वैधमापनशास्त्र कायद्यातील तरतुदींनुसार विक्री झालेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ कमी असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित विकासकावर कारवाई केली जाईल, असे संजय पांडे, नियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग यांनी म्हटले आहे. तेव्हा त्यांनी कृपया जागेच्या मोजणीसंबंधात खालील खुलासा करावा!
१) महाराष्ट्र शासनाने १२ मे २००८ ला अध्यादेश काढून ‘सदनिकांची विक्री कार्पेट क्षेत्रावर असावी तसेच कार्पेट क्षेत्रात बाल्कनीच्या क्षेत्राचा अंतर्भाव असेल,’ असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. आपल्या वैधमापनशास्त्राप्रमाणे आपण कार्पेट एरिया मोजणार का? ती कशी मोजणार? १२ मे २००८ च्या अध्यादेशाप्रमाणे क्षेत्रफळ मोजणार का?
२) बांधकाम व्यावसायिक कार्पेट क्षेत्रात उंबरठे, फ्लावरबेड, २ फूट उंचीपर्यंतचे कपाट, गच्ची (Terrace), जिना, लॉबी, लिफ्ट वगैरे सामायिक जागांचे क्षेत्रफळ, क्लब हॉऊसचे क्षेत्रफळ वगैरे सर्व मोजतात व सदनिकांच्या क्षेत्रफळात मिळवतात. आपण या सर्व अवैध मोजण्या ग्राह्य धरणार आहात का?
३) या सर्व (क्र. २ मधील)  क्षेत्र यांची बेरीज केल्यानंतर त्यावर प्रत्येक विकासकाला हवे तसे क्षेत्रफळ ४० टक्केपासून ७० टक्केपर्यंत वाढवतात. आपण हे मान्य करणार का?
४) करक प्रमाणे कारपेट क्षेत्रात स्वयंपाकघर, शौचालय, बाथरूम या भागांचे क्षेत्रफळ (कार्पेट क्षेत्रात) धरत नाहीत, आपणसुद्धा या भागांखेरीज कार्पेट क्षेत्र मोजणार का?
५) उच्च न्यायालयाने वाहनतळाची जागा विकता येणार नाही असा न्यायनिवाडा केला आहे. आपण हे मान्य केलेले आहे का? पोटमाळा ((LOFT) क्षेत्र कार्पेट क्षेत्रात मिळवायचे का?
६) नकाशाप्रमाणे सुरुवातीला बुकिंग नकाशे करतात व त्याप्रमाणे विक्री होते. इमारत पूर्ण झाल्यावर फायनल पेमेंटचे २० टक्के पैसे देण्यापूर्वी सदनिकेची पुन: मोजणी करणे आवश्यक आहे. आपण हे अनिवार्य करणार का?
७) सदनिका खरेदीदाराला वाढीव चुकीचा कार्पेट एरिया विकल्यामुळे अवाजवी किंमत, अवाजवी स्टँपडय़ुटी व अवाजवी व्याज याचा बोजा सहन करावा लागतो व त्याची लूटमार झालेली असते. शासन अधिसूचना काढून सदनिका ग्राहकाची झालेली लूटमार परत करण्याचा कायदा करणार आहे का?
आपण वरील मुद्दय़ांचा सविस्तर खुलासा जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावा. सच्च्या प्रशासनाला ते शोभेल.     
लक्ष्मण पाध्ये (आर्किटेक्ट)