आपल्या देशावरील इंग्रजांची सत्ता जाऊन आता तर सहा दशकांचा काळ लोटला आहे. तरी त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासह त्यांनी उभारलेल्या अनेक देखण्या वास्तू म्हणजे पर्यटक-अभ्यासकांच आकर्षण ठरल्यात. यातील काही वास्तू, शिल्पाकृतींचा लौकिक असा आहे की, त्याच्या अस्तित्वानेच त्याच्या सभोवतालचा परिसर ओळखला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश जमान्यातील नाव धारण केलेले रस्ते आणि देखण्या शिल्पाकृतींचं जरी उच्चाटन-स्थलांतर झालं तरी मूळ नावानेच तो मोहल्ला अजूनही सर्वत्र ओळखला जातोय. उदा. रुबाबदार अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणाला कुणी शामाप्रसाद मुखर्जी चौक म्हणून ओळखत नाही. अजूनही ‘काळा घोडा’ म्हणूनच हा भाग ओळखला जातो. नामकरण झालं तरी धोबी तलाव परिक्षेत्राला कुणी वासुदेव बळवंत फडके चौक म्हणून संबोधायला तयार नाही.. दक्षिण मुंबईच्या हद्दीची सर्वश्रुत खूण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरा फाऊंटनला ‘हुतात्मा चौक’ हे नामाभिमान रूढ व्हायला अजून किती काळ जाईल हे सांगता येत नाही. राजकीय स्थित्यंतरानंतर नावीन्याच्या ध्यासाने आणि बरेचदा आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपण्यासाठी कागदोपत्री जरी नावे बदलली तरी जनमानसातील पुरातन नावांसह ठसलेली प्रतिमा काही पुसली जात नाही.
दक्षिण मुंबईत वावरताना इच्छित स्थळी जाण्यासाठी फ्लोरा फाऊंटनची खूण केंद्रस्थानी ठेवून कसे मार्गस्थ व्हायचे याचे मार्गदर्शन केले जाते. याचे कारण ‘ghaisas2009@gmail.com’ प्रमाणे द. मुंबईतील सर्वच रस्ते फ्लोरा फाऊंटनमार्गे जाताहेत.. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिण मुंबईत प्रशासकीय कार्यालये, व्यापारी पेठ, गव्हर्नरचे निवासस्थान इ. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये असल्याने आजही या परिसराचा उल्लेख ‘फोर्ट’ म्हणून केला जातो. त्या काळी या किल्ल्याला तीन प्रचंड मोठी प्रवेशद्वारे होती. आजच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयानजीकचे अपोलो गेट, फ्लोरा फाऊंटनजवळील चर्चगेट आणि बझारगेट हीच तीन प्रवेशद्वारं माणसासह, वाहतुकीच्या आगमन-निर्गमनासाठी होती.
इंग्रजी सत्ताकाळात आपल्या मायभूमीपासून दुरावलेल्या ब्रिटिश अंमलदारांना त्यांच्या इंग्लड भूमीची, तेथील वातावरणासह आठवण येणं स्वाभाविक होतं. याच जाणिवेतून दक्षिण मुंबईतील बऱ्याच इमारतीसह तेथील परिसराची निर्मिती झाली. फ्लोरा फाऊंटनची उभारणी करताना लंडनच्या पिकॅडली सर्कलप्रमाणे त्याची रचना असावी अशी ब्रिटिशसाहेबाची भावना त्या पाठीमागे होती. १८६९ मध्ये हे देखणं शिल्प उभारण्यासाठी कर्सेटजी फर्दूमजी पारेख या दानशूर पारसी माणसाने सढळ हस्ते देणगी दिल्यावर अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने फ्लोरा फाऊंटन शिल्पाचे काम पूर्णत्वास नेले.
१९व्या शतकाच्या मध्यावर किल्ल्यातील वाढती लोकसंख्या ही प्रशासनाची मोठी समस्या होती. सौंदर्याची उत्तम जाण असलेल्या दूरदृष्टीच्या ब्रिटिश प्रशासकांना किल्ल्याची तटबंदी अनावश्यक वाटल्याने ती त्यांनी खंदकांसह जमीनदोस्त करून टाकली. या कार्यवाहीत चर्चगेट प्रवेशद्वारही नामशेष केले गेले. अपेक्षित जागा उपलब्ध होऊन दक्षिण मुंबईला मोकळा श्वास घ्यायला मिळाला. यापूर्वी वास्तुकलेच्या अभावाने नियोजनशून्य दाटीवाटीच्या वस्तीलाही आकार यायला लागला. यानंतर एकापाठोपाठ एक अशा नेत्रदीपक ‘गॉथिक’ पद्धतीच्या इमारतीही उभ्या राहायला सुरुवात झाली. नंतरच्या दोन दशकांत मुंबई महापालिका इमारत, कामा रुग्णालय, सेंट झेव्हियर्स कॉलेज, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, क्रॉफर्ड मार्केट, छ. शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानक या मुंबईचे वैभव वाढवणाऱ्या इमारतींची निर्मिती झाली.
किल्ल्याच्या तटबंदीमधील चर्चगेट हे प्रवेशद्वार हटवल्यावर १८६९मध्ये हे शिल्पाकृती कारंजे उभारले गेले. खरं तर आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार गव्हर्नर सर बार्टले फ्रियर यांच्या स्मरणार्थ हे कारंजे बांधले गेले आहे. या बांधकामासाठी ६७ हजार रुपये इतका खर्च झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या काळात या कारंजाला ‘फ्रियर फाऊंटन’ असे संबोधले जात होते. कालांतराने त्याला फ्लोरा फाऊंटन हे नाव रूढ झाले.
इंग्रज प्रशासकांच्या सौंदर्यदृष्टीला साजेशी नैसर्गिक वातावरणाची सजावट या कारंजाभोवती करण्यात आली. प्रारंभीची सुमारे ४० वर्षे या आल्हाददायक वातावरणात हे कारंजे उभे होते, पण त्यानंतरच्या काळात वाहनं आणि वाढत्या रहदारीमुळे नाइलाजाने सभोवतालच्या सुशोभित वातावरणाची रचना हटवल्याने फक्त कारंजाचे शिल्पच उभे राहिले. तेच आजचे फ्लोरा फाऊंटन, हुतात्मा चौक होय.
या कारंजाचा आराखडा तथा संरचना (LAYOUT) इंग्लंडमधील वास्तुविशारद आर नॉर्मन शॉ यांनी तयार केला असून त्याला अप्रतिम शिल्पसाज जेम्स फॉर्सिथ यांनी कल्पकतेने चढवला आहे. दक्षिण मुंबईच्या मोक्याच्या जागेवर उभ्या असलेल्या या कारंजावर फुलांची आकर्षक शिल्पाकृती आहे. फ्लोरा फाऊंटनचे हे शिल्प सुमारे २५ फूट उंचीचे असून त्याच्या चारही बाजूला पाश्चिमात्य पौराणिक कथेतल्या स्त्रीमूर्ती आहेत आणि कारंजाच्या शिखरावर ‘फ्लोरा’ या रोमन देवतेची पूर्णाकृती मूर्ती पाहाताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या शिखरावरील ‘प्रोग्रेस’ देवतेची आठवण व्हावी. ‘फ्लोरा’ म्हणजे फुलांची देवता. तिची आराधना केल्याने धन, वैभव, समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. फ्लोरा फाऊंटनच्या बांधकामासाठी पोर्ट लँड दगडाचा वापर केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६१ साली या ऐतिहासिक कारंजाच्या शेजारी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मारक उभारल्यावर त्याचे हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले.
अखंड वाहत्या गजबजाटाच्या रस्त्याच्या मध्यवर्ती उभारलेले एखादे शिल्प कैक वर्ष त्या शहराची ओळखच होऊन जाते याचं फ्लोरा फाऊंटन हे उदाहरण आहे. सौंदर्यदृष्टी असलेल्या इंग्रजसाहेबाच्या कल्पनेतील आपल्या मायभूमीच्या वातावरणाशी साधम्र्य असलेली ही सौंदर्यशाली कारंजा शिल्पाकृती आता फेरीवाले आणि मोटारींच्या पार्किंगच्या गराडय़ात उभी आहे.