झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणाने रिअल इस्टेट विशेषत: बांधकाम क्षेत्राला भरभराटीचे दिवस आले. पूर्वीची शहरे महानगरे झाली आणि महानगरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांनी आसपासच्या गावांना आपली उपनगरे बनविले. परिसरातील शेतजमिनी झपाटय़ाने निवासी क्षेत्रात परिवíतत झाल्या. जिथे एकेकाळी टुमदार गावसंस्कृती होती, अशा ठिकाणचा चेहरामोहरा बदलून गेला. या सर्व प्रकारात नागरी सुविधांवर येणारा ताण वाढतच गेला आणि स्वच्छ मोकळी हवा खेळत होती अशा ठिकाणांमध्ये गुदमरून जगावे लागते, अशी काँक्रीटची जंगले तयार झाली. परिणामी, पर्यावरणाचे रक्षण हा विषय लहान मुलांच्या परिचयापुरताच, शालेय पाठय़क्रमापुरताच उरला हे खेदाने नमूद करावे लागेल.
गेल्या काही दशकांमध्ये भारतातील नागरीकरणाचा वेग पाहता, शहरे विकसित होत आहेत की विद्रुप होत आहेत, असा प्रश्न पडतो. या सर्व प्रक्रियेमध्ये पर्यावरणाची होत असलेली अपरिमित हानी आपण कशी भरून काढणार हा विषय आता प्रामुख्याने पुढे येऊ लागला आहे. विशेषत: बांधकाम क्षेत्रात त्यावर कामही सुरू झाले आहे. देशभरातील नामवंत बिल्डर्स आता इको-हाउसिंग संकल्पनेमध्ये रस घेऊन त्यात काम करीत आहेत, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. मात्र, तिचा प्रसार, प्रचार आणि विविध घटकांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद अद्याप निर्माण व्हावयाचा आहे. तरीदेखील इको-हाउसिंग संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्याच्या दिशेने पाऊल तरी पडले आहे, हे नक्की.
इको हाउसिंग संकल्पना म्हणजेच पर्यावरणाकूल गृहप्रकल्पाची संकल्पना आपल्याकडे आता रुजू घातली आहे. नागरी सुविधांचा अनियंत्रित भार महापालिकेच्या यंत्रणांच्या आवाक्याबाहेरचा विषय होत चालला आहे. त्यातून अगदी सांडपाण्याच्या व्यवस्थापनापासून कचऱ्याच्या विल्हेवाटीपर्यंत अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. प्रदूषणाची पातळीही झपाटय़ाने वाढते आहे. वीज, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठी नागरिकांना झगडावे लागते किंवा त्याची आíथक स्वरूपात झळ सोसावी लागते. अशा परिस्थितीत स्वत:हून इको-हाउसिंगसारखी संकल्पना स्वीकारून अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी समाजात जागरूकता निर्माण होते आहे. या संकल्पनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ंच हे की, पर्यावरणाला अनुकूल अशाच पद्धतीने गृहप्रकल्प आणि त्यातील सुविधा व यंत्रणा विकसित केल्या जातात. जेणेकरून पाणीपुरवठय़ापासून विजेच्या वापरापर्यंत अनेक बाबींसाठी अन्य यंत्रणांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आणि स्थानिक पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास न होता, कोण्याही बाह्य यंत्रणांवर ताण न येता आनंददायी वास्तव्य करता येते. पर्यावरणाकूल (इको फ्रेंडली) आणि ऊर्जा सक्षमता (एनर्जी एफिशिएन्सी) या दोन मूळ तत्त्वांवर या संकल्पनेचा पाया आहे. इको हाउसिंग संकल्पनेचा मूळ हेतू म्हणजे गृहप्रकल्पाच्या उभारणीपासून त्याच्या वापरानंतरही पर्यावरणावरील विपरित परिणाम टाळणे. म्हणूनच प्रकल्पासाठी जागेची निवड करताना, प्रकल्पाचा आराखडा तयार करताना, प्रत्यक्ष बांधकाम करते वेळी आणि गृहप्रकल्पात वास्तव्य करतानादेखील स्थानिक पर्यावरणावर त्याचा परिणाम होणार नाही ना, याची दक्षता घेतली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये १९७० मध्ये वातावरणातील प्रदूषणाचा धोका ओळखला गेला व तेव्हापासून सस्टेनेबल डेव्हलपमेंट (स्थायी विकास) या संकल्पनेवर काम सुरू झाले. यातूनच पुढे ग्रीन बििल्डग किंवा ग्रीन स्ट्रक्चर अशा संकल्पना पुढे आल्या. पर्यावरणाकूल निर्मिती हाच त्यांचा पाया होता. आपल्याकडे आता या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले जात आहे व म्हणूनच इको हाउसिंग ही प्रगत देशांमध्ये स्वीकारली गेलेली संकल्पना आपल्याकडे रुजते आहे.
इको हाउसिंग संकल्पना
इमारत अथवा गृहप्रकल्पाचा आराखडा (डिझाइन) तयार करताना नसíगक प्रकाश, मोकळी हवा यांना सर्वाधिक प्राधान्य दिले. ऊर्जानिर्मिती हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने प्रामुख्याने नसíगक संसाधनांचा उपयोग करून त्याचा कल्पक वापर केला जातो. सोलर अथवा सौर ऊर्जेसारखे अपारंपरिक पद्धतींचा सुनियोजित वापर त्यात होतो.
पुनर्नवीकरण (रिन्यूएबल) या पद्धतीचा अवलंब करून पाणी, वीज यांची बचत आणि उपयोग कल्पकरीत्या करता येतो. रेन वॉटर हाव्‍‌र्हेिस्टग, रिन्यूएबल एनर्जी, सेव्हेज वॉटर ट्रीटमेंट अशा विविध पद्धतींनी नसíगक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या पारंपरिक संसाधनांचा वापर टाळला जातो. इमारतींच्या बांधकामांसाठी वापरण्यात येणारी बांधकाम सामग्रीदेखील पर्यावरणाकूल अशीच असावी, हे कटाक्षाने पाहिले जाते. बांधकाम साहित्य हे पर्यावरणाप्रमाणे मानवी आरोग्यावरदेखील परिणाम करीत असते. अशा सामग्रीची निर्मिती ही स्थानिक पातळीवरच आणि पर्यावरणीय निकषांवर केली जाते. विशेषत: ज्यांचा पुन्हा वापर करता येईल, अशा रिन्यूएबल घटकांपासून बनलेल्या सामग्रीला प्राधान्य दिले जाते.
अमेरिका, युरोपमध्ये लाइफ सायकल असेसमेंट (एलसीए) तंत्राने निश्चित केलेल्या निकषांवर प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री, तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम आदींचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार प्रकल्पांना रेटिंग दिले जाते. आपल्याकडे आयएसओ विश्लेषण तंत्रामध्ये साधारणत: त्यांचा अंतर्भाव आहे. नसíगक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणे. उदाहरणार्थ, पारंपरिक पद्धतीने बांधकाम केलेल्या छतांऐवजी टर्फरुफ, सोलर पॅनल्सचा जास्तीत जास्त वापर झाला तर मोठय़ा प्रमाणात ऊर्जाबचत होते व स्थानिक सूक्ष्म पर्यावरण (मायक्रो इन्व्हायर्नमेंट) जपले जाते. अर्थात, प्रकल्पांच्या गरजांनुसार विविध पर्यावरणानुकूल पर्याय समोर ठेवून त्याची निश्चिती होते.
स्थानिक पर्यावरणाला अनुकूल अशा पद्धतीने बांधलेल्या घरांमधील वास्तव्य केव्हाही आल्हाददायी असते. विशिष्ट मानसिकतेच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार केला तर इको-हाउसिंग ही अत्यंत अभिनव, कल्पक आणि जीवनात नावीन्य भरणारी संकल्पना आहे. भारतातील बांधकाम जगत आता त्यासाठी सरसावते आहे. मात्र, त्यासाठी समाजातून सकारात्मक प्रतिसाद आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून अशा घरांच्या निर्मितीसाठी मोठय़ा प्रोत्साहनाची गरज आहे. फायदे आणि तोटय़ांचा विचार करता, विद्यमान पारंपरिक बांधकाम पद्धतीपेक्षा केव्हाही उजवी ठरेल अशा इको-हाउसिंग संकल्पनेचा स्वीकार झाला तर भारतीय बांधकाम उद्योगाची दिशा बदलेल. आपल्या भावी पिढीच्या आयुष्यात वीज-पाणी-कचऱ्याची चिंता करायची की त्यावर सहज मात करणाऱ्या इको हाउसिंगसारख्या संकल्पनेचा स्वीकार करून त्यांच्या आयुष्यात निखळ आनंद पेरायचा, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.