27 October 2020

News Flash

सबकुछ फोल्डिंग आणि स्लायडिंग…

काकांच्या व्यवस्थितपणाचा प्रभाव पडल्याने माझ्याही डोक्यात भन्नाट कल्पना येऊ लागल्या. सोफा कम बेड आणि बंकरबेडचा मुलांचा प्रस्ताव लगेचच मी मान्य केला. डबल-बेड सकाळी रोजच्या रोज

| June 14, 2014 01:02 am

काकांच्या व्यवस्थितपणाचा प्रभाव पडल्याने माझ्याही डोक्यात भन्नाट कल्पना येऊ लागल्या. सोफा कम बेड आणि बंकरबेडचा मुलांचा प्रस्ताव लगेचच मी मान्य केला. डबल-बेड सकाळी रोजच्या रोज आत ढकलून वावरायला मोकळी जागा करण्याचा उत्साह मी अंगी बाणवला. बैठकीतील फ्रेंच विंडोलाच खाली आडवा ग्रॅनाइट लावून त्यावर छोटी गादी-लोड ठेवून बैठक केली. व्हरांडय़ामध्ये छोटी सेटी ठेवून वाचनासाठीची सोय केली. दोन दारं स्लायडिंग करून टाकली.
संस्कृत सुभाषितं शिकवताना वामनकाकांचं अध्यापन कौशल्य फुलून येत असे. कॉलेजला असताना मी काही शंकानिरसनासाठी त्यांच्याकडे जात असे. एकदा शिकवणीतल्या मुलांना ते संस्कृत कवी भवभूतीचा श्लोक शिकवत होते, ‘‘मुलांनो, ‘कालो ह्ययं निरवधि: विपुला च पृथ्वी.’ म्हणजे काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे, हे सुभाषित पाठ करा. ह्या अनंत काळावर आणि विपुला पृथ्वीवर आपली नाममुद्रा उमटवण्यासाठी खूप अभ्यास करा, वेगळं मौलिक काही तरी करा..’’ शिकवणी संपली आणि मुलं पांगली. मला बसायची खूण करत त्यांनी भिंतीतील कपाटात पुस्तके नीट रचून ठेवली. त्यांचा तो पुस्तकांचा कप्पा खूप व्यवस्थित होता. जुन्या वाडय़ातील जाडजूड भिंतीतील ते खूप खोल नि रुंद कपाट होतं. काकांचा निम्माअधिक पुस्तकांचा संसार त्यात सामावला होता. कमी जागेत खूप सारं सामान चातुर्याने नि खुबीने बसवलं होतं. एखाद्या माणसाच्या आचार-विचार-उच्चारावरून त्याचे संस्कार उमजतात. अक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधता येतो.. तसंच त्या कप्प्याकडे बघून मला काकांचं व्यक्तिमत्त्वच समजू लागलं.
पण काळ अनंत असला तरी आपला इहलोकीचा निवास किती काळ, हे आपणास ठाऊक नसतं. आणि पृथ्वी विपुला असली तरी आपल्या घराची लांबी-रुंदी मर्यादित असते. आपल्या जीवनकाळात आपल्या मालकीच्या किंवा भाडय़ाने घेतलेल्या जमिनीच्या तुकडय़ाचं मोल फार मोठं असतं. त्यामुळे मिळालेल्या पृथ्वीच्या तुकडय़ाचा सदुपयोग करणं आणि आनंदाने काळ कंठणं आपल्याच हातात असतं. हेच नेमकं काकांचं घर पाहून मला वाटलं. दोन खोल्यांचं घर असूनही व्यवस्थितपणा, टापटीप आणि स्वच्छता यामुळे काकांचं घर खूपच प्रसन्न वाटे. शिवाय ते एकटेच राहत. तरी एखाद्या गृहिणीचा मायेचा हात फिरावा तसा त्यांचा हात त्या घरावर फिरत असावा, असं मला वाटलं. माझ्या अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी भिंतीवरील फळ्यांवर त्यांनी बरंच काही लिहिलं. मी ते टिपून घेतलं. त्यानंतर त्यांना चहाची हुक्की आली. त्यांनी त्या फळ्यालाच सरकवायला सुरुवात केली. मी चकित होत पाहातच राहिले. तो फळा म्हणजेच स्लायडिंग डोअर होतं-स्वयंपाकघराचं! अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करावा, तशी मी त्या स्वयंपाकघरात शिरले. अगदी छोटं असूनही ते अगदी व्यवस्थित होतं. सगळं काही जिथल्या तिथं. मोजकी भांडी आणि स्वच्छ ओटा. तिथे डायनिंग टेबल नव्हतं, पण एकात एक घातलेले स्टूल्स होते. समोर भिंतीवर एक बंदिस्त मांडणी होती. त्यांनी त्याचं दार वरून खाली उघडलं आणि आत दडलेले त्याचे पाय बाहेर काढून त्याचंच टेबल खाली मांडलं. अच्छा! म्हणजे ते मांडणीचं दारच फोल्डिंग टेबल होतं तर! मला स्टुलावर बसायची खूण करत त्यांनी डब्यांचा कप्पा उघडला. त्याला सरकती दारं- स्लायडिंग डोअर्स होती. त्यात ओळीनं व्यवस्थित डबे मांडलेले होते. आधुनिक ट्रॉलीही होत्या ओटय़ाखाली. ‘‘नेहमी लागणाऱ्या वस्तू, पदार्थ, भांडी हाताशी असतील तर काम सोपं होतं, हे आपल्याकडच्या हुशार गृहिणींना किती छान समजतं! ‘फोडणीचा डबा’ हे त्याचंच उदाहरण बरं का! जपानी भाषेत त्याला ‘कैझन’ म्हणतात. जपानी लोकांची घरं बघा-जागा कमी असल्यानं कल्पकतेने साकारलेली असतात. लांब कशाला जा? आपल्या सिक्कीम, दार्जिलिंगमधली घरंसुद्धा डोंगराळ प्रदेशात जागेचा अभाव असूनही मस्त बांधलेली असतात. आणि मुंबईतली छोटी छोटी घरंही कशी ऐटबाज असतात! शेवटी माणसाला किती जागा लागते?’’
‘‘विश्व्विख्यात लेखक टॉलस्टॉयनं त्याच्या ‘माणसाला किती जमीन लागते?’ या कथेतही हेच सांगितलंय, हो ना?’’ मी म्हणाले. त्यावर होकार भरत ते म्हणाले, ‘‘जागेचा कसा कल्पक उपयोग करावा, हे आपल्या बायकांकडून जगाने शिकावं.’’ चहामध्ये आलं किसून टाकताना काका म्हणाले. ‘‘तुमच्याकडूनही शिकावं!’’ मी हसून म्हटलं. ‘‘पण काय हो काका, तुम्ही हे कोणाकडून शिकलात?’’
‘‘माझ्या दिवंगत आईकडून आणि नंतर माझ्या पत्नीकडूनही. ती सध्या अमेरिकेला गेलीय लेकीचं बाळंतपण करायला. हे त्या दोघींचेच संस्कार बरं! म्हणून म्हणतो, काटकसर, टापटीप, व्यवस्थितपणा शिकावा तर अशा गुणी बायकांकडून. किती टुकीनं संसार करतात त्या एवढय़ाशा पैशात. कमी जागेतही कसं सारं छान बसवतात.’’ चहा कपात ओतत ते म्हणाले.
‘‘तुम्हीसुद्धा आदर्श ‘गृहस्थ’ आहात हं! किती मस्त ठेवलंय घर तुम्ही!’’ त्यावर चहाचा लांबलचक भुरका मारत ते म्हणाले, ‘‘आमचं घर म्हणजे ‘सबकुछ फोल्डिंग अँड स्लायडिंग’ आहे. गरज ही शोधाची जननी असते आणि त्या शोधांचा पाठपुरावा करून त्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरवणं ही त्याची फलश्रुती ठरते. आमचं घर छोटं, म्हणून आम्ही त्यावर उपाय म्हणून अनेक शोध लावले. गरज+सुविधा+वेळेचं व्यवस्थापन=घरातील आनंद! ही आपली आमची व्याख्या. आपल्या सुखाच्या आणि आरामाच्या कल्पना तपासून ज्यात आपण सहजपणे वावरू शकतो, ते स्वीकारावं. उगाच प्रतिष्ठेच्या मागे लागू नये.’’ असं म्हणत त्यांनी कपबशी विसळून ठेवली. मी निरीक्षण करू लागले, तर मला दिसलं की त्या मांडणीत काचेच्या, प्लॅस्टिकच्या बरण्या होत्या. त्यामुळे आतील जिन्नस दिसतात. शोधण्याचा त्रास वाचतो. ओळीने मांडलेल्या डब्यांवर आतील चीजवस्तूचं नाव सुवाच्य अक्षरात लिहिलं होतं. ओटय़ावर कोपऱ्यात दूधदुभत्याचं कपाट. त्या कपाटाच्या दराचाच छोटा निरोप-फळा केलेला दिसला. त्यावर खडूने मदतनीस बाईसाठी निरोप लिहिला होता. भिंतीतील कोनाडय़ाचंच क्रॉॅकरी शोकेस केलेलं दिसलं. बाकी सर्वत्र छोटय़ा छोटय़ा कानाकोपऱ्यांतही फोल्डिंग आणि स्लायडिंगचा प्रयोग केलेला दिसत होता. लॉफ्ट हे सहसा कधीतरीच लागणारं सामान, अडगळ आणि पसारा ठेवण्याचं ठिकाण असतं बहुतकरून. पण काकांचा लॉफ्ट बघण्यासारखा आहे. त्यावरील सामान सुव्यवस्थित लावून ठेवलेलं होतं. काही वस्तू कागदात गुंडाळून त्यावर त्या वस्तूच्या नावाचं लेबल होतं. किती हा नेटकेपणा! आणि त्यातही किती साधेपणा! निरोप देता देता काका हसत म्हणाले, ‘Making space is creating space!’
काकांच्या व्यवस्थितपणाचा प्रभाव पडल्याने माझ्याही डोक्यात भन्नाट कल्पना येऊ लागल्या. सोफा कम बेड आणि बंकरबेडचा मुलांचा प्रस्ताव लगेचच मी मान्य केला. डबल-बेड सकाळी रोजच्या रोज आत ढकलून वावरायला मोकळी जागा करण्याचा उत्साह मी अंगी बाणवला. बैठकीतील फ्रेंच विंडोलाच खाली आडवा ग्रॅनाइट लावून त्यावर छोटी गादी-लोड ठेवून बैठक केली. व्हरांडय़ामध्ये छोटी सेटी ठेवून वाचनासाठीची सोय केली. दोन दारं स्लायडिंग करून टाकली. त्यामुळे दार उघड-बंद करायला अर्धवर्तुळाकार मोकळी जागा सोडायची गरज उरली नाही. स्वयंपाकघरात ‘छ’ आकाराचा ओटा केल्याने जागेचा पुरेपूर वापर तर झालाच, पण ट्रॉलीमुळे भांडी आणि जिन्नस हाताशी आले नि कामे पटापट होऊ लागली. गोल डब्यांच्या जागी चौकोनी डबे आणले. शिवाय फोल्डिंग टेबलालाच खाली मीठ, चटणी, लोणचं ठेवण्यासाठी काचेचा आकर्षक कप्पा केला. आणि एकात एक बसणाऱ्या खुच्र्याची चवड. बोटभर आकाराच्या बाटलीपासून तर हातभर उंच बरणीपर्यंत सगळ्यांना त्याच्या उंची-जाडीप्रमाणे स्थान मिळालं. चारचाकी गाडीला कायमस्वरूपी शेड करण्याऐवजी अ‍ॅडजस्टेबल कॅनपी टाकली. पाहिजे तेव्हा ऊन, पाहिजे तेव्हा सावली. थोडक्यात काय, तर काकांप्रमाणे माझंही घर ‘सबकुछ स्लायडिंग आणि फोल्डिंग’ प्रकारात मोडू लागलं.
पण ह्या सगळ्या स्लायडिंग-फोल्डिंगच्या भानगडीत इतका अतिरेक होऊ लागला की घराच्या तसू तसूवर त्याचा असर पडू लागला. सगळं फोल्ड करता करता दमछाक झाल्याने शांतपणे जगण्याचाच विसर पडू लागला. ऊठसूट सारखं सारखं काही ना काही फोल्ड नाहीतर सरकवत बसण्याचा खटाटोप अंगाशी येऊ लागला. सोपं करण्याचा खटाटोपच अवघड होऊन बसला. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ असली तरी स्लायडिंग दाराला ढकलताना युक्ती कुचकामी ठरून शक्तीपातच अधिक होऊ लागला. सारखा आपला तो ‘Making space is creating space’ चा धोशा लावून जागा निर्माण करायची आणि दमायचं! सतत घर आवरण्याच्या झपाटय़ात घराचं झालं ‘शो-रूम’! घराचं घरपण जाऊन त्याजागी आले अटळ नियम आणि कडक शिस्त! माझे डोळे लख्ख उघडले. काकाचं दुसरं एक वाक्य मला उशिरा का होईना पण आठवलं, ‘‘आपल्यासाठी वस्तू असतात, फर्निचर असतं, वस्तूसाठी आपण नाही!’’ त्यानंतर मी आणि माझं घर हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येऊ लागलं आणि ते मोकळा श्वास घेऊ लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:02 am

Web Title: folding furniture and sliding
टॅग Building,House
Next Stories
1 घर शोधण्याच्या खाणाखुणा
2 घर घ्यायचे ते प्रकल्पाचा आराखडा बघूनच!
3 वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत ३० सप्टेंबपर्यंत!
Just Now!
X