच अशक्य आणि अयोग्य वाटत नसे. यजमानांना आणि पाहुण्यांनासुद्धा म्हणूनच खुच्र्या कोचांव्यतिरिक्त खाली बसण्यासाठी चटई, सतरंजी, जाजमचा सरसकट वापर होई. प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी सुंदर डिझाइनच्या आणि घडी करता येण्याजोग्या चटयांनी पारंपरिक बांबू-तागाच्या चटयांची मक्तेदारी मोडीत काढली.

पाहुण्यांच्या सरबराईसाठी झोपाळ्यापासून गालीचा-चटयांपर्यंत अनेक बठकांचा विचार करता करता डोक्यात एक मजेशीर कल्पना आली. पाहुण्यांना टेकण्यासाठी वापरलेला आणि अजरामर झालेला एक बठक प्रकार आजवर कधीच कुणीच वापरलेला नाहीये, तो म्हणजे- दारी भेटासाठी आलेल्या पांडुरंगाच्या पुढय़ात पुंडलिकाने सरकवलेली ती सुप्रसिद्ध वीट.. मुळात ती अजरामर झालेली वीट कुठल्या बरे बठक प्रकारात मोडते? कुणाला सांगता येईल का?

alaknanda263@yahoo.com