उन्हाळ्यात झाडांखाली दुपारी गारव्याला येणारे कुत्रे घराची राखण करतात. एखादे मांजरही कधीतरी झाडाचा आसरा घ्यायला येते. एकदा झाडावर खार येऊन सुरसुर वरखाली पळत होती तर माकडाने हजेरी लावून त्याच्या माकडचेष्टेने मजा आणली होती. आंब्याच्या झाडावर येणारे कोकिळ आपल्या मधुर आवाजाने आपले मन जिंकतात.
नेरळला नवीन घर बांधले आणि फुलझाडांची आवड असल्याने नर्सरीत जाऊन लहान तयार रोपटी व काही झाडांच्या बिया घेऊन आलो. झाडांची चांगली जोपासना केल्यामुळे ती आता मोठी झाली आहेत. घरापुढे पहिल्यापासून उंचच उंच सुरुचे झाड उभे आहे.
पहिल्या वेळी जेव्हा आम्ही तिथे रात्रीचा मुक्काम केला त्या वेळी पावसाळ्याचे दिवस होते. रात्री तुफान पाऊस पडत होता. सोसाटय़ाचा वारा सुटला होता आणि वाऱ्यामुळे सुरुच्या झाडाचा वेगळाच आवाज येत होता. बेडकांचे डराव डराव, रातकिडय़ांचा किर्र आवाजही चालू होता. त्या काळोख्या रात्री भुताच्या सिनेमांमध्ये जसे आवाज असतात तसे वाटले. मला प्रथम जरा भीतीच वाटली, कारण त्या वेळी आजूबाजूला वस्ती नव्हती. मी माझ्या मिस्टरांना म्हटले, ‘येथे भीतिदायक सिनेमातल्या आवाजासारखे आवाज येतात, आपला बंगला भूतबंगला असल्यासारखा वाटतो.’ नंतर माझ्या या वाक्यावर आम्ही दोघेही खूप हसलो.
आता आमच्या घराच्या बाजूला आंबा, नारळ, चिक्कू, पपई, रायआवळा, सीताफळ, कढीपत्ता, पेरू व इतर चाफा, गुलाब, मोगरा, मदनबाण, जाई, जुई, सायली, अनंत, तगर, डबल तगर, जास्वंद यांची झाडे आहेत. सोसाटय़ाचा वारा सुटला की या झाडांचे वेगवेगळे आवाज येतात आणि फुलांचा सुगंध आसमंतात पसरतो.
या झाडांची दरवेळी माती बदलणे, पाणी घालणे, खत घालणे, कीटकनाशक फवारणे अशी काळजी आम्ही घेतो. लहानापासून मोठय़ा केलेल्या या झाडांवर आता आमचा जीव बसला आहे. या झाडांना पाणी घातले की ती हसरी वाटायला लागतात. झाडांवर कळ्या, फुले, फळे आली की एकप्रकारचा आनंद होतो. स्वत: लावलेल्या झाडावरची फळे काढून खाण्यात, फुले डोक्यात माळण्यात एक अवर्णनीय आनंद असतो. हे ती झाडे लावणाऱ्यालाच जास्त समजते. आपण लावलेली ताजी भाजी खाण्यातही एक प्रकारचा गोडवा व वेगळाच आनंद असतो. या झाडांची पाने सुकायला लागली किंवा कीड पडली की काळजी वाटते. जांभळाचे मोठे झालेले झाड संपूर्ण सुकले, शेवग्याचे झाड वाऱ्याने पडले तेव्हा आम्हाला साहजिकच वाईट वाटले होते.
आता माझ्या चांगलेच लक्षात आले आहे की, ही झाडे आणि त्या अनुषंगाने येणारे पक्षी, प्राणी, निसर्ग हे आपले सहचर आहेत. कावळे आणि कोकिळ जोरजोरात ओरडत असले की तेथे एखादे जनावर आहे हे समजते. उन्हाळ्यात झाडांखाली दुपारी गारव्याला येणारे कुत्रे घराची राखण करतात. एखादे मांजरही कधीतरी झाडाचा आसरा घ्यायला येते. एकदा झाडावर खार येऊन सुरसुर वरखाली पळत होती तर माकडाने हजेरी लावून त्याच्या माकडचेष्टेने मजा आणली होती. आंब्याच्या झाडावर येणारे कोकिळ आपल्या मधुर आवाजाने आपले मन जिंकतात. इतर वेळी येणारे वेगवेगळे पक्षी त्यांच्या रंगाने व अंगावरील नक्षीने आपले नेत्र सुखावतात. त्यांच्या कुजनानेही आपल्याला बरे वाटते. फुलांवर रुंजी घालणारी फुलपाखरे बघताना मन आनंदून जाते. आजूबाजूला येणाऱ्या दुर्वावर चालले की पायांना शीतलता जाणवते. आपोआप आणि भरपूर येणाऱ्या तुळशींनी एक प्रकारचे पावित्र्य वाटते. पावसाळ्यात धोधो  पडणारा पाऊस आणि आजूबाजूला आलेली हिरवळ एका वेगळ्याच दुनियेत आपल्याला घेऊन जाते. गच्चीवर उभे असताना सुगरण सुरुच्या झाडावर घरटे बांधताना दिसते. ती पानांची एक एक बारीक काडी आणून आपण जसे सुयांनी विणतो तसे चोचीने त्याचे दोरे एकमेकांना गुंफत आणि सुंदर घर बांधते. तिचे ते कौशल्य बघून कौतुक वाटते.
कावळाही आमच्या सुरुच्याच झाडावर घरटे बांधतो. एकदा माझ्या मुलीने कावळ्याने तिथे घरटे बांधले आहे असेमला सुरुचे फळ उडवून दाखवले. ते फळ गच्चीवरच पडले. ते फळ कावळ्याच्या घरटय़ापर्यंत उडालेही नव्हते. परंतु थोडय़ाच वेळात तो कावळा आमच्या डोक्यावर उलटा उलटा उडायला लागला. नंतर गच्चीच्या चारी बाजूंनी येऊन जोरजोरात ओरडायला लागला. त्याच्या घरटय़ाला एखाद्या माणसापासून जरा जरी धोका आहे असे वाटले की तो त्याच्या मागेमागे लागतो. छोटे ठिपके असलेले रंगीत पक्षी आमच्या बाल्कनीत खिडकीच्या वरती पावसाळ्यात घरटे बांधतात. आम्ही बाल्कनीत झोपाळ्यावर बसलेले असलो की समोर तारेवर त्यांचा घरटय़ासाठी जीव घालमेल झालेला दिसतो. आपण जसे कष्ट करून घर बांधतो तसेच पक्षीही त्यांचे घरटे बांधतात. या पक्ष्यांचे त्यांच्या घरटय़ावर व पिल्लांवर माणसासाखे प्रेम असते. एकूण काय तर आपल्या वास्तुभोवताली हे सहचरही त्यांची घरटी बांधून आपल्यासोबत त्यांच्या विश्वात रमतात आणि आपल्या जीवनात एकप्रकारचा वेगळाच आनंद निर्माण करतात.