13 July 2020

News Flash

घर सजवताना : सजली दिवाळी घरोघरी

दिवाळी म्हटली की रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील हे सारे ओघानेच येते

(संग्रहित छायाचित्र)

गौरी प्रधान

गेले काही दिवस सोशल मीडियावर काही ग्रुपमध्ये सप्तपर्णी या झाडाविषयी बरीच चर्चा होताना पाहायला मिळते आहे. सप्तपर्णी म्हणजे  हल्ली रस्त्याच्या कडेला बरीच झाडे लावलेली दिसतात तेच. दिवाळीच्या सुमारास शुभ्र फुलांच्या घोसांनी हा वृक्ष फुलून येतो. काहींचे म्हणणे की, याच्या फुलांना फारच उग्र सुगंध येतो. तर कोणी म्हणे याच्या वासाने डोके जड होते. कोणाला हाच उग्र सुगंध फार आवडतो. मला मात्र याचा सुगंध आला की दिवाळी आल्याचा भास होतो.

कित्ती मतमतांतरे नाही! तसे तर प्रत्येकच बाबतीत व्यक्तिगणिक मत बदलत जाते. पण काही गोष्टी किंवा प्रसंगच असे असतात की तिथे एकमत झाल्यावाचून राहत नाही. यातीलच एक म्हणजे दिवाळी. दसरा झाला की वेध लागतात दिवाळीचे. इतर सण असू देत कितीही मोठे, पण दिवाळीची सर मात्र कोणालाच नाही. दिवाळीसाठी जसे कपडे, दागिने खरेदीची लगबग सुरू होते, तशीच गृहसजावटीचीदेखील धांदल उडते. आता नमनाला घडाभर तेल मी ओतलेच आहे तर आता सांगूनच टाकते. आज आपण बोलणार आहोत ते फक्त आणि फक्त दिवाळीच्या खास गृहसजावटीबद्दल. एरवीच्या आपल्या नीटनेटक्या परीटघडीच्या घराला दिवाळीच्या निमित्ताने थोडा भरजरी साज कसा चढवता येईल याचा जरा विचार करू या.

मुळातच दिवाळी म्हटली की रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील हे सारे ओघानेच येते. पण सजावट ही अशी गोष्ट आहे की ती कितीही केली तरी मनच भरत नाही. मग या पारंपरिक रीतींसोबतच आणखी काय वेगळे करता येते ते पाहू. सुरुवात ही मुख्य दरवाजापासून करू. घराच्या दरवाजात रांगोळीसोबतच दाराच्या चौकटीला फुलांचीदेखील सजावट आपण करू शकतो. यात देखील पारंपरिक पद्धतीने फुलांचे तोरण लावा किंवा मग आधुनिक पद्धतीची बुकेप्रमाणे रचना करा- दोन्ही छानच. हल्ली बरेच फुलवाले अशा प्रकारच्या ऑर्डर घेऊन दाराच्या चौकटी सजवून देतात. अर्थात खऱ्या फुलांची सजावट करणे आणि नंतर पुढे तीन-चार दिवस ती सांभाळणे हे थोडे महागच पडते. मग याला पर्याय म्हणून हल्ली बाजारात मिळणाऱ्या खोटय़ा; परंतु अगदी खऱ्यासारख्या दिसणाऱ्या फुलांचाही वापर आपण करू शकतो. खोटय़ा फुलांची ही सजावट करताना मात्र मध्ये मध्ये खऱ्या पानांचा उपयोग केल्यास तुमची सजावट खऱ्या फुलांची आहे की खोटय़ा हे पाहणाऱ्याला पटकन समजणारच नाही. दिवाळीच्या काळात दारातल्या कंदीलाइतकेच महत्त्व असते ते दाराच्या रांगोळीला, रांगोळीशिवाय तर दिवाळी अपूर्णच. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळेलच; आणि मिळाला तरी प्रत्येकाकडे ती कला असेलच असे नाही. फुलवाले बाहेरून येऊन फुलांची सजावट करून देतात, तसेच काही रांगोळी आर्टस्टि देखील असतात- जे आपल्या दरवाजाला शोभेल अशी रांगोळी झटपट घालून देऊ शकतात. त्यांच्या मदतीने मात्र आपण ही हौस देखील पूर्ण करून घेऊ शकतो.

आता मुख्य प्रवेशद्वार तर सुशोभित झाले, मग पाहू या घराच्या आत काय करता येईल. आता दिवाळी आणि रंगांचे नाते असेही अतूट. मग दिवाळी म्हटले की रंगकाम आलेच. पण प्रत्येक वेळी हे शक्य नाही होत. पण या जगात पर्याय नाही अशी एकही गोष्ट नाही, त्यामुळेच झटपट घराचे स्वरूप बदलण्यासाठी आपण वॉलपेपरचे साहाय्य नक्कीच घेऊ शकतो. बाजारात इतक्या विविध प्रकारचे वॉलपेपर मिळतात की अगदी हा घेऊ की तो असे होऊन जाते. आणि विनापसारा झटपट घराचे स्वरूप अगदी नव्यासारखे करता येते.

अजून म्हणजे, दिवाळीच्या निमित्ताने आपण भिंतींवर लावलेले पेंटिंग्स वॉलपीस या वस्तू बदलून घराला पटकन, पण वेगळे स्वरूप देऊ शकतो. बाजारात आज-काल मिळणारे ब्रोकेडचे सुंदर सोनेरी रुपेरी रंगांमधील कुशन कव्हर्स पटकन घराला भरजरी करून जातात. याव्यतिरिक्त बाजारात आजकाल सोनेरी किंवा इतर चमकदार रंगांत छान छान तरीही अतिशय स्वस्त असे जाळीचे कापड मिळते. या कापडाचे वेलांस म्हणजेच झालर करून खिडकीच्या पडद्यावरून सोडल्यास स्वस्त आणि मस्त गृह सजावट होऊन जाते आणि पडदे न बदलताही नव्या आणि वेगळ्या पडद्यांचा आनंद घेता येतो.

आता महत्त्वाची वस्तू म्हणजे आकाशकंदील. दिवाळी हा सणच प्रकाशाचा असल्याने सर्वात जास्त महत्त्व हे रोषणाईला. मागे एका लेखात घरातील विद्युत व्यवस्थेबद्दल लिहिताना मी नमूद केले होते त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी मुख्य दरवाजाबाहेर आणि खिडक्यांच्या बाहेर लाइटचे पॉइंट घेतले असतील त्यांना आज त्याचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल. ज्यांचे बठे घर किंवा बंगला आहे ते दारासमोरच आकाशकंदील लावू शकतात. पण शहरातील जास्तीत जास्त जनता ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्याने त्यांना कंदील अडकवण्यासाठी खिडकीचाच काय तो आधार असतो. अशा वेळी बाहेर जो आपण प्लग पॉइंट घेऊन ठेवतो त्याच्या मदतीने फक्त आकाशकंदीलच नाही, तर इतरही लाइटच्या माळा वैगेरे सोडून रोषणाई करू शकतो. या सर्वाखेरीज बाजारात सहज उपलब्ध असणारे शोभेचे छोटे कंदील, चांदण्या यांच्या उपयोगाने गृहसजावट पटकन आणि परिणामकारक देखील होते.

अशा तऱ्हेने आनंदात ही दिवाळी साजरी करत असतानाच सुरक्षेचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. रोषणाई करताना वायर्स कुठे खिडकीत दरवाजात दाबल्या जात  तर नाहीत ना, हे नक्की पाहा. लोखंडी ग्रीलवरून रोषणाई करताना चांगल्या दर्जाच्याच दिव्यांच्या माळांचा वापर करा, जेणेकरून अपघाताला आमंत्रण मिळणार नाही. रात्री झोपताना सर्व कंदील, दिवे, माळा व्यवस्थित मालवल्या आहेत यांची खात्री करून घ्या.

चार दिवसांची दिवाळी येते आणि जातेही; मग त्यासाठी सजावट करताना मूळ इंटिरियरला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे. बरेचदा अशा सण समारंभांना झिरमिळ्या, फुगे यांचा वापर करण्याचा मोह होतोच. इथे मात्र उत्साहाच्या भरात भिंतींवर चिकट पट्टी वगैरे वस्तूंचा वापर करून सजावट करणे टाळल्यास बरे; नाहीतर नंतर रंग उडालेल्या, पोपडे निघालेल्या भिंती वर्षभर पाहात राहाव्या लागतील. म्हणूनच वर नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यास ही दिवाळी आपणा सर्वाना आनंदाची, सुख समृद्धीची आणि सुरक्षित अशीच जाईल.

सर्व वाचक मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दीपावली!

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:02 am

Web Title: diwali decorating house abn 97
Next Stories
1 देशमुखांचा वाडा
2 पर्यावरणप्रेमी मुंबईकर?
3 सुंदर माझं स्वयंपाकघर!
Just Now!
X