किति मौज दिसे ही पहा तरी,

हे विमान फिरतें अधांतरीं

आपल्याकडे वेद-पुराणात हवाई उड्डाणे होत असली तरी आपल्या भारतीय लोकांना मात्र कुतूहल आणि अप्रूप असतं ते पाश्चात्त्यांच्या खऱ्या विमानाचं आणि त्यातील विमान प्रवासाचे!

छपरांच्या गर्दीतून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकडय़ातून जाणारे विमान पाहून मनोमन हरखून जाणारे आजही सापडतील. उंचावरून धुराची रेषा सोडत जाणाऱ्या विमानाला ‘रॉकेट’ समजून, त्याबद्दल अनेक गैरसमज बाळगून, धूर विरेपर्यंत आकाशात पाहत राहण्यापेक्षा आपणही त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे असे शीव (सायन) येथे राहणाऱ्या राजेंद्र प्रधान यांना वाटून गेले. आणि त्यातून जन्म झाला एका अनोख्या साठवणींचा वडील एअर इंडियात असल्याने १९६२ पासूनचे विमानांचे अनेक मॉडेलचे कलेक्शन जमत गेले.

आपणही पायलट व्हावे हे स्वप्न राजेंद्रना खुणावत होते. त्याआधीची तयारी म्हणून इयत्ता सहावीत असल्यापासून इंडियन हॉबी सेंटर येथे रेडिओ कंट्रोल विमान पाहायला जात. त्या वेळी १०-१५००० हजार रुपये म्हणजे आवाक्याबाहेरचे होते. दुधाची तहान ताकावर-पाण्यावर भागवत त्या वेळी वडिलांनी ५-१० रुपयाला हाताने उडवायची विमान किट ते विकत घेऊन देत.

थोडं मोठं झाल्यावर कुलाब्यापर्यंतच्या वाऱ्या खूप वाढल्या. त्याला जोड मिळाली ती एन. सी. सी.तल्या आडोळे सरांकडून. तेही विमाने बनविण्यासाठी प्रोत्साहन देत. विमानतळावर अभ्यास सहली काढत. आता हा छंद व कलेक्शन वाढले ‘मुलगा वाईट संगतीत राहण्यापेक्षा विमान बनविण्यात रमतोय’ याचा दिलासा व आनंद आई-बाबांना जास्त होता. पण हा आनंद जास्त टिकला नाही. या छंदामुळे अभ्यासावरचे लक्ष उडालेले. त्यांचा ‘अ’ तून थेट ‘ड’ तुकडीत झालेला उतरता प्रवेश, पायलट पदाच्या स्वप्नातून खाडकन जागं करून गेला.

विमानं बनविण्याचे झपाटलेपण १२ वीच्या वर्षांतदेखील टिकल्याने आई-बाबांनी विमानाचे पंख छाटले. सर्व विमाने पोटमाळ्यावर टाकली. पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत त्या विमानांचा वाळवीने ताबा घेतला.

सुदैवाने नोकरी लागली तीदेखील एअर इंडियात! विमान जमविण्याच्या, बनविण्याच्या छंदाने पुन्हा उचल खाल्ली. या वेळी सोबती होते व छंदाने महागडे रूप घेतले होते. नोकरी सोडून एव्हिएशनसाठी लागणारे पार्ट्स, लाइट्स, टेक्स्टाइल, बेकरी असे व्यवसाय सुरू केले. त्यातील यशाचा फायदा म्हणजे आधी न परवडणारी महागडी रेडिओ कंट्रोल विमाने पैसे साठवून आणता येऊ  लागली. यामुळे दहा हजार ते दीड लाखापर्यंतची विमाने त्यांच्या ताफ्यात आहेत. प्रत्येक विमानामागे त्या मूळ विमानाचा गौरवास्पद इतिहास आहे. जणूकाही आकाशाचा इतिहास विमानाच्या माध्यमातून साकारला आहे. (ती विमाने, त्यांची नावे, त्यांच्या इंजिन क्षमता माझ्या लक्षात राहणं तरी कठीण आहे.) याशिवाय ६०-७० विविध छोटी मॉडेल साठवणीत आहेतच; स्वत:चं घर झाल्यावर या छंदाला अधिकृत ऑफिस मिळाले. जिथे विमानाची हक्काची जागा असेल. मुंबईतील चेंबूरसारख्या महागडय़ा ठिकाणी विमानासाठी म्हणून एक खोली ठेवणं म्हणजे राजेशाही थाटच!

इथं मोठय़ा विमानाची वेगळी खोली, तर शोभेच्या विमानांना हॉलमध्ये खास शेल्फ बनवून घेण्यात आले. वडिलांनी आणि त्यांनी साठवलेली विमाने आजही हॉलमध्ये विसावलेली असतात. मला स्वत:ला दुसऱ्या महायुद्धातील विमाने आवडत असल्याने त्याचे कलेक्शन आपसूक जास्त आहे. या चालू-बंद विमानाची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची स्वच्छता राखण्याचे काम राजेंद्र हौसेने करतात. घरात आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलांपासून या विमानांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या टॉक्सी कुत्र्याकडे दिलीये. आजोबांचे व वडिलांचे विमानाचे कलेक्शन वाढविण्याची जबाबदारी त्यांच्या  मुलाने- हृदयने स्वत:हून घेतली आहे.

हवेत न उडता येण्याचे शल्य माणसाला होतेच, त्यावर उतारा म्हणून आजही एकटय़ाने उडता येण्याचे अनेक प्रयोग तो करत असतो. असाच प्रयोग म्हणून ‘एकआसनी विमान’ राजेंद्र प्रधान यांनीही एकेकाळी बनवले होते. ते रजिस्टर करून घेतले होते.

पूर्वी विमान- हेलिकॉप्टरचा आवाज ऐकल्या ऐकल्या लहान मुले धावत घराबाहेर येत. आज समाजात मात्र मंत्र- श्लोकाच्या पठणात खऱ्या विमानाची घरघर ऐकू येईनाशी झालीये. त्यात अशी साठवण, अशी आठवण यापुढेही जन्मेल का?

– श्रीनिवास बाळकृष्णन

chitrapatang@gmail.com