News Flash

हर घर कुछ कहता है..

प्रत्येक घराला स्वत:ची अशी ओळख असते. त्या-त्या घराची ओळख निर्माण होते ती घरातील सजावटीमुळे, नाहीतर तिथल्या माणसांमुळे.

 

प्रत्येक घराला स्वत:ची अशी ओळख असते. त्या-त्या घराची ओळख निर्माण होते ती घरातील सजावटीमुळे, नाहीतर तिथल्या माणसांमुळे. काही घरांमध्ये प्रवेश करताच आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर काही घरांमध्ये क्षणभरही थांबू नये असं वाटतं..

 

स्पॅनिश भाषेत ‘कासा’ आणि कानडी भाषेत ‘मने’ म्हणजे घर. त्यामुळे आधुनिक फ्लॅटच्या संकुलांना ‘कासा रिजन्सी’ ‘कासा एन्क्लेव्ह’ यांसारखी नावं देतात मराठी भाषा समृद्ध आहे. ‘शब्दरत्नाकर’मध्ये घर या शब्दाचे खूप अर्थ आहेत. घर म्हणजे गृह, कुटुंबातली माणसं, बिऱ्हाड, संसार, प्रपंच, घराणे, उत्पत्तीस्थान, आगर, खण, कप्पा, चौक.. घराचे कितीही का अर्थ असेनात, आपल्यासाठी घर म्हणजे जिथे निवांत बसता येतं. जमिनीवर किंवा चटईवर लोळत वृत्तपत्र वाचता येतं. स्त्रियांना स्टुलावर बसून स्वयंपाकाच्या ओटय़ावर वही-पुस्तक ठेवून मुलानं गृहपाठ केला तरी आई रागावत नाही. जिथे मोठय़ा आवाजात हसता येतं.

घर आतून कसं आहे हे महत्त्वाचं. किंबहुना प्रत्येक खोलीच्या चार भिंती कशा. भिंतीवर कोणा साधुबाबाची तसबीर नसेल तर तो चार्वाक. किंवा अंनिसच्या मतांशी सहमत असणारा. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्टिकर गोदरेजच्या कपाटावर दिसला किंवा शेगावच्या महाराजांचं आयकॉनिक छायाचित्र असेल तर ते घर आस्तिक आणि पाप करायला घाबरणारं. माजघरात भिंतीवर दिनदर्शिकेवर तारखेच्या जागी गोल करून आज गॅस संपला. पुढच्या आठवडय़ात आलेल्या नव्या सिलिंडरचा पुन्हा गोल करून उल्लेख केला असेल तर दर वेळी गॅस किती दिवस चालतो याचाच फक्त हिशेब करणारं नाही, तर सर्व बाबतीत हिशेबात पक्कं असणारं घर. कोटय़वधी लोक सारख्याच पद्धतीनं विचार करणं शक्य नाही.

बैठकीची खोली अथवा माजघर राहणाऱ्याची आवड दर्शवतं. बाहेरून आलेल्यानं घरातलं काय पाहावं हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर अवलंबून असतं. आपली पुस्तकं सगळ्यांनी पाहावीत की नकोत; कारण मागणारे मागतात आणि परत करीत नाहीत. कोणत्या वस्तू दिसाव्यात, आलेल्या माणसांनी खूप वेळ बसावं की बसू नये, हे घराची रचना बाहेरून आलेल्याला सुचविते. घराचं दार उघडलं की लगेच माणसानं बैठकीच्या खोलीत न शिरलेलं बरं. माजघर आणि प्रवेशद्वार यात अंतर असावं.

ही झाली सगळी मनातली खळबळ, पण खरोखर घर कसं आहे ते पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कळतं. ते पावसात गळत नाहीना, कडक उन्हाळ्यात तापतं का, वायुविजन नसेल तर जिवाची तगमग होते का, कोणी गच्चीला पांढरा रंग देऊन ऊन परावर्तित करून थोडं सहनशील बनवतं. कोणी वाळ्याचे पडदे लावतं. बांबूची जाळी लावतं. घर थंड ठेवायचे उपाय शोधले जातात.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा मित्र अहमदाबादला राहत असे, तिथे उन्हाळ्यात पारा पंचेचाळीसपर्यंत पोहोचे. त्याचं तळमजल्याचं भाडय़ाचं छोटं घर होतं. त्यानं घराच्या चारही दिशांना रेल्वे कीपर आणि मधुमालतीचे वेल लावले होते. सगळ्या वेलांच्या गर्दीत भिंती दिसत नसत, दिसत फक्त खिडक्या, तिथल्या बस थांब्याला लोक हिरव्या घराजवळ थांबव, असं सांगत, बाहेर असह्य़ गर्मी असली तरी त्याचं घर थंड असे. त्याचं अनेक बाबतीत छान निरीक्षण असतं. झुरळं अंधाऱ्या जागी असतात म्हणून त्यानं कपाटाचं प्लायवुड शटर काढून काचेचं बसवलं. लगेच झुरळं निघून गेली.

तसं म्हटलं ऊष्ण कटिबंधात राहणारे सगळेच स्वच्छतेचे पुजारी आहेत, उष्ण आणि दमट हवेत राहणारे दोनदा अंघोळ करतात. बंगाली, तामीळ, केरळी स्त्रिया दिवसातून दोनदा सचैल नाहतात आणि केस वाळण्यासाठी मोकळे ठेवतात, नद्यांवरती घाट बांधले आहेत ते राजेमहाराजांनी पैसे उडवण्यासाठी नव्हते, प्रजा स्वच्छ असावी, सहजपणे नदीवर अंघोळ करता यावं त्यासाठी. म्हणून अहिल्यादेवींनी महेश्वरला अप्रतिम घाट बांधला, तसेच काशीचे घाट भोसले, होळकर, जठार आदी मराठी राजे आणि सरदारांनी लोकांसाठी बांधले.

जसे माणसाचे कपडे हे बाह्य़ आवरण, तसं घर हे कुटुंबाचं आवरण, ते सर्वाना आवडावं अशी इच्छा असते. नव्या घराची वास्तुपूजा करतात तेव्हा नातेवाईक, मित्रमैत्रिणींना बोलावतात. जेवायला घालतात, त्यामागे आमंत्रितांनी घराचं कौतुक करावं अशी अपेक्षा असते. स्वत:चं घर असणं हे कोणत्याही काळात महत्त्वाचं होतं आणि आजही आहे, पण घर कधीच स्वस्त नव्हतं. एकीकडे स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या वस्तू स्वस्त होताहेत आणि घर महाग.

घर म्हणजे कुटुंबाचं चिलखत. नाशिक-पुण्याचे जुने वाडे आठवले तर लक्षात येईल की, वाडय़ाच्या प्रवेशद्वाराचा खर्च घराच्या खर्चाच्या वीस टक्के येत असे. दिंडी-दरवाजा तोडून आत यायला बरीच आयुधं आणि माणसं लागत.

परिवर्तनशीलता हा घराचा स्थायीभाव असतो, ते कालच्यासारखं आज नसतं. प्रत्येक पिढीला गरजांनुसार घराला अद्ययावत ठेवावं लागतं. जिभेला चव असते. तशी डोळ्यांना त्यांना जे पसंत पडतं ते मनात कोरलं जातं. त्यापेक्षा गौण गोष्टी ते बिलकुल स्वीकारीत नाही. जे मिळेल ते घ्यावं ही झाली बुभुक्षिताची अवस्था. लोकांनी घरात पाऊल ठेवू नये असं जाणवणारी घरं असतात. कधी कधी नको त्या माणसांच्या आगमनामुळे घर विटाळतं. कोणाला जवळ करायचं कोणाला दूर लोटायचं हे माणूस घराला सांगतो, अडसर लावतो.

घराइतका आजूबाजूचा परिसर जास्त महत्त्वाचा. सावली देणारी झाडं असतील तर उत्तम. एकही फुलझाड नसेल तर ते घर आळशी. फुलं फुलली की मन प्रसन्न होऊन उत्साह वाढतो. झाडांवर पक्षी बसले की परिसराचा जिवंतपणा मनात ठसतो.

देवळात हल्ली घंटा आणि नगारा बडवायची मशीन्स असतात. ती सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटं ठणाठण करतात. त्यामुळे मंदिराशेजारी घर नसलं तर बरं. माणूस आणि घर याचं अद्वैत असतं. त्यात विक्षेप नसावा.

आमच्या घरासमोर चौपदरी डांबरी गुळगुळीत रस्ता आहे. त्याच्या मध्यभागी द्विभाजक आहे. त्यात माती असून कण्हेरीची झाडं लावलेली आहेत. उन्हाळ्यात त्यांना पाणी घालायला पालिकेची मोटर येते. कण्हेरीला सुंदर फुलं येतात. ती जास्त वाढली की फांद्या कापायला येतात. पण कण्हेरीमुळे रस्ता प्रसन्न वाटतो. पावसाळा संपला की टाकळा अघाडय़ासारखी पावसाळी झुडपं कापून जातात. पावसाळ्याआधी नाला सफाईचं काम करतात. रोज सकाळी कचरागाडी येऊन घरोघराचा कचरा गोळा करून जाते. त्याशिवाय परिसर झाडायला एक सफाई कर्मचारी एक दिवसाआड साफ करून जातो. त्यामुळे सर्वत्र स्वच्छता असते. संक्रांतीनंतर झाडांवर आणि विजेच्या तारांवर अडकलेले पतंग मांजा काढायला माणसं येतात. ते साफ करून जातात. पण ‘स्व’ स्वच्छतेबाबत लोक जितके जागरूक आहेत तितके सार्वजनिक स्वच्छतेबाबत नाहीत.

घराला ओळख असते. नगरपालिका घराला नंबर देते, पालिकेत आणि सिटीसव्‍‌र्हेच्या दप्तरात त्याची नोंद असते, पोस्टमन त्याप्रमाणे पत्र टाकून जातो, क्रमांकाप्रमाणे प्रत्येक घराचे आपापले नियम असतात. त्याचबरोबर एका घरानं दुसऱ्यासारखं न वागण्याची मिजास हवी.

हल्ली अनेक घरं आकसलीत. कारण मुलं दूर असतात. घरात एक-दोन माणसं असतात. कधी स्त्री-पुरुष टीव्ही लावून ठेवात. तो पाहतात असं नाही, पण त्या आवाजाची त्यांना सोबत असते. तसेच शेजार, सोबत आवश्यक असते. गुजरातीत एक म्हण आहे, ‘खरो सगो ते पाडोशी’ शेजारच्या घराशी फटकून वागून चालत नाही. शेजारी कोणाही असला तरी शेजारधर्म पाळतं ते घर, गरम कांदाभजी शेजारच्या घरी नेऊन देतं ते घर सुजाण नागरिकांशिवाय घर म्हणजे ऐतिहासिक वास्तू!

आमचा मित्र अहमदाबादला राहत असे, तिथे उन्हाळ्यात पारा पंचेचाळीसपर्यंत पोहोचे. त्याचं तळमजल्याचं भाडय़ाचं छोटं घर होतं. त्यानं घराच्या चारही दिशांना रेल्वे कीपर आणि मधुमालतीचे वेल लावले होते. सगळ्या वेलांच्या गर्दीत भिंती दिसत नसत, दिसत फक्त खिडक्या, तिथल्या बस थांब्याला लोक हिरव्या घराजवळ थांबव, असं सांगत, बाहेर असह्य़ गर्मी असली तरी त्याचं घर थंड असे.  त्याचं अनेक बाबतीत छान निरीक्षण असतं. झुरळं अंधाऱ्या जागी असतात म्हणून त्यानं कपाटाचं प्लायवुड शटर काढून काचेचं बसवलं. लगेच झुरळं निघून गेली.
-प्रकाश पेठे – prakashpethe@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:28 am

Web Title: each house to say somethings
टॅग : House
Next Stories
1 वास्तुमार्गदर्शन
2 डीम्ड कन्व्हेअन्स एक अत्यावश्यक बाब
3 पहिल्यांदा घर घेताना..
Just Now!
X