News Flash

व्यायाम, फिटनेस किटस् आणि बरेच काही!

व्यायाम करायचे भूत एकेकदा डोक्यावर हावी होते.

व्यायाम करायचे भूत एकेकदा डोक्यावर हावी होते. दुसऱ्या कोणाचे आजारपण बघून कधी एकदम खडबडायला होते. नवीन वर्षांच्या डायऱ्या येऊन पडल्या की नव्याने व्यायाम करायचे प्लॅन्स आखले जातात. एक तारखेपासून आपण अचानक आणि एकदम समजूतदार आणि नियमित होणार असतो व्यायामाच्या बाबत. व्यायाम तर करायचा आहे, अमुक पद्धतीनेच करायचा आहे याची गणिते आणि सल्ले लोकांचे अनुभव आणि चर्चा याने आपली झोळी तुडुंब भरून गेलेली असते. एक-दोन दिवस चालायला सुरुवात केली जाते. मग लगेच पावले मोजणारे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड होते. अ‍ॅपची नवलाई असते, तोवर उत्साह असतो. अ‍ॅप बरोबर काम करते की नाही, हे देखील ताडून बघायचे असते कोणाला. महागडे जिम लावावे, फिजिकल ट्रेनर ठेवावा की बिन खर्चाचे व्यायामाचे नियोजन करावे याविषयी मनात गोंधळ असतो. नुसत्या जिमपेक्षा ट्रेनर असलेले जिम हवे. कोणी म्हणते, मोकळ्या बागेत चालायला जावे. रोज तेच ते इंटेरिअर दिसणाऱ्या, कर्कश्य गाणी लावून ठेवलेल्या जिमसारख्या बंदिस्त जागेत करून करून काय व्यायाम करणार आणि तिथे प्रसन्न तरी किती वाटणार? रोज काय होणार? कोणी म्हणते, ऊन, वारा, पाऊस, गर्दी, पचापच थुंकलेले रस्ते, फेकलेल्या कचऱ्यात आणि शहरांतल्या गोंगाटात मोकळ्या जागी असे मिळून मिळून मिळणार तरी काय? आपले घर बरे, आपण बरे! घरातच ट्रेड मिल घ्यावी. सायकल घ्यावी. मग वस्तू येते घरात, मानाने एकदम. कालांतराने ती ट्रेड मिल, सायकल फक्त कपडे वाळत घालण्याच्या कामी येते. वस्तू काय? कशाला घेतली? वापरली का जात नाही? यावर मनातल्या मनात मात्र भरपूर फिरून होते!

सगळा विरोधाभासी कच्चा माल मनात जमला की आपण शरीराला अजून थोडे वळण लावणारे, सुख सोयी देत काहीतरी बरे घडवणारे यंत्र वगरे शोधत बसतो. सूप्स पीत जाऊ. फळं खात जाऊ. पालेभाज्या आहारात वाढवू. पौष्टिक अन्न वाढवू. कसल्या कसल्या प्रोटिन सप्लिमेंट आणू. ‘त्यांनी हे केले, वजन इतके कमी झाले.’ आणि ‘यांनी हे केले तर कसा फायदा झाला’, सगळ्या लिस्टस् एकदम तयार होतात. ‘मोड आलेले अमुक तमुक खा..’, मग आपण पहिली गोष्ट ध्यानात घेतो की आपल्याकडे अमुक प्रकारचे भांडेच नाहीये. मोड असेही येऊच शकतात धान्याला. पण ते विशिष्ट भांडे आणल्याशिवाय आपले काम वेगात होणारच नसते. आधी जाऊन स्प्राऊट मेकर विकत घेतले जाते. सूप्स प्यायचे तर भारीतले मिक्सर, ज्युसर हवे. मग त्या-त्या गोष्टी चटचट घरात येऊन पडतात. त्यांचे सेटिंग्ज काय, काय काय सुविधा, कोणती भांडी कशाला याविषयी अपवादानेच वाचणारे चोखंदळ लोक असतात.

योग करायचा तर योगा मॅटशिवाय सुरुवातच होणार नाही, असे अडून बसणे होते. थेट जमिनीवर, चादरीवर, सतरंजीवर सुरुवात केली तर काही बिघडत नसते. पण काहीतरी करायचे तर काहीतरी नाहीये म्हणून काहीतरी केले जात नाहीये, यातच मन जास्त गुंतलेले असते. अजून एक उदाहरण- डोक्याला मसाज तर हवाच. वीस रुपयाचे तारेचे खेळणे कुठे रस्त्यावर विकत मिळते. विकणारा आपल्या डोक्यावरच प्रयोग करून दाखवतो. छान वाटते. लगेच घेऊन टाकले जाते. घरी वापरायला सुरुवात केल्यावर छान वाटलेले बाजूला पडते आणि ते मसाजर डोक्यात टोचते, फार वापरायला नको असले काही, केस ओढले जातात वगरे तपशिलांनी हे छान वाटणे नटते थटते. नंतर छान मुखवटा गळून पडतो आणि केवळ तक्रारीच उरतात. मग अशा मसाज वगरे वाल्या तमाम वस्तू माळ्यावर विराजमान होतात. भाडं न देता वर्षांनुर्वष तिथं नांदतात.

शेकायच्या पिशव्या, पाऊच किती पडलेले असतात घरोघरी. कोणी म्हणते की गरम करून शेका. कोणी म्हणते- गार करून शेका. कोणी सांगते, ‘जेलवाले नवे शेकायचे पाऊच किती छान.’ आणि कोणी म्हणते, ‘शेकायची पाण्याची पिशवीच आपली खरी.’ कोणाला इलेक्ट्रिक काही हवे असते आणि एक-दोन वापरातच त्याची वायर लूज वाटते. कुठे शॉकच बसतो, तर कुठे पुरेसे गरमच होत नाही. कुठे कोणाच्या शेकायच्या जुन्या पिशवीत चक्क गोणपाटाच्या चिंध्या निघालेले आपण ऐकतो. कुठे चायनीज माल असलाच, हा दृष्टांत होतो. कोणी सवलत देऊन काहीतरी आपल्या माथी मारून जाते तेव्हा वाटते ही अल्पकाळच सवलत आहे. नंतर कळते, कायमच सवलत सुरू असते. मग कळते, सवलतच नसते. मग स्वत:ला दोष देण्याची एक फैरी आपल्या आतच झडते. कुठे ‘हेही असू दे, तेही असू दे आणि वेळेवर काहीच धड नाही’, असा मामला झालेला असतो. पाण्यात पाय बुडवून बसणे.. पाणी बादलीत देखील घेता येते. पण त्यात फूट मसाजरची सोय आपल्याला हवी असते. प्रदर्शनात, एखाद्याकडे आपण काही बघतो. आपल्याला वाटते, शेवटी कमावतो कशाला आपण? आपल्यासाठी काही सुविधा हव्यात म्हणूनच ना! मग फक्त ती वस्तू ‘विकत घेऊन टाकायची’ असे ठरते. त्याभरात विविध प्रकारचे फूट आणि बॉडी मसाजर्स घरात नांदायला येतात. ते उत्पादन नेमके काय आहे, त्याची वॉरंटी, गॅरंटी काय आहे, कोणी बनवले आहे, कितपत योग्य आहे. ती वस्तू वापरणे, कशी वापरायला हवी ती वस्तू, केव्हा, कुठे, कशी जपायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली गरज काय, आपल्या शरीराला काय योग्य आहे हे निश्चित न करताच अशी तमाम खरेदी ‘‘कोणासाठी कमवायचे, आपल्या सुखासाठीच ना’’ या डायलॉगखाली होते. सुखासाठी आणलेली ती वस्तू मुळातच सुख देऊ शकायच्या दर्जाची नसते. कमअस्सल असते. आपण ती वापरणे गरजेचे नसते. आपली सोय काहीतरी वेगळीच असते. असे नवनवीन शोध खरेदीनंतर लागले की माळ्यावरच्या पडीक वस्तूंची यादी वाढत जाते.

वेगवेगळे बेल्ट्स, पावले मोजणारी गॅजेट्स, कसले कसले काउंटर्स, ट्रीमर्स, मसाजर्स, सूप्स आणि ज्युसेस करून देणारी यंत्रे, विविध पदार्थाचे विशिष्ट पात्र आणि कुठे चक्क झोपलो की इन्स्टंट बरेच होऊन उठू अशा गाद्यासुद्धा ‘हे तरी वापरून जरा आराम पडेल, सोय होईल’ या आशेपोटी सन्मानाने घरात येतात. आहार, व्यायाम, झोप यांचा विचार करून काही सुविधा आपल्यासाठी असणे छानच असते. पण त्या सुविधा देणाऱ्या उत्पादनांचा दर्जा बघणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे काही असेल तर ते म्हणजे आपली गरज नेमकी काय आहे, याचा विचार आणि त्यातल्या तज्ज्ञांचा सल्ला. आपल्या घरात पडून राहणाऱ्या तमाम आरोग्यविषयक यंत्र- उपकरणांची साधारण हीच रड असते. ती समजून घेऊन ही अडगळ कमी करायची असेल, पुन्हा वापरात आणायची असेल किंवा कोणाला तरी देऊन टाकायची असेल, दुरुस्त करायची असेल तरी वस्तू जमवायच्या या मानसिकतेतच डोकवावे लागते. घरातल्या निम्म्या अडगळीवर नीट विचार केला तर मुळातच त्यांना घरात येण्यापासून रोखता येते आणि खऱ्या अर्थाने जे आपण वापरतो, ज्यातून आराम पडतो, अशीच सुविधा आपण घेऊ लागतो.

– प्राची पाठक

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 11:19 pm

Web Title: exercise and fitness kits
Next Stories
1 बाल्कनीतील छोटुशी बाग 
2 विमानांनी उडावं ते प्रधानांकडे!
3 घरातली पडीक यंत्रे
Just Now!
X